कृषी उद्योग व्यवस्थापक

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोरोना काळातही इतर अनेक क्षेत्रांनी हाय खाल्ली असली तरी शेतीचे उत्पादन नुसते समाधानकारकच नव्हे तर काही राज्यात विक्रमीसुद्धा झाले. भारताच्या एकूण सकल उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा १६ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. कृषी क्षेत्राला अधिक ऊर्जितावस्था देण्याचे काम कृषीआधारित उद्योगांनी केले आहे. भारत हा कृषी उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. म्हणूनच या उद्योगाच्या सुयोग्य व्यवस्थापन व्यूहनीतीसाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. 

अन्न हीच मनुष्याची सर्वाधिक महत्त्वाची आणि मोठी मूलभूत गरज असल्याने या क्षेत्राच्या व्यावसायिकीकरणाकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अधिक उत्पादन आणि त्याचे सर्वदूर वितरण यावर जगातील सर्व प्रमुख देशांनी लक्ष केंद्रित केले आहे. भारतामध्ये या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अपरिमित संधी असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारे व खासगी क्षेत्राने कृषी क्षेत्राच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष पुरवले आहे. कृषीआधारित उद्योग क्षेत्रातील व्यवस्थापन तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौसह देशातील काही महत्त्वाच्या संस्थांनी एमबीए इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या उद्योगाच्या सुयोग्य व्यवस्थापन व्यूहनीतीसाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे.

काय शिकाल?
या अभ्यासक्रमात ढोबळमानाने पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे- (१) कृषी आणि खाद्यान्ने धोरण, (२) कृषी क्षेत्रासाठी लागणारे वित्त, (३) कृषी उत्पादनांचे विपणन (मार्केटिंग), (४) अन्नपदार्थांच्या विपणनासाठी व्यूहनीती, (५) कृषी-उद्योग प्रकल्पांचे व्यवस्थापन, (६) बाजाराचे संशोधन (मार्केट रिसर्च) आणि माहितीची कार्यप्रणाली, (७) आंतरराष्ट्रीय कृषी-अन्न व्यापार, (८) कृषी व्यवसायाच्या अनुषंगाने मूल्य साखळी व्यवस्थापन, (९) कृषी उद्योगासाठी लागणारी सर्जनशीलता, नवता, ज्ञान, उद्योजकतेचे कौशल्य, विविध प्रकारच्या संबंधांची साखळी (नेटवर्किंग), (१०) अन्न आणि कृषी उद्योगासंदर्भात आंतरराष्ट्रीय व्यूहनीती आणि आंतरराष्ट्रीय संस्था, (११) सूक्ष्म वित्त व्यवस्थापन, (१२) अन्न पुरवठा साखळी व्यवस्थापन, (१३) क्षमता वृद्धीचे विश्लेषण आणि क्षमता बांधणी, (१४) सार्वजनिक धोरण, (१५) सामाजिक उद्योजकता- सामाजिक बदलासाठीचे नावीन्यपूर्ण उपक्रम, (१६) विक्री आणि वितरण व्यवस्थापन, (१७) कृषी व्यवसाय उद्योजकता, (१८) कृषी व्यवसायासाठीचे नेतृत्व कौशल्य, (१९) अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि दर्जाचे अर्थशास्त्र, (२०) कृषी व्यापार व्यवस्था आणि मूल्यनिर्धारण, (२१) भांडवली बाजारात कृषी आधारित व्यवसायाचे स्थान, (२२) कृषी आधारित उपयोजित व्यापार आणि धोरणाचे विश्लेषण, (२३) स्थैर्याचे व्यवस्थापन, (२४) ऊर्जा व्यवसायाचे व्यवस्थापन. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी व्यवसायाच्या वाढ-विकास-समृद्धी आणि स्थैर्यासाठी लागणारे सैद्धांतिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. 

रोजगार संधी
या क्षेत्रात रोजगाराची संधी देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था- (१) गोदरेज ॲग्रोव्हेट, (२) पीआय इंडस्ट्रीज, (३) पायोनिअरिंग व्हेंचर्स, (४) निन्जाकार्ट, (५) वेकूल, (६) आयएनआय फार्म्स, (७) रिलायन्स फ्रेश, (८) केपीएमजी, (९) एचयूएल, (१०) ॲमेझॉन, (११) ओलॅम, (१२) डोव ॲग्रोसायन्स, (१३) ड्यू पॉइंट, (१४) मोन्सॅन्टो, (१५) सिनजेंटा, (१६) एबी ॲग्री, (१७) एडीएम-बियाणे वाहतूक आणि प्रकिया, (१८) जॉन डिअर-कृषी संयंत्रे निर्मिती, (१९) ओशन स्प्रे-शेतकऱ्यांची सहकारी संस्था. कृषी व्यवसाय/उद्योगातील स्टार्टअप्समध्येही मोठ्या संधी मिळायला सुरुवात झाली आहे. बियाणे उत्पादन, कृषी संयंत्रे आणि उपकरणांची निर्मिती अशा प्रकारच्या शेतीशी संबंधित विविध कंपन्या/उद्योग आणि व्यवसायांमध्ये करिअर संधी मिळू शकते. यामध्ये पशूखाद्य, कृषी रसायने, कुक्कुट खाद्य, अन्न प्रकिया उद्योग, दुग्धजन्य पदार्थ प्रकिया उद्योग, फळे आणि भाजीपाला प्रकिया, मांस प्रकिया, किरकोळ विक्री उद्योग, वित्तीय सेवा, खासगी क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सूक्ष्म वित्त बँक, कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात कार्यरत नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या, कृषी साठवणूक गृहे/केंद्रे, कमोडिटी ट्रेडिंग क्षेत्र, कृषी निर्यात केंद्रे, ई-कॉमर्स, संशोधन, सहकारी संस्था आणि फार्मर प्रोड्यूसिंग ऑर्गनायझेशन, सल्लागार आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्या.

वेगळ्या कौशल्याची गरज
नियमित स्वरूपाचे व्यवस्थापकीय तंत्र आणि कौशल्यापेक्षा कृषी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रासाठी आवश्यक वित्त/ विपणन/ निर्मिती/ उत्पादन कौशल्य व तंत्रे, अनेक बाबतीत वेगळी असतात. कृषी क्षेत्रामधील गुंतवणुकीचा कालावधी मोठा असतो. उत्पादन येण्याचा कालावधी मोठा असतो. कृषिमालाचे संरक्षण आणि सुरक्षेचे विविध प्रश्न भेडसावतात. निसर्गाचा कोप कधी होईल हे सांगता येत नाही.

या व्यवसायामध्ये कृषी आणि तत्सम क्षेत्रातील उत्पादने, कृषी रसायने, वितरण, शेतीसाठीची संयंत्रे आणि उपकरणे, प्रकिया, बियाणांचा पुरवठा, निर्यात-आयात, वित्त व्यवस्थापन, विक्री, पुरवठा साखळी व्यवस्थापन, करनिर्धारण, व्यापार या विषय घटकांचा समावेश होतो. या प्रत्येकासाठी वेगवेगळी सैद्धांतिक कौशल्ये वापरावी लागतात. नियोजन आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन यामध्ये बराच कालावधी जाण्याची शक्यता असते. या कालावधीत बाजाराची दिशा आणि दशा यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

वानिकी (फॉरेस्ट्री) या घटकाचा कृषी आधारित उद्योग/व्यवसायात समावेश होतो. या क्षेत्रात अनेक वेळा ३० ते ३५ वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. दीर्घ मुदतीच्या उत्पादन चक्रामुळे मूल्य निर्धारणावर मर्यादा येऊ शकतात. गेल्या वर्षी मिळालेले मूल्य यंदा मिळेल असे ठामपणे सांगता येत नाही. कृषी उत्पादन वाढीसाठी घेतलेले लघुमुदतीचे व्यवस्थापकीय निर्णय हे विक्री योग्य उत्पादनात लघु कालावधीसाठी वाढ किंवा घट करू शकतात. याचा थेट परिणाम गुंतवणुकीवर होतो. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून ॲग्री-बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची, या क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम मनोभूमिका तयार केली जाते.

महत्त्वाच्या संस्था आयआयएम अहमदाबाद
या संस्थेमार्फत एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. कृषी, अन्नपदार्थ निर्मिती, कृषी व्यवसाय, ग्रामीण आणि तत्सम क्षेत्रासाठी सक्षम आणि समर्थ व्यवस्थापकांची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या क्षेत्रातील उद्योगांच्या उच्च दर्जाच्या अपेक्षा साध्य करण्याची क्षमता आणि कौशल्य या विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमाद्वारे निर्माण केली जातात. 

कृषी आधारित व्यवसाय हा इतर उद्योग/व्यवसायांपेक्षा भिन्न असल्याने अचूक निर्णय घेणे व त्याची तत्काळ व प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असते. हे कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे शिकवले जाते. उद्योजकीय प्रेरणा व क्षमतावृद्धीवर भर देण्यात येत असल्याने कृषी आधारित उद्योग/व्यवसायासाठी हे विद्यार्थी सकारात्मक बदलाचे घटक ठरावेत यासाठी विषय घटकांची दिशा निश्चित केली जाते. कालावधी- दोन वर्षे. आयआयएमच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाची जोड या अभ्यासक्रमाला मिळाली असून तो या क्षेत्रातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च श्रेणीच्या करिअरसाठी उपयुक्त ठरणारा आहे. 

पात्रता ः १) कोणत्याही विषयातील पदवी आणि कृषी व खाद्यान्ने व्यवसाय क्षेत्राची आत्यंतिक आवड. निवड प्रक्रिया - या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पुढील पद्धतीने राबवली जाते. कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (कॅट)मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित निवडक उमेदवारांची विश्लेषणात्मक लिखाण कौशल्य (ॲनालिटिकल रायटिंग स्किल्स) चाचणी आणि मुलाखत घेतली जाते. अंतिम निवड करताना ७० टक्के वेटेज कॅटमधील गुण आणि ३० टक्के वेटेज इतर बाबींना (ॲप्लिकेशन रेटिंग स्कोअर) दिले जाते. यामध्ये दहावी, बारावी आणि पदवीमधील गुणांचा समावेश असतो.

संपर्क : प्रोग्रॅम ऑफिसर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद- ३८००१५, दूरध्वनी- ०७९-७१५२४६३१, ईमेल- admission@iima.ac.in, संकेतस्थळ- iima.ac.in, 
आयआयएम, लखनौ

या संस्थेमार्फत एमबीए इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. कालावधी- दोन वर्षे. निवड प्रक्रिया- कॅट परीक्षेतील गुण आणि संस्थेमार्फत घेतली जाणारी समूह चर्चा व मुलाखत. पात्रता- कृषी किंवा त्यासंदर्भातील इतर विषयातील पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि कृषी व खाद्याने क्षेत्राची तीव्र आवड.
संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, प्रबंध नगर, आयआयएम रोड, लखनौ- ०५२२-२७३४१०१ २२६०१३, दूरध्वनी- ०५२२-२७३४१०१, ईमेल- diroffice@ iiml.ac.in, संकेतस्थळ- iiml.ac.in 

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस 
या संस्थेने सुरू केलेला एमबीए इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा महत्त्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या अभ्यासक्रमात वित्त (सूक्ष्म वित्त, धोके व्यवस्थापन, कर्ज, खरेदी विक्री इत्यादी), विपणन (ग्रामीण आणि किराणा (रिटेल) व्यवसाय व्यवस्थापन) पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि करनिर्धारण या विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. जागतिक व्यापार संघटना, कृषी माल आयात निर्यात/ कृषी वित्त या विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते. विद्यार्थ्यांची निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे, पात्रता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. निवड- संस्थेची चाळणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे.
संपर्क : गेट नंबर १७४/१ हिंजवडी, तालुका- मुळशी, जिल्हा पुणे, दूरध्वनी-०२०-२२९३४३१६, ईमेल- director@siib.ac.in

वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट
ही संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे, पात्रता-कोणत्याही विषयातील पदवी. निवड प्रकिया- प्राथमिक निवड सूचीसाठी कॅट/ मॅट/ झॅट/ जीमॅट/ सीमॅट यापैकी कोणत्याही एका परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. त्याद्वारे निवडक विद्यार्थ्यांची निवड समूह चर्चा आणि मुलाखतीसाठी केली जाते. या दोन्ही चाचण्यांवर आधारित अंतिम निवड यादी तयार केली जाते. 
संपर्क : व्हॅम्निकॉम, चतुःश्रुंगी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ रोड, पुणे- ४११००७, दूरध्वनी- ०२०-२५७०१०००, फॅक्स- २५५३७७२६, ईमेल- info@vamincom.gov.in, संकेतस्थळ- www.vamnocom.gov.in

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅन्टेशन मॅनेजमेंट
बंगळूर येथे असलेली ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था होय. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट-अॅग्री बिझनेस अँड  प्लॅन्टेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- दोन वर्षे. हा निवासी पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. पात्रता- कृषी किंवा फलोद्यान किंवा पशुवैद्यक किंवा फॉरेस्ट्री किंवा सेरिकल्चरसह कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण आवश्यक. प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमार्फत घेण्यात येणारी कॉमन अॅडमिशन टेस्ट-सीएटी किंवा मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट -एमएटी किंवा कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट-सीएमएटी या परीक्षा देऊन योग्य गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. या संस्थेकडे अत्याधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा आहेत. उमेदवारांना परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये अनुभवासाठी पाठवले जाते. या संस्थेकडे डिजिटल लँग्वेज आणि कम्युनिकेशन स्किल्स लॅब आहेत. संबंधित उद्योगासोबत या संस्थेने सहकार्य केले आहे. कृषी-उद्योग क्षेत्रातील नव्या उदयोन्मुख प्रवाहांशी सुसंगत अशी या अभ्यासक्रमातील विषय घटकांची संरचना केली आहे. 
संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅन्टेशन मॅनेजमेंट, ज्ञानभारती कॅम्पस, पोस्ट ऑफिस मालाथल्ली बंगळूर- ५६००५६, दूरध्वनी - ०८०-५६००५६, २३२१ २७६७, ईमेल- admissions@iipmb.edu.in, संकेतस्थळ- www.iipmb.edu.in

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट
ही हैदराबादस्थित आणि भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. कृषी आधारित उद्योगांना लागणाऱ्या व्यवस्थापकांची निर्मिती या अभ्यासक्रमाद्वारे केली जाते. व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या आघाडीच्या देशस्तरीय खासगी आणि शासकीय संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट मिळाली आहे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागते. प्रारंभिक निवडीसाठी हे गुण ग्राह्य धरले जातात. अंतिम निवड मुलाखत आणि समूह चर्चेद्वारे केली जाते. कॉमन एन्ट्रस टेस्ट परीक्षेचा अर्ज भरण्याबरोबरच या संस्थेचाही प्रवेश अर्ज भरावा लागतो. पात्रता- कृषी व कृषी संबंधित विषय आणि इतर कोणत्याही विषयातील ४५ टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट. अंतिम निवडीसाठी १०० टक्के वेटेज पुढील प्रमाणे विभाजित केले जाते- ५५ टक्के वेटेज कॅट गुण, ६ टक्के वेटेज शिक्षणातील वैविध्य (डायव्हर्सिटी फॅक्टर), निबंध लेखन- ५ टक्के, समूह चर्चा- १० टक्के वेटेज, मुलाखत- १४ टक्के, कार्यानुभव-  ५ टक्के वेटेज, शैक्षणिक पात्रता- ५ टक्के.  संपर्क : प्रिन्सिपल कोऑर्डिनेटर-पीजीडीएम-एबीएम, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद- ५०००३०, पीजीसेल दूरध्वनी- ०४०-२४०१६७०९, ईमेल- pgcell@manage.gov.in, संकेतस्थळ- manage.gov.in
इतर संस्था
(७) केआयआयटी स्कूल ऑफ रूरल मॅनेजमेंट,भुवनेश्वर - एमबीए इन ॲग्री बिझनेस, (८) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेंट, (९)  इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल मॅनेजमेंट, (१०) झेवियर स्कूल ऑफ रुरल मॅनेजमेंट, भुवनेश्वर - एमबीए इन रुरल मॅनेजमेंट, (११) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस - स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, तुळजापूर - एम.ए. इन डेव्हलपमेंट पॉलिसी, प्लॅनिंग ॲण्ड प्रॅक्टिस.

संबंधित बातम्या