करिअर निवड कशी करायची, कुणी करायची?

 डॉ. विजय पांढरीपांडे
सोमवार, 27 जून 2022

नव्या तंत्रज्ञानामुळे जग सातत्याने, द्रुतगतीने बदलत जाणार आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची ओळख असल्याशिवाय, ते वापरण्याची क्षमता असल्याशिवाय नोकरीत/ व्यवसायात टिकून राहणे कठीण होणार आहे. भविष्याचा विचार करता बहुशाखीय ज्ञान, इंटर-डिसिप्लीनरी नॉलेजही, गरजेचे आहे.

करिअर कसे निवडायचे? कुठे स्कोप आहे? तरुण मुलांच्या मनात नेहमीच हे प्रश्न असतात. या प्रश्नाच्या तळाशी मूळ प्रश्न असतो, तो म्हणजे की कोणत्या क्षेत्रांत जास्त संधी आहे, पैसा आहे? नोकरी, करिअर हे जास्तीत जास्त कमाईसाठीच करायचे असा एक समज, नव्हे तशी पक्की धारणा झाली आहे तरुण पिढीतल्या बऱ्याचजणांची.

करिअरसंबंधी  स्वतःला खरे तर वेगळेच प्रश्न विचारायला हवेत. ते म्हणजे मला काय करणे आवडेल? (नुसताच ‘मला काय आवडेल?’ हा चुकीचा प्रश्न. इथे ‘करणे’ शब्द महत्त्वाचा). दुसरा प्रश्न, जे करायला आवडेल ते करण्याची माझी क्षमता आहे का? हा प्रश्न विचारताना आपल्या बौद्धिक आणि आर्थिक अशा दोन्ही क्षमतांचा विचार करायला हवा. आज करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत; किंबहुना आपल्याला गोंधळात टाकू शकतील इतके पर्याय उपलब्ध आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नाचीही बरीच चर्चा होत असते. पण गांधीजींच्या तत्त्वानुसार इथे प्रत्येक व्यक्तीसाठी जॉब आहे. प्रत्येकाची गरज पुरविण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. पण हाव मात्र नको. म्हणतातच ना, नीड कॅन बी सॅटिस्‌फाईड, बट नॉट ग्रीड!

मुलाने/ मुलीने आपले करिअर स्वतः ठरवावे. पालकांचा, इतरांचा सल्ला जरूर घ्यावा. पण त्यांच्यावर विसंबून राहू नये. शेवटी आपला निर्णय आपणच घ्यावा. कारण प्रश्न आपल्या आयुष्याचा, भविष्याचा आहे; पालकाच्या, मित्रांच्या नाही. इतरांचे सल्ले त्यांच्यात्यांच्या अनुभवावर आधारित असतात. प्रत्येकासाठी परिस्थिती वेगवेगळी असू शकते. एकाचे कपडे दुसऱ्याला फिट होणार नाहीत, तसेच हे. दुसरे असे की बऱ्याचदा तुमची पदवी, तुमचा अभ्यासक्रम यांचा तुमच्या नोकरीतील कामाशी फारसा संबंध असतोच असे नाही. म्हणजे सगळेच शिक्षण निरर्थक असते, असे म्हणायचे नाहीये. शिक्षण आपल्याला नवे नवे शिकायला शिकवते! करिअर करताना त्या त्या कामाच्या, प्रोजेक्टच्या गरजेनुसार पुन्हा शिकावेच लागते. आयटी क्षेत्रात गेलेली सर्व माणसे एन्ट्री लेव्हललाच आयटी तज्ज्ञ होती/ असतात, असे मुळीच नाही. आयएएस, आयपीएस झालेल्यांना सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे काम करावे लागते. त्यांचा माणसांशी, समाजाशी थेट संबंध येत असल्याने त्यांचे संवाद कौशल्य; निर्णय कौशल्य महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाण महत्त्वाची असते. म्हणजे नोकरी आणि व्यवसायातही गरजेनुसार तुम्हाला सतत नवे शिकावे लागते.

आता तर इन्फो-टेक, नॅनो-टेक, एआय अशांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे जग सातत्याने, द्रुतगतीने बदलत जाणार आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची ओळख असल्याशिवाय, ते वापरण्याची क्षमता असल्याशिवाय नोकरीत/ व्यवसायात टिकून राहणे कठीण जाणार आहे. मी अमुकच काम करेन, मला फक्त एवढेच येते; मी नवीन काही शिकू शकणार नाही, हा हट्ट, दुराग्रह आता चालणार नाही. तसेच कोणतेही काम कमी प्रतीचे, कमी महत्त्वाचे नसते. कामाच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने तुम्हाला तुमचे स्थान, तुमची गरज निर्माण करावी लागते. मात्र, जे काम तुम्ही करता, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, समाधान लाभले पाहिजे. पगार, पॅकेज दरवेळेसच महत्त्वाचे नसते. पैसा असूनही त्याचा फारसा उपयोग नसतो, हे आपण लॉकडाउनच्या काळात अनुभवले आहेच. 

आता प्रत्येकाला माहिती-तंत्रज्ञानासारख्या क्षेत्राचे आकर्षण असते. पण त्या क्षेत्रात बरेच ताण तणाव असतात. वैद्यकीय व्यवसायात आपत्कालीन परिस्थितीसाठी मानसिक तयारी असावी लागते, वेळेचे बंधन नसते. त्यामुळे करिअर निवडताना माझी प्रकृती, स्वभाव कसा आहे, मला काय जमेल, काय जमणार नाही याचाही विचार जरूर केला पाहिजे. अनेक नोकऱ्या फिरतीच्या असतात, कुटुंबापासून दूर राहावे लागते. कुठे प्रोजेक्टची डेड लाईन पाळावी लागते. 

नोकऱ्या मिळत नाहीत, अशी तक्रार जेव्हा केली जाते, तेव्हा बऱ्याचदा दहा ते पाच अशा नोकरीची अपेक्षा असते, असे दिसून येते. जिथे एकदा चिकटले की तुम्हाला कुणी काढू शकत नाही याची खात्री असते. काम करा किंवा करू नका, एक तारखेला ठरलेला पगार मिळणार हे निश्चित असते. खासगी क्षेत्रात हे असे लाड चालत नाहीत. तिथे दरमहा केलेल्या कामाचा हिशेब द्यावा लागतो. दर वर्षी मूल्यमापन होते. 

थोडक्यात नोकरीत/ व्यवसायात तुम्ही तुमची गरज निर्माण केली पाहिजे. नवे सातत्याने शिकण्याची तयारी पाहिजे. परिश्रम, प्रामाणिकपणा, मिळून मिसळून काम करण्याची तयारी, उत्तम संवाद कौशल्य हे गुण असतील तर करिअरच्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. शिखरावर पोहचाल. 

भविष्याचा विचार करता आणखीन एक बदल जाणवतो. तो म्हणजे तुम्हाला बहुशाखीय ज्ञान, इंटर-डिसिप्लीनरी नॉलेज, गरजेचे आहे. डॉक्टरला नव्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचे ज्ञान हवे. पूर्वी कार हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विषय होता, आताची कार हा बहुतांश इलेक्ट्रॉनिक, संगणक तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. संगीताच्या क्षेत्रात देखील बरीच वाद्ये इलेक्ट्रॉनिक तंत्रावर चालतात. सिनेक्षेत्रात संगणकाचा खूप उपयोग होतो. बँकिंगचे व्यवहार संगणकामुळे आरपार बदललेला आपण पाहतो. एवढेच कशाला खडू-फळ्याचे शिक्षणही ऑनलाइन झालेले आपण अनुभवले.

एकूण काय या सर्व बदलांना सामोरे जायची तयारी ठेवली, तर माझे काय होईल, जॉब मिळेल की नाही, अशी चिंता करण्याची काहीच गरज नाही. जे कोणत्याही बदलाला सामोरे जायला, परिश्रम करायला तयार आहे, नावीन्याचा सामना करायला, नवनवीन गोष्टी शिकायला तयार आहेत त्यांना काळजी नको.

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

संबंधित बातम्या