न्यू नॉर्मलमधले तंत्रकौशल्य

सुरेश  वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

कोरोना काळात डिजिटल युगाला आणखी लखलखीत करण्याचे कार्य तंत्रज्ञानाने केले. या बाबी लक्षात घेता पुढील काही क्षेत्रांमध्ये नजीकच्या काळात करिअर संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात.

कोरोनोत्तर काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. यामध्ये बिग डेटा, क्लाऊड कॉम्प्युटिंग यांचा ठळकपणे उल्लेख करता येईल. याच काळात सायबर सुरक्षेचे विविधांगी प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्या. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून डेटा म्हणजे माहितीच्या साठ्याचा व्यवसाय वृद्धीसाठी कल्पकतेने वापर करणे गरजेचे असल्याचे कोरोना काळाने शिकवले. कोरोना काळात (जो अद्यापही सुरूच आहे) अर्थचक्राला खीळ बसली. उद्योग-व्यवसायांना फटका बसला. मात्र या काळात तंत्रज्ञानाने अर्थचक्राची गती सावरण्यासाठी मोठा हात दिला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घरून कार्यरत राहणे शक्य झाले. विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे तसेच त्यावर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या संनियंत्रणासाठी तंत्रज्ञानाची मदत झाली आणि होत आहे.
 

(१) डेटा : या काळात अधिकाधिक व्यक्तींना घरून काम करावे लागले. परिणामी अधिकाधिक डेटाचा उपयोग जागतिक पातळीवर करण्यात आला. मागील वर्षापेक्षा ही वाढ ३८ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले. त्यामुळे डेटा व्यवस्थापन, डेटा नियंत्रण, डेटा अभियांत्रिकी, डेटा ॲनालिस्ट, डेटा शास्त्रज्ञ, मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा ॲण्ड ॲनालिटिक्स मॅनेजर या क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी गरज असल्याचे दिसून आले. डेटाचा वापर हा पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने या क्षेत्रातील मनुष्यबळाला चांगल्या संधी मिळू शकतात. 

कोरोनोत्तर काळात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्स (ओटीटी) ते स्मार्ट गॅजेट्स (उपकरणे/संयंत्रे) यांच्या उपयुक्ततेचा मुख्य आधार डेटा ठरत आहे. डेटाचा वापर आणि ग्राहकाची वर्तणूक यांचा अन्योन्यसंबंध प्रस्थापित झाल्याचे दिसते. त्यामुळे डेटा विश्लेषक आणि त्या निष्कर्षानुसार व्यूहनीती ठरवणारे मार्केटर्स या तज्ज्ञांची गरज वाढलीय. सांख्यिकी तंत्रावर हुकूमत असणाऱ्या किंवा मिळवणाऱ्या डेटा सायन्टिस्ट किंवा विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या संधी चालून येऊ शकतात.

सध्या मशिन लर्निंग, स्टॅटिस्टिक्स, रिसर्च, प्रेडिक्शन, व्हिज्युअलायझेशन, रेकमेंडेशन, ऑप्टिमायझेशन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ॲण्ड रिग्रेशन, डीप लर्निंग या क्षेत्रातील कौशल्ययुक्त मनुष्यबळाची वानवा भासायला लागलीय. एका सर्वेक्षणानुसार सध्या ६५ ते ७० टक्के नोकऱ्यांसाठी मशिन लर्निंगचे या विषयाचे ज्ञान अत्यावश्यक समजले जाते. 

डेटा सायन्टिस्टला गूगल ॲनालिटिक्स, गूगल सर्च कन्सोल सारख्या तंत्रामध्ये पारंगत असणे आवश्यक ठरू शकते. ४५ ते ४८ टक्क्यांच्या आसपास नवे रोजगार या तंत्र कौशल्याशी निगडित आहेत. एचटीएमएल-हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि सीएसएस (कॅसकॅडिंग स्टाइल शीट्स), या तंत्रात अवगत असणारे उमेदवार इतरांपेक्षा दोन पावले समोर राहू शकतात. 

गेल्या वर्षी २५ ते ३० टक्के रोजगारासाठी की-वर्ड रिसर्च आवश्यक बाबींपैकी हे महत्त्वाचे तंत्रकौशल्य असणे अपेक्षित होते. मोबाइल सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे (एसईओ) तंत्र कौशल्य हस्तगत केलेल्या उमेदवारांना अधिक चांगल्या संधी मिळू लागल्या आहेत. डेस्कटॉपपेक्षा मोबाइलवर अधिकाधिक शोध घेण्याची आणि काम करण्याची गती वाढल्याने या क्षेत्रातील कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज वाढली आहे. 

(२) क्लाऊड कॉम्प्युटिंग : सार्वजनिक क्षेत्रातील क्लाऊड तंत्रज्ञान हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या पायाभूत व्यवस्थेचा कणा असल्याचे या काळात दिसून आले. २०१९मध्ये गार्टनर या संस्थेने सार्वजनिक क्षेत्रातील क्लाऊड तंत्रज्ञान सेवेची २०२०मध्ये १७ टक्क्यांहून अधिक वृद्धी होईल, असे भाकीत केले होते. इन्स्टिनेट या संस्थेने मार्च २०२०मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार ६८ टक्के कंपन्यांनी आपल्या कामकाजात क्लाऊड तंत्रज्ञानास सर्वोच्च स्थान दिले होते. यापुढील काळात ही गती विस्मयकारक राहण्याची शक्यता असल्याने क्लाऊड आर्किटेक्ट, क्लाऊड आयटी ॲडमिनिस्ट्रेटर, क्लाऊड इंजिनिअर अशा मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर भासेल.
जनरल क्लाऊड कॉम्प्युटिंग मधील कौशल्यप्राप्त मनुष्यबळास ॲमेझॉन वेब सर्व्हिस, मायक्रोसॉफ्ट अझुरे, गूगल क्लाऊड प्लॅटफॉर्म या ठिकाणी अग्रक्रमाने संधी मिळाली. ॲमेझॉन वायरलेस सर्व्हिस या संस्थेकडे ग्राहकांचा अधिक ओढा दिसून येतो कारण इतर अनेक कंपन्या या संस्थेच्या सेवा मॉड्युलचा उपयोग, त्यांच्या सेवा देण्यासाठी करतात. गेल्या काही वर्षात ॲमेझॉन वायरलेस सर्व्हिसच्या रोजगार संधीत पाच पटीने वाढ झाली. या बाबी डेटा हातळण्यासंदर्भात असल्याने पुढील दहा वर्षे या भूमिका आणि या तंत्रकौशल्याचे महत्त्व कायम राहणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे. 

(३) सायबर सिक्युरिटी : नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ८६ टक्क्यांहून अधिक कंपन्या/ उद्योग/ कॉर्पोरेट यांनी सायबर सिक्युरिटीला सर्वोच्च स्थान दिले आहे. कुठूनही काम करण्याची पाळी आल्याने वा तशी सुविधा कंपन्यांनी उपलब्ध करून दिल्याने डेटा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. घरून अथवा कुठूनही काम करणारे मनुष्यबळ हे स्वतःचे वायफाय अथवा कमी सुरक्षित असलेले वायफाय नेटवर्क वापरत असल्याने, सायबर आक्रमणाची भीती वाढली. सायबर सिक्युरिटी हा यापुढील काळात अत्यंत कळीचा विषय ठरणार असल्याने या क्षेत्रातील सायबर आर्किटेक्ट, एथिकल हॅकर्स अशा तज्ज्ञांची गरज सातत्याने वाढेल.

(४) डिजिटल मार्केटिंग : अधिकाधिक लोकांचा ओढा ऑनलाइन माहितीकडे अथवा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे वळल्याने डिजिटल मार्केटिंग हे सध्या व्यवसाय - व्यापार वाढीसाठी लाइफलाइन म्हणून समोर आले आहे. ऑनलाइन मार्केटिंगमुळे कंपन्यांच्या खर्चात बचत झाली. गुंतवणुकीपेक्षा अधिक नफा मिळू लागला. त्यामुळे यापुढील काळात डिजिटल ब्रँड मॅनेजर, ईमेल मार्केटिंग तज्ज्ञ, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर अशासारख्या मनुष्यबळाची गरज भासेल.

नव्या समाजमाध्यमांच्या उदयामुळे त्यासाठी लागणाऱ्या आशय निर्मितीची (कंटेट डेव्हलपमेंट/ रायटिंग) गती वाढली आहे. त्यामुळे डिजिटल कंटेंट निर्मिती, विदा विश्लेषण आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे तंत्र हस्तगत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल राहील.

लिड जनरेशन प्रोफेशनल्स किंवा व्यावसायिक हे विक्री प्रकियेमधील महत्त्वाचे घटक समजले जातात. संभाव्य ग्राहकांचा शोध घेऊन, ईमेल मार्केटिंग आणि सोशल सेलिंग या बाबींचा अवलंब करून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे महत्त्वाचे कार्य या मनुष्यबळास करावे लागते. गेल्या वर्षी लीड जनरेशन स्पेशालिस्टची गरज पुढील क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून आली. (१) डिजिटल मार्केटिंग मॅनेजर्स, (२) ॲड मॅनेजर्स, (३) फेसबुक ॲड स्पेशालिस्ट, (४) कम्युनिकेशन मार्केटिंग डायरेक्टर, (५) चीफ मार्केटिंग ऑफिसर, (६) अकाउंट एक्झिक्युटिव्ह (७) परफॉर्मन्स मार्केटर्स, (८) सर्च इंजिन मार्केटिंग स्पेशालिस्ट.

(५) बिझनेस ॲनालिस्ट : अधिकाधिक व्यवसाय हे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरून होत आहेत. यामध्ये रिटेल - शिक्षण - आरोग्य व्यवस्था आदींचा समावेश आहे. डिजिटलायझेशन वरील हा भर वाढत चालल्याने बिझनेस ॲनालिस्टची गरजही वाढलीय. अमेरिकन ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टक्सनुसार, नजीकच्या काळात मॅनेजमेंट ॲनालिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट यांची गरज १४ टक्क्यांहून अधिक राहील.

 (६) ऑनलाइन अध्यापन (टीचिंग) :  कोरोनोत्तर काळात ऑनलाइन अध्यापनाने चांगलीच गती घेतली. जवळपास सर्वच शैक्षणिक संस्था बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ऑनलाइन अध्यापनाची बऱ्यापैकी प्रभावी यंत्रणा उपलब्ध झाली. कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक पाहता, ऑनलाइन अध्यापन पुढील काही महिने किंवा वर्षे तरी तसेच सुरू राहील. त्यामुळे या क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची मागणी वाढती राहील. या काळात बायजू, टॉपर, वेदांतू, अनॲकॅडमी या भारतीय ऑनलाइन अध्यापन/ शिक्षण/ प्रशिक्षण कंपन्यांनी चांगला व्यवसाय केला. त्याचप्रमाणे लिंक्डइन लर्निंग, कोर्सेरा, उदेमी, खान ॲकॅडमी या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडे पालक आणि विद्यार्थी लक्षणीयरित्या आकर्षित झाले.  यापुढील काळात नर्सरीपासून विद्यापीठीय (पदवी-पदव्युत्तर-पीएचडी) शिक्षणासाठी डिजिटल तंत्राचा आधार घेतला जाईल. त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायवृद्धीच्या अमाप संधी असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर आता करिअरच्याही संधी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात.

(७) ऑनलाइन ट्यूटर : डिजिटल प्लॅटफॉर्मवरील अध्यापन आणि अध्ययनाच्या वाढत्या प्रसारामुळे या करिअरला चालना मिळाली. एज्युकेशन टेक्नॉलॉजीच्या (शैक्षणिक तंत्रज्ञान) कंपन्यांची झपाट्याने वाढ होत असल्याने या क्षेत्रात पारंगत उमेदवारांना रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. 

 (८) माहिती तंत्रज्ञान क्षेत्र : या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी पुढील काळात वाढतीच राहील. तथापि, या क्षेत्रात इतरांपेक्षा समोर राहण्यासाठी कोडिंग, रोबोटिक्स, मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), ब्लॉकचेन या घटकांचे कौशल्य प्राप्त करणे गरजेचे राहील. सध्याच्या स्वयंचलित (ऑटोमेशन) काळासाठी ही प्रमुख कौशल्ये आहेत. सॉफ्टवेअर विकासाच्या क्षेत्रात पायथन, नॉड्स, रिॲक्ट, एसईएम-सर्च इंजिन मार्केटिंग, गूगल ॲनालिटिक्स, रस्ट डार्ट या घटकांच्या तंत्रकौशल्याची गरज भासते. 

(९) सांख्यिकी शास्त्र : डेटा सायन्टिस्टला आपले ज्ञान आणि कौशल्य सतत वृद्धिंगत करणे गरजेचे झाले आहे. ६० ते ७० टक्के नव्या रोजगार संधींमध्ये स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकी कौशल्याची गरज अत्यावश्यक समजली जाते. सांख्यिकी शास्त्रातील विविध संकल्पनांचा वापर करून उत्पादकतेसंबंधी अचूक निदान काढता येण्याचे कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना या संधी सुलभतेने मिळत आहेत. 

(१०) औषध निर्माण क्षेत्र : या क्षेत्रात भारताची जगात सध्या आघाडी आहेच. पुढील काळात कोरोना विषाणू व इतरही अनेक आजार/रोग यांचा प्रतिकार करणाऱ्या औषधी/लशी यांची मोठी मागणी जगभर वाढेल. ही मागणी पुरवण्याची क्षमता भारतीय औषध निर्माण क्षेत्रात आहे. भारतात औषध निर्मितीचा खर्च जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भारत सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीलाही भारत सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे औषध निर्मिती आणि विविध प्रकारची वैद्यकीय उपकरणे/संयंत्रे यांच्या उत्पादनास वेग मिळेल. या क्षेत्राबरोबरच बायोइन्फॉर्मेटिक्स या क्षेत्रातही तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासेल.

(११) आरोग्यसुविधा (हेल्थ केअर) : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात कोरोना रुग्णांवरच उपचार केंद्रित झाल्याने इतर रोगी आणि आजारांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या क्षेत्रापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो की काय असे वाटू लागले. पण कोरोना काळात आणि त्यानंतरही आरोग्याचे क्षेत्र हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले. केंद्र आणि राज्य शासनही या क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष देत आहे. केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी याच क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आला. त्यामुळे या क्षेत्रात नजीकच्या काळात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. कोरोनोत्तर काळात आरोग्यविषयक समस्यांच्या तत्काळ निराकरणाकडे अधिकाधिक नागरिकांचा ओढा असेल. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, औषध विक्रेते, औषधनिर्मिती तज्ज्ञ, या मुनष्यबळास या क्षेत्रात प्रगती आणि विकासाच्या नव्या संधी मिळतील. 

वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रांच्या निर्मिती क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. ऑक्सिमीटर, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, मास्क अशा वैद्यकीय उपकरणांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. या क्षेत्रातील उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्या जागतिक पातळीवर या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करतील आणि काही नव्या कंपन्याही या क्षेत्रात उतरतील. इम्युनॉलॉजी (रोग प्रतिकारशास्त्र), व्हायरॉलॉजी (विषाणूशास्त्र), जेनॉमिक्स (जनुकीय शास्त्र) या क्षेत्रातही करिअर संधी मिळू शकतात.

(१२) संशोधन : कोरोना काळात वैद्यकीय संशोधनास मोठी चालना मिळाली. जगातील प्रमुख देशांनी विषाणू नियंत्रण लशीच्या शोधावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला. वैद्यकीय तज्ज्ञांबरोबरच डॉक्टर, सामाजिक आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञसुद्धा कोरोना प्रादुर्भावाच्या विविधांगी परिणामांच्या संशोधनात गढले. धोरणकर्त्यांसाठी निर्णय घेण्यासाठी आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी हे संशोधन दिशा दाखवणारे ठरले.

(१३) डिजिटल पेमेंट : गेल्या वर्षीच्या कोरोना काळात सर्वांचा अधिकाधिक वेळ घरी गेला. २०२१मध्ये ही परिस्थिती नियंत्रणात येईल असे वाटत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा एकदा आपल्या देशात व जगातही इतरत्र कोरोना विषाणूने उचल खाल्ली. त्यामुळे पुढेही बराच काळ घरीच राहावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. घरी राहून विविध प्रकारची कामे करावी लागतील. यामध्ये वेगवेगळ्या सेवांची देयके भरणे, दैनंदिन गरजेच्या वस्तू मागवणे, खाद्य पदार्थ मागवणे इत्यादी बाबींचा समावेश करता येईल. या सर्व बाबी डिजिटली करता येणे शक्य आहे. गेल्या वर्षी डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले. ही स्थिती यंदाही कायम राहील.

(१४) स्पेशल (खास) रसायने : कोरोना काळाने सतत स्वच्छता गंभीरपणे अंगीकारण्यास बाध्य केले. त्यामुळे हात आणि शरीराची स्वच्छता, घर/ लिफ्ट/ कार्यालये/ उपकरणे यांच्या स्वच्छतेसाठी लागणारे सॅनिटायझर/ जंतुनाशक/ इतर रसायनांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे अन्नपदार्थ निर्मिती/ उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी विविध श्रेणी आणि उपयुक्ततेच्या अशा स्पेशल रसायनांची निर्मिती केली. औषधांची मागणी वाढल्याने या क्षेत्रासाठी रसायनांची मागणी वाढली.

(१५) व्हिडिओ ब्लॉगर : हे सध्या सर्वाधिक मागणी असलेले आणि लोकप्रिय असलेले ऑनलाइन करिअर आहे. अनेक कंपन्या अशा व्हिडिओ ब्लॉगरच्या किंवा यूट्युबरच्या शोधात असतात. आपले उत्पादन/सेवा किंवा एखादा विशिष्ट संदेश डिजिटल माध्यमांद्वारे हे व्यावसायिक प्रभावीपणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू शकतात असा विश्वास कंपन्यांना वाटतो. या क्षेत्रात प्रकल्प आधारित मेहनताना/मूल्य मिळत असल्याने, संबंधितांच्या कौशल्यावर अधिकाधिक उत्पन्न मिळवता येणे शक्य होऊ शकते.

(१६) ग्राफिक डिझायनर : हे तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या उमेदवारांना चांगली मागणी राहील. कोरोनोत्तर काळात त्यांची गरज स्टार्टअप आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर भासत आहे. हा संपूर्ण व्यक्तिगत स्वरूपाचा रोजगार असल्याने ऑनलाइन ग्राफिक डिझायनर्सना अधिकाधिक संधी मिळू शकते. 

(१७) जाहिरात संस्था : कोरोना काळात पारंपरिक पद्धतीच्या जाहिरात क्षेत्राने मान टाकली. त्याचा मुद्रित माध्यमांवर आणि जाहिरात संस्थांवरही परिणाम झाला. मोठे आणि प्रमुख ब्रँड्स/कंपन्यांनी आपला मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळवला. या कंपन्यांनी स्वतःचे, मार्केटिंग कम्युनिकेशन विभाग सुरू करून डिझायनर्सची नियुक्ती केली. त्यामुळे डिजिटल माध्यमाचा वापर करू शकण्याची क्षमता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना जाहिरात निर्मिती संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळणे आणि ती टिकून राहणे यापुढील काळात शक्य होऊ शकेल.

(१८) इलेक्ट्रॉनिक/ डिजिटल/ मुद्रित माध्यमातील पत्रकारिता : कोरोना काळात मुद्रित आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी विविध प्रकारची माहिती देण्यासाठी जिवाची पर्वा न करता काम केले. आपल्या पंतप्रधानांनी पत्रकार/ माध्यमकर्मींचा उल्लेख कोरोना योद्धा असा केला. मात्र मुद्रित माध्यमांना आणि त्यात काम करणाऱ्या व्यक्तींनाही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका बसला. मात्र सर्वसामान्यांपर्यत तत्काळ माहिती पोहचवण्याचे पत्रकारांचे कसब आणि कौशल्य हे दुर्लक्षित करता येणारे नाही ही बाब, प्रसारण आणि माध्यम समूहांच्या लक्षात आली आहे. काही माध्यम समूहांनी मोठ्या प्रमाणावर भरतीही सुरू केली आहे. सध्याच्या अनिश्चतेतही पत्रकारिता/ माध्यमांच्या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात. 

(१९) कंटेट क्रिएशन (आशय निर्मिती) : विपणन म्हणजेच मार्केटिंगपासून चित्रपट निर्मितीपर्यंत आशय (कंटेट) हाच महत्त्वाचा घटक असल्याचे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिसून आले. समाज माध्यमांवर सुयोग्य आशयाची पेरणी सातत्याने केल्याने अनेक व्यवसाय, कोरोना काळात लोकांना आकर्षित करत होते. बरेच चित्रपट या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर (डिजिटल) प्रदर्शित झाले. विविध स्वरूपाच्या ब्लॉगद्वारे लोक/ग्राहकांपर्यंत पोहचता येणे शक्य झाले. पुढील काळात अधिकाधिक व्यक्ती डिजिटल जगताशी अधिक जोडल्या जातील. त्यामुळे ब्लॉग/ फेसबुक/ यूट्युब इत्यादी समाज माध्यमांवरील तुमची उपस्थिती लोकांच्या नक्कीच लक्षात येऊ शकते.
सध्या कोणत्याही संस्थेसाठी आशय (कंटेट) हाच प्राणवायू झाला आहे. ऑनलाइन कंटेट विकसक, हा संस्थेच्या कंटेट व्यूहनीतीचा आराखडा तयार करण्यासाठी जबाबदार असतो. शिवाय कंपनीच्या उद्दिष्ट्यपूर्तीची दिशा ठरवण्यात त्याला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. बहुतांश स्टार्टअप हे ऑनलाइन कार्यरत असल्याने त्यांचे कंटेट व्यवस्थापन महत्त्वाचे ठरत आहे. अशा स्टार्टअप कंपन्यांना ऑनलाइन कंटेट विकसकांची मोठी गरज भासू लागली आहे.

(२०) शेअर मार्केट स्पेशालिस्ट : हा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करून उत्तम उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. अनेक शेअर ब्रोकर कंपन्या, अशा ऑनलाइन तज्ज्ञांना त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी रोजगार संधी देत असतात. अशा उमेदवारांना हे काम पूर्ण वेळ अथवा अर्धवेळ ऑनलाइन पद्धतीने करता येते. 

(२१) खाद्यान्ने आणि रिटेल मार्केटिंग : कोरोना काळात या क्षेत्राची उलाढाल समाधानकारक राहिली. खाद्यान्ने, शीतपेये, अन्नपदार्थ यांच्या प्रत्यक्ष आणि ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. आरोग्यदायी आणि रोगप्रतिकार अन्नपदार्थांविषयी जागृती झाल्याने या पदार्थांच्या खरेदीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे अन्नपदार्थ निर्मिती उत्पादकांनी या अन्नपदार्थांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. या आरोग्यदायी अन्नपदार्थांचा थेट पुरवठा ग्रामीण भागापर्यंत करण्यात कंपन्यांनी बाजी मारली. त्यामुळे या कालावधीत या कंपन्यांनी अपेक्षित उलाढाल केली आणि नफा साध्य झाला. यामुळे प्रेरित होऊन या क्षेत्रातील कंपन्यांनी आरोग्यदायी अन्नपदार्थांची नवी उत्पादने बाजारात आणली. त्याला ग्राहकांना उत्तम प्रतिसाद दिला. 

(२२) ब्यूटी इन्फ्ल्युअर्स/ मेकअप आर्टिस्ट : कोरोना काळात सलूनमध्ये जाणे ग्राहकांनी टाळले. त्यामुळे सौंदर्यविषयक लिखाण करणारे ब्लॉगर्स आणि इन्फ्ल्युएन्सर्स यांच्याकडे ग्राहक वळले. या मंडळींनी दिलेल्या सौंदर्याच्या टिप्स आणि ट्रिक्स उपयुक्त असल्याचे दिसून आले. या मंडळींचा हा प्रभाव पाहता सौंदर्यप्रसाधनांच्या अनेक ब्रँड्सनी त्यांच्याशी सहकार्य करून आपली उत्पादने  अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचवली.

(२३) नव्या गृहसेवा : शेफ ऑन कॉलसारख्या नव्या घरपोच सेवांना प्राधान्य मिळू शकते. याशिवाय आरोग्य सेवा सुविधा देणाऱ्या तंत्रज्ञांची सेवा अधिकाधिक घरपोच दिली जाईल. हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, मसाजर, ऑन डिमांड डॉक्टर्स, केअर गिव्हर्स यांच्या सेवाही, मोठे मानधन (मूल्य/ किंमत/ प्राइस) घेऊन उपलब्ध करून दिल्या जातील.

इतर क्षेत्रे

(१) सोशल मीडिया कन्सलटन्ट, (२) व्हर्च्युअल असिस्टन्ट, (३) फ्रीलान्स कॉपी रायटर, (४) वेब डेव्हलपर, (५) सोशल मीडिया डेव्हलपर, (६) वित्तीय सेवा, विमा क्षेत्र आणि बँकिंग, (७) स्पर्शविरहित (टचलेस) अर्थव्यवस्था (ब्रॉडबँड, गृह पुरवठ्याची सेवा, जिमपासून ते योगापर्यंतचे ऑनलाइन वर्ग, एकमेकांशी संपर्क साधू शकणारे ॲप्स इत्यादी), (८) सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, (९) प्रोजेक्ट मॅनेजर, (१०) कस्टमर सर्व्हिस स्पेशालिस्ट यांचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल. या क्षेत्रात टप्प्या-टप्प्याने तांत्रिक बदल होतील. मात्र रोजगाराच्या संधींमध्ये फार फरक पडणार नाही. 

मानसिकता बदलण्याची गरज
कोरोनोत्तर काळात करिअरच्या अनुषंगाने पारंपरिक मते बदलण्याची गरज निर्माण झाली. नोकरी देणारे आणि नोकरीची गरज असणारे या दोन्ही घटकांना नव्या पद्धती वा कार्यशैलीचा अवलंब करावा लागला.

न्यू नॉर्मलमध्ये कंपन्या उमेदवारांच्या गुणांकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागल्या. आतापावेतो ज्या पद्धतीने व्यवसाय/उद्योग केला त्यापेक्षा वेगळ्या व्यूहनीतीचा अवलंब करून अधिकाधिक नफा मिळवण्याकडे वा मार्केट (व्यवसाय/बाजार) मधील आपले स्थान अबाधित राखण्याकडे कंपन्यांचा कल वाढला. त्यासाठी नावीन्यपूर्णरीत्या काम करू शकणाऱ्या गुणवंतांची गरज भासतेय. पारंपरिक कौशल्यापेक्षा आधुनिक तंत्र आणि कौशल्य हस्तगत केलेले हे उमेदवार कंपन्यांच्या अपेक्षांना वास्तवात उतरवू शकतात, असे समजले जात असल्याने त्यांना अधिकाधिक संधी देण्याकडे कल वाढलाय. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थी व संबंधित उमेदवारांनी नवी कौशल्य आत्मसात करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. ज्यांच्याकडे काही कौशल्ये असतील त्यांनी त्याचे उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करायला हवे. कौशल्याचे सतत उन्नतीकरण ही सध्याची गरज असून त्यामुळे कंपन्या/ व्यवसाय/ उद्योग/ कार्पोरेट्समध्ये विविध आव्हानात्मक कार्यांना स्वीकारून प्रभावीरीत्या पार पाडणे शक्य होऊ शकते. अशा बहु-कौशल्य प्राप्त उमेदवारांना इतरांपेक्षा लवकर संधी मिळू शकतात. शिवाय प्रगतीच्या संधी वेगाने मिळू शकतात. 

नव्या भूमिकांचा तत्परतेने स्वीकार करून त्यात कौशल्य सिद्ध करणाऱ्या उमेदवारांची, व्यवसाय वाढीसाठी कंपन्यांना सातत्याने गरज भासते. त्यामुळे अशा नव्या भूमिकांची जबाबदारी घेण्यासाठी सदैव तयार असणे गरजेचे ठरते. हे बदल आणि आव्हाने स्वीकारण्याची ज्या उमेदवारांची तयारी असेल त्यांना सध्याच्या कठीण काळातही विविध करिअर संधी सुलभतेने मिळताना दिसतात.

कौशल्य संच
न्यू नॉर्मल काळात पुढील काही कौशल्यसंच असलेल्या उमेदवारांना संधी मिळत असल्याचे दिसून येते. 

  1. स्वीकारार्हता आणि लवचिकता : न्यू नॉर्मल काळात घरूनच काम करण्याची स्थिती तशीच राहू शकते. त्यामुळे घरून काम करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र - कौशल्य - शैली- मानसिकतेचा स्वीकार करणाऱ्या वा तत्परतेने अंगीकारणाऱ्या उमेदवारांना संधीची कमतरता पडणार नाही. पूर्वी लवचिकतेच्या व्याख्येत कुठेही म्हणजेच कोणत्याही शहरात काम करण्याची तयारी, असे समजले जायचे, आता मात्र कामाचा सकारात्मक दबाव, खुली मानसिकता, अनपेक्षित अशा डेडलाइन्स म्हणजे कार्य/काम किंवा टास्क पूर्ण करण्यासाठीचा कालावधी आणि अतिरिक्त जबाबदारींचा स्वीकार या घटकांचा समावेश लवचिकतेत केला जातो.
  2. तंत्र स्नेही : आता बहुतेक सर्व कंपन्यांनी आपले बहुतांश काम डिजिटली होईलच यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे कंपन्यांची कार्यशैली व पद्धत बदललेली असून कंपन्यांचे डिजिटल रूपांतरण झाले आहे. यापुढील काळात कोरोनासदृश कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी या कंपन्यांनी जोमाने सुरू केली आहे. त्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिॲलिटी आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. 
  3. नेतृत्व गुण : जेव्हा जहाज संकटात सापडते तेव्हा फक्त त्या जहाजाचा कप्तानच त्याला या संकटातून बाहेर काढू शकतो. अनपेक्षित संकटाच्या समयी सक्षम नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्य, इतरांना प्रेरणा देणारी, इतरांकडून उत्कृष्ट काम करून घेणारी व्यक्ती कंपनीच्या हिताचे रक्षण करू शकते याची जाणीव कंपन्यांना झाली असून हे गुण अथवा कौशल्य प्राप्त व्यक्तींना चांगल्या संधी देण्याचे धोरण कंपन्यांनी अवलंबले आहे.
  4. भावनिक बुध्यांक : सर्वत्र अस्थिरता असणाऱ्या काळात कंपन्यांना आपल्या कामगार/ कर्मचारी/ मनुष्यबळास मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवणे गरजेचे वाटू लागले आहे. मानसिक स्थैर्य असणारी व्यक्तीच कंपनीच्या उत्पादकतेवर परिणाम घडू देणार नाही, असे यामागचे गृहीतक आहे. त्यामुळे मानसिक स्थैर्य असणाऱ्या व्यक्ती भावनांवर नियंत्रण ठेऊ शकतात, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, असे समजले जाते. हा एक महत्त्वाचा गुण आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ठरतो.
  5. संवाद कौशल्य : कोरोनोत्तर काळात आपल्या कंपन्यांची गेलेली पत किंवा कमी झालेला व्यवसाय या बाबींवर मात करण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या व कंपनीच्या ब्रँडिगसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या व्यक्तीस संधी देण्याकडे कल वाढलेला आहे. सर्जनशील लिखाण, संहितेची व्यूहनीती, डिजिटल माध्यमासाठी सुयोग्य संहिता लेखन, ही कौशल्ये गरजेची मानली जात आहेत. 
  6. सर्जनशीलता आणि वेगळा विचार करण्याची क्षमता : कोरोना काळात विविध प्रकारच्या माहितीने (अर्धसत्य- असत्य- खोडसाळ- बनावट- संदर्भहीन इत्यादी) खूप गोंधळ घातला. त्यामुळे भयाची स्थिती निर्माण झाली. सर्व प्रकाराच्या व्यवस्था कोलमडून पडल्या. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना, पुन्हा अशा खोडसाळ, असत्य माहितीच्या प्रसरणामुळे अकल्पित नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या स्रोतांमधून येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळणे, त्याचे विश्लेषण करणे, वस्तुनिष्ठता तपासणे यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासेल. त्यामुळे सर्जनशील विचार करणारी व निर्णयप्रक्रियेला बळकटी देऊ शकणारी व्यक्ती, कोणत्याही संस्था/ कंपनी/ उद्योग/ कॉर्पोरेट यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यामुळे अशा प्रकारची कौशल्ये प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या नेमणुकीला गती मिळू शकते.

विस्मयकारक बदल
कार्यशैली, शिक्षणपद्धती आणि संवाद प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होतच होते. मात्र न्यू नॉर्मल काळात हे बदल अत्यंत विस्मयकारक ठरले. आता संगणक आणि रोबो हे दोघेही काम करण्याचे साधन राहिले नसून ते साहाय्यक झाले आहेत. असे असले तरी घरूनच पूर्ण वेळ काम करण्याचा मोठा पट जगभर मांडला जाईल अशा शक्यतेची कल्पना अभावानेच केली गेली. डिजिटल शाळा, डिजिटल अध्ययन, डिजिटल मीटिंग, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल हेल्थ सिस्टीम अशा जवळपास सर्वच क्षेत्राचे डिजिटलायझेशन कोरोनोत्तर काळात झाले. कोरोना विषाणूवर मात केल्यानंतरही या स्थितीत कितपत बदल होईल, याबाबत ठामपणे सांगता येत नाही. पूर्वस्थितीला सर्व व्यवस्था येतील हे मात्र जवळपास अशक्य नसले तरी त्यास बराच कालावधी लागू शकतो. 
कोरोनोत्तर काळात रोजगाराच्या संधी कमी होतील असे भाकीत काही तज्ज्ञांनी केले होते. काही अंशी ते खरे ठरले असले तर नव्या कौशल्यसंचाला हस्तगत केलेल्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर या काळात भरती झाल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या