डिजिटल खेळ निर्मिती

सुरेश  वांदिले
सोमवार, 27 जून 2022

कव्हर स्टोरी ः करिअर विशेष

काही आठवड्यांपूर्वी गेमिंग उद्योगाबाबत अर्थविषयक नियतकालिकांमध्ये बातमी प्रकाशित झाली. या बातमीनुसार भारतात कोरोना विषाणुमळे लागलेल्या टाळेबंदीच्या काळात डिजिटल गेमिंग आणि ई-स्पोर्ट्‌सची लोकप्रियता प्रचंड वाढली. गेल्या वर्षी या उद्योगामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली. पब्जी या गेमवरील बंदीमुळे ही वाढ काही काळ थांबली. मात्र टाळेबंदीच्या काळात ई-स्पोर्ट्‌समध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत ९० टक्के वाढ झाली. जवळपास दीड कोटी प्रेक्षकांचा वेगवेगळ्या १७ प्रसारण माध्यमांद्वारे (ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म) यात सहभाग नोंदवला गेला.  

फिकीच्या (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री) वार्षिक अहवालानुसार २०२०मध्ये ऑनलाइन गेमिंग उद्योगाची उलाढाल ७७०० कोटी रुपयांपर्यंत पोहचली होती. डिजिटल गेम खेळणाऱ्यांची संख्या २०२२पर्यंत ४४ कोटींपर्यंत पोहचण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला होता. नजारा टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिश मित्तरसेन यांच्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये या क्षेत्राचा सर्व प्रकारच्या मनोरंजन व्यवसायाच्या एकत्रित व्यवसायापेक्षा १० पट अधिक विस्तार होऊ शकतो. भविष्यातील संधी लक्षात घेऊन या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य हस्तगत केल्यास विपुल संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

गेमिंगचे क्षेत्र नवे असूनही गेल्या वर्षी या क्षेत्रात २५ हजाराच्या आसपास करिअर संधी निर्माण झाल्याचे एक्सफेनो या कंपनीने निदर्शनास आणले आहे. स्पेशालिस्ट मनुष्यबळाच्या रोजगाराच्या संदर्भात कार्यरत करणारी ही कंपनी आहे. २०२४पर्यंत भारतातील गेमिंग इंडस्ट्रीची वार्षिक उलाढाल २५ हजार कोटी डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतात सहजतेने उपलब्ध होणारे स्मार्ट फोन, मोबाईल इंटरनेटचा वाढता वापर, टॅबलट आणि गेमिंग ॲपचा वाढलेला वापर, यामुळे भारतात गेमिंगचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. गेल्या काही वर्षांत अँड्रॉइड, वेब, आयओएस आणि संगणकासाठी २५०पेक्षा अधिक डिजिटल गेम दाखल झाले आहेत. जपान, उत्तर अमेरिका, युरोप इत्यादी देशांमध्ये या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळास मोठी मागणी आहे.

ई-स्पोर्ट्‌स आणि आणि मोबाईलवरील खेळांची लोकप्रियता वाढल्याने  या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तथापि, गेमिंग आणि गेम डेव्हलपमेंट या दोन भिन्न बाबी असल्याचे, या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे. गेमिंग हा केवळ मनोरंजनाचा प्रकार असून गेम डेव्हलपमेंट मात्र अथक परिश्रम करावयास लावणारे, सर्जनशील क्षेत्र आहे. या क्षेत्रात प्रगतीसाठी चिकाटी, योग्य संधी आणि उच्चप्रतीचे कौशल्य आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या संस्थेमधून गेम डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम केल्याबरोबर लगेच मोठ्या संधी मिळतील असे मात्र सांगता येत नाही.

गेम डेव्हलपमेंट उद्योगासाठी, डिझायनर, प्रोग्रॅमर आणि आर्टिस्ट यांची गरज भासते. या क्षेत्रातील डिझायनरला मानवी भावभावनांची चांगली जाण असणे अपेक्षित असते. तसेच त्याला अभिकल्प म्हणजेच डिझाइनच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे गरजेचे असते. प्रोग्रॅमिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस संहिता लेखन (कंटेट रायटिंग), कोडिंगची भाषा, विज्ञान आणि गणिताचेही ज्ञान असणे आवश्यक ठरते. आर्टिस्ट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या टूडी आणि थ्रीडी कला आणि त्यांच्या निर्मितीचे ज्ञान अपेक्षित आहे. गेम डेव्हलपमेंटच्या अभ्यासक्रमामध्ये या तिन्ही विषय घटकांचे ज्ञान संबंधित उमेदवारांना दिले जाते. तसेच या विषय घटकांच्या तंत्रकौशल्याची माहिती करून दिली जाते. या विषय घटकांमध्ये गेम लेव्हल डिझाइन, यूआय/यूएक्स डिझाइन, प्रोग्रॅमिंग, टूडी/थ्रीडी आर्ट, निर्मिती यांचा प्रामुख्याने समावेश असतो.

भारतीय संस्कृती, मूल्ये आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब असणाऱ्या देशी डिजिटल गेमिंगचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्या अनुषंगाने शिक्षण मंत्रालयामार्फत पुढील काळात निश्चितपणे मोठी पावले उचलली जातील.

संस्था आणि अभ्यासक्रम
(१) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या संस्थेने पदव्युत्तर पदवी स्तरावर मास्टर ऑफ डिझाइन इन डिजिटल गेम डिझाइन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम समजला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या अभ्यासक्रमातील विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम केलेल्या सर्व उमेदवारांना उत्तमोत्तम संधी मिळाल्या आहेत. हा अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय स्वरूपाचा असून यात संगणकीय तंत्र, कला, सौंदयपूर्ण अभिकल्प, सामाजिक आणि ज्ञानप्रकिया समजून घेण्याची प्रकिया, या घटकांचा अध्ययनात समावेश करण्यात येतो. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, समूहात काम करण्याची सक्षमता, सर्जनशील आणि टीकात्मक वैचारिक क्षमता आणि विविध समस्यांच्या निर्धारणाचे कौशल्य हे गुण विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

काय शिकाल? - या अभ्यासक्रमात डिजिटल मीडिया, डिजिटल आर्ट, गेमिंगचा इतिहास आणि सैद्धांतिक बाबी, टूडी आणि थ्रीडी ग्राफिक्स, मॉडेलिंग, स्टोरी टेलिंग ॲण्ड नॅरेटिव्ह आर्किटेक्चर (कथानकाची मांडणी आणि बांधणी), युझर इंटरफेस डिझाइन (वापरकर्त्यासाठी सुलभ अभिकल्प), गेम डिझाइन, ऑनलाइन गेम, कॅज्युअल गेम, मॅसिव्हली मल्टी प्लेअर गेम (असंख्य खेळाडूंसह खेळला जाणार खेळ), या विषय घटकांचा समावेश आहे. डिजिटल गेमची निर्मिती, व्हिज्युअल डिझाइन, गेमचे विश्लेषण, विविध प्रकारच्या गेमचा अभ्यास, संस्कृती आणि कला, चित्रपट इत्यादी विषय घटकांचे ज्ञानसुद्धा विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांना गेम निर्मिती-विकास-परीक्षण आणि डिझाइनच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाते. या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक गेम डिझायनर आणि आर्टिस्ट यांच्याकडून महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले जाते. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना गेम डिझाइनसाठी आवश्यक असलेले तंत्र आणि कौशल्य यात पारंगत होणे मिळवणे शक्य होऊ शकते. वेगवेगळ्या सॉफ्टवेअर आणि गेम इंजिनचा उपयोग करून गेम डिझाइन करण्याची कला शिकवली जाते. आंतरसंवादीय डिजिटल कथाकथन, दृश्‍यात्मक परिणाम आणि चलत रेखाटने, टूडी आणि थ्रीडी भूमिकांचे ॲनिमेशन, डिजिटल गेमसाठी संहिता लेखनाचे तंत्र, गेम डिझाइनमधील सौंदर्यतत्त्वे, संगीत आणि ध्वनीची निर्मिती, प्रत्यक्ष गेमचे कार्यान्वयन आणि त्याची प्रतिकृती इत्यादी बाबीही शिकवल्या जातात. डिझाइन मॅनेजमेंट (अभिकल्प व्यवस्थापन), संशोधन कार्यपद्धती, सामाजिक शास्त्रे इत्यादींबाबतही ज्ञान दिले जाते. गेमिंग उद्योग, मनोरंजन उद्योग आणि दृश्यात्मकता (व्हिज्युअलायझेशन) या क्षेत्रात समर्थपणे करिअर करता यावे या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते.

या अभ्यासक्रमाचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. प्रवेशासाठी एनआयडीमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला प्रवेश मिळू शकतो.  

संपर्क- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पालडी, अहमदाबाद- ३८०००७, दूरध्वनी- ०७९-२६६२९५००, ईमेल- academic@nid.edu, संकेतस्थळ- nid.edu
***

(२) इमेज (इन्स्टिट्यूट फॉर मल्टिमीडिया आर्ट्स ॲण्ड ग्राफिक इफेक्ट्स) मल्टिमीडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही गेमिंग डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम राबविणारी महत्त्वाची संस्था असून संस्थेने राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाबरोबर कौशल्यनिर्मितीचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणासाठी भागीदारी केली आहे. या संस्थेने गेम टेक्नॉलॉजी, एआर (ऑगमेंटेंड रिॲलिटी) आणि व्हीआर (व्हर्च्युअल रिॲलिटी) टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षे असला तरी अतिरिक्त वेळ देऊन एका वर्षात अभ्यासक्रम करण्याची सुविधा दिली जाते. या अभ्यासक्रमामध्ये मोबाईल आणि डेस्कटॉप/लॅपटॉपसाठी डिजिटल गेमच्या विकासाचे तंत्र शिकवले जाते. गेम आर्ट (कला), गेम डिझाइन (अभिकल्प), गेम प्रोग्रॅमिंग (निर्मिती) या विषय घटकांचे कौशल्य शिकवले जाते. प्रोग्रॅमिंगसाठी आवश्यक असणाऱ्या संहिता लेखनाचे तंत्र शिकवले जाते. या उद्योगास आवश्यक असणारा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते. ऑगमेंटेड रिॲलिटी आणि व्हर्च्युअल रिॲलिटी टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात थ्रीडी गेम इंजिनचा उपयोग करून डिजिटल खेळाच्या विकासाचे तंत्र शिकवले जाते. व्हर्च्युअल रिॲलिटी ॲप आणि मोबाईल ॲपच्या निर्मितीचे तंत्र शिकवले जाते. 

पदवीस्तरीय अभ्यासक्रम - 

(१) गेम प्रोग्रॅमिंग- हा अभ्यासक्रम केल्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅमर, गेम प्रोग्रॅमर, गेम इंजिन प्रोग्रॅमर, स्पेशल इफेक्ट्स प्रोग्रॅमर, ॲप्स डेव्हलपर, मोबाईल/वेब गेम डेव्हलपर, ग्राफिक्स प्रोग्रॅमर, नेटवर्क प्रोग्रॅमर लेव्हल डिझायनर, अशा करिअर संधी मिळू शकतात. 

(२) गेम आर्ट आणि डिझाइन - हा अभ्यासक्रम केल्यावर डिजिटल खेळ निर्मितीचे कौशल्यप्राप्त होते. विविध डिजिटल खेळ विकसित करता येतात. कंसेप्ट आर्टिस्ट, थ्रीडी एन्व्हायर्न्मेंटल मॉडेलिंग, कॅरॅक्टर डिझायनर, व्हेइकल ॲण्ड वेपन्स मॉडेलिंग, बॅकग्राऊंड डिझायनर, गेम डिझायनर, लेव्हल डिझायनर, यूआय डिझायनर, थ्रीडी कॅरॅक्टर मॉडेलर, गेम टेस्टर, थ्रीडी पॉप्स मॉडेलिंग आणि ॲनिमेटर अशा संधी मिळू शकतात. 

(३) गेम डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट - हा अभ्यासक्रम केल्यावर कंसेप्ट आर्टिस्ट, एन्व्हायर्न्मेंट आर्टिस्ट, गेम डिझायनर, इफेक्ट्स ॲनिमेटर, कॅरॅक्टर ॲनिमेटर, थ्रीडी गेम आर्टिस्ट, लेव्हल डिझायनर, गेम प्ले प्रोग्रॅमर, टूल डेव्हलपर अशा संधी मिळतात. गेमिंग कला, डिझाइन आणि गेमची निर्मिती या तीन विषय घटकांचा या  अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

(४) युझर इंटरफेस डिझाइन आणि डेव्हलपमेंट- हा अभ्यासक्रम केल्यावर युझर इंटरफेस डिझायनर, इंटरॅक्शन डिझायनर, युझर इंटरफेस डेव्हलपर, इन्फर्मेशन आर्किटेक्ट, यूक्स इंजिनिअर, टेस्टर, फ्रंट एंड/बॅक एंड डेव्हलपर, वेब/मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअर संधी मिळू शकतात. 

(५) गेम प्रोग्रॅमिंग- कालावधी- चार वर्षे, पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही विषयातील बारावी.

(६) एम.एस्सी. इन गेम टेक्नॉलॉजी- कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम केल्यावर कंसेप्ट आर्टिस्ट, एन्व्हायर्न्मेंटल आर्टिस्ट, गेम डिझायनर, गेम डेव्हलपर, गेम प्रोग्रॅमर, इफेक्ट ॲनिमेटर, कॅरॅक्टर ॲनिमेटर, लेव्हल डिझायनर, गेम आर्टिस्ट, गेम प्ले प्रोग्रॅमर अशा संधी मिळू शकतात.

या संस्थेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये गेम डिझाइन, गेम डेव्हलपमेंट, यूआय डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट, या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.

संपर्क- (१) ४२४ बोमनहल्ली, हौसर मेन रोड, बंगळूर, ५६००६८, दूरध्वनी- ०८०-४११०७७५५, संकेतस्थळ- www.icat.ac.in, (२) एल.बी नगर, आर आर डिस्ट्रिक्ट, हैदराबाद- ५०००७४, दूरध्वनी- ०४०-२४४७७५५, (३) ५३, सँथोम हायरोड, मायलापोर, चेन्नई- ६००००४, दूरध्वनी- ०४४-४२९३४२९३
***

(३) व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल- या संस्थेच्या स्कूल ऑफ ॲनिमेशन ॲण्ड गेम डिझाइनमार्फत बॅचलर ऑफ डिझाइन इन गेम डिझाइन हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पात्रता- कोणत्याही ज्ञानशाखेतील बारावी. ही पदवी राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत दिली जाते.

या अभ्यासक्रमात ॲनिमेशन, कॉमिक्स आणि गेम्सचा इतिहास, दृष्ये आणि साहित्य, दृष्यात्मक कथन, रंगांची कला, ॲनिमेशनसाठी संहिता लेखन, भूमिका/चरित्रांची निर्मिती/डिझाइन, गेम डिझाइन, पाश्चिमात्य कला, कला आणि सौंदर्य, कथेचे काल्पनिक जग, गेम डिझाइन स्टुडिओ, अभिजात भारतीय कला, प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत बाबी, जॅपनीज आणि चायनीज कला, स्थिर छायाचित्रण, डिजिटल आर्ट, व्हिडिओ गेम्समधील नैतिकता, भारतीय लोककला, विपणन (मार्केटिंग) आणि प्रचार, पर्यायी तंत्र आणि माध्यमे, विसाव्या शतकातील आणि समकालीन जागतिक कला, उद्योजकता, सांस्कृतिक अभ्यास, व्हिडिओ गेम निर्मिती, गेम‍ डिझाइन स्टुडिओ, कोडिंग व्हिडिओ गेम्स, विसावे शतक आणि समकालीन भारतीय कला, संशोधनाची तोंडओळख, गेमिंगमधील व्यवसाय, सुपर हिरो यांसारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. विद्यार्थ्यांना गेम विकासाचे तंत्र शिकण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे ज्ञान दिले जाते. विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळण्याबरोबरच त्यांना स्वतंत्ररीत्या कार्यरत होता यावे, या दृष्टीने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. 

याच स्कूलमार्फत बीए इन ॲनिमेशन हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. 

संपर्क- फिल्मसिटी, गोरेगाव (पश्चिम) मुंबई- ४०००६५. दूरध्वनी- ०२२-६२७१६०७०, ई-मेल- admissions@whistlingwoods.net, संकेतस्थळ- whistlingwoods.net
***

(४) अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी - अभ्यासक्रम- (१) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन गेम डेव्हलपमेंट आणि (२) बी.एस्सी. इन गेम आर्ट ॲण्ड डिझाइन. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी ३ वर्षे. पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. 

संपर्क- अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, चारोळी बुद्रूक व्हाया लोहगाव, जिल्हा- पुणे- ४१२१०५, दूरध्वनी- ०२०-३५०३७९४२, संकेतस्थळ-www.adypu.edu
***

(५) विश्वकर्मा युनिव्हर्सिटी- अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ डिझाइन इन गेम आर्ट अॅण्ड डिझाइन. कालावधी- चार वर्षे.
संपर्क- विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, सर्व्हे क्रमांक २,३,४ लक्ष्मी नगर, कोंढवा बुद्रूक पुणे- ४११०४८, संकेतस्थळ- vupune.ac.in, ईमेल- admission.vupune.ac.in
***

(६) एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन- बॅचलर ऑफ डिझाइन इन गेम डिझाइन. कालावधी- चार वर्षे. 
संपर्क- राजबाग, लोणी-काळभोर, पुणे-सोलापूर महामार्ग, पुणे- ४१२२०१, संकेतस्थळ- mitid.edu.in, ईमेल- admissions2022@ mitid.edu.in

संबंधित बातम्या