भविष्यातील संधी 

सुरेश  वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

भटकंती- इव्हेंट्स- हॉटेलिंग क्षेत्रात करिअरच्या संधी सध्या अल्पप्रमाणात असल्या तरी पुढे दोन ते तीन वर्षात मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या संधी नक्कीच निर्माण होतील. त्यामुळे या क्षेत्रात मनापासून करिअर करण्याची आवड, इच्छा असल्यास पर्यटन, आतिथ्य सेवा आणि इव्हेंट्स मधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना यंदा प्रवेश घ्यायला हवा. 

गेल्या वर्षी मार्चपासून आपण आपल्या भटकंती- इव्हेंट्स- हॉटेलिंग- मौजमजा या बाबींना जवळपास मुकलोच. त्याचा फटका या क्षेत्रातील व्यवसाय/ उद्योगांना बसला. पुन्हा आलेली टाळेबंदी आणि विविध नियंत्रणांमुळे यंदासुद्धा ही तीनही क्षेत्रे काळवंडलेलीच राहतील असे चित्र आहे. पण कोरोना विषाणूवर नजीकच्या काळात बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले जाईल, हे सध्या जगातील सर्व राष्ट्रांद्वारे ज्या विविध उपाययोजना केल्या जाताहेत यावरून ठामपणे म्हणता येईल. याचा अर्थ २०२२मध्ये समजा स्थिती किंचित सुधारली तर २०२३पर्यंत परिस्थिती बरीच चांगली होईल. तेव्हा दीड-दोन वर्षे थोपवून धरलेली भटकंती/पर्यटन, खाऊ गल्लीची सैर आणि इव्हेंट्स या तिन्ही बाबी जोशात आणि जोमात केल्या जातील. पर्यटन व्यावसायिक किंवा उद्योजकांकडूनही नव्या स्वरूपातील पर्यटन/भ्रमंतीच्या योजना आणल्या जातील. याचाच अर्थ या तिन्ही क्षेत्रात यंदा करिअरच्या संधी अल्पप्रमाणात असल्या तरी पुढे दोन ते तीन वर्षात मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या संधी नक्कीच निर्माण होतील. त्यामुळे या क्षेत्रात मनापासून करिअर करण्याची आवड, इच्छा असल्यास आणि पालकांचाही सकारात्मक दृष्टिकोन असल्यास पर्यटन, आतिथ्य सेवा आणि इव्हेंट्स मधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना यंदा प्रवेश घ्यायला हवा. 

(१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट
पर्यटन आणि यात्रा व्यवस्थापन या विषयातील शिक्षण देणारी आपल्या देशातील सर्वात महत्त्वाची आणि दर्जेदार संस्था म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट या संस्थेने ख्याती प्राप्त केली आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था असून या संस्थेचे ग्वाल्हेर, नॉयडा, भुवनेश्वर, गोवा आणि नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस आहेत. संस्थेच्यावतीने बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल, मास्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

(बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल- कालावधी तीन वर्षे असून प्रवेशासाठी संस्थेमार्फत, आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट ही चाळणी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा ग्वाल्हेर, भुवनेश्वर, गोवा, नॉयडा आणि इतर काही केंद्रावर घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत विशिष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावण्यात येईल. तिन्ही घटकांच्या कामगिरीवर आधारित अंतिम निवड केली जाईल. त्यासाठी प्रवेश परीक्षेतील कामगिरीला ७० टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी १५ टक्के वेटेज दिले जाते.

अशी असते परीक्षा
ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धतीची आहे. एकूण गुण १००. या प्रश्नपत्रिकेमध्ये सामान्य अध्ययनाचे ५० प्रश्न, भाषिक कौशल्याचे २५ प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे २५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. प्रश्नपत्रिकेचा दर्जा बारावी परीक्षेचा असतो.
पात्रता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग प्रवर्गासाठी गुणांमध्ये पाच टक्क्यांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या एकूण ३७५ जागा आहेत. ग्वाल्हेर कॅम्पसमध्ये ११२, भुवनेश्वर कॅम्पसमध्ये ११३, गोवा आणि नॉयडा कॅम्पसमध्ये प्रत्येकी ७५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये व्यवस्थापनाची तत्त्वे आणि संकल्पना, पर्यटनाची तोंडओळख, भारतीय इतिहास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, लेखाविषयक मूलभूत तत्त्वे, आतिथ्यसेवेची तोंडओळख, भूगोलाची तत्त्वे, व्यवसायाचे अर्थकारण, विपणन व्यवस्थापन, पर्यटनासाठी माहिती तंत्रज्ञान, यात्रा/ प्रवास/ पर्यटनाचे आयोजन, वाहतूक व्यवस्था, पर्यटन संसाधने, परदेशी भाषा (फ्रेंच किंवा जर्मन), पर्यटनाच्या कायदेशीर चौकटी, भारतीय संस्कृती आणि परंपरा, सांख्यिकी शास्त्राची तोंडओळख, हवाई वाहतुकीची तिकिटे आणि मूल्य निर्धारण, हवाईवाहतूक व्यवस्थापन, कार्यान्वयन व्यवस्थापन, पर्यटन छायाचित्रण, मनुष्यबळ व्यवस्थापन, साहस पर्यटन, योग आणि सुदृढ आरोग्य, इव्हेंट व्यवस्थापन या विषय घटकांचा समावेश आहे.
भारत सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत विविध संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिवाय अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत शैक्षणिक शुल्काचा परतावा दिला जातो. ग्वाल्हेर, नॉयडा, नेल्लोर आणि भुवनेश्वर कॅम्पसमध्ये नाममात्र शुल्कात मर्यादित स्वरूपात निवासाची व्यवस्था करण्यात येते.

एमबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल
या क्षेत्राशी संबंधित हा महत्त्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्याचे कौशल्य आणि तंत्र या प्रदान केले जाते. एकूण ७५० जागा पुढील प्रमाणे भरल्या जातात. ग्वाल्हेर कॅम्पस -३३४, भुवनेश्वर कॅम्पस -११२, नॉयडा कॅम्पस -१८९, नेल्लोर कॅम्पस -७५ आणि गोवा कॅम्पस -५०.

प्लेसमेंट
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मेक माय ट्रीप, थॉमस कुक, ली पॅसेज टू इंडिया, टीयूआय डॉट इन, द रिट्ज कार्लटॉन, कुओनी, यात्रा डॉट कॉम, हॉलिडे इन, आयआरसीटीसी, केरला हॉलिडे मार्ट, शेरेटॉन हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्‌स, बनायन टूर ॲण्ड ट्रॅव्हल, मॅरिएट हॉटेल्स रिसॉर्ट, बाल्मर लॅवरी ट्रॅव्हल आणि व्हेकेशन, पॅलेस ऑन व्हील्स, इंडियन हॉरिजॉन-इंडियन ट्रॅव्हल एजन्सी, जिंजर, ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, ग्रीन ॲडव्हेंचर्स, ॲडव्हेंचर टुर्स इंडिया, हॅपी टूर-कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट, राजविलास जयपूर आदी कंपन्यांमध्ये हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्या आहेत.

पात्रता - या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. राखीव संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये पाच टक्क्यांची सूट दिली जाते. प्रवेशासाठी दोन पद्धती अवलंबण्यात येतात. (अ) पुढील चाळणी परीक्षेपैकी कोणतीही एक परीक्षा दिलेली असावी- (१) मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, (२) कॅट- कॉमन ॲडमिशन टेस्ट, (३) सीमॅट- कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (४) झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट, (५) जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (६) असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल मार्फत घेतली जाणारी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन. यापैकी कोणतीही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना, आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट द्यावी लागेल. ही परीक्षा ग्वाल्हेर, नॉयडा, भुवनेश्वर, नेल्लोर आणि इतर केंद्रांवर घेतली जाईल.
ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धतीची आहे. एकूण गुण १००. या प्रश्नपत्रिकेमध्ये सामान्य अध्ययनाचे ५० प्रश्न, भाषिक कौशल्याचे २५ प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे २५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेचा असतो. ही परीक्षा किंवा उपरोक्त नमूद परीक्षेतील गुणांवर आधारित निवड विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावले जाते. अंतिम निवड करताना प्रवेश परीक्षेतील कामगिरीला ७० टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी १५ टक्के वेटेज दिले जाते.
संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर- ४७४०११, दूरध्वनी- ०७५१-२४३७३००, ईमेल- admissions@iittm.ac.in, संकेतस्थळ-www.iittm.ac.in

(२) मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स (बीएमएस) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- तीन वर्षे. पात्रता- कोणत्याही ज्ञानशाखेतील बारावी उत्तीर्ण. प्रवेश-चाळणी परीक्षेद्वारे.

काय शिकाल?
या अभ्यासक्रमात यात्रा/प्रवास आणि पर्यटन आढावा, भारतीय संस्कृती आणि पर्यटन, पर्यटन भूगोल आणि कार्यप्रणाली, इंग्रजी संवादकौशल्य, आंतरराष्ट्रीय पर्यटन, पर्यटन सेवा आणि उत्पादने, हवाई वाहतूक शुल्क आकारणी आणि तिकिटे, आतिथ्य सेवा व्यवस्थापन, पर्यटन तंत्रज्ञान आणि जागतिक वितरण कार्यप्रणाली, देशी आणि परदेशी पर्यटनाचे नियोजन, हवाई वाहतूक व्यवस्थापन, पर्यटन नियोजन आणि विकास, पर्यटनातील सध्याचे प्रवाह आदी विषय घटकांचा समावेश आहे.
संपर्क : विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००९८, दूरध्वनी- ९७०२१४२१९१, ईमेल- gicedenqury@giced.mu.ac.in, संकेतस्थळ- giced.co.in

(३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट - ही संस्था आणि भारत सरकार आणि तेलंगणा सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने स्थापन करण्यात आली. संस्थेमार्फत पर्यटन आणि आतिथ्यसेवा विषयातील ज्ञान शाखेचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. संशोधन कार्यास प्रोत्साहन दिले जाते. अभ्यासक्रम- (१) बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन ट्रॅव्हल ॲण्ड हॉस्पिटॅलिटी. कालावधी - चार वर्षे. पात्रता- कोणत्याही ज्ञानशाखेतील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा शासनमान्य तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम किंवा तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांमध्ये पाच टक्के सूट. प्रवेश- मुलाखतीद्वारे .

करिअर संधी- हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील  ठिकाणी करिअर संधी मिळू शकतात. ट्रॅव्हल एजन्सी आणि टूर ऑपरेशन्स, हॉटेल आणि संबंधित हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, राज्य पर्यटन विकास विकास मंडळात सुपरवायझर, रिसॉर्ट्‌स आणि स्पा केंद्रातील व्यवस्थापन, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापनासाठी कार्यकारी पद /उपव्यवस्थापक, सुविधा व्यवस्थापन आणि व्यवस्थापन सेवा पुरवठादार संस्थेतील सुपरवायझर, इव्हेंट सुविधा व्यवस्थापनातील साहाय्यक/ कार्यकारी पद, परराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ पुरवठा साखळीचे सुपरवायझर, हॉटेल व्यवस्थापन आणि अन्नपदार्थ कला शिक्षण संस्थेत अध्यापक, उद्योजक.

संपर्क : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, टेलिकॉम नगर, गाचीबावली, हैदराबाद- ५०००३२, तेलंगणा, दूरध्वनी- ०४०-२३०००४७२, ईमेल-director@nithm.ac.in, संकेतस्थळ- nithm.ac.in 

(२) एमबीए इन ट्रॅव्हल ॲण्ड हॉस्पिटॅलिटी- कालावधी- दोन वर्षे. पात्रता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी. राखीव संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये पाच टक्के सूट. उमेदवारांची निवड मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, मुलाखत आणि समूह चर्चा या तीन घटकांमध्ये मिळालेल्या गुणांवर केली जाते. 
पर्यटन, प्रवास/यात्रा, आतिथ्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उद्योजक व शिक्षण तज्ज्ञांच्या साहाय्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पर्यटन व्यवसाय/उद्योगासाठी आवश्यक नेतृत्व कौशल्याची निर्मिती व्हावी यासाठी, अभ्यासक्रमात विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर, हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवस्थापक, साहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक,अन्न पदार्थ आणि शीतपेये संचालक, ऑफिस व्यवस्थापक, मनुष्यबळ व्यवस्थापक, इव्हेंट नियोजक, पर्यटक एजंट्स, समूह पर्यटन सुविधा पुरवठादार इत्यादी सारख्या करिअर संधी मिळू शकतात. 

(४) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट. कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम केल्यावर इव्हेंट मॅनेजमेंट, फॅसिलिटीज मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, बँकिंग ॲण्ड फायनान्स, कस्टमर रिलेशनशिप ॲण्ड केअर, सेल्स ॲण्ड मार्केटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअर करता येते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत हा एकमेव अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमातील विषय घटकांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक, प्रशासकीय, आणि तांत्रिक कौशल्याची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. चौथ्या सत्रात वीस आठवड्यांची औद्योगिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पात्रता- कोणत्याही ज्ञानशाखेतील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये पाच टक्के सूट. 
संपर्क : डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे- ४११००७, दूरध्वनी- ०२०-२५६९३३८०, -pumba.in, ईमेल- pumba.bbahfm@gmail.com

इव्हेंट मॅनेजमेंट
मार्च २०२० पूर्वी संबंध देशात मोठमोठी प्रदर्शने, संगीत जलसे, सेलिब्रिटी लग्न सोहळे, चित्रपट व इतर क्षेत्रातील पुरस्कार वितरण कार्यक्रम, परिषदा, कार्पोरेट क्षेत्रातील चर्चासत्रे, क्रीडा क्षेत्रातील आयपीएल (क्रिकेट), प्रिमिअर बॅडमिंटन लीग, प्रो कबड्डी लीग, लाइव्ह शो यांची रेलचेल होती. इव्हेंट व्यवस्थापनातील तंत्र आणि कौशल्य वापरून या सर्वांचे भव्यदिव्य आयोजन केले जात होते. या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल सातत्याने वाढत होती. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत होता. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला करिअरच्या वेगवेगळ्या संधी मिळत होत्या. पण मार्च २०२०नंतर सारीच परिस्थिती बदलली. याचा इव्हेंट व्यवस्थापन क्षेत्राला मोठा फटका बसला. अजूनही हीच स्थिती आहे. मात्र पुढील तीन ते चार वर्षाचा विचार केल्यास आपल्या एकंदर उत्सवप्रियतेमुळे हे क्षेत्र जोमाने कार्यरत होईल. तेव्हा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल, त्या अनुषंगाने तीन ते चार वर्षे कालावधीच्या पदवीस्तरीय अभ्यासक्रमास यंदा प्रवेश घेण्याचा विचार करायला हवा.

अभ्यासक्रम आणि संस्था
(१) एनएइएमडी (ॲकॅडमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड डेव्हलपमेंट)- अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)- इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन. कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. 
काय शिकाल? 

व्यवसाय संवाद कौशल्य, इव्हेंट व्यवस्थापनाची कौशल्ये, संस्थात्मक वर्तणूक, इव्हेंट नियोजन आणि स्थान निश्चितीचे व्यवस्थापन, इव्हेंट निर्मितीची प्रकिया, इव्हेंट संसाधानांचे व्यवस्थापन, इव्हेंट आतिथ्य आणि खानपान, इव्हेंट विपणन आणि प्रायोजक, विवाह सोहळ्याचे नियोजन आणि लाइव्ह इव्हेंट्स, इव्हेंट व्यवस्थापनाच्या वैधानिक बाजू, ब्रँड व्यवस्थापन -संशोधन आणि विकास, कॉर्पोरेट इव्हेंट्स, नैतिक मूल्ये आणि सुशासन, माध्यम व्यवस्थापन, ग्राहकांची वर्तणूक, जनसंपर्क, जाहिरात, इव्हेंट सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन, इव्हेंट लेखा आणि वित्त व्यवस्थापन, आदी विषय घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष इव्हेंट आयोजनासाठी आवश्यक असणारे तंत्र-कौशल्य यामध्ये नैपुण्य मिळवणे शक्य होऊ शकते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, जनसंपर्क कंपनी, पर्यटन आणि आतिथ्य कंपनी आदी ठिकाणी रोजगार संधी मिळू शकतात. स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी उघडून स्वयंरोजगारही करता येतो.
संपर्क : संकेतस्थळ - giced.co.in ईमेल-mumbai@naemd.edu.in

(२) व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल- इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म, कम्युनिकेशन ॲण्ड क्रिएटिव्ह आर्ट्स (स्कूल ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट) - अभ्यासक्रम -बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट, कालावधी- तीन वर्षे. पात्रता- कोणत्याही ज्ञानशाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण. प्रवेश- चाळणी परीक्षेद्वारे. या संस्थेत एमबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमही करता येतो. 

काय शिकाल?
कॉर्पोरेट, धार्मिक, सामुदायिक, डिजिटल आणि रिटेल इव्हेंट्स, शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील घटकांचे इव्हेंट, दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठीचे इव्हेंट, लग्नसोहळयांचे नियोजन, शोकसभा आयोजन व्यवस्थापन, वर्धापन दिन आयोजन. 
संपर्क : फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई- ४०००६५, दूरध्वनी- ८४५१८०३८५२, संकेतस्थळ-whistlingwoods.net, ईमेल-admissions@whistlingwoods.net

संबंधित बातम्या