एरोस्पेस तंत्रज्ञान

सुरेश वांदिले
सोमवार, 27 जून 2022

कव्हर स्टोरी ः

करिअर विशेष

नॅसकॉम (द नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीज) संस्थेच्या अंदाजानुसार, पुढील काही वर्षांत एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात अब्जावधीची उलाढाल होण्याची शक्यता आहे. भारताकडूनही या क्षेत्रातील निर्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. भारताने अंतराळ संशोधनाचा बहुआयामी कार्यक्रम राबवण्याचे ठरविले असून यामध्ये दळणवळणीय उपग्रहांचा विकास, प्रगत दूरसंदेश वहन, उपग्रहीय आधारित दिशादर्शन कार्यप्रणाली, मानवी अंतराळ संशोधन, प्रगत अंतराळ वाहतूक कार्यप्रणाली, अवकाशयानांसाठी नव्या तंत्रांचे अधिक प्रगत इंजिन इत्यादींचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांना कालबद्धरीत्या आणि प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, एरोस्पेस, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील बीटेक पदवी प्राप्त उमेदवारांना या क्षेत्रात करिअरची संधी मिळू शकते. 

इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह, ॲन्टेना/रडार, व्हीएलएसआय ॲण्ड एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयांतील स्पेशलायझेशनसह एमटेक, मेकॅनिकल शाखेतील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, थर्मल, एरोनॉटिक्स या विषयातील स्पेशलायझेशनसह एमटेक केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.

अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. अभियांत्रिकीतील प्रत्येक ज्ञानशाखेचा संबंध अंतराळाशी येतो. मेकॅनिकल अभियंते हे अवकाश यानांचे डिझाइन, बांधणी आणि निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकतात. केमिकल अभियंते हे अवकाश यानांच्या इंधनप्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. संगणक शास्त्रातील अभियंते माहिती विश्लेषणात सहभागी होतात. तथापि, एरोस्पेस अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात प्राधान्याने संधी मिळू शकते.

अभ्यासक्रम 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था आहे.‍ केरळ राज्यातील ‍तिरुअनंतपुरमपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वालियामाला येथे स्थित या संस्थेत अंतराळशास्त्र आणि तंत्रज्ञानातील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनपर अभ्यासक्रम चालविले जातात. 
संस्थेत अंतराळ संशोधनाच्या संदर्भातील जागतिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटीज स्पेस रिसर्च असोसिएशन आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीबरोबर विद्यार्थी आणि अध्यापकांच्या शैक्षणिक आदानप्रदानासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत काही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प आणि इंटर्नशिप अमेरिकेत करण्याची संधी दिली जाते. 
या संस्थेतील बीटेक अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नऊ महिने कालावधीच्या उच्चश्रेणीच्या प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले जाते.

संस्थेचे अभ्यासक्रम
संस्थेत बीटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग या शाखेत ७० विद्यार्थ्यांना, बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या शाखेत ७० विद्यार्थ्यांना आणि ड्युएल डिग्री (बीटेक ॲण्ड मास्टर ऑफ सायन्स/ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) या शाखेत २२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. (हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीच्या दहा सत्रांत विभागण्यात आला आहे.) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बीटेक इन इंजिनिअरिंग फिजिक्स आणि मास्टर ऑफ सायन्स (ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स किंवा अर्थ सिस्टीम सायन्स)/ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (सॉलिड स्टेट फिजिक्स किंवा ऑप्टिकल इंजिनिअरिंग) ही पदवी प्रदान केली जाते. पदव्युत्तर पदवीचे विषय सहावे सत्र संपल्यावर विद्यार्थ्यांना दिले जातात. यासाठी विद्यार्थ्यांचा  पसंतीक्रम आणि सहा सत्रांपर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीचा विचार केला जातो.
निवड प्रक्रिया- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई-ॲडव्हान्स्डमधील गुण ग्राह्य धरले जातात. (जेईई-ॲडव्हान्स ही परीक्षा जेईई-मेन परीक्षेत उत्तीर्ण पहिल्या अडीच लाख विद्यार्थ्यांना देता येते. जेईई-मेन ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्राथमिक परीक्षा आहे.)

पात्रता- विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात ७५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना पात्रतेसाठी ६५ टक्के गुण हवेत. उमेदवारांनी दहावी आणि बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

या संस्थेत भारत सरकारच्या नियमानुसार २७ टक्के जागा नॉन-क्रिमिलेअर इतर मागास वर्ग, १३ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, तीन टक्के जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवल्या जातात. भारत सरकारच्या नव्या नियमानुसार आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांसाठी दोन्ही बीटेक अभ्यासक्रमांसाठी सहा जागा राखीव ठेवण्यात येतात. बीटेक-एमएस/एमटेकसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात येतात. दोन्ही बीटेकमध्ये महिलांसाठी अतिरिक्त पाच आणि बीटेक-एमएस/एमटेकसाठी अतिरिक्त तीन जागा राखीव ठेवण्यात येतात.

एरोस्पेस 
या ज्ञानशाखेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अग्निबाणवाहक, अंतरिक्ष यान, विमाने यांचे डिझाइन आणि विकास यांचे मूलभूत ज्ञान दिले जाते. या ज्ञानशाखेचे विद्यार्थी एरोस्पेस इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमधील प्रोप्युल्शन सिस्टीम्स, एरोडायनामिक डिझाइन, स्ट्रक्चरल सिस्टीम्स, प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यास सक्षम होतात. 

करिअर संधी
या विद्यार्थ्यांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाच्या आणि प्रगत प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटर - त्रिवेंद्रम, इस्रो सॅटेलाइट सेंटर - बंगळूर, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर - अहमदाबाद, सतीश धवन स्पेस सेंटर - श्रीहरिकोटा, लिक्विड प्रॉप्युलशन सिस्टीम्स सेंटर - बंगळूर, त्रिवेंद्रम आणि महेंद्रगिरी, इस्रो सॅटेलाइट ट्रॅकिंग सेंटर - बंगळूर, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एरोस्पेस सिस्टीम्सची निर्मिती करणारे उद्योग, मेकॅनिकल सिस्टीम्सचे डिझाइन आणि विकास करणारे उद्योग यांमध्ये वेगवेगळ्या संधी मिळू शकतात.

एव्हिऑनिक्स
एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्सचा दर्जा आणि विश्वासार्हता उच्च दर्जाची असणे आवश्यक असते. एरोस्पेसशी संबंधित यंत्रसामग्रीशी संबंधित सर्व आव्हाने स्वीकारण्याची क्षमता या अभ्यासक्रमाद्वारे तंत्रज्ञांमध्ये निर्माण केली जाते. या अभ्यासक्रमात कंट्रोल सिस्टीम्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सिस्टीम्स यांचा ठळकरीत्या समावेश करण्यात येतो.

करिअर संधी
हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटर - त्रिवेंद्रम, इस्रो सॅटेलाइट सेंटर - बंगळूर, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर - अहमदाबाद, मास्टर कंट्रोल फॅसिलिटी - गोविंदपुरा, नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर - हैदराबाद, इस्रो सॅटेलाइट ट्रॅकिंग सेंटर - हैदराबाद, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आदी महत्त्वाच्या संस्थांमध्ये संधी मिळू शकते, तसेच इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्सचे विकास आणि डिझाइन करणारे विविध उद्योग, कॉम्प्युटर नेटवर्क आणि सॉफ्टवेअर सिस्टीम्सचा विकास करणारे उद्योगांमध्येही संधी असू शकतात.

ड्युएल डिग्री अभ्यासक्रम 
पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मूलभूत अभ्यासक्रम शिकवले जातात. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे पायाभूत विषय शिकवले जातात. चौथ्या वर्षी स्पेशलायझेशनचे विषय शिकवले जातात. पाचव्या वर्षी प्रकल्प संशोधनावर भर देण्यात येतो.

ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या स्पेशलायझेशनमध्ये ग्रह, तारे, अंतराळ, विश्व आणि आकाशगंगा यांच्या अनुषंगाने भौतिकशास्त्राचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले जाते. अर्थ सिस्टीम सायन्समध्ये पृथ्वीच्या भौतिक, रासायनिक, जैविक प्रक्रियेची व्यामिश्र संकल्पना समजावून सांगितली जाते. पर्यावरण, जलावरण, भूगर्भ आणि जैवपर्यावरण यांच्या परस्परसंबंधाविषयी अभ्यास करावा लागतो. सॉलिडस्टेट फिजिक्स या स्पेशलायझेशनमध्ये सेमी-कंडक्टर उपकरणांच्या संशोधनात्मक अभ्यासावर भर देण्यात येतो. भौतिकशास्त्रातील उच्च दर्जाच्या संशोधनास प्रोत्साहन आणि चालना देणारा हा अभ्यासक्रम आहे. ऑप्टिकल इंजिनिअरिंग या स्पेशलायझेशनमध्ये ऑप्टिक्स उद्योगातील भविष्यातील तंत्रज्ञान विकासावर भर दिला जातो. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, लेन्स डिझाइन, ऑप्टिकल फॅब्रिकेशन यांसारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते.

अशी मिळते संधी 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स, इस्रो आणि केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्समार्फत विद्यार्थ्यांना बीटेकमधील कामगिरीवर आधारित अर्थसाहाय्य करण्यात येत असल्याने इस्रो व डिपार्टमेंट ऑफ सायन्स या संस्थांना जागांच्या उपलब्धतेनुसार या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा पहिला अधिकार राहील. सरासरी ग्रेड पॉइंट ॲव्हरेज ७.५ असल्यास विद्यार्थ्यांचा या संस्थेतील नोकरीसाठी विचार केला जाऊ शकतो. जागांची उपलब्धता लक्षात घेऊन मेरिट क्रमांकानुसार नोकरी दिली जाते.
संपर्क- डीन (ॲकेडमिक्स), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, वालियामाला, थिरुअनंतपुरम- ६९५५४७, केरळ. दूरध्वनी- ०४७१-२५६८४७७, फॅक्स- २५६८४५५६, संकेतस्थळ- www.iist.ac.in, ईमेल- admin@iist.ac.in
***
अन्य संस्था
१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर - (१) बीटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग. प्रवेशासाठी जेईई-मेन आणि जेईई-ॲडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करावे लागतात. (२) एमटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (प्रवेश- जॉइंट ॲडमिशन्स फॉर मास्टर्स-जेएएम)(३) पीएचडी इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (प्रवेश - ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग- गेट). 
संपर्क- डीन ऑफ ॲकॅडमिक अफेअर्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर, दूरध्वनी- ०५१२-२५९०१५१, संकेतस्थळ- www.iitk.ac.in, ई-मेल- doaa@iitk.ac.in 

२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास - (१) बीटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग, (२) बीटेक-एमटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (ड्युएल डिग्री इन्टिग्रेटेड), प्रवेश- जेईई-मेन आणि जेईई-ॲडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करावे लागतात. (३) एमटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (प्रवेश- जॉइंट ॲडमिशन्स फॉर मास्टर्स), (४) एम.एस्सी. इन एरोस्पेस इंजिनिअरिंग.
संपर्क - डिपार्टमेन्ट ऑफ एरोस्पेस इंजिनिअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, चेन्नई - ६०००३६, दूरध्वनी- ०४४-२२५७४०००, फॅक्स-२२५७८२०४, संकेतस्थळ - www.ae.iitm.ac.in, ई-मेल -  office@ae.iitm.ac.in

३) एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी- या संस्थेने बीटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. 
संपर्क - डायरेक्टर ॲडमिशन, एसआरएम, एसआरएम नगर, कट्टनकुलाथूर, जिल्हा कांचिपुरम - तमिळनाडू- ६०३२०३, दूरध्वनी- ०४४-२७४१७०००, संकेतस्थळ-srmuniv.ac.in, ई-मेल- admissions.india@srmuniv.ac.in

संबंधित बातम्या