यशस्वी करिअर व संपन्न व्यक्तिमत्त्व

डॉ. विद्याधर बापट
सोमवार, 27 जून 2022

सुरुवात करावी लागते ती व्यक्तिमत्त्वामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. काल्पनिक भीती, स्वतःविषयीच्या चुकीच्या; नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडिओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव ह्या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याच बरोबर आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.

यशस्वी करिअर झालं असं आपल्याला केव्हा म्हणता येईल, तर झेपेल, रुचेल अशा व्यावसायिक पदवीची, करिअरची निवड आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास झाला तर. तोही खऱ्या अर्थानं होतो तेव्हा. तो झाला नाही तर कुठल्याही विद्यापीठाची कितीही मोठी पदवी मिळाली तरी एक समृध्द आयुष्य जगायला ती अपुरीच पडते.

खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्त्व विकास झाला नाही; रुजायला हवीत अशी मूल्य आपल्यात रुजली नाहीत; आयुष्य आनंदी, शांत, स्थिर, कणखरपणे जगण्यासाठीचे चांगले गुण आपल्यात विकसित झाले नाहीत, तर पदवी मिळवूनही, आपण अशिक्षितच राहतो. मुळात करिअर करायचं कशासाठी, तर बुद्धिमत्तेला, स्वतःतल्या क्षमतांना न्याय देण्यासाठी. पैसा, प्रतिष्ठा ही उद्दिष्ट ओघानं येतात. 

लहानपणापासून विकासाची सुरुवात होते. पण तारुण्यावस्था, विशेष करून महाविद्यालयीन आयुष्य सुरू झालं की उडण्यासाठी भलं मोठं विशाल आकाश आपल्यासाठी मोकळं होतं. आपल्यातला ‘मी’ ह्या मोकळ्या आकाशात छानपैकी विहरू शकण्यासाठी आपल्या पंखात आवश्यक ते बळ निर्माण होण्याची हीच वेळ असते. आव्हानांना सामोरं जाण्याची आणि विनाशाकडे नेणारे मोह टाळण्याची शक्ती ह्याच काळात निर्माण होऊ शकते. हा काळ  एका अर्थानं स्वातंत्र्याचाही असतो. त्यात स्वैराचाराकडे झुकण्याची शक्यता असते. प्रचंड ऊर्जा ओसंडून वाहत असते; म्हणूनच काळजीपूर्वक पावलं टाकणं महत्त्वाचं असतं. कुठले मोह आपण टाळायला हवेत आणि कुठल्या स्ट्रेंथ आपण गोळा करायला हव्या, हे पाहणं महत्त्वाचं. ह्या गोष्टी एकदा समजल्या अन पाळल्या की संपूर्ण आयुष्यभर आठवत राहतील असे आनंदाचे क्षण आपल्याला भरभरून मिळतात.

महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया, की मेंदूच्या पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग अर्थात पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशनची तयारी ह्या काळात होऊ शकते. ज्या पायावर एक संपूर्ण आनंदी आणि कणखर मन उभं राहू शकतं. आणि त्यावरच समृद्धीचे सहा सोपान -म्हणजे उत्कृष्ट शारीरिक आरोग्य, उत्कृष्ट मानसिक आरोग्य, आसपासच्या माणसांबरोबरच पशुपक्षी आणि एकूणच निसर्गाबरोबरचं निकोप नातं, पुरेसा पैसा; आनंद मिळवण्याची कला आणि निरंतर समाधानी अवस्था -साध्य होतात. 

ह्यासाठी मेंदूच्या न्यूरोनल नेटवर्कला विशिष्ट गोष्टी करण्याची शिस्त लावावी लागते. यश अपयशापेक्षा शंभर टक्के प्रयत्न करणं आणि प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत आनंद घेणं हेच महत्त्वाचे आहे, हीच मनाची आयुष्यभरासाठी धारणा व्हायला हवी. हे सगळं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित घडू शकतं.

ह्या काळात मिळवण्याच्या, कमवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी अर्थात बलस्थानं - एक, शारीरिक क्षमतेचा विकास. दोन, व्यक्तिमत्त्व विकास. तीन, नियमित अभ्यास आणि एकाग्रता. चार, सर्व प्रकारच्या व्यसनांपासून आणि अनैतिक गोष्टींपासून दूर राहणं. पाच, कलाकौशल्य, क्रीडानैपुण्य, नेतृत्वगुण, चांगले मैत्र आणि सहावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाविद्यालयीन जीवनात आवश्यक व पुढील जीवनात उपयोगी अशी आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्ये.

व्यक्तिमत्त्व विकास
‘व्यक्तिमत्त्व विकास’ ह्या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पाहायला हवे. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, परंतु त्याचबरोबर  चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनशील असणं, त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्त्व होणं जास्त महत्त्वाचं. आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. प्रयत्नांती असं व्यक्तिमत्त्व मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. ह्या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रं, व्यायाम शिकवणारी तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी, म्हणजेच आतलं विश्व शांत, स्वस्थ आणि आनंदी  करणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्त्व विकास झाला असं म्हणता येईल.

सुरुवात महत्त्वाची
ह्या सगळ्याची सुरुवात करावी लागते ती व्यक्तिमत्त्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. काल्पनिक भीती, स्वतःविषयीच्या चुकीच्या; नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडिओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक परिणाम ह्या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याच बरोबर आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.
व्यक्तिमत्त्व विकासातील काही महत्त्वाची साध्ये

स्वतःत रुजवायला हवं की - 

 • माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश ह्यापेक्षा माझ्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, त्या प्रक्रियेतला आनंद महत्त्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुःख करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन, आणि निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्त्वं मी आयुष्यभर पाळेन. ते माझ्या विचारसरणीचा भाग होऊन जाईल.
 • माझं ‘आतलं’ विश्व मी कायम शांत, स्वस्थ, आनंदी आणि कणखर ठेऊ शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्वीकारेन.
 • आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने  व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मला मिळवता येतील.
 •   मी स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. मी समाजाचा भाग आहे आणि समाजाप्रती माझी काही कर्तव्ये आहेत. मी चांगली मूल्ये जोपासेन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही.
 • प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काही बलस्थाने दिली आहेत. माझ्यातील बलस्थाने मी ओळखेन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी करेन. 
 • ह्या जगातील प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट महत्त्वाची आहे. मी आत्मसन्मान ठेवला पाहिजे तसाच इतरांचाही आदर राखला पाहिजे. मुख्यतः स्त्रियांचा.
 • दोन्ही दिशांनी -इनर जर्नी व आउटर जर्नी- करावयाच्या प्रयत्नांमध्ये मधे काय येतं? वरील साध्ये आत रुजवणे. स्वस्थतेची तंत्रे, साक्षीभाव ठेवण्याची तंत्रे, सकारात्मक विचारसरणी स्वभावाचा भाग होण्यासाठीचे मनाचे व्यायाम, भावनांचे सबलीकरण, बुद्धिमत्तेचा, कल्पनाशक्तीचा सृजनात्मक वापर,  आत्मविश्वास, धैर्य, नेतृत्वगुण, संवादकौशल्यं, टाइम मॅनेजमेंट वगैरे गुणांबरोबरच दडपणाखाली काम करण्याची क्षमता विकसित करण्याची तंत्रे, मित्रमैत्रिणी सहकाऱ्यांबरोबर छान संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता विकसित करणे, नकारात्मक वातावरणातही काम करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक आयुष्य व शैक्षणिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याची कला (Compartmentalization) ह्यासाठीची तंत्रे शिकून घेणे.

विकसित व्यक्तिमत्त्वाची मुले आयुष्यात काय करू शकतात

 • आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकतात.
 • ताणतणाव चांगल्या रीतीने हाताळू शकतात.
 • कठीण प्रसंगात न डगमगता योग्य निर्णय घेऊ शकतात. 
 • यश डोक्यात जाऊ देत नाहीत वा अपयश आल्यास खचून जात नाहीत. 
 • नवीन कौशल्ये खूप लवकर आत्मसात करतात. 
 • संवादकौशल्ये, आत्मविश्वास व सकारात्मकतेने छाप पाडू शकतात. 
 • आपल्या क्षमता शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करणे व त्या प्रक्रियेचा आनंद घेणे त्यांना जमू शकते.
 • केवळ स्वतःपुरता विचार न करता इतर व्यक्तींच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतात.
 • स्वतःच्या विकासाबरोबरच कुटुंब, समाज ह्यांच्या सर्जनाचे भान त्यांना असते.
 • आवश्यक व उपयोगी व्यवस्थापकीय कौशल्ये
 1.  वेळेचे व्यवस्थापन- असाईनमेंट, सबमिशन, परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यापासून ते व्यायाम, खेळ, झोप, आहाराच्या वेळा, घरची कामे, वैयक्तिक आणि सामाजिक कर्तव्ये सगळ्याचे काटेकोर नियोजन करावे. दैनंदिन, आठवड्याचे, महिन्याचे वेळापत्रक करावे. त्यासाठी आधी प्राथमिकता (Priorities) ठरवाव्या.  
 2. आर्थिक नियोजन - परीक्षेच्या फीपासून मोबाईलच्या खर्चापर्यंत काटेकोर नियोजन. प्रत्येक पैसा आवश्यक तेवढा आणि तिथेच खर्च होतोय हे पाहणे महत्त्वाचे. मजाही करावी परंतु बंधन असावे.
 3. भावनांचे व्यवस्थापन - कुठलीही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याचे प्रशिक्षण महत्त्वाचे. मग ते वैयक्तिक मानसिक स्वास्थ्य, भावनिक समतोल, मैत्री, प्रेमसंबंध ते मित्रांच्या गटाचे निर्णय, योग्य वर्तनाचे सामाजिक भान या सगळ्यालाच हे लागू आहे.
 4.  वाटचालीचा, वर्तनाचा मागोवा (Periodical Review) आपण ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने प्रत्येक कृती होते आहे की नाही, प्रत्येक गोष्टीचे ठरवल्याप्रमाणे व्यवस्थापन घडते आहे की नाही ह्याचा ठरावीक काळाने मागोवा घेत राहायला हवा. होत असेल तर स्वतःला शाबासकी द्यायला हवी. होत नसेल तर स्वतःत आवश्यक त्या दुरुस्त्या करायला हव्यात.
 5. एकूण काय, विचारात, वागणुकीत तारतम्य बाळगलं, स्वयंशिस्त आखली, बेभानपणातील आनंद आणि मर्यादा ओळखल्या तर तारुण्यातला उत्साह, आनंद, भरभरून उपभोगण्याचा हा काळ आहे. भरपूर काही आत्मसात करण्याचा, स्वतःला ओळखण्याचा हा काळ  आहे. ह्या काळातलं आनंदाचं संचित पूर्ण आयुष्यभर पुरतं.

मग खऱ्या अर्थाने, निवडलेले व्यावसायिक करिअर यशस्वी होते. स्वप्न पूर्ण व्हायला मदत होते. मुख्य म्हणजे आनंद आणि मनःशांती मिळायला मदत होते, ज्यासाठी सर्व मनुष्यमात्र धडपडत असतात!

(लेखक ज्येष्ठ मानस तज्ज्ञ आहेत.)

संबंधित बातम्या