कृषी क्षेत्रातील संधी

सुरेश  वांदिले
सोमवार, 27 जून 2022

कव्हर स्टोरी ः करिअर विशेष

महाराष्ट्रातील कृषी ‍शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम आहे. या सर्व संस्थांकडे गेल्या काही दशकांचा चांगला अनुभव आहे. अनुभवी उच्चशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, विस्तीर्ण कॅम्पस, ग्रंथालये, वसतिगृहे, व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम, संशोधनाची आवड निर्माण होईल अशी अभ्यासक्रमांची संरचना आणि परवडणारे शैक्षणिक शुल्क आणि इतर सुविधा ही या संस्थांची वैशिष्ट्ये.

या विद्यापीठांमार्फत पुढील अभ्यासक्रम चालविले जातात.

(१) डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी/ ॲग्रिकल्चरल पॉलिटेक्निक. अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे. (२) कृषी तंत्रनिकेतन पदविका. कालावधी- दोन वर्षे. (३) कृषी विज्ञान पदविका/ डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल सायन्स. कालावधी- दोन वर्षे. (उपरोक्त तिन्ही अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा नाही.) 

व्यावसायिक‍ (प्रोफेशनल) अभ्यासक्रमांचा दर्जा असलेले अभ्यासक्रम- (१) बी.एस्सी. (ऑनर्स) (ॲग्रिकल्चर), कालावधी- चार वर्षे. (२) बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर)/ बी.एस्सी. (ऑनर्स) (हॉर्टिकल्चर), कालावधी- चार वर्षे. (३) बी.एस्सी. (फॉरेस्ट्री)/ बी.एस्सी. (ऑनर्स) फॉरेस्ट्री, कालावधी- चार वर्षे. (४) बी.एस्सी. (होमसायन्स)/ बी.एस्सी. (ऑनर्स) (कम्युनिटी सायन्स), कालावधी- चार वर्षे. (५) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) (फूड टेक्नॉलॉजी), कालावधी- चार वर्षे. (६) बी.एस्सी. (ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी)/ बीटेक (बायोटेक्नॉलॉजी), कालावधी- चार वर्षे. (७) बीटेक (ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग), कालावधी- चार वर्षे. (८) बी.एस्सी. (ऑनर्स)- कृषी व्यवसाय व्यवस्थापन

प्रवेश प्रक्रिया

(१)बी.एस्सी. (ऑनर्स)- कृषी आणि बी.एस्सी. (ऑनर्स)- उद्यानविद्या, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट (यूजी) किंवा जेईई परीक्षा द्यावी लागेल. 

(२) बी.एस्सी. (ऑनर्स) - वनविद्या आणि बी.एफएस्सी. (मत्स्यशास्त्र)- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट परीक्षा द्यावी लागेल.

(३) बीटेक (अन्न तंत्रज्ञान) आणि बीटेक (कृषी अभियांत्रिकी) - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा किंवा जेईई परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्याने जीवशास्त्र विषय घेतला नसल्यास, त्याला संबंधित विद्यापीठाने विहित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. 

(४) बीटेक (जैवतंत्रज्ञान) आणि बी.एस्सी. (ऑनर्स) - सामुदायिक विज्ञान - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट किंवा जेईई परीक्षा द्यावी लागेल. ज्या विद्यार्थ्याने गणित विषय घेतला नसेल, त्यांना त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यापीठाने निर्धारित केलेला गणित अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषय घेतला नसेल त्यांना त्याची पूर्तता करण्यासाठी जीवशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. 

(५) बी.एस्सी. (ऑनर्स) - कृषी व्यवस्थापन (ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट किंवा जेईई परीक्षा द्यावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी गणित विषय घेतला नसेल, त्यांना त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यापीठाने निर्धारित केलेला गणित अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषय घेतला नसेल त्यांना त्याची पूर्तता करण्यासाठी जीवशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.  

संबंधित उमेदवाराने एकापेक्षा अधिक सामाईक परीक्षा दिल्या असल्यास, ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असेल, त्यासाठी लागू असलेल्या विषयगटात, ज्या सामाईक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेले असतील ते प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. (उदा. - एखाद्या उमेदवाराने नीट, जेईई आणि एमएचटी-सीईटी या तिन्ही परीक्षा दिल्या असतील व त्यास भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या गटात, समजा नीट परीक्षेत अधिक गुण मिळाले असतील, तर ते गुण ग्राह्य धरले जातात. एखाद्या विद्यार्थ्यास जेईईमध्ये सर्वाधिक गुण मिळाले असतील तर ते गुण ग्राह्य धरले जातात.)

प्रवेश पात्रता- 

(अ) भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यापैकी कोणताही गट घेऊन बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बी.एस्सी. (ऑनर्स) (१) कृषी, (२) उद्यान विद्या, (३) सामाजिक विज्ञान, (४) जैवतंत्रज्ञान, (५) कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

(ब) भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना, बी.एस्सी. (ऑनर्स) (१) मत्स्यविज्ञान, (२) वनविद्या या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

(क) भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना, बी.एस्सी. (ऑनर्स) (१) कृषी अभियांत्रिकी, (२) अन्नतंत्रज्ञान, या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

शासकीय/अनुदानित महाविद्यालये

(१) बी.एस्सी. ऑनर्स (कृषी)- ही महाविद्यालये पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, कराड, जळगाव, जामखेड (अहमदनगर), अकोला, नागपूर, सोनपूर (गडचिरोली), मूल (चंद्रपूर), वरोरा (चंद्रपूर), अमरावती, परभणी, लातूर, बदनापूर (जालना), किणी (उस्मानाबाद), गोळेगाव (औंढा नागनाथ), दापोली (रत्नागिरी) येथे आहेत. एकूण जागा- २०७२.

(२) बी.एस्सी. ऑनर्स (उद्यान विद्या)- ही महाविद्यालये पुणे, अकोला, परभणी, दापोली (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे आहेत. एकूण जागा- २००.

(३) बी.एस्सी. ऑनर्स (वनविद्या)- ही महाविद्यालये अकोला, दापोली (रत्नागिरी) येथे आहेत. एकूण जागा- ६४.

(४) बी.एफएस्सी (फिशरी सायन्स/मत्स्य विज्ञान) - शिरगाव (रत्नागिरी). एकूण जागा- ४०

(५) बीटेक (अन्न तंत्रज्ञान/फूड टेक्नॉलॉजी)- ही महाविद्यालये परभणी, काष्टी (मालेगाव/नाशिक), शिरगाव (रत्नागिरी) येथे आहेत. एकूण जागा- १४४.

(६) बीटेक (जैव तंत्रज्ञान/बायो टेक्नॉलॉजी)- ही महाविद्यालये यवतमाळ, लातूर येथे आहेत. एकूण जागा- ८०.

(७) बी.एस्सी. ऑनर्स (सामुदायिक विज्ञान)- परभणी, एकूण जागा- ४०.

(८) बी.एस्सी. ऑनर्स (कृषी व्यवसाय व्यवस्थापन)- काष्टा (मालेगाव, जि. नाशिक), एकूण जागा- ४०.

या सर्व ज्ञानशाखांमध्ये एकूण २,९२७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याशिवाय महाराष्ट्रात याच सर्व ज्ञानशाखेतील विनाअनुदानित महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्ये १२,४५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील बीटेक जैवतंत्रज्ञान हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिली तीन वर्षे बारामती येथे आणि उर्वरित एक वर्ष नेदरलँडमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. याच प्रतिष्ठानच्या कृषी महाविद्यालयातील बी.एस्सी. ऑनर्स (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिली दोन वर्षे बारामती येथे आणि उर्वरित दोन वर्षे नेदरलँडमधील व्हॅन हॉल लॅरेस्टिन युनिव्हर्सिटीतून अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

आरक्षण सुविधा

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विमुक्त जमाती यांच्यासाठी असलेल्या राखीव जागांसोबत पुढील घटकांसाठीही या अभ्यासक्रमांमध्ये राखीव जागा आहेत. (१) महिला- ३० टक्के, (२) आर्थिक दुर्बल घटक- १० टक्के, (३) स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य- २ टक्के, (४) दिव्यांग- ५ टक्के, (६) आजी माजी सैनिकांची मुले- २ टक्के, (७) प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या व्यक्तींची मुले - ४ टक्के, (८) शेतकरी व विहित पात्रता असलेले किंवा कृषी विषयक अनुभव असलेली शेतकऱ्यांची मुले- ६ टक्के, (९) अनाथ- १ टक्का.

अतिरिक्त गुण

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुढील बाबींची पूर्तता होत असल्यास अतिरिक्त गुण (पॉइंट) दिले जातात.

(१) कृषी विषयक व्यावसायिक/ ऐच्छिक विषय/ पदविकेसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त १० गुण दिले जातात.

(२) वादविवाद, निबंध स्पर्धा, वक्तृत्व राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागासाठी अतिरिक्त २ गुण दिले जातात.

(३) जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी अतिरिक्त २ गुण दिले जातात.

(४) राष्ट्रीय छात्रसेना बी किंवा सी प्रमाणपत्र/ हवाई दल, नौदल, सेनादलाचे प्रमाणपत्र/राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये किमान २४० तास काम केलेले/ विशेष शिबिर केलेले प्रमाणपत्रधारक यांना अतिरिक्त २ गुण दिले जातात.

(५) राज्यातील कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील किंवा कृषी परिषद पुणे/महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केलेल्या आजी/माजी कर्मचाऱ्यांचे पाल्य - यांना ३ गुण दिले जातात.

(६) शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील ज्या उमेदवाराची स्वतःची अथवा त्याचे आई-वडील/ आजी-आजोबा (वडिलांचे आई-वडील) यांच्या नावे शेत जमीन असल्यास - १२ गुण दिले जातात. (अशी शेतजमीन असल्याचे, अधिकार अभिलेख (सात बाराचा उतारा) किंवा भूमिहिन शेतमजूर किंवा शेतकरी असल्याबाबत तहसीलदार/नायब तहसीलदार यांचे प्रमाणपत्र/मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कुटुंबासाठी शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांचा मासेमार दाखला) सादर करावा लागेल.

कोणत्याही परिस्थितीत २० गुणांपेक्षा अधिक गुण दिले जाणार नाहीत.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

(१) महात्मा फुले कृषी विद्यापीठ - राहुरी, संकेतस्थळ- mpkv.ac.in  (२) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ - अकोला, संकेतस्थळ- 
http://www.pdkv.ac.in/ (३) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ - परभणी, संकेतस्थळ - www.mkv२mah.nic.in , (४) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ - दापोली , संकेतस्थळ- www.dbskkv.org 

करिअर संधी
इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेने कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, वनविद्या, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान या विषयांतील पदवींना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम केल्यानंतर विविध क्षेत्रात करिअर संधी मिळणे अधिक सुलभ झाले आहे.

बी.एस्सी. (कृषी) हा अभ्यासक्रम केल्यावर, अधिक चांगल्या संधींसाठी संबंधित विद्यार्थी पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी.), संशोधन (पीएचडी), एमबीए या अभ्यासक्रमांच्या मार्गावरून जाऊ शकतो. बँकिंग क्षेत्रातील कृषी/ग्रामीण भागाशी निगडित स्पेशलाइज्ड मनुष्यबळ किंवा प्रोबेशनरी ऑफिसर या पदांच्या चाळणी परीक्षेला बसू शकतो. संघ लोकसेवा आयोग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च श्रेणीच्या पदांसाठीही तो पात्र ठरतो. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या/उद्योग यांनाही या मनुष्यबळाची गरज भासते. 

राज्य शासनामार्फत कृषी अधिकारी/ मृद्संधारण अधिकारी/ कृषी विस्तार अधिकारी अशा पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना बसू शकतो. कृषी पदवीधारकास विमा क्षेत्रातही संधी मिळू शकते. ॲग्रिकल्चरल रिसर्च सर्व्हिस एक्झामिनेशन (www.asrb.org.in) देऊन संशोधन कार्य करण्याची संधी मिळू  शकते. या सेवेंतर्गत मुलाखतीद्वारे उपमहासंचालक, सहाय्यक संचालक, संचालक, प्रकल्प संचालक, विभागीय समन्वयक, संयुक्त संचालक, विभागीय केंद्रांवरील प्रमुख, प्रधान वैज्ञानिक, प्रशिक्षण आयोजक, वरिष्ठ संशोधक इत्यादी पदांची भरती केली जाते. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ही परीक्षा देऊन संशोधन अभ्यासक्रम करण्याची संधी मिळू शकते. ही परीक्षा उत्तमरीतीने उत्तीर्ण झाल्यास सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र होता येते.

 इतर संधी

ॲग्रिकल्चर सायन्टिस्ट, प्रॉडक्शन मॅनेजर, फूड मायक्रोबायोलॉजिस्ट, क्रॉप स्पेशालिस्ट, प्लान्ट जेनिटिसिस्ट, ॲग्रिकल्चरल इंजिनिअर, ॲग्रॉनॉमिस्ट, फॉरेस्टर, वॉटर कंझर्व्हनिस्ट, सॉइल इंजिनिअर, फार्म मॅनेजर, फूड रिसर्चर, फर्टिलायझर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ॲग्रिकल्चर फूड सायन्टिस्ट, ॲक्वेटिक इकॉलॉजिस्ट, हॉर्टिकल्चरलिस्ट, सॉइल ॲण्ड प्लान्ट सायन्टिस्ट, ऑपरेशन मॅनेजर इन फर्टिलायझर युनिट, प्लांटेशन मॅनेजर, बँकांमधील ॲग्रिकल्चर लोन ऑफिसर आदी करिअर संधी मिळू शकतात.

कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक नामवंत उद्योग संस्था आणि   कृषी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप (उदा.- रोग आणि कीटक नियंत्रण, अचूक वेळेवर जलसिंचन आणि मृदा आरोग्य, पॅकेजिंग आणि वाहतूक, शेताची हवाई पाहणी करून पिकासंदर्भात वा जमिनीसंदर्भात समस्यांचा शोध घेणे इत्यादी) या ठिकाणी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध असू शकतात.

संबंधित बातम्या