रुग्णालयाचे प्रशासन आणि व्यवस्थापन

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

आरोग्य व्यवस्था सक्षम असणे याचा अर्थ केवळ पुरेसे मनुष्यबळ असणे एवढाच नाही तर आता रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि प्रशासनसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासन या ज्ञानशाखेत शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण पडला. रुग्णांची प्रचंड वाढलेली संख्या, वैद्यकीय मनुष्यबळ, उपकरणे, औषधी, पायाभूत सुविधा यांची फार कमतरता असल्याचे या काळात लक्षात आले. रुग्णांच्या उपचारात रात्रंदिवस व्यग्र असणाऱ्या काही रुग्णालयांमध्ये आगीसारख्या घटना महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी घडल्या. आरोग्य व्यवस्था सक्षम असणे याचा अर्थ केवळ पुरेसे मनुष्यबळ असणे हा नसून यापुढे रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि प्रशासनसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासन या ज्ञानशाखेत शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या विषयातील अभ्यासक्रम हे पदव्युत्तर पदवी पातळीवरील असून यंदा पदवी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास पुढील दोन वर्षात त्यांच्यासाठी नव्या संधीचे दार उघडले जाऊ शकते.

काही संस्था आणि अभ्यासक्रम
(१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोडे या संस्थेने प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन हेल्थकेअर मॅनेजमेंट ॲण्ड ॲनॅलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. सांख्यिकी विश्लेषणाचे तंत्र आणि कौशल्य वापरून आरोग्य सुविधा उद्योगातील विविधांगी समस्यांचे निराकरण करण्याचे ज्ञान या अभ्यासक्रमाद्वारे दिले जाते. या अभ्यासक्रमात आरोग्य सुविधा, त्यासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापकीय कौशल्य, आरोग्य व्यवस्थेचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन, आरोग्य सुविधा विश्लेषण, व्यूहनीती आणि नेतृत्व कौशल्य अशा सारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. 
पात्रता ः कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर व तीन वर्षे प्रत्यक्ष कार्यानुभव. 
संपर्क : संकेतस्थळ - https://iimk.eruditus.com/healthcare-management-and-analytics 

(२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद - कोरोना नंतरच्या काळातील आरोग्य व्यवस्था/ सेवा क्षेत्राचे आव्हान स्वीकारू शकणारा, हेल्थ केअर मॅनेजमेंट इन पोस्ट कोविड इंडिया, हा अभ्यासक्रम या संस्थेने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन करता येतो. सध्यातरी हा अभ्यासक्रम आरोग्य व्यवस्था सुविधा/सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील मनुष्यबळासाठी आहे. 
काय शिकाल? ः या अभ्यासक्रमात आरोग्य सुविधा/सेवा क्षेत्राच्या मार्केटसाठी व्यूहनीती, या क्षेत्रातील अर्थकारण, या क्षेत्रासाठीचे सांख्यिकी ज्ञान, या क्षेत्राचे कार्यान्वयन व्यवस्थापन, बिग डेटा आणि ॲनॅलिटिक्स तंत्र, व्यवसाय प्रारूप आणि उद्योजकता, भारतीय आरोग्य सुविधा/ सेवा क्षेत्रासाठी सार्वजनिक धोरण आणि नियामके आदी विषय घटकांचा समावेश आहे. 
संपर्क : आयआयएम, न्यू कॅम्पस वस्त्रपूर, अहमदाबाद- ३८०१५. ईमेल- exed@iima.ac.in, संकेतस्थळ-https://web.iima.ac.in/exed

(३) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस  या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या स्कूल ऑफ हेल्थ सिस्टिम स्टडीज मार्फत, दोन वर्षे कालावधीचा, मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम चालवला जातो. सर्वत्र वेगाने विकसित होत असलेल्या कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मिती व्हावी हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस व्यामिश्र स्वरूपाच्या आणि तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कौशल्ययुक्त शेकडो व्यक्तींचा वावर वाढला आहे. या सर्व मनुष्यबळास कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आणि रुग्णांच्या विविध स्वरूपाचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी या मनुष्यबळाचा उपयोग होतो.

काय शिकाल? ः सर्वसाधारणतः हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित अर्थकारण किंवा अर्थशास्त्र, वित्तीय व्यवस्थापन या विषयांचे ज्ञान दिले जाते. त्याचबरोबर संस्थात्मक वर्तणूक, रुग्णालय व्यवस्थापनाची तत्त्वे, रुग्णालयांसाठी संशोधन पद्धती, संस्था आणि सहाय्यकारी कर्मचारी/कामगार सेवा, संस्था आणि वैद्यकीय व सुपर स्पेशॅलिटी (अतिविशेषज्ञ) सेवांचे प्रशासन, वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान व्यवस्थापन, जैवसांख्यिकीची तोंडओळख, रुग्णालय माहिती सेवा, रुग्णालय नियोजन आणि कार्यक्रम व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कामगार कायदे, रुग्णालयांशी संबंधित नैतिक बाबी, रुग्णालय किंवा आरोग्य व्यवस्थेचे गुणवत्ता व्यवस्थापन, व्यवस्थापकीय विश्लेषण आणि कार्यपद्धतीचे विश्लेषण, रुग्णालयाच्या व्यावसायिक बाबींच्या कायदेशीर चौकटी, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास वाढीच्या व्यूहनीती, आरोग्य विमा आणि धोके व्यवस्थापन, नागरी आरोग्य, व्यूहात्मक व्यवस्थापन आणि संस्थात्मक विकास, आरोग्य व्यवस्थेतील उद्योजकता, सेवा व्यवस्थापन हे विषयदेखील अभ्यासक्रमात आहेत.

करिअर संधी ः (१) कॉर्पोरेट क्षेत्रातील वा सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या विभागांचे संनियंत्रण (२), रुग्णालयातील नव्या सेवा किंवा नव्या रुग्णालयांची रचना आणि नियोजन, रुग्णालये सल्लागार कंपन्या (हॉस्पिटल कन्सलटन्सी फर्म), (३) आरोग्य विमा क्षेत्र, (४) आरोग्य सुविधा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (हेल्थकेअर आयटी इंडस्ट्री) 

पात्रताः कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, विधि अशा कोणत्याही शाखेतील पदवी. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मात्र त्यांचा निकाल ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागणे आवश्यक. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असलेली ऑनलाइन टेस्ट द्यावी लागते. 
संपर्क : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार, मुंबई- ४०००८८. संकेतस्थळ- https://admissions.tiss.edu/

(४) सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा, एमबीए इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते. 
पात्रता ः कोणत्याही विषयातील पदवी. 

संपर्क : सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) युनिव्हर्सिटी कॅम्पस, हिल बेस, लवळे. पुणे-४१२११५, ईमेल- admissions_nd@sihspune.org, संकेतस्थळ- www.sihspune.org

(५) मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने एक वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही विषयातील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येत असला तरी, बी.एस्सी, एमबीबीएस, बीएएमएस, बी.फार्म, एमबीए या पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

करिअर संधी ः रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासनाचा अभ्यासक्रम केल्यावर रुग्णालयाचे फ्रंट ऑफिस, बिलिंग, अकाऊंट, वित्त, माहिती व्यवस्थापन सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन, साहित्य/ वस्तू व्यवस्थापन, विपणन, पुरवठा व्यवस्थापन, डॉक्युमेंटेशन आदी विभागांमध्ये संधी मिळू शकतात.
संपर्क : विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई-४०००९८, ईमेल-gicedenquiry@giced.mu.ac.in, संकेतस्थळ- giced.mu.ac.in

(६) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकता - येथे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन हेल्थ केअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. आरोग्य व्यवस्था/सुविधा पुरवणाऱ्या क्षेत्राची वाढ विस्मयकारक आहे. या वाढत्या क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही वाढत आहे. ही बाब ध्यानात घेऊन आयआयएम कोलकता २०१५ सालापासून हेल्थकेअर मॅनेजमेंट या विषयाचा अभ्यासक्रम चालवत आहे. या अभ्यासक्रमात या क्षेत्रासाठी आवश्यक सैद्धांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. एखादे मोठे रुग्णालय, हेल्थकेअर संस्था येथे प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करून दिली जाते. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व व्यावसायिकांना बोलावले जाते. देशातील दर्जेदार आरोग्य सुविधा/सेवा पुरवणाऱ्या संस्थांचे सहकार्य अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घेतले जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. 

काय शिकाल? ः या अभ्यासक्रमात जागतिक आरोग्य व्यवस्थेतील प्रवाह आणि भारतातील स्थिती, आरोग्यव्यवस्थेचे अर्थशास्त्र, आरोग्यव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि कार्यान्वयन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि आरोग्य व्यवस्था, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक संरचना आणि त्यातील बदल, मनुष्यबळ व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थेतील संख्यात्मक विश्लेषण, सार्वजनिक आरोग्य, नेतृत्वाच्या शैली, व्यवस्थापकीय संवाद, आरोग्य व्यवस्थेतील विपणन, वित्त नियोजन, व्यूहात्मक व्यवस्थापन, संघर्ष आणि वाटाघाटी, मानवीय मूल्य आणि नैतिकता, सामाजिक न्याय, आपत्ती निवारण व्यवस्थापन, विकसित देशातील कामकाजासंदर्भात आरोग्यविषय प्रश्न/समस्या, आरोग्यविषयक कायदे, आरोग्य सुविधा/सेवा क्षेत्रातील उद्योजकता. 

पात्रता ः हा अभ्यासक्रम, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, जैवतंत्रज्ञान किंवा जैनवैद्यकीय विषयातील पदवी प्राप्त उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. तथापि आरोग्य व्यवस्था/सेवा क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरसुद्धा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षेतील गुण, शैक्षणिक पात्रता, अनुभव, मुलाखत या घटकांना अवलंबण्यात येते. संपर्क- https://www.iimcal.ac.in/ldp/PGCHM

(७) सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने एमबीए इन हेल्थकेअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- दोन वर्षे.
करिअर संधी ः हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, डिजिटल हेल्थ केअर, डिजिटल मार्केटिंग ऑफ हेल्थकेअर, सेल्स ॲण्ड मार्केटिंग प्रॉडक्टस ॲण्ड सर्व्हिस, एचआर मॅनेजमेंट इन हेल्थकेअर सेक्टर, ऑपरेशन्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट इन हेल्थकेअर, हेल्थकेअर ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड मीडिया मॅनेजमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट इन हेल्थकेअर, पेशंट केअर ॲण्ड सर्पोट मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट इन हेल्थकेअर, मॅनेजिंग हेल्थकेअर चेन, डेटा ॲनॅलिटिक्स ॲण्ड इन्फॉर्मेटिक्स इन हेल्थकेअर, क्वालिटी मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी इन हेल्थकेअर, न्यू बिझनेस डेव्हलपमेंट इन हेल्थकेअर

काय शिकाल? ः या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. व्यवसाय संवाद आणि अहवाल लेखन, सांख्यिकी विश्लेषण, आरोग्य अर्थकारणाच्या मूलभूत बाबी, आरोग्य व्यवस्था व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था/ सेवा क्षेत्रातील अर्थशास्त्राच्या सूक्ष्म बाजू, या क्षेत्राशी निगडित पुरवठा साखळी व्यवस्थापन, वित्त, विपणन, मनुष्यबळ विकास, मूल्य आणि व्यवस्थापकीय लेखा, औषधी आणि जैवतंत्र व्यवस्थापन, रुग्णालय प्रशासन, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था, गुणवत्ता व्यवस्थापन, कायदेशीर बाजू/ पैलू, सुविधा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा/सेवा विपणन-मार्केटिंग (औषधी/ रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे,) रुग्णांची काळजी आणि वर्तणूक, व्यवसाय विकास, ब्रँड व्यवस्थापन, वैद्यकीय पर्यटन (आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि विपणन), समुपदेशन, बौद्धिक संपदा अधिकार, उद्योजकता व्यवस्थापन, आरोग्य विमा आणि वित्त पुरवठा, आरोग्य धोरण आणि लोकसंख्या/ भूभागाचे विश्लेषण, सांख्यिकी विश्लेषण, डिजिटल विपणन, करनिर्धारण, मार्केट संशोधन, व्यूहनीती व्यवस्थापन, पर्यावरणीय आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा/ व्यवस्थेतील नव्याने उदयाला येणारे तंत्रज्ञान, ग्राहकसंबंध व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्था/ संघटना व्यवस्थापन, कार्यप्रवण व्यवस्थापकीय कार्यपद्धती, जागतिक आरोग्य संघटना (शाश्वत आरोग्य व्यवस्था), जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन. 

निवड- या अभ्यासक्रमासाठी ५० टक्के गुणांसह कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर अर्ज करू शकतो. या उमेदवाराने कॅट -कॉमन ॲडमिशन टेस्ट/सीमॅट-कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट-/झॅट-झेव्हियर ॲप्टिट्यूड टेस्ट /जीमॅट-ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, या परीक्षांमधील गुणांवर आधारित उमेदवारांची निवड समूहचर्चा आणि मुलाखतीसाठी केली जाते. हा अभ्यासक्रम करण्याचा हेतू स्पष्ट करणारे निवदेन (स्टेटमेंट ऑफ पर्पझ) देणे आवश्यक आहे.

संपर्क : के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, विद्याविहार- पूर्व, मुंबई - ४०००७७, ईमेल-info.simsr@somaiya.edu, संकेतस्थळ- somaiya.edu
(८) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूरने सर्टिफिकेट कोर्स इन हेल्थ केअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी एक वर्ष. पात्रता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा आरोग्य सुविधा/सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेतील व्यवस्थापकीय स्वरूपाचा ५ वर्षाचा अनुभव. 
संपर्क : https://courses.hugheseducation.com/iim-indore-post-graduate-certificate...
(९) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथे मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम करता येतो. हा या क्षेत्रातील देशातील सर्वाधिक जुना अभ्यासक्रम आहे. संपर्क ः एम्स, अन्सारी नगर, नवी दिल्ली-११००२९, https://www.aiims.edu/

१०) इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च युनिव्हर्सिटी ही आरोग्यसुविधा क्षेत्रासाठी आवश्यक असणारे विशेष अभ्यासक्रम चालवणारी संस्था आहे. या संस्थेने अमेरिकेतील जॉहन्स युनिव्हर्सिटी, इंग्लंडमधील चेस्टर युनिव्हर्सिटी, कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ माँट्रिएल, ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटी आदी विद्यापीठांशी सहकार्य केले आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या संस्थेस इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचा दर्जा दिला आहे. अभ्यासक्रम- एमबीए इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थ मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे. 

काय शिकाल? ः या अभ्यासक्रमाद्वारे आरोग्यव्यवस्था उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असणारे नियोजन, अंमलबजावणी, कार्यान्वयन व्यवस्थापन, या उद्योगाशी संबंधित समस्या व त्यांचे निराकरण, सल्ला-सेवा आणि उद्योजकता. आरोग्य सुविधा उद्योग क्षेत्रातील व्यवस्थापनाच्या गरजा भागविण्यास हे मनुष्यबळ समर्थ ठरत आले आहे. 

प्रवेश प्रकिया ः या अभ्यासक्रमाला ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी घेतलेले उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कॅट/ मॅट/ झॅट/ जीमॅट/ सीमॅट/ एटीएमए या पैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील गुण प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. या गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावले जाते. यापैकी कोणतीही परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा (यू-मॅट- युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट टेस्ट) द्यावी लागेल. 
संपर्क : १, प्रभुदयाल मार्ग, संगानेर एअरपोर्टजवळ, जयपूर-३०२०२९, ईमेल- iihmr @iihmr.edu.in/ संकेतस्थळ- https://www.iihmr.edu.in/

(११) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट  ॲण्ड रिसर्च, दिल्ली येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट, हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हेल्थ मॅनेजमेंट आणि हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टिम या तीन विषयांमध्ये स्पेशलायझेशनची सुविधा आहे. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता आहे. 

पात्रता ः कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी. रुग्णालयाला भेडसावणाऱ्या व्यवस्थापकीय समस्यांचे निराकरण करणे, आरोग्यसुविधा पुरवणाऱ्या संस्थांचे नियोजन, बांधणी आणि नियोजनाचे कौशल्य प्रदान करणे, नागरी आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा पुरवठा करणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण व अशा मनुष्यबळाचा विकास करणे आदी बाबींचे सैद्धांतिक ज्ञान या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दिले जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅट/ मॅट/ झॅट/ जीमॅट/ सीमॅट/ एटीएमए या पैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. या गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूह चर्चेसाठी बोलावले जाते. या दोन्ही बाबींमधील काम‍गिरी आणि चाळणी परीक्षेतील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. 
संपर्क : आयआयएचएमआर,प्लॉट नंबर ३, सेक्टर १८ ए,व्दारका, फेज टू,न्यू दिल्ली- ११००७५, ईमेल-info.delhi@iihmrdelhi.edu.in, संकेतस्थळ- iihmrdelhi.edu.in

(१२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेच्या गांधीनगर कॅम्पसमध्ये मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- दोन वर्षे. पात्रता ः कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. संपर्क- http://www.iiphg.edu.in/ भारतीय आरोग्य सुविधा/सेवा उद्योग क्षेत्रामध्ये २०२२ पर्यंत ३७२ बिलियन डॉलर्सने वाढ अपेक्षित आहे असा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारत सरकारमार्फत २०२५ पर्यंत एकूण सकल घरेलू उत्पादनाच्या (जीडीपी) २.५ टक्के गुंतवणूक या क्षेत्रात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी नव्याने निर्माण होतील. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या वाढत्या क्षेत्रासाठी व्यवस्थापकीय मनुष्यबळ किमान अडीच लाखांपर्यंत लागू शकेल.

संबंधित बातम्या