आयुर्वेद औषधनिर्मिती

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

देश आणि जागतिक पातळीवर आयुर्वेदाशी निगडित उद्योगांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता पुढील काळात या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी निर्माण होऊ शकतात. 

कोरोना काळात आयुर्वेदिक औषधे आणि आयुर्वेदिक आरोग्यविषयक उत्पादनांची (हेल्थ प्रॉडक्ट) मागणी जगभर मोठ्या प्रमाणात वाढली. आयुर्वेद औषधे आणि उत्पादने यांच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यास केला असून त्यांच्या निष्कर्षानुसार २०५०पर्यंत हा व्यवसाय जागतिक पातळीवर पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहचू शकतो. आयुर्वेदिक औषधी किंवा अन्नपदार्थांचे शरीरावर शून्य दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स), जागतिक दर्जाचे गुणवत्ता नियंत्रण आणि गेल्या दशकभरात या औषधांचे जागतिक पातळीवर प्रमाणीकरण किंवा विधिग्राह्यतेची वाढलेली गती यामुळे आयुर्वेदाशी निगडित उद्योगांचा झपाट्याने विकास होताना दिसतो. 

औषधीनिर्मितीशिवाय, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड, आयुर्वेद औषधीनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा व्यापार, औषधी वनस्पतीमधील नेमके द्रव्य मिळवणे या बाबींनासुद्धा सध्या जागतिक पातळीवर मागणी वाढली आहे. याशिवाय आयुर्वेदिक प्रसाधने, आयुर्वेदिक अन्नपदार्थ यांच्या निर्मितीसही चालना मिळाली आहे. या क्षेत्रातील अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना भारतीय आणि जागतिक पातळीवरील आयुर्वेद औषधे, अन्नपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधने निर्मिती करणाऱ्या कंपन्या/उद्योगांमध्ये निर्मिती प्रकिया, उत्पादन प्रक्रिया, संशोधन, औषधांचा शोध, गुणवत्ता नियंत्रण, नियामक तज्ज्ञ यांसारख्या संधी मिळू शकतात. स्वतःच्या दुकानांबरोबरच संबंधित उमेदवार लघु प्रमाणावरील औषधी निर्मितीचे संयंत्रसुद्धा सुरू करू शकतो. भारत सरकारने आयुर्वेदिक औषधी आणि इतर उत्पादनांच्या निर्मितीमध्ये असणाऱ्या लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांसाठी अर्थसाहाय्याचे मोठे पॅकेज घोषित केले आहे.

संस्था आणि अभ्यासक्रम
(१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायन्सेस ही आपल्या देशातील आयुर्वेद औषध निर्मितीशास्त्राचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था आहे. या क्षेत्रातील महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने गेल्या वर्षी या संस्थेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’चा दर्जा दिला असून यापुढे ही संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग ॲण्ड रिसर्च इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायन्सेस’ या नावाने ओळखली जाईल.

या संस्थेत आयुर्वेद औषधी निर्माणशास्त्रातील डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म.), बॅचलर इन फार्मसी (बी.फार्म.) हे अभ्यासक्रम करता येतात.
डी.फार्म. : कालावधी दोन वर्षे. दहावीतील गुण आणि मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमात रसशास्त्र आणि भैशज्य कल्पना, द्रव्यगुण, आयुर्वेद आणि स्वस्थवृत्त, शरीर रचना आणि क्रिया, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स (औषधी निर्माणशास्त्रातील न्यायतत्त्वशास्त्र), औषध साठा व्यवस्थापन, रुग्णालयातील औषधालये इत्यादी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर उमेदवार आयुर्वेदिक औषधालय उघडू शकतो. या उमेदवारास शासकीय रुग्णालयाच्या औषधालयातील तज्ज्ञ वाटपदार (Pharmacist), आयुर्वेद औषधी निर्मिती कंपन्यांसाठी मार्केटिंग (विपणन), औषध तयार करणारा तज्ज्ञ (Dispenser) इत्यादी करिअर संधी मिळू शकतात.

बी.फार्म. : कालावधी चार वर्षे. पात्रता - बारावी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण. बारावीतील गुण आणि मुलाखतीद्वारे अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. या अभ्यासक्रमात औषधीनिर्मितीचे रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान, औषधीनिर्मितीची अभियांत्रिकी, औषधीनिर्मितीचे जैवरसायनशास्त्र, औषधीनिर्मितीचे सूक्ष्मजीवशास्त्र, गुणवत्ता नियंत्रण, संगणकाचा वापर, औषधालयाच्या संदर्भात कायदे, नियम आणि अधिनियम, पर्यावरणशास्त्र, संस्कृत आाणि इंग्रजी, न्यायवैद्यकीय औषधालये, रसशास्त्र आणि भैशज्य कल्पना, द्रव्यगुण, आयुर्वेद आणि स्वस्थवृत्त, शरीर रचना आणि क्रिया, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स (औषधी निर्माणशास्त्रातील न्यायतत्त्वशास्त्र) आणि औषध साठा व्यवस्थापन, रुग्णालयातील औषधालये इत्यादी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर आयुर्वेदिक औषधी निर्मिती उद्योगांमध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून करिअर संधी मिळू शकते. त्याच बरोबर, गुणवत्ता नियंत्रक अधिकारी, शासकीय प्रयोगशाळांमध्ये विश्लेषक (ॲनालिस्ट), ड्रग इन्स्पेक्टर, औषधांचे पुरवठादार, वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह), खरेदी अधिकारी अशा संधी मिळतात. आयुर्वेदिक औषधालय उघडून स्वयंरोजगाराची पायाभरणी करता येते. 

प्लेसमेंट - या संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये इमामी, बैद्यनाथ, हिमालय, आस्फा, वासू हेल्थकेअर, उंझा आयुर्वेदिक फार्मसी, विर्गो आयुर्वेदिक फार्मा, बेनमून फार्मा रिसर्च, झांडू, बॅन लॅब लिमिटेड, व्हायटल केअर-हेल्थ ॲण्ड हॅप्पिनेस, मुलतानी, आर्युकेअर फार्मास्युटिकल्स, चरक आदी कंपन्या सहभागी होतात. 
संपर्क :  ए. के. जमाल बिल्डिंग, गुरु नानक रोड, जामनगर, गुजरात - ३६१००९, दूरध्वनी - ०२८८-२५५५७४६, फॅक्स - २५५५९६६, संकेतस्थळ - www.iaps.ac.in, ईमेल - principal@iaps.ac.in

(२) माधव युनिव्हर्सिटी, राजस्थान (माधव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल) - आयुर्वेद औषधी निर्माणशास्त्रातील डी.फार्म. आणि बी.फार्म. हा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क : माधव हिल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७, भारजा, अबु रोड, ता.- पिंडवारा, जिल्हा- सिरोही, राजस्थान- ३०७०२६, दूरध्वनी - ८८७५०२८९९१, संकेतस्थळ - https://madhavuniversity.edu.in/aboutus.html, ईमेल - info@ madhavuniversity.edu.in 

(३) केरळ हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी (एमव्हीआर, आयुर्वेद मेडिकल कॉलेज, पारास्सिनिक्कडवू) - बी.फार्म. (आयुर्वेद) अभ्यासक्रम करता येतो. संपर्क : थ्रिस्सूर- ६८०५९६, दूरध्वनी - ०४८७-२२०७६५०, फॅक्स - २२०६७७०, संकेतस्थळ - khus.ac.in, ईमेल - academic@khus.ac.in
याच महाविद्यालयात बी.एस्सी. नर्सिंग (आयुर्वेद) हा अभ्यासक्रमही करता येतो.

(४) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा इन आयुष नर्सिंग ॲण्ड फार्मसी हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी - ३ वर्षे. पात्रता - कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. संपर्क : कादवड, जोधपूर- नागौर हायवे रोड, जोधपूर - ३४२०३७, संकेतस्थळ - https://education.rajasthan.gov.in/content/raj/education/dr--sarvepalli-..., ईमेल - rau_jodhpur@yahoo.co.in, दूरध्वनी-०२९१-२७९५३११ 

(५) अॅपेक्स प्रोफेशनल युनिव्हर्सिटी - बी.फार्म. आणि डी.फार्म. संपर्क : अॅपेक्स प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, एनएच-२२, पासिघाट स्मार्ट सिटी, जिल्हा सियांग (पूर्व) - ७९११०२, अरुणाचल प्रदेश. संकेतस्थळ - apexuniversity.edu.in, ईमेल - ask@apexuniversity.edu.in, भ्रमणध्वनी- ८८००८३८८३९. 

(६) सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस - अभ्यासक्रम - पंचकर्म साहाय्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम. पात्रता - बारावी उत्तीर्ण. कालावधी - १ वर्ष. हा अभ्यासक्रम संस्थेच्या दिल्ली आणि केरळमधील चेरुथुरुथी येथील कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
संधी - पंचकर्म सेवा-सुविधा पुरवणारे स्पा/आरोग्य केंद्र/आयुर्वेद केंद्र/स्वयंरोजगार
संपर्क : अनुसंधान भवन, नंबर ६१-६५, इन्स्टिट्यूशनल एरिया, अपोझिट डी ब्लॉक, जनकपुरी, नवी दिल्ली - ११००५८, दूरध्वनी - ०११-२८५८५८५२, फॅक्स - २८५२०७४८, संकेतस्थळ - www.ccras@nic.in, ईमेल-dg-ccras@nic.in

संबंधित बातम्या