क्रीडा क्षेत्र-प्रशिक्षण ते व्यवस्थापन

सुरेश वांदिले
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

भारत सरकार देशातील क्रीडाक्षेत्राला प्राधान्य देत आहे. या क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. त्यामुळे गुणवंत खेळाडूंनी या क्षेत्राकडे वळावे यासाठी बहुविध प्रयत्न केले जात आहेत. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी एक हजार प्रतिभावंत क्रीडापटूंना हेरून त्यांना पुढील आठ वर्षे दरवर्षी पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

महाराष्ट्र सरकारने खेळाडूंसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा साधारणतः पन्नास क्रीडाप्रकारातील खेळांना होणार आहे. हे सर्व खेळ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघ, राष्ट्रीय ऑलिंपिक संघ आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघाने मान्य केलेले आहेत. या खेळांमधील व्यक्तिगत, सांघिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी बजावणाऱ्या महिला आणि पुरुष खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील नोकऱ्यांमधील शासनाच्या अ, ब, क आणि ड या संवर्गात पाच टक्के आरक्षणाचा फायदा मिळू शकतो.

क्रीडा क्षेत्रात करियर करण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष खेळातील सहभागाबरोबरच क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा स्पर्धा आयोजन (इव्हेंट्स), क्रीडा पत्रकारिता अशा बाबीही सध्या महत्त्वाच्या ठरताहेत. या अनुषंगाने राज्य आणि देशपातळीवर अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत.

अभ्यासक्रम आणि संस्था
(१) नॅशनल स्पोर्ट्‌स युनिव्हर्सिटी 
भारत सरकारच्या युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत, नॅशनल स्पोर्ट्‌स युनिव्हर्सिटीस केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. मणिपूर राज्यातील इंफाळ येथे असणाऱ्या या विद्यापीठामध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात. - 

१) बी.एस्सी. इन स्पोर्ट्‌स कोचिंग, कालावधी - चार वर्षे/आठ सत्रे. या अभ्यासक्रमामध्ये क्रीडा प्रशिक्षणाच्या विविध पद्धती आणि सिद्धांत, क्रीडा तंत्र, व्यायामाच्या पद्धती इत्यादी बाबींचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षकाचे कौशल्य, ज्ञान आणि प्रावीण्य प्राप्त व्हावे असे अपेक्षित आहे. 
पात्रता - ४५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. प्रवेश घेतेवेळी उमेदवाराचे वय १७ वर्षांपेक्षा अधिक असावे. कमाल वयोमर्यादा - २३ वर्षे. उमेदवाराने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियायी क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप, जागतिक विद्यापीठ क्रीडास्पर्धा यांसारख्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे. या स्पर्धेतील यशानुसार अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी गुण दिले जातात. 

या प्रशिक्षणामध्ये तिरंदाजी, बॅडमिंटन, मैदानी खेळ, मुष्टियोद्धा, नेमबाजी, हॉकी, जलतरण, भारोत्तोलन, या खेळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यास प्रारंभीच यापैकी कोणताही एका क्रीडा प्रकार स्पेशलायझेशनचा विषय म्हणून निवडावा लागतो. हा क्रीडाप्रकार त्याला नंतर बदलता येत नाही. 

उमेदवारांच्या निवडीसाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेतली जाते. यामध्ये सामान्य ज्ञान, क्रीडा विषयक सामान्य ज्ञान याविषयी १०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. कालावधी १ तास २० मिनिटे. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी ५० गुण दिले जातात.

२) एम.एस्सी. इन स्पोर्ट्‌स कोचिंग, कालावधी- दोन वर्षे. 
पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी आणि स्पोर्ट्‌स कोचिंग विषयातील पदविका किंवा चार किंवा दोन वर्षे कालावधीचा बीपीएड (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) किंवा बी.एस्सी. इन स्पोर्ट्‌स कोचिंग किंवा बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन इन स्पोर्ट्‌स कोचिंग. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या उमेदवाराने किमान एकदा वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा यामध्ये सहभाग घेतलेला असावा. या अभ्यासक्रमांतर्गत बॅडमिंटन, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स या क्रीडाप्रकाराशी संबंधित प्रशिक्षक - प्रशिक्षण दिले जाते. उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा, मुलाखत आणि क्रीडा स्पर्धेतील सहभाग या तीन घटकांचा समावेश केला जातो.

३) एम.ए. इन स्पोर्ट्‌स सायकॉलॉजी. पात्रता- बीपीएड, किंवा सायकॉलॉजी या विषयासह बी.ए. (ऑनर्स) किंवा सायकॉलॉजी किंवा स्पोर्ट्‌स सायकॉलॉजी विषयासह कोणत्याही विषयातील पदवी. उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. निवडीसाठी लेखी परीक्षा, मुलाखत आणि क्रीडा प्रकारातील सहभाग या  बाबींचा समावेश केला जातो. 

संपर्क - रजिस्ट्रार, नॅशनल स्पोर्ट्‌स युनिव्हर्सिटी, सेकंड फ्लोअर, ऑलिंपिक भवन, खुमन लम्पक स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, इंफाळ, मणिपूर - ७९५००१, दूरध्वनी- ०३८५-२४२१४७१, ईमेल- registrar@nsu.ac.in, संकेतस्थळ- www.nsu.ac.in

(२) स्कूल ऑफ स्पोर्ट्‌स : 
हरयाणा सरकारने १९७३ साली मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्‌स या संस्थेची स्थापना केली. ही निवासी शाळा सोनपत जिल्ह्यातील राय या ठिकाणी आहे. आर्थिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या कुटुंबातील प्रतिभावंत खेळाडूंना सर्व सुविधा या शाळेत पुरवल्या जातात. ही शाळा २५० एकर परिसरात वसली असून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन- सीबीएसई) संलग्न आहे. या शाळेत मुख्यत्वे चौथ्या वर्गात प्रवेश दिला जातो. एकूण १०० मुले आणि मुलींची निवड केली जाते. यातील ८० टक्के मुले हरयाणा राज्यातील असतात, तर इतर राज्यातील २० टक्के मुले असतात. 

या मुलांना ॲथलेटिक्स, स्वीमिंग, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, बास्केटबॉल, रायफल शूटिंग, व्हॉलिबॉल, लॉन टेनिस, घोडेस्वारी, क्रिकेट, रायफल शूटिंग, तिरंदाजी, तायक्वांदो, फेन्सिंग या खेळांचे प्रशिक्षण दहावीपर्यंत दिले जाते. यापैकी कोणत्याही एका क्रीडाप्रकारात विद्यार्थ्याने प्रावीण्य मिळवावे यासाठी प्रशिक्षणासोबतच इतर सुविधा पुरवल्या जातात. विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. निर्धारित केलेल्या निकषांनुसार संबंधित विद्यार्थ्याची कामगिरी होत नसल्यास त्याचा प्रवेश रद्द होतो.
या संस्थेच्या परिसरात स्टेडियम, जलतरण तलाव, फुटबॉल, व्हॉलिबॉल, जिम्नॅशियम सुविधा, टेनिस कोर्ट, स्क्वाश कोर्ट, क्रिकेट आणि रायफल नेमबाजीची सुविधा आहे. कृत्रिम गवताने तयार केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकीचे मैदान आहे. क्रीडा प्रशिक्षणाबरोबरच दहावी आणि बारावी परीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते. बारावीनंतरच्या एनडीए, वैद्यकीय (नीट), अभियांत्रिकी (जेईई) या परीक्षांची तयारही करून घेतली जाते. वेगवेगळ्या राज्य आणि राष्ट्रस्तरीय स्पर्धांसाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे प्रशिक्षण आयोजित केले जाते.

अशी असते परीक्षा  
या संस्थेत वर्ग चारमधील प्रवेशासाठी शारीरिक क्षमता चाचणी आणि खेळ कल चाचणी (फिजिकल इफिशिएन्सी ॲण्ड स्पोर्ट्‌स ॲप्टिट्यूड टेस्ट- पीईसीएटी) आणि क्रीडा गुणवत्ता चाळणी (गेम स्पेसिफिक टॅलेन्ट टेस्ट) संस्थेच्या राय येथील कॅम्पसमध्ये घेतली जाते. पीईसीएटी उत्तीर्ण झालेल्या मुलांना क्रीडा गुणवत्ता चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. लेखी परीक्षेला ४० टक्के वेटेज दिले जाते. या परीक्षेत हिंदी, इंग्रजी, गणित या विषयांवर प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे १० प्रश्न विचारले जातात. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग म्हणजेच एनसीईआरटीच्या तिसरीच्या पुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. भाषेचा पेपर सोडल्यास इतर पेपर इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये सोडवता येतात.

उपरोक्त नमूद दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांना वैद्यकीय चाचणी परीक्षा द्यावी लागते. यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाते. एखाद्या खेळात असामान्य प्रतिभा असलेल्या पाच विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो. या मुलांचे वय ८ ते १८ वर्षे या दरम्यान असावे. या मुलांनी कनिष्ठ वा वरिष्ठ राष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग घेतलेला असावा किंवा राज्य खेळ स्पर्धांमध्ये पहिला, दुसरा वा तिसरा क्रमांक मिळवलेला असावा. मात्र त्यांना लेखी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यात घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा संस्थेच्या कॅम्पसमध्ये फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते.

संपर्क : मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्‌स, राय, जिल्हा सोनपत- १३१०२९, दूरध्वनी- ०१३०-२३६६५०१,२३६६२७१, फॅक्स- २३६६२७१, संकेतस्थळ- www.mnssrai.com, ईमेल-  mnssrai@rediffmail.com 

(३) लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन
ग्वाल्हेरस्थित लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेची स्थापना शारीरिक शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण आणि योग शिक्षण या क्षेत्रात शिक्षण-प्रशिक्षण-संशोधन करण्यासाठी भारत सरकारने केली आहे. या संस्थेने गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अत्युकृष्ट कार्य केल्याने नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन काउन्सिलने ए प्लस प्लस हा दर्जा प्रदान केला आहे. या संस्थेतील विविध अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या करियर संधी सातत्याने मिळत आहेत. 

अभ्यासक्रम 
(१) बी.ए. इन स्पोर्ट्‌स ॲण्ड परफॉर्मन्स - तीन वर्षे कालावधीचा आणि सहा सत्रात शिकवला जाणारा हा अभ्यासक्रम आहे. प्रवेशासाठी ग्वाल्हेर येथे चाळणी  / प्रवेश परीक्षा घेण्यात येते.
पात्रता- १) कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण, २) वय १७ वर्षांपेक्षा अधिक असावे, ३) उमेदवाराने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियायी क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धा, यांसारख्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे.

विवाहित युवतींना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाच्या काळात त्यांना मूल झाल्यास एका शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रम न करण्यापासून सूट दिली जाते. त्यानंतर ही युवती नव्या सत्रापासून पुन्हा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकते. नवजात बालकास वसतिगृहात सोबत ठेवण्याची परवानगी दिली जात नाही.

प्रवेश प्रकिया 
     टप्पा १) क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी १०० गुण. यासाठीची सहभाग पातळी व त्याचे गुण - (अ) आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - पहिला क्रमांक- ५० गुण/ दुसरा क्रमांक- ४९ गुण/ तिसरा क्रमांक- ४८ गुण/ चौथा क्रमांक- ४७ गुण. (ब) अधिकृत राष्ट्रीय स्पर्धा-  पहिला क्रमांक- २५ गुण/ दुसरा क्रमांक- २४ गुण/ तिसरा क्रमांक- २३ गुण/ चौथा क्रमांक- २२ गुण (क) अधिकृत कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/ असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज- पहिला क्रमांक- १५ गुण/ दुसरा क्रमांक- १४ गुण/ तिसरा क्रमांक-१३ गुण, /चौथा क्रमांक- १२ गुण (ड) स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या क्रीडा स्पर्धा (भारतीय ऑलिंपिक समितीने मान्यता दिलेले क्रीडा प्रकार)- पहिला क्रमांक- १० गुण/ दुसरा क्रमांक- ९ गुण/ तिसरा क्रमांक- ८ गुण.  टप्पा २) क्रीडा प्रावीण्य चाळणी - १०० गुण. प्रवेशासाठी ही चाचणी देणे अत्यावश्यक आहे.
  

   पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स कोचिंग- या अभ्यासक्रमांतर्गत ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, ज्यूदो, टेनिस आणि व्हॉलिबॉल या खेळांच्या प्रशिक्षक-प्रशिक्षणाचा समावेश आहे. (कालावधी- एक वर्ष/ पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी किंवा फिजिकल एज्युकेशन विषयातील पदवी)
   

 डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स इव्हेंट मॅनेजमेंट, पात्रता- ४५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील बारावी. कालावधी- एक वर्ष, विद्यार्थ्यांची निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाते.
संपर्क : रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्ती नगर, रेस कोर्स रोड, ग्वाल्हेर - ४७४००२, दूरध्वनी- ०७५१-४०००९०२, ४०००९००, फॅक्स- ४०००९९२, संकेतस्थळ- lnipe.edu.in, ईमेल - registrar@ lnipe.edu.in

(४) स्पोर्ट्‌स ॲथॉरिटी ऑफ इंडिया 
     एम.एस्सी. इन स्पोर्ट्‌स कोचिंग. हा अभ्यासक्रम पतियाळा येथील कॅम्पसमध्ये चालवला जातो. कालावधी- दोन वर्षे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, स्वीमिंग, व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
   

 डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स कोचिंग - कालावधी एक वर्ष, पात्रता - कोणत्याही विद्याशाखेतील पदवी आणि मान्यताप्राप्त खेळातील प्रावीण्य. या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
   

 सर्टिफिकेट कोर्स इन स्पोर्ट्‌स कोचिंग - अभ्यासक्रम कालावधी सहा आठवडे. हा अभ्यासक्रम संस्थेच्या पतियाळा, बंगळूर, तिरुअनंतपुरम, कोलकता आणि गांधीनगर या कॅम्पसमध्ये करता येतो. शिवाय सोनपत, रोहतक, लखनौ विद्यापीठ, एसआरएम युनिव्हर्सिटी - कांचीपुरम, स्वर्णिम गुजरात युनिव्हर्सिटी गांधीनगर कॅम्पस, केआयआयटी युनिव्हर्सिटी- भुवनेश्वर, ए.एन युनिव्हर्सिटी- गुंटूर, बनारस हिंदू विद्यापीठ- वाराणसी, सिंघानिया विद्यापीठ- राजस्थान या ठिकाणी प्रशिक्षण घेता येते. क्रीडा प्रशिक्षणाशी संबंधित शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, औद्योगिक आणि इतर अशाच प्रकारच्या संस्थांमधील व्यक्ती या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. हे प्रशिक्षण दरवर्षी उन्हाळा आणि हिवाळ्यात आयोजित केले जाते.  
   

 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स मेडिसीन, कालावधी- दोन वर्षे. खेळांशी संबंधित औषधोपचारांबाबत आवड असणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम केल्यावर विविध खेळातील राष्ट्रीय चमू अथवा व्यावसायिक क्रीडा संघातील, टीम डॉक्टर म्हणून संधी मिळू शकते. संपर्क : स्पोर्ट्‌स ॲथॉरिटी ऑफ इंडिया, नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स, ओल्ड मोतीबाग, पतियाळा- १४७००१, दूरध्वनी- ०१७५-२३०६१७१, फॅक्स- २२१२०७०, संकेतस्थळ-https://sportsauthorityofindia.nic.in, ईमेल- mail@nsnis.org.

(५) तमिळनाडू फिजिकल ॲण्ड स्पोर्ट्‌स युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- (१) बीबीए इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, कालावधी- तीन वर्षे, पात्रता- कोणत्याही विषयातील बारावी, (२) एमबीए इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी/कालावधी - दोन वर्षे, (३) एम.फिल इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, पात्रता- एमबीए इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट किंवा एमबीए जनरल. (४) पीएचडी इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, पात्रता- एमबीए इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट किंवा एमबीए जनरल किंवा एम.फिल इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, (५) एम.एस्सी. इन स्पोर्ट्‌स सायकॉलॉजी अॅण्ड सोशिऑलॉजी (पात्रता-कोणत्याही विषयातील पदवी), (६) एम.एस्सी .इन स्पोर्ट्‌स कोचिंग (पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी आणि एक वर्ष कालावधीचा स्पोर्ट्‌स कोचिंग डिप्लोमा), (७) मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन स्पोर्ट्‌स टेक्नॉलॉजी (पात्रता- कोणत्याही अभियांत्रिकी विषयातील पदवी). सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी दोन वर्षे.
संपर्क : द रजिस्ट्रार, तमिळनाडू फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्‌स युनिव्हर्सिटी मेलाकोट्टैयूर, चेन्नई- ६००१२७, , दूरध्वनी- ०४४-२४७६७९०६, संकेतस्थळ- www.tnpesu.org, ईमेल-regtnpesu@gmail.com

क्रीडा पत्रकारिता
ज्या तरुण-तरुणींना खेळ व पत्रकारिता या दोन्ही विषयात आवड असेल त्यांनी क्रीडा पत्रकारितेतील विशेष अभ्यासक्रम करायला हवा.

संस्था आणि अभ्यासक्रम
(१) लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वाल्हेर 
१) एम.ए. इन स्पोर्ट्‌स जर्नालिझम, कालावधी- दोन वर्षे, २) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स जर्नालिझम, कालावधी- एक वर्ष. पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी.
(२) मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (स्कूल ऑफ कम्युनिकेशन)- १) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स कम्युनिकेशन, कालावधी – एक वर्ष, पात्रता – कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. २) सर्टिफिकेट कोर्स इन स्पोर्ट्‌स कम्युनिकेशन, कालावधी – दोन महिने, पात्रता – कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम केल्यावर क्रीडा माध्यमे, क्रीडा इव्हेंट्स व्यवस्थापन, क्रीडा नियतकालिकांसाठी लेखन इत्यादी करियर संधी मिळू शकतात.  
संपर्क : डायरेक्टर, मणिपाल ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल - ५७६६१०४, भ्रमणध्वनी- ९२४३७७७७३३, संकेतस्थळ- www.manipal.edu, ईमेल- admissions@manipal.edu

क्रीडा इव्हेंट्स
मैदानावर पराक्रम गाजवणाऱ्या खेळाडूंबरोबच क्रीडा महोत्सव, मोठ्या स्पर्धा असे घटक क्रीडा संस्कृतीला अधिक देदीप्यमान करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे क्रीडांगणाबाहेरील व्यावसायिकांचे करिअर बहरत चालले आहे. महत्त्वाकांक्षी तरुण-तरुणी या क्षेत्राकडे वळल्यास तीन ते पाच वर्षानंतर त्यांना उत्तमोत्तम संधी नक्कीच मिळू शकतील. अर्थातच यामध्ये अथक परिश्रम, नावीन्यपूर्ण कल्पनांना मूर्त स्वरूपात आणण्याचे कौशल्य आणि तंत्रज्ञानातील पारंगतता या बाबी उंच उडीसाठी आवश्यक ठरतील.

या क्षेत्रातील काही अभ्यासक्रम
(१) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट : 
१) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट इन स्पोर्ट्‌स- कालावधी- ३ वर्षे. पात्रता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण. २) मास्टर ऑफ मॅनेजमेंट इन स्पोर्ट्‌स - कालावधी- २ वर्षे. पात्रता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण. हा अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष आहे. यामध्ये ६० टक्के सर्वसाधारण व्यवस्थापनाची तत्त्वे आणि ४० टक्के क्रीडा व्यवस्थापनाची तत्त्वे शिकवली जातात. हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत.

पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ३) स्पोर्ट्‌स इव्हेंट मॅनेजमेंट आणि ४) स्पोर्ट्‌स ॲण्ड वेलनेस मॅनेजमेंट - कालावधी - प्रत्येकी ११ महिने. पात्रता - कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण. 
संपर्क :  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट (आयआयएसएम) फ्लिट हाऊस, अंधेरी-कुर्ला रोड, गावदेवी, मरोळ नाका, मुंबई- ४०००५९, भ्रमणध्वनी- ८९७६०१८८७१, ईमेल-  info@iismworld.com, संकेतस्थळ- http://www.iismworld.com/ 

(२) नॅशनल अॅकॅडमी ऑफ स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट- 
१) बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स) इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, पात्रता- कोणत्याही शाखेतील बारावी, कालावधी - ३ वर्षे. (२) पोस्ट गॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी, कालावधी - १ वर्ष. (३) डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, पात्रता- कोणत्याही शाखेतील बारावी, कालावधी - ११ महिने. (४) एमबीए इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट, पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी, कालावधी - २ वर्षे.

संपर्क :  नॅशनल अॅकॅडमी ऑफ स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट कॅम्पस, नगीनदास खंडावाला कॉलेज, एस.व्ही.रोड, मालाड (पश्चिम), मुंबई- ४०००६४, दूरध्वनी- ०२२-२८४४४१११, ईमेल- mumbai@nasm.edu.in / info@nasm.edu.in, संकेतस्थळ- www.nasm.edu.in
 

३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर ॲण्ड बिझनेस मॅनेजमेंट(आयआयएडब्ल्यूबीए) : 
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट. कालावधी- एक वर्ष. पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी. 
संपर्क : आयआयएडब्ल्यूबीए मॅनेजमेंट हाऊस, कॉलेज स्क्वेअर- वेस्ट, कोलकता- ७०००७३, दूरध्वनी- ०३३-२२४१३७५६, फॅक्स- २२४१३९७५, संकेतस्थळ- www.iiswbm.edu, ईमेल-iiswbm.eduकिंवा sports@iiswbm.edu

(४) एमआयटी पुणे : 
या संस्थेने एमबीए इन स्पोर्ट्‌स (मार्केटिंग) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.  कालावधी- दोन वर्षे, पात्रता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमात क्रीडा क्षेत्राशी संबंधित नियोजन, आयोजन, नियंत्रण, ग्राहकसेवा, आतिथ्य, विक्री आणि विपणन, दिशा निर्देशन, वाटाघाटी, ग्राहक संबंध व्यवस्थापन, विश्लेषण, माहितीचे संकलन इत्यादी बाबींचा समावेश करण्यात येतो. 
संपर्क : एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, रस्ता क्रमांक १२४, पौड रोड, कोथरुड, पुणे- ४११०३८, दूरध्वनी- ०२०-७११७७१०४, फॅक्स- ७११७७१०५, संकेतस्थळ- http://mitwpu.edu.in/mba-sports-management, ईमेल-admissions@mitwpu.edu.in

वॉटर स्पोर्ट्‌स
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्‌स ही संस्था पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. जलक्रीडेस प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे, संशोधन करणे आणि सल्ला देणे यासाठी संस्था स्थापन करण्यात आली. आग्नेय आशियातील अशा प्रकारची एकमेव ही संस्था आहे. या संस्थेत २० प्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले जातात. यामध्ये स्कुबा डायव्हिंग, कयाकिंग, रिव्हर राफ्टिंग, वॉटर स्किईंग, विंडसर्फिंग, सेलिंग, टिलर कंट्रोल्ड पॉवर बोट हँडलिग, रिमोट कंट्रोल्ड पॉवर बोट हँडलिग, जेट स्काय ऑपरेशन्स, पॅरासेलिंग ऑपरेशन्स, लाइफ सेव्हिंग टेक्निक्स - वॉटर स्पोर्ट्‌स ऑपरेटर्स, लाइफ सेव्हिंग टेक्निक्स - पूल लाइफगार्ड्स, लाइफ सेव्हिंग टेक्निक्स - वॉटर पार्क लाइफगार्ड्स, सर्फ लाइफ सेव्हिंग टेक्निक्स- बीच लाइफगार्ड्स यांचा समावेश आहे. 
याशिवाय वॉटर स्पोर्ट्‌स सेंटर मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल फॉर वॉटरस्पोर्ट इन्स्ट्रक्टटर्स हे प्रशिक्षणही संस्थेमार्फत चालवले जातात.
संपर्क : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्‌स, ट्रेनिंग कॉम्प्लेक्स, ऐव्हाव्हो, दोना पावला सर्कल, करानझालेम, पणजी, गोवा- ४०३००२, दूरध्वनी- ०८३२-२४५३८९०, २४५२३९८, टेलिफॅक्स-२४५६०५०, फॅक्स- २४३६४००, ईमेल- niwsgoa @gmail.com, संकेतस्थळ- www.niws.nic.in 

नेव्ही बॉईज स्पोर्ट्‌स कंपनी
नौदलाच्या क्रीडाशाखेतील नेव्ही बॉईज स्पोर्ट्‌स कंपनीमध्ये उदयोन्मुख तरुण क्रीडापटूंना शिक्षणाची संधी दिली जाते. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी संबंधित उमेदवार आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ क्रीडा स्पर्धेत यॉटिंग (नौकानयन) किंवा सेलिंग (नौका विहार) या क्रीडाप्रकारात सहभागी झालेला असावा. या योजनेतंर्गत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने पदक विजेता वा ‍जिल्हा/ राज्य/ राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जातो. संबंधित उमेदवाराने किमान पाचवी उत्तीर्ण केलेली असावी. इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा अवगत असाव्यात. संबंधित उमेदवाराचे वय १२ ते १५ वर्षे असावे. 
मोफत शिक्षण : या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सहावी ते दहावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण कें.वि. मांडवी येथे मोफत दिले जाते. यासोबत त्यांना यॅाटिंग आणि सेलिंग या क्रीडाप्रकारातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण अथवा नौदलातील नामवंत प्रशिक्षकांकडून दिले जाते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर या उमेदवारांची नौदलात भरती केली जाते.

प्रशिक्षणाच्या काळात समाधानकारक प्रगती नसलेल्या आणि या क्रीडा कौशल्यात ठरविलेल्या निकषापर्यंत प्रगती न केलेल्या किंवा वैद्यकीय/शारीरिकदृष्ट्या अपात्र असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणातून बाहेर काढले जाते. तसेच खोटी माहिती देणाऱ्या किंवा खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांनासुद्धा प्रशिक्षणातून बाद केले जाते. आतापर्यंत या प्रशिक्षणावर झालेला खर्च संबंधित उमेदवाराच्या पालकांकडून वसूल केला जातो.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची प्रारंभिक निवड सेलिंग क्रीडाप्रकारातील त्याच्या उच्च प्रतीच्या कामगिरीवर आधारित केली जाते. निवड प्रकिया तीन दिवस चालते. त्याचवेळी मूळ प्रमाणपत्रते सादर करावी लागतात. या निवड प्रक्रियेचा एक भाग वैद्यकीय चाळणी/परीक्षा आहे. यातून अंतिम निवड यादी तयार केली जाते. वैद्यकीयदृष्ट्या तात्पुरते अपात्र ठरलेल्या उमेदवारास २१ दिवसांच्या कालावधित पुनार्वलोकनाची संधी दिली जाते. हा उमेदवार लष्कराच्या निवडक रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करू शकतो.

पात्रतेसाठी आवश्यक बाबी- (१) वयोमर्यादा- किमान १२ कमाल १५ वर्षे, (२) हृदयाशी संबंधित कोणतीही व्याधी/ तक्रार नसावी, (३) कानाचे विकार नसावेत, (४) फिट्सचा आजार नसावा, (५) कोणताही मनोविकार नसावा, (६) दृष्टीसाठी शस्त्रक्रिया केलेली नसावी, (७) पाय किंवा गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे डिफॉर्मिटी (शारीरिक दोष/व्यंग) निर्माण झालेली नसावी, (८) शरीराच्या कोणत्याही भागावर कायमस्वरूपी टॅटू नसावेत.
संपर्क :  द सेक्रेटरी, इंडियन नेव्हल सेलिंग असोसिएशन, सेव्हन्थ फ्लोअर, चाणक्य भवन, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, नवी दिल्ली- ११००२१, दूरध्वनी- ०११-२६११०८४२

संबंधित बातम्या