डिजिटल मार्केटिंग

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

न्यू नॉर्मलच्या काळातही आता घरूनच काम आणि घरूनच खरेदी-विक्री हे दोन्ही प्रवाह कायम राहणार असल्याने अधिकाधिक कंपन्या डिजिटल मार्केटिंगकडे वळून स्वतःची डिजिटल उपस्थिती अधिकाधिक कशी वाढेल याकडे लक्ष देतील हे निश्चित.

डिजिटल मार्केटिंग हा कोरोना नंतरच्या काळातला परवलीचा शब्द झालाय. लॉकडाउनच्या काळात घरबसल्या खरेदी-विक्री करण्याकडे डिजिटल साक्षरांचा कल वाढलाय. शासनही अशा व्यवहारास, ‘दो गज की दूरी आणि ‘सुरक्षित राहा’, या तत्त्वानुसार प्राधान्य देत आहे. या पुढील काळातही घरूनच काम आणि घरूनच खरेदी-विक्री हे दोन्ही प्रवाह कायम राहणार असल्याने अधिकाधिक कंपन्या डिजिटल मार्केटिंगकडे वळून स्वतःची डिजिटल उपस्थिती अधिकाधिक कशी वाढेल याकडे लक्ष देतील हे निश्चित. 

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २०२५ पर्यंत या क्षेत्रातील वाढ १६० मिलियन डॉलर्स इतकी राहील. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य प्राप्त करून त्यात नैपुण्य मिळविल्यास करियरच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

डिजिटल मार्केटिंगसाठी ढोबळ मानाने पुढील काही मनुष्यबळाची गरज लाभते

  • डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ः कंपनी आणि कंपनीच्या उत्पादनांची माहिती देण्यासाठी ब्लॉग, ई-बुक या माध्यमांचा उपयोग करण्याचे कौशल्य या उमेदवाराने प्राप्त करणे गरजेचे आहे. बाजारातील विक्रीचे प्रवाह आणि कल यांचे संशोधन, संवाद प्रक्रियेत सातत्याने सुधारणा, डिजिटल जागेचा अधिकाधिक प्रभावी वापर करून कंपनी किंवा उत्पादन (प्रॉडक्ट) किंवा दोघांचेही उत्तम ब्रँडिंग करण्याची जबाबदारी या उमेदवारास पार पाडावी लागते. 
  • डिजिटल मार्केटिंग मॅनेजरः  डिजिटल क्षेत्र किंवा जागा व्यापण्यासाठी आवश्यक असणारी नवी तंत्रे अंगीकारून त्याचा प्रभावी वापर या उमेदवाराने करणे अपेक्षित असते. कंपनीच्या उत्पादनांबाबत ग्राहकांमध्ये जागृती व्हावी यासाठी वेगवेगळ्या व्यूहनीती आखणे आणि त्याची प्रभावीरीत्या अंमलबजावणी करण्याची जबाबादारी या उमेदवारास पार पाडावी लागते.  
  • सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) ॲनॅलिस्ट ः कंपनी आणि उत्पादनाच्या शोधासाठी ग्राहकांनी संबंधित संस्था अथवा कंपनीच्या संकेतस्थळाकडे मोठ्या संख्येने वळावे यासाठी या तज्ज्ञास प्रयत्न करावे लागतात. संकेतस्थळाची श्रेणी (रॅकिंग) सतत वाढत राहावी यासाठी त्यास कौशल्य वापरावे लागते. ग्राहकांच्या खरेदीचा कल ओळखून मार्केटिंगच्या नव्या व्यूहनीती आखण्यासाठी या उमेदवारास दक्ष राहावे लागते. यासाठी तांत्रिक बाबींची उत्तम जाण असणे आवश्यक ठरते. या  क्षेत्रातील सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने, डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात सध्या या मनुष्यबळास मोठी मागणी आहे. 
  • सोशल मीडिया मार्केटर ः संकेतस्थळाचा वापर आणि विपणाचे तंत्र यांचा प्रभावी समन्वय साधण्याचे कौशल्य या उमेदवाराने प्राप्त करणे गरजेचे आहे. सामाजिक माध्यमांची साखळी आणि ग्राहकांचे विविध प्रकार - स्वभाव आणि वर्तणूक याकडे लक्ष ठेवून त्याप्रमाणे विक्री आणि विपणनाच्या पद्धतीमध्ये तत्काळ बदल करणे, या तज्ज्ञाकडून अपेक्षित असते. आशय लेखन (कंटेंट क्रिएशन), नव्या कल्पनांचे सृजन (आयडिएशन), माध्यमांचे नियोजन (मीडिया प्लॅनिंग) अशा घटकांचे समन्वयही त्यास करावे लागते. 
  • डिजिटल मार्केटिंग रायटर ः कंपनी अथवा उत्पादनाच्या ब्रँडशी सुसंगत आणि प्रभावी आशयाच्या निर्मितीची जबाबदारी या उमेदवारास उचलावी लागते. अपेक्षित ग्राहक ओळखून त्यानुसार संवाद प्रकिया राबवावी लागते. पहिल्याच दृष्टिक्षेपात ग्राहकाने आकर्षित होऊन, उत्पादन खरेदी करण्याच्या निर्णयाप्रत पोचवण्यासाठी, संकेतस्थळ, समाजमाध्यमे, ईमेलिंग, मोबाईल संदेश प्रसारण, व्हिडिओ कथन, रेडिओ जिंगल्स आदी माध्यमांचा सर्जनशील उपयोग करण्याचे तंत्र या उमेदवाराने अवगत करणे आवश्यक ठरते. 
  • पे पर क्लिक ः हे एक नवे क्षेत्र असून त्यासाठी सर्च इंजिन मार्केटिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनशी संबंधित तांत्रिक बाबींमध्ये पारंगतता मिळवणे गरजेचे ठरते. विश्लेषण आणि आकडेमोडीचे कौशल्य व आवड असावी. कंपनीने गुंतवणूक केलेल्या रकमेपेक्षा अधिक मिळकत कशी राहील यासाठी या तज्ज्ञांकडून विपणनाशी संबंधित प्रयत्न आणि व्यूहनीती अपेक्षित असते. 
  • सर्च इंजिन मार्केटिंग ः या मनुष्यबळास वेब मार्केटिंग, वेब ॲनालिसिस, कंटेंट स्ट्रॅटेजी, कीवर्ड स्ट्रॅटेजी या बाबी हाताळाव्या लागतात. त्याद्वारे कंपनीच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या व्यूहनीतीचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते. 
  • वेब डेव्हलपर ॲण्ड वेब डिझायनरः या मनुष्यबळास कंपनीच्या आकर्षक संकेतस्थळ निर्मिती, त्याचे सतत अपग्रेडेशन, या संकेतस्थळाकडे ग्राहकांनी आकर्षित व्हावे म्हणून सातत्याने सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करणे यासाठी प्रयत्न करावे लागतात. सॉफ्टवेअर वापरण्याचे तंत्र आणि ग्राफिक डिझाइन मधील कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात संधी मिळू शकते. 
  • डिजिटल एजन्सी अकाउंट मॅनेजरः या उमेदवारास कंपनीच्या सध्याच्या व्यवसायासोबतच सातत्याने नव्या व्यवसाय संधींचा शोध घ्यावा लागतो. या संधीचा लाभ कंपनीने कसा घ्यावा यासाठी व्यवस्थापकांना मार्गदर्शन करावे लागते. कंपनीच्या गरजा ओळखून त्यानुसार उद्दिष्टांचे निर्धारण करणे, याबाबीकडेही लक्ष पुरवावे लागते.

संस्था आणि अभ्यासक्रम
(१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोझिकोड, या संस्थेने इरुडायटस या शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने, प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग ॲण्ड ॲनालिसिस हा दहा महिने कालावधीचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. (१) डिजिटल मीडियाची ओळख, (२) डिजिटल विश्वातील विपणन, (३) डिजिटल विपणन व्यूहनीती, (४) डिजिटल विपणासाठीची आयुधे, (५) मोबाईल विपणन, (६) समाजमाध्यांद्वारे विपणन आणि आशयाद्वारे विपणन (कंटेंट मार्केटिंग), (७) डिजिटल माध्यम आणि मनोरंजन, (८) विपणन विश्लेषण प्रक्रिया. संपर्क : https://iimk.eruditus.com/digital-marketing-and-analytics/
 

(२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट -कोलकता, या संस्थेने टॅलेंटस्प्रिंट या कंपनीच्या सहकार्याने ॲडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) पॉवर्ड मार्केटिंग हा सहा महिने कालावधीचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मार्केटिंगच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून डिजिटल मार्केटिंग अधिक प्रभावी करता येणे शक्य असल्याचे या संस्थेचे सांगणे आहे. दोन वर्षाचा कार्यानुभव असलेला आणि ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतो. टॅलेंटस्प्रिंट ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजअंतर्गत कार्यरत असणारी शैक्षणिक बाबी हाताळणारी संस्था आहे.  संपर्क : https://iimcal.talentsprint.com/ai-powered-marketing 
 

(३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर, या संस्थेने सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल मार्केटिंग ॲण्ड स्ट्रॅटेजी, हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात डिजिटल, समाज माध्यमे आणि मोबाईल ॲप्सचा यांचा प्रभावी वापर करण्याचे ज्ञान प्रदान केले जाते. विपणनाची तत्त्वे, डिजिटल जगात वापरण्यासाठीची आवश्यक आयुधे, तंत्र, विश्लेषणाची कौशल्ये, या अभ्यासक्रमातील सैद्धांतिक बाबी आणि प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना प्रदान केली जातात. कालावधी ११ महिने असून ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवीधर हा ऑनलाइन अभ्यासक्रम करू शकतो.  संपर्क : https://www.iimidr.ac.in/executive-programmes 
 

(४) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रायपूर, येथे पाच महिने कालावधीचा सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग ॲण्ड सोशल मीडिया स्ट्रॅटेजी हा अभ्यासक्रम करता येतो. पात्रता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी आणि कार्यानुभव. या अभ्यासक्रमात संकेतस्थळ, डिजिटल अवकाश, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि सर्च इंजिन मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, समाज माध्यमातील विपणनाची तत्त्वे, डिजिटल अवकाशातील स्पर्धा, डिजिटल अवकाशातील प्रभाव आदी बाबींचा ढोबळमानाने समावेश करण्यात आला आहे.  संपर्क: https://talentedge.com/iim-raipur/executive-certificate-program-in-digit...  (५) मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन- या संस्थेने ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ब्रॅडिंग ॲण्ड कम्युनिकेशन, सोशल मीडिया आणि कंटेंट मार्केटिंग, मार्केटिंग ॲनॅलिटिक्स, मार्केटिंग कम्युनिकेशन या चार विषयांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची सुविधा आहे. विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार स्पेशलायझेशनचा विषय निवडू शकतो. मुख्य अभ्यासक्रमाचा कालावधी ५ महिन्यांचा असून त्यानंतर सहा आठवडे

स्पेशलायझेशनच्या विषयासाठी राखून ठेवले जातात. पात्रता- कोणत्याही विषयातील पदवीधर. हा अभ्यासक्रम अपग्रॅड या ऑनलाइन शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. संपर्क : www.mica.ac.in,आणि digitalmarketing@upgrad.com ईमेल-admissionenquiry@micamai

संबंधित बातम्या