करिअर आणि आरोग्य

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

एका परीक्षेच्या निरनिराळ्या विषयांसाठी क्लासेस, शाळा किंवा कॉलेजचे कंपल्सरी वर्ग, रात्रंदिवस जागरणे, जेवणा-खाण्याकडे दुर्लक्ष आणि अनेकदा सर्वावर कडी म्हणजे पालकांच्या आणि नातेवाइकांच्या जबरदस्त अपेक्षांचे ओझे, या सर्वांच्या दबावाखाली आरोग्यदायी जीवनशैली बासनात गुंडाळावी लागते. परिणामतः शारीरिक आजार, त्यातही बिघडलेल्या जीवनशैलीतून उद्‌भवणारे विकार आणि 'परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर?' या तणावाने उद्‌भवणारे मानसिक रोग या साऱ्या एकत्रित ‘पॅकेज’ला बहुसंख्य किशोरांना आणि तरुणाईला सामोरे जावे लागते.

आजच्या सुशिक्षित वर्गाचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष दोन प्रमुख कालखंडात मोडते. एक करिअर सुरू करण्यापूर्वीचा आणि दुसरा करिअर सुरू झाल्यानंतरचा. म्हणजे थोडक्यात करिअर आणि आरोग्य यामध्ये आजमितीला करिअरलाच झुकते माप दिले जाते. ग्लोबलायझेशनची लाट आल्यावर गेल्या पंचवीस-तीस वर्षाचा आढावा घेतला, तर भारतीय पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी आपल्या आयुष्यात आरोग्यापेक्षा करिअरलाच जीवनातले सर्वोच्च स्थान दिले आहे. 

आजच्या युवकांच्या शैक्षणिक आयुष्यातील स्वास्थ्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे ग्रहण लागले आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर अशा नेहमीच्याच करिअरसाठी नव्हे, तर आधुनिक जीवनातल्या प्रत्येक पद्धतीच्या उच्च शिक्षणक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा देणे भाग पडते आहे. आपल्या मुलाचे करिअर उत्तम व्हावे या इच्छेतून अनेक पालक त्यांच्या मुलांना या स्पर्धा परीक्षारूपी शर्यतीच्या तोंडी देतात. एका परीक्षेच्या निरनिराळ्या विषयांसाठी क्लासेस, शाळा किंवा कॉलेजचे कंपल्सरी वर्ग, रात्रंदिवस जागरणे, जेवणा-खाण्याकडे दुर्लक्ष आणि अनेकदा सर्वावर कडी म्हणजे पालकांच्या आणि नातेवाइकांच्या जबरदस्त अपेक्षांचे ओझे, या सर्वांच्या दबावाखाली आरोग्यमय जीवनशैली बासनात गुंडाळावी लागते. परिणामतः शारीरिक आजार, त्यातही बिघडलेल्या जीवनशैलीतून उद्‌भवणारे विकार आणि 'परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर?' या तणावाने उद्‌भवणारे मानसिक रोग या साऱ्या एकत्रित ‘पॅकेज’ला बहुसंख्य किशोरांना आणि तरुणाईला सामोरे जावे लागते.

परीक्षेत यश मिळाले आणि करिअरची सुरुवात झाली तरी आरोग्याची विस्कटलेली घडी ठीकठाक करायला फुरसत मिळत नाही आणि बऱ्याचदा ऐन तारुण्यात अनेकविध आजारांनी हे युवक ग्रासले जातात. परीक्षेत अपयश येणाऱ्या युवकांना नैराश्य ग्रासते आणि त्यातून आरोग्याची हेळसांड होतच राहते. परिणामतः हा वर्गही उत्तरायुष्यात मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांनी वेढलेला राहतो.

कोरोना महासाथीच्या काळात बंद असलेली शाळा-कॉलेजेस-क्लासेस, पुढे ढकलल्या जाणाऱ्या आणि रद्द होणाऱ्या परीक्षा, यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये आभासी जगाची सफर घडवून आणणाऱ्या संगणक आणि मोबाईलच्या माध्यमांचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ठायी ठायी आढळून येतेय. तसेच लॉकडाउनमुळे बाहेर न जाण्याने आणि खेळ-व्यायामापासून वंचित राहिल्याने अनेक आरोग्यसमस्या डोके वर काढत आहेत.

आजच्या युवकांची करिअर यात्रा साधारणतः इयत्ता नववीपासून सुरू होते आणि आयुष्यभरात ती आरोग्यपंढरीच्या दर्शनाला कायमची मुकते. भारतातल्या शालेय शिक्षण घेणाऱ्या जवळपास तीस टक्के मुलांच्या आरोग्याची ही शोकान्त कथा आहे.  

विविध आजार
करिअरची महत्त्वाकांक्षा आणि त्यामुळे फरफटत जाणारे जीवन यातून अनेक आजार निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने आहारातील समतोल नसल्याने होणारे आजार, व्यायाम नसल्याने होणारे त्रास, बैठी जीवनशैली आचरली जात असल्याने उद्‌भवणाऱ्या समस्या, नियमित झोपेकडे दुर्लक्ष आणि अपरिमित तणावातून जन्मणारे मानसिक दोष यांचा समावेश होतो. विद्यार्थीदशेत परीक्षांच्या अतिरिक्त तणावामुळे मुलांमध्ये खालील दुष्परिणाम मुख्यत्वे दिसून येतात.

अतिरिक्त वजनवाढ
समतोल आहाराचा अभाव, जंकफूड, फास्टफूड तसेच चमचमीत पदार्थ खाणे या सवयीमुळे, उंचीच्या आणि वयाच्या प्रमाणात आवश्यक असलेले आदर्श वजन राखण्यात बहुसंख्य मुलांना अपयश येते. अतिरिक्त वजनवाढ असलेल्या दहा वर्षाखालील लहानग्यांचे ‘बाळसेदार बाळ’ म्हणून कौतुक केले जाते. वाढत्या वजनासोबत पोट, कंबर आणि नितंब यांचे आकार वाढत जातात आणि त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्यांबरोबरच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यामुळे धमन्यांचे आजार होणे, हाडे ठिसूळ होणे, सांध्यांचे आणि मणक्यांचे आजार उद्‌भवतात. किशोरवयीन मुलींमध्ये पॉलिसिस्टीक ओव्हॅरियन डिसीज (पीसीओडी) हा विकार उद्‌भवून मासिक पाळी अनियमित होणे आणि पुढील आयुष्यात वंध्यत्वाच्या समस्या उभ्या राहू शकतात.

व्यायामाचा अभाव
करिअर सन्मुख जीवनशैलीमुळे दैनंदिन जीवन बैठ्या स्वरूपात होते. साध्या हालचाली टाळल्या जातात, व्यायामाकडे पूर्ण दुर्लक्ष होते. परिणामी शरीरात येणाऱ्या अतिरिक्त ऊर्जामूल्ये चरबीत रूपांतरीत होऊन वजनवाढ होते. त्यामुळे जीवनशैलीचे वर उल्लेखलेले आजार दिसून येतात.

असमतोल आणि अयोग्य आहार
‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार, कॅल्शिअम आणि तत्सम खनिजे न मिळाल्याने निर्माण होणारे हाडांचे तसेच स्नायूंचे दौर्बल्य अनेकांत आढळते. लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिन घटून अॅनिमियासारखे विकार आज तीस टक्क्याहून अधिक मुलांत आणि ५० टक्क्याहून अधिक मुलींमध्ये दिसून येतो.

विश्रांती
नियमित वेळेस आवश्यक तितका वेळ झोपणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. परंतु परीक्षार्थी जीवनक्रमात सर्वात आधी झोपेच्या वेळेवर अतिक्रमण होते. परिणामतः अभ्यासातील एकाग्रता आणि आकलनशक्ती कमी होते. वाचलेल्या आणि अभ्यासलेल्या गोष्टींचे विस्मरण वाढते. गणित आणि शास्त्र विषयात लागणारी निर्णयशक्ती घटते. ताणतणाव जास्त जाणवतो, मनाची शांती ढळते, चिडचिडेपणा वाढतो. चिंता आणि नैराश्य उद्‌भवण्याला हे बदल कारणीभूत ठरतात. 

असे असंख्य त्रास असलेले अनेक विद्यार्थी दवाखान्यात उपचाराला येतात. त्यांना त्यांच्या जीवनशैलीत आरोग्यदृष्ट्या बदल सुचवले जातात. पण आजच्या झटपट जमान्याला अनुसरून त्यांना त्यासाठी गोळ्या, औषधे, टॉनिक्स, इंजेक्शने हवी असतात; दिनक्रमात बदल करणे त्यांना नकोही असते. आणि आरोग्यापेक्षा करिअरला प्राधान्य असल्याने, हे बदल करायला त्यांना वेळही नसतो. ‘परीक्षा झाल्यावर हे बदल करू’, असे आश्वासन पालक आणि पाल्य दोघेही देतात, पण नेहमीप्रमाणे तो ‘उद्या’ कधीच उगवत नाही आणि सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांमध्ये हे आजार आयुष्यभर त्यांना पिडत राहतात.

कोरोना काळातील विद्यार्थांचे सर्वेक्षण
एकूण विद्यार्थ्यांपैकी ४४ टक्के विद्यार्थ्यांनी कोरोना काळात शारीरिक व्यायाम कमी केल्याची नोंद आहे, व्यायाम करण्याची इच्छाच न होणे हे कारण त्यातल्या एक तृतीयांश मुलांनी नमूद केले. उर्वरित  मुलांनी इच्छा आहे पण लॉकडाउनच्या निर्बंधामुळे करू शकलो नाही असे मत नोंदवले. याला मानसोपचार तज्ज्ञ ‘मोटिव्हेशन पॅरॅलिसिस’ म्हणून संबोधतात.

कोरोनाच्या महासाथीत प्रौढांप्रमाणे विद्यार्थ्यांनीदेखील आपले दैनंदिन नॉर्मल आयुष्य गमावले. सततची एक अनिश्चिततेची भावना आणि आजूबाजूचे आजाराचे आणि मृत्यूंचे थैमान याचा परिणाम मानसिकतेवर आणि शारीरिक स्वास्थ्यावर मोठ्या प्रमाणात झाला.  

यावर्षी २ एप्रिल ते २ मे दरम्यान दोन हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या केलेल्या एका नमुना सर्वेक्षणात विद्यार्थांच्या दैनंदिन जीवनशैलीत झालेल्या बदलांची एक झलक पाहायला मिळते.  आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे हे बदल होते. 

 • ४५ टक्के मुले जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हाच खात आहेत आणि ३८ टक्के मुलांमध्ये स्पष्टरीत्या कोरोनाच्या भीतीने मानसिक तणाव निर्माण होऊन अन्नावरची वासना उडाली आहे.  
 • ४१ टक्के मुलांमध्ये झोपेचे प्रमाण ३३ टक्क्यांनी कमी झाले आहे. यात ताणतणाव आणि त्यापोटी संगणक व मोबाईलवर अतिरिक्त वेळ घालवणे ही मुख्य कारणे आहेत. 
 • पंचवीस टक्के मुलांना संगणक आणि मोबाईलवर जास्त वेळ घालवूनही कोणताही शारीरिक त्रास जाणवला नाही.
 • ५४ टक्के मुलांमध्ये डोकेदुखी आणि ४६ टक्के मुलांना मान आणि खांदे दुखण्याचे त्रास जाणवत आहेत.
 • शहरी भागातील ६० टक्के मुलांची कोणतीही वैद्यकीय तपासणी झालेली नाही. हे प्रमाण ग्रामीण भागात ७८ टक्के आहे. 
 • आपले सर्वसाधारण आरोग्य कितपत चांगले आहे या प्रश्नावर १८ टक्के मुलांनी उत्कृष्ट, ४८ टक्के मुलांनी चांगले आहे, असे मत नोंदवले. तर १८ टक्के मुलांनी ठीक आणि १४ टक्के मुलांनी आपली तब्येत खालावल्याचे मत नोंदवले. 
 •  शाळा-कॉलेजात खेळात भाग घेणाऱ्या आणि नियमित व्यायाम करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी २६ टक्के मुलांनीच आपले स्वास्थ्य उत्तम टिकून आहे असे सांगितले.
 • कोरोनाचा आपल्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे मत ५० टक्के मुलांनी नोंदवले, तर ३३ टक्के मुले तटस्थ राहिली आणि १७ टक्के मुलांनी आपल्यावर काहीही परिणाम झाला नाही असे नमूद केले. 
 • आहार, व्यायाम, विश्रांती या तीन गोष्टी सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहिले. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या मुलांवर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम झाले असे या पाहणीत दिसून आले.

यशस्वी करिअरसाठी उत्तम आरोग्य 
कोणत्याही क्षेत्रातील करिअरसाठी उत्तम आरोग्य हा पाया असतो. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून करिअरच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी, त्या अभ्यासक्रमात उत्तम यश मिळवण्यासाठी आणि करिअरमध्ये यशस्वी होऊन ते यश दीर्घकाळ टिकवण्यासाठी आरोग्य उत्तम राखणे आवश्यक असते. त्यासाठी खालील सोप्या सूचना पाळणे गरजेचे.

 • आहार समतोल पाहिजे. गोड, तेलकट पदार्थ टाळावेत. जंकफूड, फास्टफूड कधीतरीच मौज म्हणून खावे. आहारात पालेभाज्या, फळे आणि प्रथिनांचा समावेश जास्त असावा.
 • आहाराच्या वेळा- दर ४ तासांनी थोडे थोडे खावे. मधे मधे अकारण काही खाऊ नये.
 • दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी पिण्याची सवय ठेवावी.
 • चहा, कॉफीसारखी उत्तेजक पेये; कोला पेये, एनर्जी ड्रिंक्स, एरीएटेड शीतपेये टाळावीत.
 • रोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम करावा. यात भरभर चालणे, पोहणे, सायकलिंग, धावणे, जॉगिंग, दोरीवरच्या उड्या अशा एरोबिक व्यायामांबरोबर जोर-बैठका, सूर्यनमस्कार, पुलअप्स, पुशअप्स, डिप्स, डंबेल्स अशा एनरोबिक व्यायामाचा समावेश असावा. परीक्षेच्या काळात व्यायामाची वेळ कमी करावी, पण व्यायाम बंद करू नये.
 • मेडीटेशन, ध्यान धारणा, एकाग्रतेचे व्यायाम यापैकी एक तरी गोष्ट रोज सकाळी लवकर उठून करावी.
 • रात्री जागरणे करू नयेत. साधारणतः रात्री १० ते ११ च्या दरम्यान झोपावे आणि सात ते साडेसात तास झोप नियमाने घ्यावी. दुपारी झोपू नये. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, टेलिव्हिजन, संगणकांचा वापर करू नये. त्यांच्या रेडीएशनचा झोपेवर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी पुस्तक वाचन, नोट्स काढणे यावर भर द्यावा.
 • सर्व मुलांनी इन्फ्लूएन्झा, टायफॉईड प्रतिबंधक लस दरवर्षी घ्यावी. इतर आवश्यक लशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात. 
 •  १८ वर्षाखालील युवक-युवतींनी आणि किशोर-किशोरींनी कोरोना प्रतिबंधक लस जरूर घ्यावी. 

थोडक्यात सांगायचे तर आर्थिक तत्त्वांवर चालणाऱ्या आजच्या युगात करिअर नक्कीच महत्त्वाचे आहे; पण ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे वचनही युगानुयुगे सत्य आहे हेदेखील ध्यानात ठेवावे.

संबंधित बातम्या