कायदे पंडितांसाठीची महाविद्यालये

सुरेश  वांदिले
सोमवार, 27 जून 2022

कव्हर स्टोरी ः करिअर विशेष

विधीविषयक शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने देशभरात नॅशनल लॉ स्कूलची स्थापना केली आहे. अशा २२ संस्थांमधील प्रवेश सामाईकरीत्या केला जातो. त्यासाठी कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT-क्लॅट) घेतली जाते. या परीक्षेद्वारे बीए - एलएलबी या पाच वर्षे कालावधीच्या इन्टिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची मराठी  मुलांची संख्या अद्यापही कमी दिसते.  

गेल्या काही वर्षापासून बऱ्याच सार्वजनिक (शासकीय) कंपन्यांमध्ये विधी सल्लागारांच्या भरतीसाठी क्लॅट गुणांचा आधार घेतला जातो.  या संस्थांमध्ये गेल (गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड), ओएनजीसी (ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस लिमिटेड), ऑइल इंडिया लिमिटेड अशा संस्थांचा समावेश आहे.

नॅशनल लॉ स्कूलच्या सर्व कॅम्पसमधील एकूण जागा दोन हजारच आहेत, त्यामुळे स्पर्धा खूप प्रचंड आणि तीव्र स्वरूपाची आहे. विधी शिक्षण देणाऱ्या काही खासगी दर्जेदार संस्थासुद्धा क्लॅट परीक्षेचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरतात.

ज्या विद्यार्थ्यांनी बारावीनंतर विधी शाखेकडेच जायचे असे ठरवले असेल, त्यांनी या परीक्षेविषयी आणि नॅशनल लॉ स्कूलमधील सर्वोच्च स्थानावरील स्कूलमधील प्रवेशासाठी आपली मनोभूमिका स्पष्ट करायला हवी. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्यास बंगळूर येथील नॅशनल लॉ स्कूलमध्येच प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला क्लॅट परीक्षेमध्ये पहिल्या एका टक्क्यांमध्ये यायला हवे. कारण बंगळूरच्या संस्थेत केवळ १२० जागा आहेत. त्यामुळे त्याला त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील. ज्या कोणत्या लॉ स्कूलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल. त्यांना त्यातील प्रवेश संख्या लक्षात घेऊन तयारीची दिशा निश्चित करावी लागेल. 

परीक्षेची तयारी

क्लॅट परीक्षेसाठी सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यासक्रम असला, तरी तो लवचिक आहे. त्यामुळे अमुकच प्रकारचे प्रश्न विचारले जातील असे होत नाही. या परीक्षेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्याकडे असतो. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, गणितीय आणि भाषिक कौशल्य व क्षमतेची चाचणी या परीक्षेद्वारे केली जाते. यासाठी अधिकाधिक सराव परीक्षा देणे आवश्यक आहे. त्यामुळे या परीक्षेत विचारल्या जाऊ शकणाऱ्या विविधांगी प्रश्नांचा सराव होऊ शकतो. 

परीक्षा पद्धती

क्लॅट परीक्षेचा पेपर १५० गुणांचा आणि दोन तासांचा असतो. यामध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला एक गुण दिला जातो. चुकलेल्या उत्तरासाठी ०.२५ टक्के गुण वजा केले जातात.  

या पेपरमध्ये पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले जाऊ शकतात - 
(१) इंग्रजी (२८ ते ३२ प्रश्न किंवा २० टक्के प्रश्न.) - विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व तपासण्यासाठी प्रश्नांची रचना केली जाते. प्रत्येकी दोन, ४५० शब्दांच्या उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. बारावीतील विद्यार्थ्यांनी हे उतारे किमान पाच ते सात मिनिटांत वाचणे अपेक्षित असते. उताऱ्यातील मध्यवर्ती कल्पना समजून घेऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. याद्वारे विद्यार्थ्यांचे व्याकरण, शब्दसंग्रह, विषयाच्या आकलनाची तपासणी केली जाते. 

(२) चालू घडामोडींसह सामान्यज्ञान- (३५ ते ३९ प्रश्न किंवा २५ टक्के प्रश्न.) - या भागात ४५० शब्दांचे उतारे दिले जातात. हे उतारे बातम्या, वृत्तपत्रीय माहितीवर आधारित असतात. या उताऱ्यात दिलेली विधी विषयक माहिती किंवा दिलेले ज्ञान यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. मात्र या उताऱ्याच्या पलीकडे विधी विषयक ज्ञानाची आवश्यकता भासत नाही. उताऱ्यातील माहितीच्या आधारे कला आणि साहित्य, आंतरराष्ट्रीय घडामोडी, ऐतिहासिक घटना आणि भारत व जागतिक महत्त्वाच्या समकालीन घटना याबाबत विद्यार्थ्यांचे आकलन तपासले जाते. 

(३) लिगल रिझनिंग/विधी शिक्षणाचा कल- (३५ ते ३९ प्रश्न किंवा २५ टक्के प्रश्न.) - हा कल तपासण्यासाठी ४५० शब्दांचे उतारे दिले जातात. नीतितत्त्वे, वस्तुस्थिती आणि निष्कर्ष या प्रकारातील प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी किती प्रमाणात अचूक निष्कर्ष काढू  शकतो, याची चाचणी घेतली जाते. 

(४) लॉजिकल रिझनिंग/ तार्किक क्षमता (२८ ते ३२ प्रश्न किंवा २० टक्के प्रश्न.) -  या भागात ३०० शब्दांचे उतारे दिले जातात. एखादी समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थी कशा रीतीने स्वतःच्या तार्किक क्षमतेचा उपयोग करतो, विचारामधील तार्किक सुसंगतेने अतार्किक बाबींची दुरुस्ती कशा रीतीने करतो या बाबींची चाचणी घेतली जाते. श्रृंखला, दिशा, समानता, तारतम्य न्याय इत्यादी बाबींचा समावेश या भागात केला जातो. 

(५) क्वांटिटेटिव्ह टेक्निक/अंकगणित (१३ ते १७ प्रश्न किंवा १० टक्के प्रश्न.) - सरासरी, काळ, काम आणि वेग, अंतर, नफा - तोटा, गुणोत्तर आणि हिस्सा, यावर प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांचा दर्जा दहावीपर्यंतच्या गणिताचा असतो. तक्ते, उतारे, चित्रे, आरेखने यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

गती आणि अचूकता

क्लॅट ही गती आणि अचूकता याची परीक्षा आहे. एक प्रश्न सोडवायला एक मिनिटापेक्षाही कमी वेळ मिळतो. सराव चाचण्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घ्यायला हवा. या सराव परीक्षेमधून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कमकुवत आणि जमेच्या बाजू लक्षात येतात. कमकुवत बाबींवर अधिक लक्ष देणे त्यामुळे शक्य होते. या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सखोल ज्ञान आणि संकल्पनांच्या स्पष्टतेची कसोटी लागते. त्यामुळे अधिकाधिक सराव परीक्षा देऊन त्याचे सतत विश्लेषण करणे, प्रत्येक सराव चाचणीत झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक ठरते. यामुळे चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी गती आणि अचूकता साध्य करता येईल. 

पात्रता- उमेदवाराचे वय १ जुलै रोजी २० वर्षांपेक्षा कमी असावे. अनुसूचित जाती, जमाती, नॉन क्रिमिलेअर ओबीसी संवर्ग, दिव्यांग संवर्गातील उमेदवारांचे वय २२ वर्षांपेक्षा कमी असावे. या परीक्षेला कोणत्याही ज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बसू शकतात. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या परीक्षेत दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास पुढीलप्रमाणे गुणानुक्रमांक ठरवला जातो. (१) विधी कल (लिगल ॲप्टिट्यूड) या भागात मिळालेले गुण. (२) उमेदवाराची उच्च वयोमर्यादा (३) संगणकीय लॉटरीपद्धती.

अशा आहेत संस्था 

या परीक्षेद्वारे पुढील राष्ट्रीय संस्थामध्ये प्रवेश मिळू शकतो. (१) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळूर, (२) नॅशनल ॲकॅडमी ऑफ लिगल स्टडी ॲण्ड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद (३) नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, भोपाळ (४) वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्‍यूरिडिका सायन्सेस, कोलकता, (५) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर, (६) हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूर, (७) गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर, (८) डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनौ, (९) राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पतियाळा, पंजाब (१०) चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पाटणा, (११) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लिगल ॲडव्हान्स्ड स्टडीज, कोची, (१२) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, कटक, ओडिशा, (१३) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडी ॲण्ड रिसर्च इन लॉ, रांची, (१४) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ॲण्ड ज्युडिशियल ॲकॅडमी, आसाम, (१५) दामोरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विशाखापट्‌टणम, (१६) तमिळनाडू नॅशनल लॉ स्कूल, तिरुचिरापल्ली, (१७) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई, (१८) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, (१९) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, (२०) हिमाचल प्रदेश लॉ युनिव्हर्सिटी, शिमला, (२१) धर्मशास्त्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जबलपूर, (२२) डॉ. बी.आर.आंबेडकर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, सोनिपत, हरियाना.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे -  मुंबई, नागपूर आणि पुणे.

महाराष्ट्रातील संस्था-  

(१) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई - या संस्थेत बीए-एलएलबी या अभ्यासक्रमासाठी १०० जागा आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बीबीए-एलएलबी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी ५० जागा आहेत. या सर्व जागा महाराष्ट्रासाठी राखीव आहेत. 

संपर्क - दुसरा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई- ४०००७६, दूरध्वनी- ०२२-२५७०३१८७, ईमेल-  admission@mnlumumbai.edu.in, संकेतस्थळ- http://www.nlumumbai.edu.in

(२) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर - येथे १२० जागा आहेत. त्या सर्व जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. 

संपर्क- वारंगा गावाजवळ, डोंगरागाव (बुटीबोरी), नागपूर- ४४११०८, दूरध्वनी- ९११२०३२२३३, ईमेल- registrar@nlunagpur, संकेतस्थळ- http://www.nlunagpur.ac.in

(३) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद - या संस्थेत ५० जागा आहेत. त्या सर्व जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. 

संपर्क - राजे संभाजी सैनिकी शाळेजवळ, नाथ व्हॅली रोड, कांचनवाडी, औरंगाबाद- ४३१००५, दूरध्वनी- ०२४०-२९५३५७५, ईमेल-registrar@mnlua.ac.in, संकेतस्थळ- www.mnlua.ac.in
या संस्थांमधील अभ्यासक्रम पूर्णकालीन आणि निवासी स्वरूपाचा आहे.
 ***

नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनव्हर्सिटी, बंगळूर
अभियांत्रिकीसाठी बहुतेक विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आयआयटी मुंबई येथे प्रवेश हवा असतो, त्याचप्रमाणे विधी शाखेचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास पहिले प्राधान्य बंगळूरस्थित नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनव्हर्सिटीला दिले जाते. या संस्थेने गेल्या काही वर्षांत विधी शिक्षणात देशात पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमात जागतिक स्तरावरील मान्य झालेले आधुनिक प्रवाह तातडीने समाविष्ट केले जातात. संस्थेचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विधी क्षेत्रातील सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त व्यक्ती येत असतात. शासनाच्या आर्थिक पाठबळावर ही संस्था तीस वर्षांपूर्वी सुरू झाली. या कालावधीत संस्थेच्या गुणवत्तेत सातत्याने भर पडली आहे.

या संस्थेमार्फत अभ्यासक्रमात सातत्याने नावीन्यता आणली जाते. समाजाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या पैलूंचा आणि बाजूंचा ठळकपणे अभ्यास केला जातो. विधी शिक्षणाची दिशा न्यायाशी सुसंगती साधणारी असते. सातत्याने सामाजिक हिताच्या समस्या, प्रश्नांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांच्या जागृतीसाठी ही चर्चासत्रे उपयुक्त ठरली आहेत. या संस्थेने ‘मार्जिनलाईज्ड कम्युनिटी स्टडी सेंटर’ आणि ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिसर्च ॲण्ड ॲडव्होकसी’ आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ लॉ ॲण्ड एथिक्स इन मेडिसिन’ या गटांची स्थापना केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक विषयांवर आपली मते मुक्तपणे मांडता येतात, भाष्य करता येते. सामाजिक समस्यांच्या निर्धारणासाठी कोणत्या नव्या कायद्यांची गरज आहे, याविषयी विचारमंथन केले जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्या वैचारिक सर्जनशीलतेला उंच झेप घेता येणे शक्य होते. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर अध्यापकांच्या विरोधात मते व्यक्त करतात, त्यांना आव्हान देतात. त्यांच्या प्रश्नांना बगल न देता, उत्तरे दिली जातात.

विधी विषयाशी संबंधित मुख्य अभ्यासक्रमांसोबत इतर वेगळे विषय असतात. उदाहरणार्थ - निवडणूक सुधारणा, सायबर सुरक्षा, अंतराळ कायदे, स्पर्धात्मक कायदे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य काळजी असे विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. दररोज दुपारचा वेळ सामाजिक विषयांच्या वादविवादासाठी ठेवला जातो. यासाठी संबंधित विषयातील शासकीय, सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि विधी क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले जाते. यातील काही तज्ज्ञ अध्यापनासाठी येत असतात. 

या संस्थेकडे अत्यंत समृद्ध ग्रंथालय आहे. परीक्षेच्या काळात मध्यरात्रीपर्यंत हे ग्रंथालय सुरू राहते. या संस्थेतील शिक्षण बहुआयामी आणि प्रात्यक्षिकांवर भर देणारे असते. शिकवण्याच्या प्रकियेत प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन, चर्चासत्रे, प्रकरण निहाय अभ्यास, अभिरूप न्यायालयाचे कामकाज आणि प्रकल्प कार्य अशा बाबींचा समावेश असतो. 

अभिनव पद्धती

या संस्थेने अध्यापनाची एक नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. यानुसार एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक अध्यापक शिकवतात व विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे समाधान करतात. सामाजिक आणि न्यायिक समस्यांच्या बहुज्ञानशाखीय विश्लेषणात्मक निकारणाच्या अनुषंगाने ही अध्यापन प्रक्रिया उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थी कोलंबिया, येल, हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केंब्रिज, वारविक, मिशिगन यांसारख्या जागतिक श्रेष्ठत्वात वरच्या क्रमांकावर असणाऱ्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी निवडले गेले आहेत. ऱ्होड्स आणि इनलेक्ससारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळत असतात. या संस्थेतील विद्यार्थी सध्या उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये कार्यरत आहेत. अनेकांनी त्यांची यशस्वी प्रॅक्टिस सुरू केली आहे. देश विदेशातील नामवंत कॉर्पोरेट लॉ कंपन्यांमध्ये उच्चपदावर अनेकजण कार्यरत आहेत. 

दूरशिक्षण पद्धतीचे अभ्यासक्रम

या संस्थेने दूरशिक्षण पद्धतीलाही महत्त्व दिले आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असून त्यातील काही समस्या न्यायालयात जात आहेत. नैतिक मुद्द्यासंबंधी प्रश्न निर्माण होत आहेत. या बाबी लक्षात घेऊन संस्थेने मीनाक्षी मिशन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च या संस्थेच्या सहकार्याने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॉ ॲण्ड एथिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. डिप्लोमा इन एन्व्हायर्न्मेंटल लॉ, डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन चाईल्ड राईट, कंझ्युमर लॉ ॲण्ड प्रॅक्टिस आणि सायबर लॉ ॲण्ड सायबर फॉरेन्सिक हे इतर अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम दूरशिक्षण पद्धतीने करता येतात.

या संस्थेचे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक संधी मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना सातत्याने उत्तमोत्तम प्लेसमेंट मिळाली आहे.
संपर्क- नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी, नागरभावी, बंगळूर- ५६०२४२, दूरध्वनी- ०८०-२३२१३१६०, फॅक्स- २३१६०५३५, ईमेल-contact@nls.ac.in, संकेतस्थळ- nls.ac.in
***

या व्यतिरिक्त सिम्बॉयसीस लॉ स्कूल- पुणे, आयएलएसएस लॉ कॉलेज - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी - वाराणसी, फॅकल्टी ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी - अलिगढ, फॅकल्टी ऑफ लॉ युनिव्हर्सिटी- लखनौ, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली आदी संस्थांनीदेखील गेल्या काही वर्षात विधी शिक्षणामध्ये सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे.

दिल्लीस्थित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या बीए - एलएलबी (ऑनर्स) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्ररीत्या ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारांना किमान ४० टक्के आणि राखीव संवर्गातील उमेदवारांना ३० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

पात्रता - या परीक्षेला कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी बसू शकतात. या परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ५० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्याला ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या परीक्षेद्वारे ७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र - मुंबई.   

संपर्क- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, सेक्टर १४, द्वारका, नवी दिल्ली- ११००७८, दूरध्वनी- ०११-२८०३४२५५, संकेतस्थळ- http://nludelhi.ac.in
***

महाराष्ट्रातील बीए-एलएलबी या पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनामार्फत एमएएच-एलएलबी (फाइव्ह इअर्स) सीईटी- लॉ ही परीक्षा घेतली जाते. 

अशी असते परीक्षा - या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या विभागात शब्दार्थ, वाक्‌प्रचार, वाक्यात उपयोग, शब्द पर्याय, वाक्यात सुधारणा, रिकाम्या जागा भरा, इंग्रजी लिखाणातील सर्वसामान्य चुका- विराम, स्वल्पविराम, अयोग्य शब्दांचा उपयोग, शब्दातील चुका, वाचन कौशल्य आणि कार्यकारण व तार्किक क्षमता तपासण्यासाठी किमान दोन उताऱ्यांचे आकलन व त्यावरील प्रश्न विचारले जातात. विधी विषयक कल या विभागात संबंधित उमेदवाराचा या ज्ञानशाखेकडे असणारा कल, संशोधनाची वृत्ती आणि समस्या सोडवणुकीचे कौशल्य याची चाचपणी केली जाते. त्यासाठी काही काल्पनिक घटना वा प्रसंग प्रश्नपत्रिकेत दिले जातात. ते सत्य असल्याचे समजून उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात. सामान्य ज्ञान या भागात इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि मागील एक वर्षातील चालू घडामोडींवर आधारित प्रश्न असतात. याद्वारे जागतिक व देशस्तरीय ताज्या घडामोडींबद्दल उमेदवारांची सजगता तपासली जाते. तार्किक क्षमता या विभागात तार्किकरीत्या विचार करण्याच्या उमेदवारांच्या कौशल्याची तपासणी केली जाते. मूलभूत गणित या विभागातील प्रश्न दहावी व बारावीतील गणितावर आधारित असतात. विशेषतः नफा, तोटा, गती, अंतर, काळ, काम, सरासरी इत्यादी घटकांवर प्रश्न विचारले जातात.
या परीक्षेद्वारे राज्यातील १५३ विधी महाविद्यालयांतील बीए-एलएलबी अभ्यासक्रमाच्या दहा हजाराच्या आसपास जागा भरल्या जातात. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राज्यातील ५३ केंद्रांवर घेण्यात येते.
संपर्क- संकेतस्थळ- www.mahacet.org, ईमेल- maharashtra.cetcell@gmail.com

संबंधित बातम्या