‘न्यू नॉर्मल’मधील शिक्षण

डॉ. श्रीराम गीत
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडे कोणते स्किल सेट्स असावेत? पालकांनी या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे? बदलत्या परिस्थितीत करिअरचा नेमका मार्ग शोधताना समोर येणारी आव्हाने कोणती? येत्या पाच-दहा वर्षांत स्कोप असणारी क्षेत्रे कोणती? करिअर निवडण्यापूर्वी करिअर काउन्सिलिंग किती गरजेचे आहे? या सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करणारा लेख...  

कोरोनाने जसा इतर क्षेत्रांवर परिणाम केला आहे, तसाच परिणाम शिक्षण क्षेत्रावरदेखील झाला आहे. मात्र पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोरोनाला घाबरून न जाता या दोन वर्षांत अडलेले शिक्षण आणि कोरोनानंतरचे शिक्षण याच्यावर मात कशी करायची याबद्दल विचार सुरू करावा. मुलांमधील ‘चौकस’पणा प्रचंड वाढवायला पाहिजे. कारण कोणतीही शाखा असली तरी, मुलांमध्ये जर ‘चौकस’पणा असेल, तर स्वाभाविकपणे लागणाऱ्या कौशल्यांचा विकास कसा करायचा याचा रस्ता मूल स्वतः शोधत असते.

पालकांनी लक्षात घ्यायचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘नियमित’पणा. विद्यार्थ्यांमध्ये नुसता चौकसपणा असून चालत नाही, तर त्याला नियमितपणाची जोड असायला हवी. शालेय जीवनात नियमितपणाला प्रचंड महत्त्व असते. तेव्हा मुलांच्या अंगात आज्ञाधारकपणा असतो, उर्मटपणा अंगी बाणलेला नसतो. शाळेमध्ये वेगळे काही केले तर आपले मित्र टिंगलटवाळी करतील. चुकीचे वागलो तर शिक्षक शिक्षा करतील याची जाणीव कुठेतरी असते. त्यामुळे पूर्णपणे मोकाट सुटलेली मुले हा प्रकार शालेय जीवनात फार क्वचित सापडतो. नियमितपणा म्हणजे काय? तो फक्त अभ्यासाच्याच बाबतीत लागू होतो का? तर नाही. नियमितपणा हा सगळ्या बाबतीत असला पाहिजे. वह्या-पुस्तके जागेवर ठेवणे, अभ्यास करताना सर्व विषयांना समान वेळ देणे याबरोबरच इतर गोष्टींमध्येही नियमितपणा हवा. 

सर्वांत महत्त्वाची आणि आयुष्याला एक छानसे वळण देणारी गोष्ट म्हणजे इयत्ता अकरावी-बारावी! वेळेवर उठणे, वेळेवर स्वतःचे आवरणे आणि स्वतःच्या उद्योगाला लागणे या सगळ्या चांगल्या सवयींमध्ये खंड पडण्याची सुरुवात अकरावी-बारावीत होत असते. उदा. आज सुटी आहे, तर दहा वाजता उठलो. बारावीनंतरचे कोर्सेस शोधत बसलो म्हणून रात्री अडीच वाजता झोपलो. इथे मी अगदी साधा सल्ला देईन; ‘आई उठली की घर उठले आणि बाबा झोपले की घर झोपले,’ हे जी मुले पाळतात त्यांची आयुष्यात कधीही पंचाईत होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा चौकसपणाच्या जोडीला नियमितपणा हवा, हे प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांनी लक्षात ठेवायला हवे.

तिसरी महत्त्वाची गोष्ट शिकवणी-क्लास. शिकवणी उपयुक्त आणि गरजेचीही असते. पण तिथे मुख्यतः परीक्षेचे टेक्निक शिकवले जाते. मूळ अभ्यास शिकवला जातो का, याविषयी मला शंका आहे. कारण मूळचा अभ्यास हा पाठ्यपुस्तकामधून होत असतो. वर्गात शिक्षकांनी शिकवलेले, फळ्यावर दाखवलेले डोक्यात काहीतरी बसते, पण ते कळते की नाही याबद्दल शंका असतात. त्याचे सुलभीकरण शिकवणीमध्ये केले जाते. शेवटी ज्याला आपण ‘सेल्फ स्टडी’ किंवा ‘स्वयंअभ्यास’ असे म्हणतो, त्याची सुरुवात मात्र पाठ्यपुस्तकामधूनच करायची असते.

म्हणजेच चौकसपणातून प्रश्न पडले, नियमितपणा अंगात बाणला आणि स्वयंअभ्यासाला सुरुवात केली, तर अकरावी-बारावीची वर्षे अत्यंत प्रगतीची, चांगल्या वाटचालीची आणि नेमक्या करिअरकडे घेऊन जाणारी ठरू शकतात.

शाखा निवड      
शाखा निवडीबद्दलही पालकांच्या मनात प्रचंड गोंधळ असतो. त्याबद्दल थोडक्यात सांगायचे, तर गुण किती मिळाले यावरून पालकांनी निर्णय घेऊ नये. कारण जी मुले किंवा पालक गुणांनुसार निर्णय घेतात त्यांना बारावीनंतर शंभर नाही, तर दोनशे टक्के पश्चात्ताप करण्याची वेळ येते. हेच आकडेवारीतून सांगायचे, तर ९० -९५ टक्के गुण मिळाले असताना शास्त्र शाखेला प्रवेश घेतला नाही तर पाप लागेल, अशी भावना अनेक पालकांच्या मनात असते. विद्यार्थ्यांना तर त्या शास्त्र शाखेमध्ये काहीतरी मोठेच्या मोठे गौडबंगाल ठेवले आहे, असे वाटत असते. पण खरेतर शास्त्र शाखा फक्त तीन प्रकारच्या लोकांसाठी आहे. 

ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे, त्यांना शास्त्र शाखेला प्रवेश घेण्यावाचून पर्याय नाही. मेडिकल, पॅरामेडिकल, फार्मसी या ग्रुपसाठी शास्त्र शाखेला प्रवेश घ्यायलाच पाहिजे. दुसरा रस्ता आहे इंजिनिअरिंगचा. इंजिनिअरिंगसाठी शास्त्र शाखा हा एक मोठ्या, गरजेचा आणि आवश्यक रस्ता ठरतो. डिप्लोमाचाही रस्ता इंजिनिअरिंगकरिता उपलब्ध असतो. तिसरा रस्ता आहे, संशोधनाची आवड असणाऱ्यांसाठी. काही वेगळे करायचे आहे, त्यांच्यासाठी शास्त्र शाखेचाच रस्ता अत्यावश्यक आहे. याला जोडून येतो तो आर्किटेक्चरचा रस्ता. थोडक्यात मेडिकल, पॅरामेडिकल, फार्मसी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आर्किटेक्चर आणि संशोधन याशिवाय कोणालाही शास्त्र शाखेला प्रवेश घेण्याची गरज नाही. 

वाणिज्य शाखा किंवा कॉमर्स म्हटले की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त सीए, सीएस आणि एमबीए एवढ्याच गोष्टी येतात. खरे सांगायचे तर कॉमर्स म्हणजे ‘स्काय इज द लिमिट’ आणि ‘एव्हरीथिंग अंडर द सन कम्स् अंडर कॉमर्स!’ अगदी सध्या ओळीत मांडणी करायची झाली, तर कोणतीही गोष्ट आपण विकत घेतो, म्हणजे ‘पर्चेस’ करतो. एखादी गोष्ट विकतो, म्हणजे ‘सेल’ करतो. वस्तूंची, धान्यांची साठवणूक करतो, म्हणजे ‘स्टोअर’ करतो. या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाइन, दुकानातून किंवा एखाद्या मॉलमधून विकत घेतो. या सगळ्याबद्दल एकत्रित बोलायचे झाले तर ते आहे ‘लॉजिस्टिक्स’. या लॉजिस्टिक्सच्या जोडीला पुढचा टप्पा येतो तो या सगळ्याची ‘डिलिव्हरी’. लॉजिस्टिक्समधली डिलिव्हरी अत्यंत महत्त्वाची. उदा. ॲमेझॉनवर तीन दिवसांत पाच लाख वस्तूंची डिलिव्हरी कशी दिली जाते हासुद्धा एक गहन प्रश्नच आहे. त्याच्या जोडीला पुढचा मुद्दा येतो त्याचे ‘मार्केटिंग’. टीव्ही सगळेच बघतात पण टीव्हीवरची सगळ्यात आवडती जाहिरात कोणती? कोणत्या जाहिरातीला आपण दाद देतो? काय दाद देतो? यांच्याबद्दलचा विचार. अशा स्वरूपाचे जर काही तयार करायचे असेल, तर मग ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग! या सगळ्याची जोड स्वाभाविकपणे कॉमर्समधून सुरू होते.

खरेदी असो, विक्री असो किंवा मार्केटिंग असो या सगळ्याकरिता पैसा लागतो. हा पैसा येतो कुठून, जातो कुठे, त्याचे करायचे काय, त्यातून फायदा कोणाचा होतो आणि हा पैसा ठेवायचा तरी कुठे? या सगळ्याची सुरुवात कुठून होते, तर ती फायनान्स आणि बँकिंगमधून. पण असा विचार करणारे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी फार नसतात. पुस्तकी ज्ञान अधिक असते. चेकची ट्रान्झॅक्शन, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, पेटीएम, गुगल-पे अशा गोष्टी वापरणाऱ्या एखाद्या वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या मुलाला ही सगळी ट्रान्झॅक्शन कशी घडतात विचारले तर त्याला सांगता येत नाही. याच वेळेला एक महत्त्वाची गोष्ट येते, ती सध्या टॅलीमधून केली जाते. त्याला ‘खतावणी’ किंवा ‘अकाउंट्स’ असा शब्द आहे. आपल्या पाठीच्या कण्याप्रमाणे हा कॉमर्सचा कणा आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

वाणिज्य शाखेचे जवळजवळ ८० टक्के पदवीधर अकाउंट्समधूनच कामाला सुरुवात करून त्यातीलच विविध स्वरूपाची कामे करतात. यामध्ये टॅक्सेशन, इन्कम टॅक्स, जीएसटी यांचा समावेश होतो. ‘टॅक्सेशन’ हे एक प्रचंड मोठे क्षेत्र त्यातून निर्माण होऊ शकते. या सगळ्याला कायद्याची आणि कंपनी अॅक्टची जोड लागते. त्यामुळे कंपनी अॅक्टच्या संदर्भातील काही तरतुदी माहिती असण्याची गरज वाटते. या सगळ्यामध्ये काम करायचे म्हणजे सीएसच व्हायला पाहिजे असे नाही, तर ‘एचआर कम सीएस कम लॉ’ अशा स्वरूपातसुद्धा कॉमर्समधली कौशल्ये विकसित करून बी.कॉम. ग्रॅज्युएटसुद्धा पुढे जाऊ शकतो.    

वाणिज्य शाखेच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ७५ ते ८५ टक्के गुण मिळाल्यानंतर वाणिज्य शाखा घेऊन सीए, सीएस करू, त्यासाठी क्लास लावू, अशा स्वरूपाचे विचार अनेक मुलांच्या डोक्यात येतात. इथेही स्वयंअभ्यासाला, नियमितपणाला महत्त्व आहे. सीए, सीएस, एलएलबी, एमबीए करावेसे वाटत असेल तर एका बैठकीत कमीतकमी २० इंग्रजी पाने वाचून काढायला हवीत. कारण या सर्व अभ्यासक्रमांची बरीचशी पुस्तके किमान हजार पानांची असतात आणि हजार पाने वाचून झाल्यानंतरच तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी बोलता येणार आहे. त्यामुळे एकावेळी वीस पाने वाचण्याची सवय अकरावी-बारावीत स्वतःला लावावी लागते. त्यासाठी ‘रीडिंग कपॅसिटी’ हा शब्द मी वापरतो. 

इयत्ता दहावीपर्यंत ‘फिलिंग द ब्लँक्स’ या पद्धतीत अनेक प्रश्न असतात. सलग निबंध लिहिला तरी तो जेमतेम २०० शब्दांचा असतो. याउलट महाविद्यालयीन परीक्षांमध्ये कोणत्याही उत्तरासाठी किमान ३०० शब्द लिहायचे असतात. म्हणजे फुलस्केपचे एक पान पूर्ण करायचे असते. ते पान पूर्ण करून जेव्हा तुम्ही पुढच्या पानावर जाता तेव्हा कुठे तुमच्या डिस्टिंक्शनच्या गुणांना सुरुवात होत असते. त्यामुळे अकरावी-बारावीच्या मुलांनी याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे लिहिण्याची सवय मोडत चालली आहे. लिहिण्याच्या सवयीमध्ये स्वतःच्या शब्दांत लिहिण्याला फार महत्त्व आहे. तेव्हा स्वतःच्या शब्दांत लिहिणे, पूर्ण फुलस्केप लिहिणे आणि बारा पाने तीन तासांत पूर्ण करणे या तीन गोष्टींवर इयत्ता अकरावी-बारावीच्या, कला आणि वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक भर देणे गरजेचे आहे.

अलीकडे गुण कमी मिळाले म्हणून कला शाखेला प्रवेश घेतला असे म्हणण्याऱ्यांपेक्षा मला कला शाखेलाच प्रवेश घ्यायचा आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र कला शाखेमधल्या काही विषयांविषयीचे आकर्षण म्हणून तिकडे जाण्याऐवजी आपल्याला कला शाखेचा एकत्रित आणि संपूर्णपणे विचार करून शिकायचे आहे, असे लक्षात घेऊन जे विद्यार्थी वाटचाल करतात त्यांना कला शाखेमध्ये सुंदर यश मिळते. कला शाखेमध्ये शाळेत शिकलेलेच मराठी, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्राचेच राज्यशास्त्रात; इतिहासाचे समाजशास्त्रात रूपांतर झालेले असते आणि अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र नव्याने आलेले विषय असतात. तसेच लॉजिक आणि फिलॉसॉफी हे अनोळखी विषय येत असतात. पण या विषयांच्या जोडीला अजून काहीतरी परदेशी भाषा शिकायची आहे. हिंदी-मराठी-संस्कृत यांच्यावर भर द्यायचा आहे, अशाही पद्धतीने पुढे जाण्याचा काही मुलांचा विचार असतो. प्रमाणभाषा, व्याकरणशुद्ध भाषा, मातृभाषेवर पकड आणि व्यक्त करण्याची भाषा म्हणून इंग्रजी, या गोष्टी तुम्हाला जमल्या, तर परदेशी भाषेच्या संदर्भातील शिक्षण यशाकडे नेते. भाषांच्या जोडीला एकत्रित विचार करायचा तर इतिहास सुटा शिकायचा नाही, त्याला भूगोलाची जोड द्यायची. इतिहास-भूगोल शिकताना महाराष्ट्राची ‘टोपोग्राफी’ही माहिती असायला हवी. याला मी ‘होलिस्टिक’ असा एक शब्द वापरतो. समाजशास्त्र शिकतोय पण आज महाराष्ट्रातले आदिवासी जिल्हे कोणते आहेत याच्याबद्दल माझ्या डोक्यात जर विचार येत नसेल, चौकसपणा नसेल तर उपयोगच नाही. म्हणूनच तुम्हाला विषयाचे भान, प्रादेशिक भान, समाजाचे भान असावे लागते आणि जो विद्यार्थी हे विकसित करतो, तो कला शाखेमध्ये उत्तम यश मिळवतो. म्हणजे इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याचे वेगळेपण काढून एकत्रितपणे शिकणारा मुलगा त्या विषयांत नक्कीच यश मिळवू शकतो आणि यालाच मी ‘कौशल्य विकास’ असा शब्द वापरतो.

‘कौशल्य विकास’ झाला की कला शाखेमधून दोन सुंदर रस्ते तयार होतात. एक म्हणजे सर्व प्रकारच्या ‘प्रवेश परीक्षा’ देऊन यश मिळविण्याचा. या प्रवेश परीक्षांमध्ये बँकांच्या परीक्षा, डिफेन्ससाठीच्या परीक्षा, युनिफॉर्म सर्व्हिसेससाठीच्या परीक्षा, क्लेरिकल किंवा प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या बँकांच्या दोन लेव्हलच्या परीक्षा येतात. त्याचबरोबर प्रायव्हेट बँकांत जायचे असेल तर तुम्हाला उत्तम इन्स्टिट्यूटमधून एमबीए करायला हवे. त्यांचीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला इंजिनिअरिंगबरोबर द्यावी लागेल. म्हणजे गणिताचीही तुम्हाला थोडीशी पुन्हा एकदा तोंड ओळख ठेवायला पाहिजे. कारण दहावीनंतर आर्ट्सचा विद्यार्थी गणित घेत नाही. पण दहावीच्या गणिताची पातळी ठेवूनच एमबीएची प्रवेश परीक्षा होते हे अनेकांना माहिती नसते. ज्यांना डिफेन्सच्या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना सिनिअर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ‘एनसीसी’ पूर्ण करून स्पेशल कोट्यातून आत जाता येते. म्हणजे हा एक कौशल्य विकासाचा भाग आहे. तेव्हा या सगळ्यासाठीच्या स्पर्धांसाठी ह्युमॅनिटीजमधून रस्ता जाऊ शकतो. सायकॉलॉजी ज्यांनी घेतले आहे ते एमबीए, एचआरकडे वळू शकतात. इकॉनॉमिक्स ज्यांनी घेतले आहे ते फायनान्सकडे वळू शकतात. 

ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, भाषेवर प्रभुत्व आहे, काहीतरी वेगळाच रस्ता धरावासा वाटतो आहे, त्यांच्यासाठी दुसरा रस्ता ह्युमॅनिटीजमधून बारावीनंतर सुरू होऊ शकतो. त्यामध्ये पत्रकारिता, मीडिया, फिल्म अँड टेलिव्हिजन, नाट्य-नृत्य-वादन-गायन या सगळ्या कला जोपासत ललित कलेकडे जाता येते. शिवाय ‘मास कम्युनिकेशन’सारखा कोर्स करता येतो. त्यात मास मीडिया, मास कम्युनिकेशनची मास्टर्सची डिग्री घ्यावी. त्याच वेळी चित्रकलेची जोड देऊन आर्ट्समधील डिग्री घेऊन अॅनिमेशन, डिझाईन अशा क्रिएटिव्ह गोष्टींकडेही जाता येते. अॅडव्हर्टायझिंगसारख्या क्षेत्रामधला एखादा कोर्सदेखील पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हललाही करता येतो. तेव्हा आर्ट्समधून जाण्याचे हे दोन रस्ते तयार होतात. एक रस्ता संपूर्णपणे स्पर्धात्मक पण सर्व होलिस्टिक पद्धतीने शिकत शिकत आणि दुसरा ज्या विषयाची आवड असेल, त्याच्यानुसार ते पूर्ण करत जाऊ शकतो. मात्र हे सगळे करण्यासाठीची दोन वर्षे सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून वापरायला हवीत.

दहावी-बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थी चांगली पोझिशन, चांगले पॅकेज, परदेशी जाण्याची संधी मिळणाऱ्या नोकरीची स्वप्ने बघत असतो. सध्या आयटी आणि कॉम्प्युटरच्या संदर्भात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, बिग डेटा, बिझनेस अॅनालिस्ट किंवा डेटा अॅनालिस्ट; इंजिनिअरिंगच्या संदर्भात एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स किंवा बायोटेक्नॉलॉजी असे शब्द कानावर पडतात. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा एक ठोस पदवी घेऊन तीन वर्षे काम केले की त्यानंतर हे सगळे रस्ते त्यांच्यासाठी सुरू होतात. उदा. बायोटेक्नॉलॉजीची पदवी घेतली आणि जर संशोधनामध्ये शिरायचे असेल, तर पीएचडीपर्यंत जावे लागते. तो लांबचा रस्ता आहे. त्यामुळे तो विषय आणि त्याचा आवाका नीट समजेपर्यंत आपल्याला तीन वर्षांपर्यंतचा कामाचा अनुभव लागतो. आत्ता बारावीनंतर स्वतःच्या क्षमतेनुसार रस्ता निवडावा.

बारावीचे गुण आणि सीईटी किंवा जेईईचे गुण यात प्रचंड तफावत असते. बारावीला ८० टक्के पडले तरी सीईटीला जेमतेम २०० पैकी १००चा आकडा ओलांडणे किंवा ‘जेईई’मध्ये ३०० पैकी ८०चा आकडा ओलांडणे अनेकांना जमत नाही. हे लक्षात घेतले तर पात्रता आणि प्रवेश परीक्षेतून मिळणारा प्रवेश उत्तम गुणांनी मिळवला तरच आपण त्या प्रवेशाच्या रस्त्याला जावे, याच्याबद्दल विचार जरूर करावा. हाच नियम सर्व स्वरूपाच्या प्रवेश परीक्षांना आहे. या प्रवेश परीक्षांत मार्जिनली प्रवेश मिळण्यापेक्षा आपण किमान ५० टक्के मार्क्स मिळविले असतील तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता नक्की वाढत जाते.

येत्या दहा वर्षांत सर्वप्रकारच्या सेवा क्षेत्रांमध्ये शंभर टक्के स्कोप आहे. पर्मनंट स्कोप असलेली तीन क्षेत्रे आहेत. पहिले क्षेत्र हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट. बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटीची पदवी घेऊनही तुम्हाला त्यात जाता येते. दुसरे क्षेत्र हेल्थकेअर. एका डॉक्टर, सिस्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ सोडून वेटलॉस, वेटगेन, स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या संदर्भातील मार्केटिंग, म्हणजे डोळ्यांचे हॉस्पिटल, स्माइल चेनसारखे छोटे छोटे क्लिनिक्स येथे संधी आहे. शिवाय आज न्यूट्रिशन, डाएट या संदर्भातले कोर्सेस आले आहेत. हेल्थकेअरमध्ये तुमची मूळची पदवी कोणतीही असली तरीसुद्धा त्यात प्रवेश घेता येतो. 

सेवा क्षेत्रातले तिसरे क्षेत्र म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम. ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये काम करताना जितका जास्त चुणचुणीतपणा असेल तितकी प्रगती होत जाते. यामध्ये चार प्रकारच्या पातळ्या आहेत. फ्रंट ऑफिस, टूर असिस्टंट, टूर गाइड आणि टूर मॅनेजर. या चार पातळ्यांमध्ये कोणत्याही पातळीला तुम्ही सुरुवात करू शकता. तुमच्या क्षमतेनुसार त्यासंदर्भात एक वर्षाचा कोर्स बारावीनंतर करता येतो. तसाच पदवीनंतर पूर्णवेळही करता येतो; शिवाय बीबीए इन ट्रॅव्हल टुरिझम नावाचेही कोर्सेस आलेले आहेत. 

करिअर काउन्सिलिंग म्हटले की अनेकांना असे वाटते, मी तर मनाशी आधीच ठरवले आहे, मला गुणही चांगले मिळाले आहेत, माझ्या आई-वडिलांकडे पैसे आहेत, माझ्यात क्षमताही आहे आणि मला प्रवेशही देत आहेत, मग काउन्सिलिंगची गरज काय? तर विद्यार्थी एखादी पदवी घेतो, ते काम करायला लागतो आणि अचानक ते काम आवडत नाही, झेपत नाही, कळत नाही, म्हणून सोडून देतो. कारण त्यांनी त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना भेटून माहिती कधीच घेतलेली नसते. मग ती माहिती तुम्हाला काउन्सेलरकडून मिळू शकते. तुमच्या शंकांना ते उत्तर देऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या त्या करिअरसाठी लागणाऱ्या क्षमतांची जाणीव होऊ शकते. 

ज्यांना उत्तम स्वरूपाचा प्रोफेशनल कोर्स करायचा आहे किंवा ज्यांना सायन्सच घ्यायचे आहे त्यांनी जरूर अॅप्टिट्यूड टेस्ट करून घ्यावी. या दोन्हीसाठीच्या लागणाऱ्या क्षमता तुमच्यात किती आहेत? पुरेशा आहेत की नाही? त्या वाढवायच्या कशा याच्याबद्दल काउन्सेलरकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळते. 

(शब्दांकन : ज्योती बागल)

संबंधित बातम्या