मानसोपचार तज्ज्ञ

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

जीवनातील तणावाचे व्यवस्थापन करून आपले दैनंदिन जगणे सकारात्मक करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ साहाय्य करतात. अशा तज्ज्ञांची गरज मोठी असून हे करिअर संबंधित विद्यार्थ्यास मनाजोगते मानधन, प्रतिष्ठा आणि समाधान देऊ शकते.

मानसिक ताणतणावाचा विषय गेली काही वर्षे सातत्याने चर्चिला जात आहे. छोट्या छोट्या कारणांवरून नैराश्यात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. बाह्यतः स्थिर दिसणाऱ्या बहुतेक व्यक्ती मानसिक अशांततेने घेरल्याचे वेगवेगळ्या घटनांमुळे स्पष्ट होत चाललेय. २०१७ साली जागतिक आरोग्य संघटनेने भारताचा उल्लेख जगातील `सर्वाधिक नैराश्यवादी देश’ असा केला होता. भारतातील दहापैकी सात व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक व्याधीने ग्रस्त असल्याचे या संघटनेने एका अहवालात नमूद केले.

कोरोनाचे धक्के
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे विविध पातळ्यांवर नागरिकांना मानसिक धक्के बसले आहेत. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच समावेश होतो. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा मोठा ताण सर्वच पातळ्यांवर दिसून आला. हा ताण सहन करणे प्रत्येकालाच शक्य होईल अशी स्थिती नाही. भारतीय मानसशास्त्रीय संस्थेच्या (द इंडियन सायकिॲट्री सोसायटी) अहवालानुसार कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मानसिक आजारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली. बेरोजगारी, आर्थिक चणचण, आजाराची भीती, शिक्षणाचे बदलेले स्वरूप, घरातूनच काम शैली, पगार कपात, प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आलेल्या/येत असलेल्या अडचणी, प्रवासासाठी असलेल्या मर्यादा इत्यादी कारणांनी मनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. 

मानसोपचार तज्ज्ञांची गरज
देशात आजमितीस ९ ते १० हजाराच्या आसपास मानसोपचार तज्ज्ञ आहेत. भारताची सध्याची १३० कोटी ही लोकसंख्या गृहीत धरली, तर प्रत्येक एक कोटी नागरिकांच्या पाठीमागे ७ ते ८ मानसोपचार तज्ज्ञ येतात. ही दरी प्रचंड असून पुढील काळात त्यात आणखी भर पडू शकते. मानसिक आजारांच्या निराकरणासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज असते. ही गरज तातडीने भागवली गेली नाही तर संबंधित व्यक्ती/रुग्णाची मानसिक स्थिती अधिक बिघडू शकते. 

तणाव व्यवस्थापन
जीवनातील तणावाचे व्यवस्थापन करून आपले दैनंदिन जगणे सकारात्मक करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ साहाय्य करतात. अशा तज्ज्ञांची गरज मोठी असून या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नाही. रुग्णांना जीवनातील उत्साह देणारे हे करिअर संबंधित विद्यार्थ्यास मनाजोगते मानधन, प्रतिष्ठा आणि समाधान देऊ शकते.

करिअर दिशा
बारावी नंतर मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करता येणे शक्य आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थी पदवीस्तरीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. पदवी स्तरावर इतर विषयांसोबत हा एक विषय असतो. तोच पुढे पदव्युत्तर स्तरावर स्पेशलायझेशनसाठी निवडता येतो. पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमानंतर करिअर करणे सुलभ जाऊ शकते. बी.ए., बी.एस्सी. इन सायकॉलॉजी असे अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये शिकवले जातात. या क्षेत्रात अधिक चांगल्या संधी मिळण्यासाठी परदेशातील मास्टर ऑफ सायन्स इन सायकॉलॉजी हा अभ्यासक्रमसुद्धा करायला हरकत नाही. (उदा. अमेरिकेतील मॅसॉन विद्यापीठ, कॅरॉल विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड तसेच ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठ इत्यादी) या अभ्यासक्रमात मेंदूबाबत अद्याप अनुत्तरीत असलेल्या प्रश्नांचा मागोवा घेता येणे शक्य आहे. तणावाच्या काळात मेंदू कसा कार्य करतो, भाषा शिकण्यासाठी कसा साहाय्य करतो, अनेक बाबी स्मरणात कसा ठेवतो, मानसिक व्याधी शरीरावर कशा तऱ्हेने परिणाम करते, अशासारख्या बाबींचे अध्ययन या अभ्यासक्रमात करता येणे शक्य होते. स्पेशलायझेशनच्या विषयांमध्ये आरोग्य, उपचार, शैक्षणिक, संशोधन, क्रीडा, समुपदेशन, व्यवसायाशी (ऑक्युपेशनल) संबंधित, मेंदू (न्युरो) विषयक इत्यादींचा समावेश होतो.

करिअर संधी 
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानंतर संशोधन-अध्यापन ते खासगी रुग्ण सेवा, सल्लागार इत्यादी पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात. (१) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, (२) क्लिनिकल काउन्सिलर, (३) कम्युनिटी काउन्सिलर, (४) न्युरो सायकॉलॉजी, (५) कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, (६) डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, (७) सोशल सायकॉलॉजी, (७) ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, (८) स्कूल सायकॉलॉजी, (९) मेंटल सायकॉलॉजी, (१०) फॉरेन्सिक सायकॉलॉजी, (११) लर्निंग डिसऑर्डर थेरपिस्ट (१२) संशोधक

कौशल्य निर्मिती
मानसशास्त्राचा अभ्यासक्रम केल्यानंतर पुढील कौशल्ये प्राप्त करता येतात- (१) व्यामिश्र स्वरूपाच्या सांख्यिकी माहितीचे विश्लेषण, (२) संवाद आणि समुदायासोबत काम करण्याचे कौशल्य, (३) सांख्यिकी माहिती हाताळण्यासाठीचे तांत्रिक कौशल्य, (४) संशोधनातील निष्कर्ष लेखी आणि मौखिकरीत्या प्रभावीपणे सादर करण्याचे कौशल्य, (५) शास्त्रीय तथ्यांना सुलभतेने समजून घेण्याचे कौशल्य, (६) विविधांगी बाजूंनी समस्येचे निराकरण करणाऱ्या शैलीचा विकास, (७) विविध अनुभव आणि भावनांबद्दल संवेदनशीलतेने विचार करण्याचे कौशल्य, (८) माहिती गोळा करण्याचे, निरीक्षण आणि एखाद्या प्रकरणाचा (केस) सखोल अभ्यास, (१०) समस्यांचे निर्धारण करण्याचे कौशल्य.

अभ्यासक्रम चालविणाऱ्या महत्त्वाच्या संस्था
(१) लेडी श्रीराम कॉलेज ऑफ वूमेन, दिल्ली, (२) झेव्हियर कॉलेज, मुंबई, (३) फर्ग्युसन कॉलेज, पुणे, (४) के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स, मुंबई, (५) जयहिंद कॉलेज, मुंबई, (६) रामनारायण रुइया कॉलेज, मुंबई, (७) के.सी कॉलेज, मुंबई, (८) वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स, मुंबई (९) आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे, (१०) सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, पुणे, (११) विल्सन कॉलेज मुंबई, (१२) एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई, (१३) अबेदा इनामदार सिनिअर कॉलेज, पुणे, (१४) एसआयइएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स, मुंबई, (१५) एस.एफ.एस कॉलेज, नागपूर, (१६) डी.वाय.पाटील आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज, पिंपरी चिंचवड, (१७) रुपारेल कॉलेज, मुंबई, (१७) दुर्गाबाई सराफ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, मुंबई, (१८) रहेजा कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, मुंबई, (१९) फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे, (२०) एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, (२१) अशोका युनिव्हर्सिटी, सोनपत, (२२) ख्रिस्त युनिव्हर्सिटी, बंगळूर

बी.ए. सायकॉलॉजी (ऑनर्स )
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए. सायकॉलॉजी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम सहा सत्रांमध्ये पूर्ण करण्यात येतो. काही विषय घटक - सामाजिक मानसशास्त्र, मानसशास्त्राचा विकास, आरोग्य मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, मानसशास्त्रीय परीक्षण आणि सांख्यिकी, ॲबनॉर्मल मानसशास्त्र, औद्योगिक संस्थात्मक मानसशास्त्र, समुपदेशन

मानसशास्त्र.
याच महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी (एम.ए.) अभ्यासक्रमासोबतच सर्टिफिकेट इन काउन्सिलिंग सायकॉलॉजी हा अभ्यासक्रमही करता येतो. संपर्क : www.fergusson.edu

डिप्लोमा इन काउन्सिलिंग
मुंबईतील झेवियर कॉलजने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन काउन्सिलिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मानसशास्त्र, सामाजिक कार्य किंवा मनुष्यबळ विकास या विषयात पदव्युत्तर पदवी (एम.ए.) अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू शकतात. याच संस्थेत सर्टिफिकेट कोर्स इन पर्सनल काउन्सिलिंग हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. पात्रता ः कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण, संपर्क : संकेतस्थळ- http://xaviers.edu/

इतर महत्त्वाच्या संस्था

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ ॲण्ड न्युरो सायन्स - या संस्थेला भारत सरकारने इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्सचा दर्जा दिला आहे. या संस्थेने पदव्युत्तर पदवी ते पीएचडीपर्यंतचे विविध मानसिक आजारांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संपर्क : हौसर रोड, बंगळूर- ५६००२९, दूरध्वनी- ०८०-२६९९५००१, टेलिफॅक्स- २६९९५००० ईमेल- ms@nimhans.ac.in, संकेतस्थळ - www.nimhans.nic.in 
  •  पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च - संपर्क : सेक्टर- १२, चंदिगढ- १६००१२, ईमेल- pgimer-chd@nic.in, दूरध्वनी- ०१७२-२७४६०१८, संकेतस्थळ-www.pgimer.edu.in,
  • सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकिॲट्री - संपर्क : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकिॲट्री, कांके, रांची- ८३४००६, दूरध्वनी- ०६५१-२४५१११५, टेलिफॅक्स- २४५१११६, ईमेल- director@cipranchi.nic.in, संकेतस्थळ- www.cipranchi.nic.in

संबंधित बातम्या