कोणत्याही शाखेतील बारावी झालेल्यांसाठी संधी

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

काहीवेळा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आपली शिक्षण शाखेची निवड चुकली तर नाही ना अशा चिंता सतावत असते. अमुक एक शाखा घेतली की करिअरचे अन्य काही मार्ग बंदच होतात, असाच बऱ्याचदा पालकांचाही समज असतो. मात्र काही अभ्यासक्रम कोणत्याही शाखेचा अभ्यास करून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तम करिअर घडवायला मदत करतात. असे काही महत्त्वाचे अभ्यासक्रम...

१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ः मद्रासमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच मानव्यशास्त्राचाही अभ्यास करता येतो. या संस्थेने २००६ साली बारावीनंतरचा पाच वर्षे कालावधीचा एम.ए (इंटिग्रेटेड अभ्यासक्रम) मानव्यशास्त्र शाखेत सुरू केला. आयआयटी सारख्या दर्जेदार संस्थेतून हा अभ्यासक्रम केल्याने करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. 

हा अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय  स्वरूपाचा असून यामध्ये इंग्रजी, परकीय भाषा, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्र, सांस्कृतिक अभ्यास, नाट्यशास्त्र, सांख्यिकी आणि तर्कशास्त्र या विषयांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठीसुद्धा हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम केल्यावर सल्लागार कंपन्या, संशोधन करणाऱ्या संस्था, जागतिक संस्था, स्वयंसेवी संस्था, बँका, अध्यापन, धोरणनिर्मितीत सहभागी असणाऱ्या संस्था आणि पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क ः डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटी ॲण्ड सोशल सायन्सेस, रूम नंबर- एचएसबी-३३३, आयआयटी-मद्रास, चेन्नई- ६०००३६, दूरध्वनी- ०४४-२२५७४५००, फॅक्स-२२५७४५०२, ईमेल- hsse@iitm.ac.in,संकेतस्थळ- https://hss.iitm.ac.in/ 

(२) फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ः पादत्राणे निर्मिती तंत्रज्ञान, चामडी वस्त्रप्रावरणे व आभूषण आणि वस्तुनिर्मिती या क्षेत्राची वाढ देशात व परदेशातही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढली आहे. कौशल्यविकास अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार या क्षेत्रात पुढील काही वर्षात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विपुल संधी मिळू शकतात. 

या बाबी लक्षात घेऊन भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९८६ साली करण्यात आली. भारतीय पादत्राणे उद्योगास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता येणे शक्य व्हावे, हा हेतू ठेवून अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. या संस्थेच्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता लक्षात घेऊन संस्थेला २०१७ साली ‘इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’चा दर्जा देण्यात आला.

देशातील सर्व भागातील विद्यार्थ्यांना संस्थेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सुलभ व्हावे यासाठी बारा शहरांमध्ये कॅम्पस सुरू करण्यात आले आहेत. 

अभ्यासक्रम ः 

  • बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझायनिंग. (करिअर संधी- कन्सलटन्ट, पर्सनल स्टायलिस्ट, टेक्निकल डिझायनर, ग्राफिक डिझायनर, फॅशन जर्नालिस्ट, फ्री लान्स डिझायनर, फॅशन मर्चंटायझर, व्हिज्युअल मर्चंटायझर, क्वालिटी कंट्रोलर, फॅशन कोऑर्डिनेटर )
  •  बॅचलर ऑफ डिझाइन इन फूटवेअर डिझाइन आणि प्रॉडक्शन. (करिअर संधी- मार्केटिंग, डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेलिंग, मर्चंटायझिंग, फॅशन फोरकास्टर, डेव्हलपर, कॉम्प्युटर एडेड स्पेशालिस्ट, डिझाइन कन्सलटन्ट, स्ट्रॅटेजी प्लॅनर, व्हिज्युअल मर्चंटायझर)
  • बॅचलर ऑफ डिझाइन इन रिटेल आणि फॅशन मर्चंटायझिंग (करिअर संधी- रिटेल स्टोअर, व्हिज्युअल मर्चंटायझिंग किंवा डिस्प्ले डिपार्टमेंट, व्हिज्युअल मर्चंटायझिंग कन्सल्टन्सी, सप्लाय कंपनी, रिटेल मर्चंटायझिंग, कॅटेगरी मॅनेजर्स, एरिया मॅनेजर, रिटेल मॅनेजर, फ्लोअर मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, लक्झरी ब्रँड्स स्टोअर मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, मर्चंट).
  • बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर गुड्स ॲण्ड अॅक्सेसरीज् डिझाइन (करिअर संधी- डिझायनर, मर्चंटायझर आणि प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह ) 

पात्रता ः कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. कालावधी ४ वर्षे.  अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये घेतली जाते.

संपर्क ः फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, ए १०/ए, सेक्टर २४ नॉयडा-२०१३०१, गौतमबुद्ध नगर, उत्तरप्रदेश, दूरध्वनी- ०१२०-४५००१००/४५००२०३, फॅक्स- २४१२५५६, ईमेल- contact@fddiindia.com आणि admission@fddindia.com, संकेतस्थळ- www.fddiindia.com. 

(३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (रोहतक) या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन लॉ (आयपीएल-लॉ) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम असून यामध्ये व्यवसाय व्यवस्थापन (बिझनेस मॅनेजमेंट) विधि आणि सुशासन यांचे सखोल ज्ञान प्रदान केले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, बीबीए -एलएलबी ही पदवी दिली जाते. या अभ्यासक्रमात १५ विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक घटक तीन महिने शिकवला जातो. शिवाय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 

पात्रता- खुला संवर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट, आणि एनसीएल ओबीसी ६० टक्के आणि अनुसू‍चित जाती आणि जमाती संवर्गासाठी ५५ टक्के गुण. उमेदवारांची निवड कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट या परीक्षेतील गुणांच्या आधारावर निवडक उमेदवारांची संस्थेमार्फत ऑनलाइन मुलाखत घेतली जाते. गुणवत्ता यादी तयार करताना दहावी आणि बारावीतील गुणांना ४० टक्के, क्लॅटमधील गुणांना ४५ टक्के आणि मुलाखतीला १५ टक्के वेटेज दिले जाते. 

संपर्क ः आयआयएम, मॅनेजमेंट सिटी, सदर्न बायपास, एनएच १०, रोहतक- १२४०१०, दूरध्वनी- ०१२६२-२२८५०५, ईमेल-ipladmission@iimrohtak.ac.in, संकेतस्थळ- iimrohtak.ac.in

(४) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (रोहतक) - या संस्थेने २०१९च्या शैक्षणिक वर्षापासून पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यास एमबीए ही पदवी प्रदान केली जाते. एखाद्या विद्यार्थ्यास तीन वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडावासा वाटल्यास, बीबीए (बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन) ही पदवी प्रदान केली जाते. 
हा अभ्यासक्रम दोन भागात विभाजित करण्यात आला आहे. पहिल्या भागात पायाभूत विषयांमध्ये लक्ष केंद्रित केले जाते. दुसऱ्या भागात व्यवस्थापन विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागते. अभ्यासक्रमाला १६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
अभ्यासक्रमात गणित, अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित, मानव्यशास्त्र हे चार घटक आहेत. कम्युनिकेशन मॅनेजमेंट- व्यवसाय संवाद, इन्फर्मेशन सिस्टिम - माहिती कार्यप्रणाली आणि परदेशी भाषा यांचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. चौथ्या आणि पाचव्या वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी जे विषय शिकवले जातात तेच विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. या परीक्षेत, विद्यार्थ्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांचा कल तपासणाऱ्या प्रश्नांचा समावेश असतो. या चाळणी परीक्षेत विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांना, लेखन कौशल्य चाळणी (रिटन ॲबिलिटी टेस्ट) आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्य याची चाचपणी केली जाते.  

मुंबई, कोलकता, दिल्ली, चेन्नई आणि बंगळूर येथे लेखन कौशल्य चाचणी आणि मुलाखती घेतल्या जातात. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना कल चाचणी परीक्षेतील गुणांना ५० टक्के वेटेज, मुलाखतीतील गुणांना ३० टक्के, लेखन कौशल्य चाचणीच्या गुणांना १० टक्के आणि शैक्षणिक कामगिरीला १० टक्के वेटेज दिले जाते. ऑनलाइन ॲप्टिट्यूड टेस्ट देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मुंबई यांचा समावेश आहे.
संपर्क ः ईमेल- ipmoffice@iimrohtak.ac.in 

(५) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (इंदूर) या संस्थेत इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांपैकी पहिल्या तीन वर्षात उमेदवारांचा विविध विषयातील पाया मजबूत केला जातो. पुढील दोन वर्षांत त्यांना या संस्थेच्या दोन वर्षे कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट/ एमबीए, या अभ्यासक्रमासाठी असलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षी, बॅचलर ऑफ आर्ट्‌स (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ॲण्ड एमबीए, ही पदवी प्रदान केली जाते. हा अभ्यासक्रम कला, वाणिज्य आणि विज्ञान या कोणत्याही शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांना करता येतो. 
शैक्षणिक वर्षापासून २०१६-१७च्या या अभ्यासक्रमाला पाच महत्त्वाच्या भागात विभाजित करण्यात आले. यामध्ये अर्थशास्त्र, गणित, सांख्यिकी, समाजशास्त्र आणि मानव्यशास्त्र या घटकांचा समावेश आहे. बिझनेस गव्हर्नमेंट आणि सोसायटी, बिझनेस हिस्टरी, कम्युनिकेशन, इन्फर्मेशन सिस्टिम या विषयांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा चौफेर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून भाषा- कला- संगीत- नाट्य- क्रीडा- योग यांचे प्रशिक्षण घेण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवव्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील व्यवस्थापन शिक्षणाचा अनुभव मिळण्यासाठी एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत पाठवण्यात येते.  

प्रवेश ः अर्जाची छाननी केल्यावर पात्र उमेदवारांना ॲप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी)साठी बोलावले जाते. वस्तुनिष्ठ पद्धतीच्या या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग असतात. एका विभागात संख्यात्मक क्षमता (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी- अल्जेब्रा, मॉडर्न मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, जॉमेट्री, डाटा ॲनॅलिसिस, अॅरिथमॅटिक यावरील प्रश्नांचा समावेश) आणि दुसऱ्या विभागात भाषा किंवा भाषिक क्षमता (व्हर्बल ॲबिलिटी- व्हर्बल रिझनिंग, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, एरर्स इन युसेज) यावर प्रश्न विचारले जातात. ॲप्टिट्यूड टेस्ट आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते. संख्यात्मक क्षमता आणि भाषा क्षमता या दोन्ही भागांसाठी विशिष्ट असा कटऑफ ठरवण्यात येतो. तो कटऑफ स्वतंत्ररीत्या प्राप्त करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे दोन्ही विभागासाठी निर्धारित कटऑफ प्राप्त उमेदवारांनाच पुढील टप्प्याच्या चाचणीसाठी निवडले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांची लेखनक्षमता चाचणी आणि व्यक्तिगत मुलाखतीचा समावेश असतो. हे कटऑफ गुण खुला संवर्ग व राखीव संवर्ग (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग, शारीरिकदृष्ट्या अपंग) यांची एकूण संख्या लक्षात घेऊन निर्धारित केला जातो. लेखन क्षमता चाचणी आणि मुलाखती देशातील दहा शहरांमध्ये घेतल्या जातात. अंतिम निवड करताना ॲप्टिट्यूड टेस्टमधील गुणांना ५० टक्के वेटेज, मुलाखतीला ३५ टक्के आणि लेखन कौशल्याला १५ टक्के वेटेज दिले जाते. अंतिम यादीत ज्या उमेदवारांची निवड होत नाही, त्यांना कळवले जात नाही. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. 

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरीय चाळणी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे - मुंबई, पुणे आणि नागपूर.
संपर्क ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर, प्रबंध शिखर, राऊ -पितमपूर रोड, इंदूर- ४५३५५६, दूरध्वनी-०७३१-२४३९६६६,२४३९६८९,फॅक्स-२४३९८००, ईमेल- ipmadmissions@iimid.ac.in, संकेतस्थळ -www.iimidr.ac.in

(६) नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून या ज्ञानशाखेतील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे. संस्थेने डिझाइन (अभिकल्प), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) या तीन बाबींचा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत आणि भक्कम व्हावा, यासाठी प्रारंभापासूनच लक्ष पुरवले आहे. देशातील ७० टक्क्यांहून अधिक फॅशन डिझायनर्स हे या संस्थेतून प्रशिक्षित झालेले असतात.

अभ्यासक्रम ः बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन/ लेदर/ ॲक्सेसरीज/ टेक्स्टाईल/ निटवेअर आणि फॅशन कम्युनिकेशन

पात्रता ः कला/ वाणिज्य/ विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण, किंवा केंद्रीय तंत्रशिक्षण मंडळाने अथवा राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली ३ किंवा ४ वर्षे कालावधीची पदविका.

प्रवेश प्रक्रिया ः या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोन टप्प्यातील, एनआयएफटी ॲडमिशन टेस्ट, ही परीक्षा घेण्यात येते. संपर्क- एनआयएफटी कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क, नवी दिल्ली-११००१६, दूरध्वनी- ०११ -२६८६७७०४, ई-मेल director.delhi@nift.ac.in, संकेतस्थळ- nift.ac.in

(७) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन - केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च या संस्थेने एनआयडीला डिझाइन क्षेत्रातील संशोधन संस्था म्हणून मान्यता प्रदान केली आहे. सध्या अहमदाबाद, कुरुक्षेत्र, विजयवाडा आणि भोपाळ येथे या संस्थेचे कॅम्पस आहेत. या संस्थेतील अभ्यासक्रम बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन) या नावाने ओळखला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत ॲनिमेशन फिल्म डिझाइन, एक्झिबिशन डिझाइन, फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन डिझाइन (जागा १०), ग्राफिक डिझाइन, सिरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन, फर्निचर ॲण्ड इंटेरियर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, टेक्स्टाईल डिझाइन या क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. कालावधी- चार वर्षे. 
प्रवेश ः अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी संस्थेमार्फत, डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा प्राथमिक आणि मुख्य अशा दोन स्तरांची आहे. प्राथमिक परीक्षा देशातील अनेक केंद्रावर घेतली जाते. (महाराष्ट्रातील केंद्रे- नागपूर / मुंबई) त्याद्वारे मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मुख्य परीक्षा अहमदाबाद केंद्रावर घेतली जाते. 

पात्रता - कोणत्याही ज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण. विजयवाडा, कुरुक्षेत्र आणि भोपाळ येथील कॅम्पसमधील अभ्यासक्रम हा ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन डिझाइन, या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी इंडस्ट्रिअल डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन आणि टेक्स्टाईल ॲण्ड ॲपरल डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. कालावधी- चार वर्षे.

संपर्क ः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पाल्डी, अहमदाबाद - ३८०००७, दूरध्वनी-०७९-२६६२९५००, ईमेल - academic@nid.edu आणि admission@nid.edu, संकेतस्थळ- www.nid.edu 

(८) इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर (आयआयटी मुंबई)
देशात अनेक ठिकाणी आयआयटी असल्या तरी मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा असे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे असते. विज्ञान शाखेतील बारावी झालेल्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी या तीनही स्तरावर साकार होऊ शकते. पण वाणिज्य आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईत शिकण्याची स्वप्नपूर्ती, इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर मधील, बॅचलर ऑफ डिझाइनच्या (अभिकल्प) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाद्वारे होऊ शकते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजेच यूसीड (UCEED), या परीक्षेला विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसोबतच कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही बसता येते.

या परीक्षेच्या गुणांवर, इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, मुंबई सोबतच आयआयटीडीएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग) जबलपूर येथील पदवीस्तरीय डिझाइन (अभिकल्प) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-  नागपूर, पुणे आणि मुंबई. 
संपर्क ः इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, आयआयटी, मुंबई-४०००७६, दूरध्वनी- ०२२-२५७६८०१, ईमेल-office.idc@iitb.ac.in किंवा admission.idc@iitb.ac.in, संकेतस्थळ- www.idc.iitb.ac.in 

(९) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बंगळूर
अभियांत्रिकीसाठी बहुतेक विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आयआयटी मुंबई येथे प्रवेश हवा असतो, त्याचप्रमाणे विधी शाखेचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास पहिले प्राधान्य नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीला दिले जाते. या संस्थेने गेल्या काही वर्षात विधी शिक्षणात देशात पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. 

संस्थेने विधी शिक्षणप्रकियेत उच्च दर्जा आणि गुणवत्ता स्थापित केली आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमात जागतिक स्तरावरील मान्य झालेले आधुनिक प्रवाह तातडीने समाविष्ट केले जातात. या संस्थेमार्फत अभ्यासक्रमात सातत्याने नावीन्य आणले जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्या वैचारिक सर्जनशीलतेला उंच झेप घेता येणे शक्य होते. विधी विषयाशी संबंधित मुख्य अभ्यासक्रमांसोबत इतर वेगळे विषय उदाहरणार्थ - निवडणूक सुधारणा, सायबर सुरक्षा, अंतराळ कायदे, स्पर्धात्मक कायदे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य काळजी असे विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. 

या संस्थेत बीए-एलएलबी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. कालावधी- पाच वर्षे. प्रवेशासाठी कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (क्लॅट) द्यावी लागते. या परीक्षेत पहिल्या ७५ ते १०० क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे सुलभ जाऊ शकते. 
संपर्क ः  नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी, नागरभावी, बंगळूर- ५६०२४२, दूरध्वनी-०८०-२३२१३१६०, फॅक्स-२३१६०५३५, ईमेल-contact@nls.ac.in, संकेतस्थळ-nls.ac.in

(१०) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग ॲण्ड न्यूट्रिशन 
दिल्ली येथे असणारी द इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग ॲण्ड न्यूट्रिशन ही संस्था १९६२ साली भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत, आतिथ्य उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या गरजांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थापन करण्यात आली. गेल्या ५९ वर्षात या संस्थेने या क्षेत्रातील शिक्षण - प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी आपल्या देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. या संस्थेचे विद्यार्थी सध्या देश-विदेशात मोठ्या पदांवर आहेत. अनेकांनी स्वतःचा व्यवसाय यशस्वी केला आहे.

अभ्यासक्रम ः बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन. कालावधी तीन वर्षे. आतिथ्य उद्योगासाठी आवश्यक असणारे आधुनिक ज्ञान आणि तंत्र, व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीचे कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे उमेदवारांना प्राप्त करून दिले जाते. 

पात्रता ः कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण किंवा बारावीची परीक्षा देणारे उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात . उमेदवारांच्या निवडीसाठी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाइन आहे. ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या केंद्रांचा समावेश आहे. 
संपर्क ः इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी पुसा कॉम्पलेक्स, नवी दिल्ली ११००१२, दूरध्वनी- ०११- २५८४१४११, फॅक्स- ०११- २५८४०१४७ संकेतस्थळ- www.ihmpusa.net आणि www.nchm.nic.in, ईमेल- ihmpusa@rediffmail.com आणि  jeenchm@gmail.com

(११) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट ॲण्ड डिझाइन- पारंपरिक हस्तकौशल्याला समकालीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास हस्तकौशल्य व्यवसाय अधिक स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना राजस्थान सरकारमार्फत करण्यात आली.

संस्थेच्यावतीने बॅचलर इन क्राफ्ट डिझाइन हा चार वर्षे कालावधीचा आणि आठ सत्रांमध्ये विभाजित करण्यात आलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत (१) सॉफ्ट मटेरिअल ॲप्लिकेशन-एकूण जागा २०, (२) हार्ड मटेरिअल ॲप्लिकेशन- एकूण जागा २०, (३) फायर मटेरिअल ॲप्लिकेशन- एकूण जागा २०, अशा तीन क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते.

पात्रता ः कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण उमेदवार. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट जयपूर ,दिल्ली, अहमदाबाद, बंगळूर, कोलकता मुंबई, लखनौ अशा काही शहरांमध्ये घेतली जाते.
संपर्क ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट आणि डिझाइन, जे-८, झालना इन्स्टिट्यूशनल एरिया, जयपूर ३०२००४, राजस्थान, दूरध्वनी:०१४१- २७०१२०३, फॅक्स: २७००१६०, ई-मेल-info@iicd.ac.in/admissions@iicd.ac.in संकेतस्थळ -www.iicd.ac.in.

(१२) नॅशनल रेल ॲण्ड ट्रान्स्पोर्टेशन इन्स्टिट्यूट 
या संस्थेत बीबीए इन ट्रान्स्पोर्टेशन मॅनेजमेंट (कालावधी-तीन वर्षे/ पात्रता ः कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण), बीबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील उमेदवारास बारावीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पाच टक्क्यांची सूट. 

संपर्क ः नॅशनल रेल ॲण्ड ट्रान्स्पोर्टेशन इन्स्टिट्यूट कॅम्पस, लालबाग, वडोदरा- ३९०००४, गुजरात, दूरध्वनी- ०२६५- २६४८३०५, ईमेल-hr@nrti.edu.in, संकेतस्थळ- nrti.edu.in

संबंधित बातम्या