लॉ-करिअरसाठी अनेक पर्याय

ॲड. असीम सरोदे, मानावी हक्क विश्‍लेषक, घटनातज्ज्ञ, कायदेविषयक भाष्यकार, क्रिमिनल वकील
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
कायद्याचा वापर व्यापक समाजपरिवर्तनासाठी करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल त्यांना वॉशिंग्टन येथील प्रतिष्ठेची अशोका फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.

कायद्याचा विस्तार ज्याप्रमाणे खूप मोठा आहे त्याचप्रमाणे लॉचे शिक्षण घेतल्यावर वेगवेगळ्या संधी आहेत. पण केवळ न्यायालयात काम करणे म्हणजेच वकिली असा मर्यादित समज सगळीकडे पसरविण्यात आल्याने या क्षेत्रातील अनेक संधींचा विचारच केला जात नाही. वकिलांची मोठी गर्दी अनेक न्यायालयांमध्ये असली तरीही कायद्याच्या न्यायालयीन प्रक्रियांची माहिती घेऊन व कायद्यातील तरतुदींचा नीट अभ्यास करून प्रत्यक्ष न्यायालयात काम करणाऱ्या प्रामाणिक वकिलांची आजही मोठी गरज आहे.  

वकील होऊन न्यायालयात केसेस चालविणे आणि यामध्ये फौजदारी म्हणजे गुन्हेगारी संदर्भातील केसेस, दिवाणी केसेस, लेबर, इंडस्ट्री, कंपनी, ग्राहक न्यायालय, को-ओपॅरेटिव्ही, विश्वस्त संस्था केसेस, कर सल्लागार म्हणून काम करणे किंवा कौटुंबिक न्यायालयातील केसेस चालविणे असे विविध मार्ग आहेत. केवळ कौटुंबिक न्यायालयात ठरवून वकिली करणे हे एक उत्तम करिअर होऊ शकते, यामध्य कौटुंबिक हिंसा, निर्वाहासाठी आर्थिक मदत, मुलाचा ताबा, निवास हक्क, ज्यूडीशिअल सेपरेशन या केसेस असतात. लॉ व कंपनी सेक्रेटरी या शिक्षणाचा मेळ घालून ‘कंपनी लीगल ॲडमिनिस्ट्रेशन’ आणि याचा थोडा स्कोप वाढविला तर ट्रेड मार्क्‍स, पेटंट, कॉपी राईट्‌स, बौद्धिक संपदा हक्क यासोबत कंपनी लॉ, आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे या क्षेत्रात काम करण्याच्या संधी वकिलांना मिळू शकतात. कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच LPO मध्ये विविध कंपन्या नवोदित वकिलांना कामाची संधी देतात. 

सोशल मीडियाचा वापर वेगाने वाढतो आहे. गुगलवर अवलंबून असणे, त्यावर येणारी माहितीच खरी आहे असे मानणे, मोठ्या, नामवंत राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना बदनाम करणारे मेम्स तयार करून प्रसारित करणे, बदनामीकारक, चुकीचा मजकूर प्रकाशित करणे, मुलींचे चेहरे मॉर्फ करणे व त्यांची बदनामी करणे, पैशाचे आमिष दाखवून बॅंकिंग फ्रॉड, एटीएम कार्डद्वारे फसवणूक अशा अनेक प्रकरणांत ‘सायबर लॉ एक्‍स्पर्ट’चे काम वाढल्याने सायबर लॉमध्ये प्राविण्य असलेल्या वकिलांना अनेक संधी आहेत. यासोबतच बौद्धिक संपदा हक्क नोंदणी (इंटलेक्‍टउल प्रॉपर्टी राईट्‌स), ट्रेड मार्क्‍स, पेटंट, सिनेमा क्षेत्रातील कलाकारांचे करार करणे, सिनेमा निर्मितीचे करार, गाणी व सिनेकथा यावरील कॉपी राईट्‌स असा कामाचा पट वाढत जाणारा आहे. 

कायद्याच्या क्षेत्रात काम करण्याच्या या प्रचलित पर्यायानंतर काही खूप माहिती नसलेले पर्याय व संधीसुद्धा नव वकिलांना उपलब्ध आहेत. ‘कायदा-पत्रकारिता’ हा त्यातील एक पर्याय. कायदा आणि पत्रकारिता यांच्या एकत्रित ज्ञानाचा उपयोग करून एक परिणामकारक व प्रभावी पत्रकार म्हणून काम करणाऱ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे, सामाजिक-राजकीय व कायदेविषयक संदर्भांचे नीट आकलन व न्यायालयांचे विविध निर्णय वाचून नेमके अन्वयार्थ काढण्याची क्षमता असणाऱ्यांनी ही संधी नक्की आजमावून बघावी अशी आकर्षक आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयात पत्रकारिता करायची असेल तर अशा पत्रकारांनी लॉचे शिक्षण घेतले असावे अशी अटच आहे व हळूहळू हा नियम सगळ्या न्यायालयांना लागू करण्यात येणार आहे. काही वर्षांचा कायदेविषयक-पत्रकारितेचा अनुभव विविध आंतरराष्ट्रीय फेलोशिप, मोठ्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनेमध्ये अधिक पगाराची नोकरी मिळविण्यासाठी उपयोगाची बाब ठरते.

स्पोर्टस लॉमध्ये स्पेशलायझेशन करण्यातून एक नवीन कामाची संधी मिळू शकते. तुलनेने हे नवीन क्षेत्र आहे, ज्यात वकिलांची गरज निर्माण व्हायला लागली आहे. आयपीएलसारख्या सामन्यांमुळे तर खेळाडूंमधील कॉन्ट्रॅक्‍ट, खेळाडूंचे विविध जाहिरात एजन्सीजसोबत होणारे करार, सट्टेबाजी व त्यात काही खेळाडू ओढले जाणे या अनेक वेळा वकिलांची गरज आहे हे लक्षात आल्याने यामध्ये कामाच्या संधी आहेत. 

कोर्टमधील कामाचा काही काळ अनुभव घेऊन न्यायाधीश होण्यासाठीची परीक्षा एमपीएससीद्वारे देता येते व प्रथम श्रेणी न्यायाधीश होता येते. ज्यांनी १० वर्षे वकील म्हणून काम केले त्यांना थेट जिल्हा न्यायाधीश पदासाठी परीक्षा आणि मुलखात देऊन तशी संधी मिळविता येते. केवळ कायदा माहिती असलेले, कायदा तोंडपाठ असलेले, न्यायालयाच्या प्रक्रिया माहिती असलेले प्रक्रियावादी, यांत्रिक विचार करणारे अनेक वकील आणि न्यायाधीश असू शकतात; मात्र कायद्याचे नेमके, पुरोगामी अन्वयार्थ काढण्याची क्षमता असलेले अनेक प्रामाणिक वकील व न्यायाधीश भारताला हवे आहेत. देशसेवा आणि न्यायनिष्ठा या भावनेने काम करण्याची मनापासून इच्छा असलेल्यांना खूप मोठी कामाची संधी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आहे. भारतात आता पर्यावरण कायद्यांत काम करण्याची संधी वकिलांना उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) येथे केवळ निसर्ग, परिसंस्था, जैवविविधता, पर्यावरण संबंधित केसेस चालतात. लॉ झाल्यावर काही छोटे पर्यावरणविषयक अभ्यासक्रम प्रत्यक्ष वकिली सुरू असतानाच करता येतात आणि त्याचा फायदा राष्ट्रीय हरित कोर्टमध्ये वकिली करताना होऊ शकतो. लॉ पदवी शिक्षण झाल्यावर पुढे मास्टर्स करून व मग पीएचडी करून लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर होता येते.

अनेक सामाजिक संस्थांमध्ये संवेदनशील वकिलांची गरज आहे. काही काळ असा अनुभव घेतल्यावर अगदी अमेन्स्टि इंटरनॅशनलसारख्या मोठ्या जागतिक संस्थांमध्ये काम करण्याच्या संधींसोबतच काही अत्यंत प्रतिष्ठित फेलोशिप मिळविता येतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक विभागांमध्ये जगातील अनेक देशांत असा अनुभव असलेल्या वकिलांना काम करण्याची संधी मिळू शकते. पुढे आतंरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट इत्यादी ठिकाणी काम करता येते. तसेच संयुक्त राष्ट्र संघटना, आतंरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट, अनेक जागतिक मानवी हक्क संघटना येथे इंटर्नशिप करून अनुभव वाढविता येतो आणि त्यानंतर मोठ्या मानाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.    

संबंधित बातम्या