विविध संधी तुमच्या दारात..

सुरेश वांदिले
सोमवार, 27 जून 2022

कव्हर स्टोरी ः

करिअर विशेष

डिजिटल तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतीमुळे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये विविधांगी बदल घडताहेत. बहुतेक सर्व उद्योग आणि कंपन्या हे तंत्रज्ञान प्राधान्याने अंगीकारत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या नोकऱ्यांना यापुढे कदाचित फारसे स्थान मिळणार नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचे कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे अधिकाधिक संधी मिळू शकते. ‘डेल टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या अहवालानुसार, २०३०पर्यंत या तंत्रज्ञानामुळे ८५ टक्के नव्या पद्धती आणि प्रकारच्या करिअर संधी निर्माण होतील. हे तांत्रिक बदल लक्षात घेऊन माहिती तंत्रज्ञान आणि संगणक शास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या उच्चशिक्षण अभ्यासक्रमांत प्रमुख वा सहायक विषय घटक म्हणून प्रोग्रॅमिंग लँग्वेज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सिक्युरिटी यांसारख्या विषय घटकांचा सध्या ठळकपणे समावेश करण्यात येत आहे. 

या विषय घटकांचा व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्येही समावेश करण्यात येत आहे. ॲनॅलिटिक्स, डेटा सायन्स, आयटी, फिनटेक यांसारखे स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम हे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या दोन्ही शाखांमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. अशी स्पेशलाइज्ड पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे सुलभ होईलच, शिवाय ते त्यांच्या क्षेत्रात नेतृत्व करून प्रगतीचे टप्पे झपाट्याने गाठू शकतील. सध्या उदयास आलेले तंत्र आणि त्यात कौशल्य प्राप्त केलेल्या मनुष्यबळाची कमतरता विविध देशांना भासत आहे. ही दरी वाढत चाललेली दिसते. त्यामुळे स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असू शकते.

१) फिनटेक
भारतीय फिनटेक क्षेत्राची वार्षिक उलाढाल ३१ बिलियन डॉलर आहे. २०२५पर्यंत ही उलाढाल ८४ बिलियन डॉलरपर्यंत पोहचेल. महसूलवृद्धी हा मुख्य उद्देश असूनही फिनटेक कंपन्या सध्या ग्राहकांच्या गरजेनुसार विविध उत्पादनांवर भर देतात. आपल्या देशाच्या अवाढव्य लोकसंख्येपैकी ३.७ टक्केच लोकसंख्या इक्विटीकडे (कंपन्यांची समभाग गुंतवणूक) वळली आहे. या संख्येत मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढू शकतात.

गुंतवणूक कशी करावी? कर्ज कसे घ्यावे? वित्तीय नियोजन, बचत, चांगल्या उत्पनवृद्धीसाठी गुंतवणूक यांसारख्या बाबींना फिनटेक कंपन्या प्राधान्य देत आहेत.

२) ब्लॉकचेन
आपल्या देशात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर नुकताच सुरू झाला असला, तरी नजीकच्या काळात या क्षेत्राची झपाट्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तंत्रज्ञानाचा वापर बँकिंग, इन्शुरन्स, हेल्थकेअर, लॉजिस्टिक्स आणि लोकप्रशासनात दिसू लागला आहे. इतरही कंपन्यांचा कल या क्षेत्रातील तंत्रकुशल मनुष्यबळाच्या भरतीकडे दिसून येतो. यामध्ये ब्लॉकचेन डेव्हलपर, ब्लॉकचेन सॉफ्टवेअर इंजिनिअर, ब्लॉकचेन सिस्टीम आर्किटेक्ट अशा मनुष्यबळाचा समावेश आहे. आयबीएम, ओरॅकल, ॲमेझॉन, जेपी मॉर्गन, मायक्रोसॉफ्ट अमेरिकन एक्स्प्रेस, इत्यादी कंपन्यांनी या विषयातील तंत्रज्ञांना अधिकाधिक संधी देणे सुरू केले आहे. भारतातही अनेक कंपन्यांना अशा तंत्रज्ञांची गरज भासू लागली आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान क्रिप्टोग्राफीच्या माध्यमातून सतत विकसित होताना दिसते. त्याद्वारे डिजिटल माहिती सर्वत्र पाठवली जाऊ शकते, मात्र त्याची कॉपी (नक्कल) करता येत नाही. वित्तीय देवाणघेवाण करण्याबरोबरच, ज्या कोणत्याही बाबीस मूल्य (व्हॅल्यू/प्राइस) आहे, त्याची नोंद इथे केली जाते. आता आपणास खिशातून पाकीट काढून व्यवहार करण्याची गरज भासत नाही. आपल्या हातातील स्मार्टफोन हाच आपल्यासाठी ई-वॉलेट झाला आहे. मोबाईल तंत्रज्ञानात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे आपल्या आर्थिक व्यवहारांवर बरेच परिणाम झाले आहेत. डिजिटल वॉलेट- ई-कॉमर्स- कॅब ॲप्लिकेशन - थेट पैशांची देवाणघेवाण, यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे बदल आपण अनुभवत आहोत. हे सर्व बदल वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रकौशल्यामुळे शक्य झाले आहेत.

ब्लॉकचेनच्या शोधामुळे वित्तीय तंत्रज्ञानाने पुढचा टप्पा गाठला असून जागतिक पातळीवर ब्लॉकचेन तंत्राचा वापर झपाट्याने वाढताना दिसतो. पारंपरिक पद्धतीच्या चलन व्यवहारापेक्षा ब्लॉकचेन या आधुनिक पद्धतीने जागतिक पातळीवरील चलनव्यवहाराला नवा आयाम दिला आहे. या तंत्राशी निगडित पेमेंट सिस्टीम, स्टेबल कॉइन, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, क्रिप्टोकरन्सी, सप्लाय चेन, असे डिजिटल प्लॅटफॉर्म अधिकाधिक वापरले जात आहेत. 

२००८मध्ये सतोशी नाकामोटो या इसमाने ब्लॉकचेन तंत्र विकसित केले, असे समजले जाते. त्यानंतर या तंत्राची बहुविध स्वरूपात उत्क्रांती होत गेली. नाकामोटोने ब्लॉकचेन तंत्राचा वापर करून बिटकॉइन या आभासी चलनपद्धतीचा विकास केला. डिजिटल विश्वासामध्ये वाढ होण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असा विश्वास नाकामोटोने व्यक्त केला होता. २०१४मध्ये ब्लॉकचेन-टू, हे या तंत्राचे दुसरे रूप विकसित झाले. पैशाच्या/चलनाच्या व्यवहारापलीकडे या तंत्राचा वापर या दुसऱ्या स्वरूपामुळे शक्य झाले. त्यानंतर इथेरिअयम ब्लॉकचेन प्रक्रियेद्वारे डिजिटल देवाणघेवाणीतील अधिक प्रगत टप्पा गाठला गेला.

आता व्हेनेझुएला, होंडुरास आणि अनेक आफ्रिकी राष्ट्रे स्थानिक चलनापेक्षा आभासी चलनावर अधिक विश्वास ठेऊ लागली आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, अधिकाधिक राष्ट्रे अमेरिकी डॉलर या चलनास अधिक विश्वासार्ह मानतात. 

सन १९४०पासून डॉलर हे चलन तेलाच्या अर्थकारणाशी निगडित आहे. अनेक देश आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी डॉलर साठवतात किंवा विकत घेतात. तेल समृद्ध देशांचा खर्च हा त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या चलनाच्या मूल्यदरात कधीही घट होऊ शकते, हे या देशातील नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या राष्ट्रातील नागरिक आपली संपत्ती सोने आणि बिटकॉइनसारख्या आभासी चलनात परिवर्तित करत आहेत. हे चलन साठवण्यासाठी सोपे आणि व्यवहारासाठी सोईचे आहे. जगातील कोट्यवधी लोकांनी या पद्धतीचा स्वीकार केला आहे.

भारतात डिजिटल व्यापार, खरेदी आणि विक्री प्रचलित असली तरी रिझर्व्ह बँकेने यावर काही निर्बंध आणल्याने काहींना हे व्यवहार बेकायदा वाटतात. हे निर्बंध क्रिप्टोकरन्सीची विक्री व खरेदी सेवा देण्यासंदर्भातील आहेत. काही कंपन्या, उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात कार्य करत आहेत. क्रिप्टोकरन्सीची खरेदी-विक्री करून नफा कसा मिळवता येईल, यासाठीही या कंपन्या प्रयत्नशील आहेत. अनेक देशांमध्ये सेंट्रल बँकेने डिजिटल करन्सीच्या वापराबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. 

या सर्व बाबींचा सखोल अभ्यास रिझर्व्ह बँकेकडून होत आहे. सध्या भारतात क्रिप्टोउद्योग कोणत्याही नियामकाशिवाय सुरू आहे. त्यास नियमांच्या चौकटीत कसे बसवता येईल यावर विचारमंथन सुरू झाले आहे. शासकीय पातळीवर ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीबाबत सकारात्मकता दिसून येते. या अनुषंगाने काही केंद्रीय मंत्र्याचा अभ्यासगटही स्थापन करण्यात आला. या अभ्यासगटाच्या अहवालानुसार या क्षेत्रासाठी नियमांची चौकट तयार केली जाऊ शकते. विकसनशील देशांसाठी वित्तीय कारभारासाठी क्रिप्टोकरन्सी ही महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. 

क्रिप्टो बँकिंगसाठी स्मार्टफोन आणि गतिमान इंटरनेट जोडणीची गरज भासते. स्मार्टफोनच्या आणि इंटरनेट डेटाच्या कमी होणाऱ्या किमती यांमुळे क्रिप्टोचलनाचा वापर नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतात मोबाईल फोन आणि इंटरनेट सुविधेबाबत झालेली प्रगती प्रचंड आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारामुळे देशांतर्गत अर्थकारणात सर्वसमावेशकता येऊ शकण्याची शक्यता बऱ्याच तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

३) डेटा ॲनॅलिटिक्स  
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डेटामुळे (विदा/विविध स्रोतांकडून गोळा होणारी माहिती) त्याचे विश्लेषण/उपयुक्तता आणि सुरक्षितता याविषयी अचूक आणि तातडीने निर्णय घेण्यासाठी या तंत्रज्ञानाची गरज भासते. महत्त्वाच्या निर्णयासाठी कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या डेटा विश्लेषणाच्या निष्कर्षावर अधिकाधिक भर देऊ लागल्या आहेत. एका अहवालानुसार, डिसेंबर २०२१पर्यंत ९० लाखांच्या वर विविध कंपन्यांमध्ये या क्षेत्राशी संबंधित जागा रिक्त होत्या. ई-कॉमर्स, एडटेक (एज्युकेशन टेक्नॉलॉजी), बीएफएसआय (बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स), लॉजिस्टिक्स या क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अशा तज्ज्ञांची गरज भासते आहे. या कंपन्यांमध्ये डेटा सायंटिस्ट, ॲनॅलिस्ट स्पेशालिस्ट, डिसिजन सायन्स मॅनेजर, बिझनेस ॲनॅलिस्ट, ॲनॅलिस्ट मॅनेजर, ऑपरेशन ॲनॅलिटिक्स मॅनेजर अशा संधी उपलब्ध झाल्या आहेत.

४) क्लाऊड कॉम्प्युटिंग  
कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कामकाजासाठी पारंपरिक पध्दतींपेक्षा क्लाऊड तंत्रज्ञानासारख्या आधुनिक तंत्रज्ञान वापरास प्राधान्य दिले. या वर्षीच्या अखेरपर्यंत या क्षेत्रात दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये क्लाऊड डेव्हलपर इंजिनिअर, क्लाऊड नेटवर्क इंजिनिअर, क्लाऊड ऑटोमेशन इंजिनिअर, क्लाऊड सिक्युरिटी मॅनेजर यांसारखी पदे भरली जात आहेत.

५) आर्टिफिशियल इंजिनिअर 
बहुतेक सर्वच कंपन्यांमधील विविध कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. यामुळे कंपन्यांमधील कार्यशैली आणि कामकाज पद्धतींमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येते. डेटा सायंटिस्ट/ सॉफ्टवेअर इंजिनिअर/ प्रॉडक्ट मॅनेजर यासारख्या मनुष्यबळाला या क्षेत्रात विविध संधी मिळू शकतात. असे कौशल्य प्राप्त केलेले विद्यार्थी झपाट्याने आपली प्रगती करू शकतात.

संधीचा फायदा घ्या
जगातील एकूण कार्यकारी मनुष्यबळामध्ये तरुणांचा सहभाग २५ टक्क्यांच्या आसपास असूनही ४० टक्के तरुणांना संधी मिळत नसल्याचे युनेस्कोच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. नोकरीच्या संधींपेक्षा नव्या तंत्रकौशल्याचा या तरुणांकडे असलेला अभाव, हे याचे मुख्य कारण असल्याचे, हा अहवाल सांगतो. युनेस्को, जागतिक कामगार संघटना आणि जागतिक बँकेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार तरुणांनी ऑनलाइन अध्ययन प्लॅटफॉर्मचा उपयोग करून नवे तंत्र आणि कौशल्य हस्तगत केल्यास त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा ॲनॅलिटिक्स या क्षेत्रात सुलभतेने रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

संबंधित बातम्या