वास्तव कधी कळणार?

डॉ. श्रीराम गीत
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
दर महिन्याला मला किमान शंभर फोन येतात. त्यातील विविध संवादांमधील सारांश ‘सकाळ साप्ताहिक’च्या जाणकार वाचकांसाठी मुद्दाम देत आहे. निष्कर्ष व मतमतांतरे ज्याची त्याची.

आमची एकुलती एक मुलगी दोन वर्षांपूर्वी बीई कॉम्प्युटर सायन्स झाली. हट्टाने तिनेच कॉम्प्युटर विषय घेतला होता. कॅंपसमधून चांगली नोकरी लागली. चार लाखांचे पॅकेज होते. दोन दिवसांपूर्वी ‘मला हे काम आवडत नाही, दुसरेच काहीतरी करावेसे वाटते’ म्हणून राजीनामा देऊन परत आली. दुसरे म्हणजे काय? तर ‘माहीत नाही’ असे तिचे उत्तर.

मुलाला मिळत नव्हती तरी डोनेशन देऊन मेकॅनिकलमध्ये ॲडमिशन घेऊन दिली. त्याचेही त्याने अभ्यास करून चीज केले. फर्स्टक्‍लासने पास झाला. मात्र, त्याच्या कॉलेजातून त्याला जी कॅंपसद्वारा नोकरी मिळाली आहे, ती करायची नाही म्हणतो. दुसरे काय करणार विचारले, तर बघू म्हणतो. आता पुन्हा परदेशी शिकायला पाठवायला चाळीस लाख आम्ही कुठून उभे करायचे? आजवर सोळा लाख खर्चून झालेत आमचे.

दहावीपासून बी.कॉम.पर्यंत ७० टक्के टिकवून आमचे चिरंजीव पास झाले. सहा-सात ठिकाणी नोकरीसाठी निवडलेपण गेले. पण फक्त बाराच हजार पगार ऐकून आम्हीच त्याला नको म्हणायला सांगितले. इतका फालतू पगार कसा पुरायचा हो त्याला? चांगल्या नोकऱ्या कशा मिळतील?

आमच्या मुलीने एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी केले. अगदी थोडक्‍यात मेडिकलची ॲडमिशन चुकली हो तिची. पण गेली तीन वर्षे तिला मनाजोगती नोकरीच मिळत नाही. फारतर एखाद्या मेडिकल लॅबमध्ये मदतनीस म्हणून ये म्हणतात. एवढी मास्टर्स झाली तरी उमेदवारी... कर, असे सांगतात. काय सुचवाल?

अगदी स्वतःहून ठरवून, छान मार्क्‍स असून मुलाने आर्टस घेतले हो. इकॉनॉमिक्‍समध्ये बी.ए. केले. एम.ए.पण झाला. पण नोकरीच नाही हो. आता युपीएस्सीची तयारी करतो आहे. वय २६ उलटून गेले. कशाचा काही पत्ता नाही. आमचा जीव मात्र वर येतो आहे.

सर, मी संगमनेरहून बी.ई. झालो. ६५ टक्के मार्क होते. त्याला चार वर्षे झाली. एमपीएस्सीला प्रयत्न करत होतो. पद नाही मिळाले. आता काय करावे कळत नाही.

खूप आवडते म्हणून मी मानसशास्त्र घेतले. पदवी घेतली. पदव्युत्तरसुद्धा झाले. क्‍लासवाले, संस्थाचालक काऊन्सेलर म्हणून येऊन बसा म्हणतात. पगार फारतर आठ हजार देऊ म्हणतात. घरचे लग्नाकरिता मागे लागले आहेत. मात्र मुलीला नोकरी नाही म्हणून काहीच पुढे सरकत नाही. 

आमचा मुलगा ‘तसा’ हुश्‍शार आहे हो. मात्र, तो अभ्यास करत नाही एवढेच. आयसीएसई शाळेतून त्याने ६२ टक्के मिळवून दहावी केली. मग सायन्सला घातले त्याला. इंटिग्रेटेड टायअप कॉलेजात चार लाख फी भरली. चार वर्षांपूर्वी बारावी सायन्स कसाबसा पास झाला. पण नंतर तो काहीच करायला तयार नाही. आता वय बावीस आहे. शाळा व क्‍लासेसवर आमचे सोळा-सतरा लाख खर्च झाले. काय करायचे सांगा ना? त्याला काय कोर्स करायला सुचवाल?

सर, मी एका कारखान्यात कामगार आहे. बायको दहावी शिकली, गृहिणी आहे. मुलाला दहावीला ७० टक्के पडले. डिप्लोमाला मोठ्या अपेक्षेने घातला. सहा वर्षे झाली तरी अजून दुसऱ्या वर्षाला आहे. त्याला आता तेवीस वर्षे पूर्ण होतील. मोबाईल, टीव्ही व मित्र यापलीकडे काहीच करत नाही. काहीतरी काम शोध म्हटले, तर आम्हालाच गुरकावतो. आम्ही अगदी हताश झालो आहोत पाहा.

सर, मी लिज्जत पापडाची कामे करून घर चालवते. सहा वर्षांपूर्वी यजमान वारले. एकुलती एक मुलगी आहे. बारावी कॉमर्सला तीन वेळा नापास झाली. पहिल्यांदा नापास झाली, तेव्हाच कर्ज काढून ब्युटीपार्लरचा कोर्स तिला लावला. तोही अर्धवट सोडला तिने. ‘मी बी.कॉम.च करणार अन हपिसात नोकरी करणार’ एवढेच एक वाक्‍य आजवर शंभर वेळा तिने मला ऐकवले आहे. त्याला आता नवीन जोड दिली आहे, ‘तुझ्यासारखे पापड नाही लाटायचे मला.’

प्रत्येक उदाहरणाचे ढोबळ विश्‍लेषण 
अक्षरशः दहा घरातली ही दहा उदाहरणे जरी प्रातिनिधिक असली, तरी माझी खात्री आहे, की ‘साप्ताहिक’च्या प्रत्येक वाचकाला निदान अशीच दोन-तीन मुलेमुली सहज डोळ्यासमोर आली असतील. थोडक्‍यात, अशी ही विदारक ‘घरघर की कहानी’ आपल्या समोर का उभी राहते आहे? यावर काहीच उत्तर नाही काय? असले तर काय? 

यासंदर्भात मला नेहमीच एक म्हण आठवते. सुख, आनंद, यश या साऱ्यामध्ये असंख्य उदाहरणांत खूपसे साम्य असते. दुःखासाठी मात्र प्रत्येकाची छटा वेगळीच असते. मग वर उल्लेख केलेल्या दहा कुटुंबातील अशा दहा छटांचा आपण विचार करून थोडे विश्‍लेषण केले, तर काय दिसते?

कॉम्प्युटर छान असतो, पगार छान मिळतो, परदेशी जाता येते म्हणून पदवी घेतली. नोकरीही मिळाली. पण त्यासाठीचे सततचे शिकणे, स्वतःला सतर्क ठेवणे व नोकरीतील ताणतणाव याचा विचारच आख्ख्या कुटुंबाने केलाच नव्हता ना? मुलाचा हट्ट पुरवणे हा केजी ते पीजीपर्यंतचा आईवडिलांचा छंद आता त्यांच्याच गळ्यापर्यंत आला आहे. बीई मेकॅनिकल झाल्यावर ‘आता नोकरी पाहा आणि कामाला लाग, तुझे तू मिळव, पॉकेटमनी बंद,’ हे वाक्‍य जर त्यांच्या तोंडून आले तर?

दहावी ते बी.कॉम. ७० टक्के म्हणजे आपण मध्यम स्तरावरील शिक्षण अन्य कोणतेही कौशल्य न शिकता पूर्ण केले आहे, हे या कुटुंबाला कोण सांगणार? मग आता कौशल्य शिकण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी दिला जाणारा बारा हजारांचा पगार हा उत्तमच आहे. हा मुलगा दिलेले काम नीट पार पाडतो, हा विश्‍वास नोकरी देणाऱ्याला आला, तर तोच पगार किमान दीडपट होईल हे नक्की. पण सुखवस्तू आईवडिलांना बारा हजारावर मुलगा नोकरी करतो, हेच जर डाचत असेल तर? त्यांनी स्वतःचा पहिला पगार आठवावा ना!

मायक्रोबायोलॉजी हा संशोधनाचा विषय आहे. त्यासाठी अजून सहा-सात वर्षे शिकून डॉक्‍टरेट केले, तर खऱ्या संधी सुरू होतात; हाच संदर्भ मास्टर्स करेपर्यंत मुलीला समजला नसेल, तर त्याला कोण काय सांगणार व मदत कशी करणार? या विषयामुळे फरपट झालेली गेल्या चाळीस वर्षांतील अक्षरशः शेकडो उदाहरणे असताना अजूनही त्या दिशेचा ओढा थांबतच नाही. अर्थशास्त्राचा उपयोजित वापर करणारे उत्तम नोकरीत सहज सामावतात. उदाहरणार्थ, एमबीए फायनान्स, ॲनॅलिटिक्‍स, मार्केट रिसर्च. अन्यथा मास्टर्सचा उपयोग नसतो. अर्थशास्त्र विषय घेऊन युपीएस्सी करणारासुद्धा शोधावा लागतो. कारण तो विषयच खूप क्‍लिष्ट आहे, गंभीर आहे. काहीच जमत नाही म्हणून युपीएस्सी कधीच जमत नसते. त्यासाठीची मानसिकता व तेच ध्येय असेल, तर यशाची शक्‍यता सुरू होते. अर्थातच त्याला कदाचित यश मिळेल; पण तेच ध्येय ठरवले तर!

बीई झालो ते छोट्या गावातून. इंग्रजी कच्चे असल्याने मुलाखतीतच घरी पाठवायला सुरुवात. पगार ऐकून (आठ हजार जेमतेम) मुलाचा नोकरीला नकार. पुण्यात येऊन एमपीएस्सी करतो, असे घरच्यांना फक्त भासवणे. आता घरच्या मनीऑर्डरची वेळ चुकू लागली आहे, म्हणून त्याचा मला फोन. मानसशास्त्रात उपयोजित कामे खूप असतात. सोशल वर्क, काउन्सिलिंग, ह्यूमन रिसोर्स, पीआरओ संदर्भातील एखादा कोर्स करून त्यातील कामे, समाजसेवी संस्थांमध्ये उमेदवारी अशातून प्रगतीची सुरुवात होऊ शकते. निव्वळ पदव्युत्तर करून तेही मराठीतून करून रस्ता सुरूच होत नाही. ‘पण मला सायकॉलॉजी आवडते,’ हे वाक्‍य दरवर्षी दर आठवड्याला मी नित्यनेमाने ऐकतो आहे. निदान गेली वीस वर्षे तरी!

बड्या शाळेत साऱ्याच फी भरणाऱ्या पैसेवाल्यांचे स्वागत असते. निव्वळ पुणे शहरातच अशा पंचवीस शाळा आहेत. वर्गात तीस मुले व सारे कसे छान छान म्हणत दहावी संपते व तशी हुशारी उघडी पडू लागते. त्यातून टायअप इंटिग्रेटेडचा रस्ता धरलेला. ६२ टक्के दहावी झाली म्हणून सायन्सला प्रवेश नाही यासाठी इंटिग्रेटेड कॉलेज. अकरावीत ४२ टक्के, तर बारावीत नापास होणे अगदी स्वाभाविकच. आता दुसरे काहीही करायचे, तर मुलाला स्वतः वाचून स्वतः नोट्‌स काढून स्व-अभ्यास करणे माहीतच नाही. तसे गेल्या सोळा वर्षांत घडलेले नाही. त्यातच चार वर्षे करू काहीतरी म्हणून घालवलेली. ब्रह्मदेवच त्याची मदत करू शकेल किंवा वडिलांनी एखादा व्यवसाय थाटून दिला, तर तो गादीवर बसू शकेल. इथे जागे होण्याची गरज आहे ती मुलाला! 

कोणाही कामगाराची स्वाभाविक अपेक्षा मुलांनी इंजिनिअर व्हावे व साहेब व्हावे. पण ते शक्‍य नाही, हे कळल्यावर त्याला आयटीआयचा रस्ता, कौशल्यविकासाचा रस्ता उपलब्ध होता. मात्र, त्या रस्त्याकडे मुलाने पाठ फिरवून नकार दिला. मोठ्या कारखान्यातील कामगार असल्याने पगार चांगला असल्याने बायकोच्या हट्टाखातर मुलगा शिकतोय तर प्रयत्न करू म्हणून तीन वर्षांचा डिप्लोमा सहा वर्षे झाली तरी अजून सुरू ठेवला गेला. अर्थातच मोबाईल, टीव्ही, मित्र यात रंगून गेलेला मुलगा आता आईवडिलांवर गुरकावायला लागला. सुखासीन व्यक्ती उगाचच झोपमोड करणाऱ्यावर कावणारच ना! अगदी तसेच!

आईचे कष्ट, वडिलांचे छत्र हरपलेले हे जरी चांगले माहिती असले, तरीही ‘तू शीक आणि मोठा हो’ हा घराघरातला मंत्र सतत जपत राहिल्याचा परिणाम इथे दिसतो. त्याचाच परिपाक सध्याच्या शेकडा ९५ टक्‍क्‍यांच्या स्वप्नात, मनात हापिसातील, एसीतील, केबिनमधील नोकरी यामध्ये होत आहे. अशी नोकरी जेमतेम पाच टक्के विद्यार्थी पदवीनंतर मिळवू शकतात. हे प्रखर वास्तव लक्षात घ्यायला हवे. १०० पैकी जेमतेम एका विद्यार्थ्याला पॅकेजची नोकरी मिळते. हे पॅकेजचे आकडे ऐकून उरलेले ९९९ विद्यार्थी समोर येणारे नोकरीचे ताट लाथाडतात. त्यांच्या या कृत्याचा अभिमान अनेक पालकांना वाटतो, जे खूप सुस्थितीत असतात वा ज्यांच्या निवृत्तीला अजून आठ-दहा वर्षे असतात. मात्र अन्य पालकांचे काय? ‘घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी!’ हे वाक्‍य आपण सारेच जागोजागी तसबिरीवर वाचत असतो. पण तू कष्ट कर, काम कर, गरजेची कौशल्ये शिकायची उमेदवारी.... कर, उमेदवारी कोणालाच चुकलेली नाही, हे मात्र त्यामागचे गर्भित अर्थाचे सार क्वचितच सांगितले जाते.

नोकऱ्या, व्यवसायाची ढोबळ आकडेवारी 
नोकऱ्या आहेत काय? हो नक्कीच आहेत. पुन्हा निव्वळ पुण्यातील आकडेवारी पाहूयात. सुमारे १५ मोठी रुग्णालये आहेत. तर मध्यम व छोटी अशी ४०० च्या वर आहेत. निव्वळ येथे लागणारे विविध कामांचे मनुष्यबळच लाखापेक्षा जास्त आहे. मात्र, त्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित कंपन्यांना पुरेसे विद्यार्थीच मिळत नाहीत. अनेक वृद्धाश्रम आहेत, तिथे कामाची तयारीच नाही. कोणत्याही हॉटेलमध्ये जा, सर्वच जण महाराष्ट्राबाहेरून आलेले दिसतील. या कामाला हलके समजून त्यात जायची तयारी नाही. रिटेल सेक्‍टर, टुरिझम, इव्हेंट्‌स व सेल्स मार्केटिंगमध्ये सहज पाच-सहा लाख व्यक्तींची गरज असते. त्यात प्रगतीची शक्‍यता भरपूर. पण ही सारी कष्टाची, फिरतीची कामे म्हणून त्याकडे आमचे पदवीधर पाठ फिरवणार. ब्युटी व वेलनेस, डाएट, योगा, जीम यात तीन ते पाच वर्षे अनुभव घेतल्यावर पर्सनल ट्रेनर म्हणून सुरुवात होते. पंचवीस ते चाळीस हजार कमावणारी अनेक उदाहरणे आहेत. पण त्याला नाक मुरडले जाते. ‘सकाळ’तर्फे विविध व्यवसायांचे ट्रेनिंग देण्याचा कार्यक्रम सातत्याने चालवला जातो. पर्सिस्टंट फाउंडेशनच्या ‘दे आसरा’तर्फे व्यवसाय सुरू करण्याचे परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. ‘मिटकॉन’तर्फे अनेक छोटे छोटे कोर्स घेतले जातात. ज्यातून स्वयंरोजगार सुरू होऊ शकतो. ‘एमकेसीएल’द्वारे ‘कमवा व शिका’ व त्यानंतर नोकरी पटकवा अशी योजना बारावीनंतर उपलब्ध आहे. कौशल्य विकासातून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करून चार-पाच वर्षे झाली आहेत. ते जवळपास भारतातील प्रत्येक शहरात चालतात. पुणे विद्यापीठात जेम्स, ज्वेलरी डिझाईनचा पदवी अभ्यासक्रम चालतो. इंटिरिअर, फॅशन, ग्राफिक डिझाईनचे अभ्यासक्रम अनेक छोट्या-मोठ्या संस्था चालवितात. प्रॅक्‍टिकल बी.कॉम. हा उत्तम अभ्यासक्रम म.ए.सोसायटीमध्ये चालतो. त्याद्वारे नोकरीची हमी आहे. मात्र, दुर्दैवाने या साऱ्याकडे तुच्छतेने पाहणारे विद्यार्थी, पालक ‘पदवी एके पदवी’ करून पदवीनंतर येणाऱ्या रोजगारीकडे बोट दाखवतात. त्याच वेळी देऊ केलेल्या नोकरीला लाथ मारण्याचे, नाकारण्याचे धाडस दाखवून कौतुकाने ‘असल्या फालतू पगाराच्या नोकऱ्या का करायच्या?’ हा प्रश्‍न अनेकदा कानावर पडत असतो. 
कसलेच काम करायची तयारी नसलेली पदवीधर व्यक्ती वयाच्या पंचविशीत म्हणत असते, ‘मला ना छान करिअर करायचे आहे.’ पण हे सारे कठोर वास्तव कधी लक्षात घेणार?

पदवी व पदवीनंतरचे काम  
पदवीधर हे फक्त पदवी‘धर’ होत आहेत. अर्थात व्यवहारी जग, व्यावसायिक, व्यापार उद्योग, इंडस्ट्री यातील लोकांच्या गरजा पुरवणाऱ्या पदवीधरांची कमतरता वाढत चालली आहे. गेल्या दशकात सातत्याने या साऱ्यांच्या तोंडी एक वाक्‍य कायम ऐकू येत असते. काम करणारा व माहिती असणारा इंजिनिअर, जबाबदारीने, जोखमीने निर्णय घेणारा डॉक्‍टर, अकाउंट्‌सची नेमकी कामे करणारा कॉमर्स पदवीधर मिळता मिळत नाही. एमबीए तर पैशाला पासरी नोकरी मागायला येतात अन्‌ आम्हालाच विचारतात काम कसे करायचे ते शिकवाल ना? सर्व वृत्तपत्रांतील संपादकांची अशीच तक्रार असते. बातमी लिहिता येते, पण संदर्भ सांगता येत नाही, बातमीतली माणसे कोण याबद्दल तर अनभिज्ञता विचारूच नका. अनेक क्षेत्रांबद्दलची मूळ तक्रार गरज असून चांगली माणसे मिळतच नाहीत, हीच आहे. 

अशीच दुसरी एक फार मोठी तक्रार सर्वच नोकरी देणाऱ्यांची असते. नोकरीसाठी जाहिरात दिली, तर भारंभार उमेदवार येतात. मुलाखतीमध्ये तेच उलटा प्रश्‍न विचारतात ‘पगार किती देणार?’ ‘काम कोणते? त्याचे स्वरूप काय?’ हा प्रश्‍न विचारणारा जवळपास सापडणे बंदच झाले आहे. मग काही प्रश्‍न उभे राहतात. निव्वळ पुणे शहराची आकडेवारी आपण पाहूयात. वय २१ ते ३५ या दरम्यान पुणे शहरातील दोन लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षा या नावाखाली आपल्या तारुण्याचा बहर वाया घालवत आहेत. प्रत्येकाला वर्षाला किमान एक लाख रुपयांची निव्वळ जगण्यासाठी गरज आहे. यातून दरवर्षी निवडल्या जाणाऱ्यांची संख्या कधीही तीनशेच्या वर गेलेली नाही. याचा ताळमेळ कसा व कोण लावणार?

एमबीएच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करतो हा असाच एक प्रकार. यासाठी साऱ्या शाखांचेच पदवीधर दोन-दोन वर्षे वाया घालवतात. परदेशात दोन वर्षांचा कामाचा अनुभव नसेल, तर एमबीएला प्रवेश मिळत नाही. इतके करूनही पुण्यातील अनेक मॅनेजमेंट संस्थांना विद्यार्थी कुठून आणावयाचे, हा यक्ष प्रश्‍न दरवर्षी उभा राहतो. त्यापैकी एमबीए चालवणाऱ्या ज्या संस्थांना तगून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत, त्यांची किमान माहिती घेण्याची तसदीसुद्धा विद्यार्थी-पालक घेत नाहीत. मग नोकरी नाही, एमबीए करूनसुद्धा उपयोग नाही, असे बेरोजगार अनेकदा भेटत राहतात.

आयटीतील नोकऱ्यांचे मृगजळ वेगळेच आहे. कॉम्प्युटरमध्ये पदवी घेतली, की परदेशी नोकरी व उत्तम पगार हा भ्रम अजून दूर होत नाही. दरवर्षी पुण्यातील कॉम्प्युटर पदवी घेणाऱ्या इंजिनिअर्सपैकी जेमतेम दहा टक्के इंजिनिअर्सना नोकरी मिळत आहे, हे माहिती करून घेण्याची इच्छाच मुले व पालकांना होत नाही. यंदाही अकरावीसाठी कॉम्प्युटर हा बायफोकल विषय घेण्यासाठीच्या मारामाऱ्या घरोघर होणारच आहेत. त्या पालकांना ‘पीसीएम’ हे विषय महत्त्वाचे असतात, हे सांगूनही त्यांचा विश्‍वास बसत नाही, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच प्रश्‍न येतो, की हे सारे कठोर वास्तव लक्षात कोण घेणार? लक्षात कधी येणार? 
 

संबंधित बातम्या