करिअरच्या वेगळ्या वाटा 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
अभ्यासक्रम - करिअर निवडताना मुलांसह पालकांनी बदलत्या जगाचा विचार केला पाहिजे. इथं काय घडतं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानुसार या जगाशी ताल जुळवताना कसा विचार करायला हवा, याचे मार्गदर्शन. 

‘थ्री  इडियट्‌स’मधल्या फुनसुक वांगडुची प्रयोगशील शाळा आपल्या सगळ्यांनाच मोह पाडते. पण मणिपूरमधल्या एका खेडेगावात राहून मुलांना शिकवणारी एक युवती आपल्या पुण्याचीच आहे. तिचं नाव सानिया किर्लोस्कर. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बायोडायव्हर्सिटी या विषयात मास्टर्सची पदवी घेतल्यानंतर सानियानं लडाख आणि हृषिकेशसारख्या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवलं होतं. आज आपल्या भोवतालच्या मुलांना मणिपूर भारतात आहे का? असा प्रश्‍न पडतो. त्याच ठिकाणी राहायला जाऊन भोवतालचा निसर्ग, पर्यावरण यांची सांगड घालून मुलांना शिकवणं; निरनिराळ्या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम घेणं आणि शिक्षकांनाही प्रशिक्षण देणं हे सगळं सानिया मनापासून करते आहे. आपल्या पालकांनी हवं ते करायला लहानपणापासून दिलेली मुभा, तसंच शास्त्रीय संगीत, निसर्गभ्रमंती, वाचन यांची जोपासलेली आवड यामुळं आपल्याला आज हे सगळं करायला प्रेरणा मिळाली, असं सानिया आवर्जून सांगते. 

आजकाल टीव्हीवर अनेकदा आपण ज्या फर्निचरच्या जाहिराती पाहतो त्या ‘अर्बन लॅडर’चा सीईओ आशिष गोयल आहे. त्याला स्वतःलाच नवीन जागेत राहायला गेल्यानंतर फर्निचरच्या बाबतीत प्रचंड समस्या आल्या. त्यातून त्यानं ऑनलाइन ऑर्डर घेऊन फर्निचर पुरवणारी कंपनी सुरू केली. आज भारतातल्या ७५ शहरांमध्ये ही कंपनी फर्निचर पुरवते. 

कनान गिल आणि बिश्व कल्याण या दोघांनी आवडत्या चित्रपटांवर मजेशीर आणि विनोदी व्हिडिओज तयार करून युट्यूबवर टाकले. आज कनान गिल याच्या युट्यूबच्या व्हिडिओ चॅनेलचे ७० लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. मुंबईतल्या भविन आणि दिव्यांक या तुराखिया भावंडांनी इंटरनेटवर वेबसाईटसाठी डोमेन रजिस्टर करणारी आपली ‘डायरेक्‍टी ग्रुप’ ही पहिली कंपनी १९९८ मध्ये सुरू केली. तेव्हा त्यांचं वय अनुक्रमे १८ आणि १६ होतं. आज ‘फोर्ब्ज’ आणि ‘हुरुन’ या दोन्ही याद्यांमध्ये दिव्यांक आणि भविन या दोन्ही भावंडांपैकी प्रत्येकाची ‘वर्थ’ १०० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक असल्याचं जाहीर झालं आहे. 

सोडा शीतपेयांचा खप १९९८ ते २०१५ दरम्यान २५ टक्‍क्‍यांनी कमी झाला, असं ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा एक अहवाल सांगतो. त्यामुळं पौष्टिक आणि आरोग्यदायक पदार्थांची मागणी वाढत चालली. हे जाणून अमेरिकेत ‘स्वीटग्रीन’ या कंपनीच्या ७७ शाखा ऑनलाइन ऑर्डर्स घेऊन ग्राहकांना सॅलड्‌स पुरवायला लागल्या. आपल्याकडंही स्विगी, झोमॅटो अशा कंपन्या आता मोबाईल ॲपद्वारे खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स घेतात. ‘ओला कॅब्ज’ टॅक्‍सी सेवा पुरवते. व्यक्ती आणि उद्योगाच्या स्वरूपानुसार ‘इनमोबी’, जाहिरातींची सेवा पुरवते. ‘क्विकर’, ‘स्नॅपडील’, ‘जबोंग’ या ऑनलाइन कंपन्या विविध सेवा पुरवतात. 

या सगळ्या उदाहरणांमध्ये दिसतं तशा प्रकारचं करिअर असू शकतं याचा विचारही आपल्यापैकी अनेकजणांनी कधी केलेलाच नसतो. पण आत्ता शाळेत असलेल्या मुलांपैकी ६५ टक्के मुलं ज्या नोकऱ्या करतील तशा नोकऱ्या आत्तापर्यंत अस्तित्वातच नसतील, असं भाकीत ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या २०१६ च्या परिषदेत केलं होतं. हे भाकीत करण्यामागं कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव, इंटरनेट ऑफ थिंग्ज हे आत्ताच्या युगातले परवलीचे शब्द कारणीभूत होते. 

यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या प्रयत्नांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता-आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’ असं म्हटलं जातं. १९५६ मध्ये अमेरिकेतल्या न्यू हॅम्पशायर राज्यात झालेल्या एका परिषदेत प्रथमच या शब्दाचा वापर झाला. यंत्रमानवाची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली आहे. यंत्रमानवाला संगणकीय भाषेत सूचना दिल्यानंतर तो त्या सूचना पार पाडतो. म्हणजेच मुळात कुठली सूचना दिल्यावर यंत्रमानवानं काय केलं पाहिजे, हे त्याला ‘शिकवलं’ जातं. त्यानंतर आज्ञाधारकपणे यंत्रमानव त्या सूचनांनुसार काम करायला लागतो. 

त्यामुळंच आज कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित वाहनं, ३ डी प्रिंटिंग तंत्रज्ञान, युद्धांमध्ये वापरले जाणारे यंत्रमानव अशी अनेक उपकरणं मानवजातीला वरदान ठरत आहेत. गुगल ‘एक्‍सपिडिशन ॲप’ विद्यार्थ्यांना ‘ग्रेट बॅरिअर रीफ’सारख्या ‘व्हर्च्युअल टूर्स’ आत्ताच घडवून आणतंय. ‘प्रोटीअस बायोमेडिकल’ आणि ‘नोव्हार्टिस’ या कंपन्यांनी तुमचं शरीर एखाद्या औषधाला कसं प्रतिसाद देतंय, त्याचा डेटा मोबाईल फोनवर वापरणारं डिजिटल उपकरण तयार केलं आहे. अशा प्रकारे तयार केलेल्या सायबरपिल्स शरीरातले अंतर्गत बदल डॉक्‍टरांना कळवत राहतात. तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेताय ना? वगैरे माहिती या सायबरपिल्स डॉक्‍टरांना देतात. ‘मिमो बेबी’ या कंपनीनं लहान बाळासाठी बेबी मॉनिटर तयार केला आहे. तो बाळाचा श्‍वासोच्छवास, झोप, शरीराची हालचाल अशा गोष्टी मॉनिटर करतो. नोकरी करणाऱ्या पालकांच्या आयपॅडवर किंवा स्मार्टफोनवर बाळाच्या या गोष्टी दिसू शकतात. ‘ॲमेझॉन’ या जगप्रसिद्ध कंपनीत शेल्फवरून वस्तू काढून खोक्‍यापर्यंत पोचवण्याचं काम यंत्रमानव करतात. ‘फेसबुक’ डेटा सर्व्हर्सचं व्यवस्थापन आता सायबोर्ग हा कॉम्प्युटर प्रोग्रॅमच करतो. जपानमधल्या हॉटेल्समध्ये  ग्राहक आत गेल्यावर स्वागत करायला, त्याचं सामान उचलायला, रुमपर्यंत पोचवायला यंत्रमानव आहेत. अमेरिकेत ऑटिस्टिक मुलांची देखभाल करायला यंत्रमानव वापरले जातात. विशेष म्हणजे, या मुलांवर उपचार करताना यंत्रमानव जास्त उपयोगी पडतात असंही लक्षात आलं आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेले हे यंत्रमानव दिवसेंदिवस स्मार्ट होत चालले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आता माणसाच्या विचारक्षमतेला आव्हान देऊ लागली आहे, ही चिंतेची बाब आहे. उदाहरणार्थ, ७ डिसेंबर २०१७ रोजी गुगलच्या ‘अल्फाझिरो’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॉम्प्युटर प्रोग्रॅमनं ‘स्टॉकफिश ८’ या काँप्युटर ॲपला बुद्धिबळात हरवलं. ‘स्टॉकफिश’ हा २०१६ चा विजेता होता आणि तो दर सेकंदाला बुद्धिबळाच्या ७ कोटी चालींमधून आपली चाल शोधत होता. ‘अल्फाझिरो’ जास्त स्मार्ट झाला आहे. तो दर सेकंदाला फक्त ८० हजार चालींमधून एक चाल शोधतो. 

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रमानवांच्या या उंचावलेल्या कामगिरीचा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे बेरोजगारी. स्वयंचलित यंत्रमानवांमुळे इंग्लंडमध्ये ३५ टक्के, अमेरिकेमध्ये ४७ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ६६ टक्के, थायलंडमध्ये ७२ टक्के, चीनमध्ये ७७ टक्के जणांच्या नोकऱ्या जातील असा सिटी बॅंकेनं ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या सहाय्यानं तयार केलेला २०१६ चा एक अहवाल सांगतो. भारतातल्या ६९ टक्के लोकांना स्वयंचलित यंत्रमानवांमुळे नोकऱ्या गमावण्याची भीती आहे असं ‘वर्ल्ड बॅंके’चा एक अहवाल सांगतो. उदाहरणार्थ, आजच्या जगात, २० हजार काॅम्प्युटर्समागे फक्त एक माणूस टेक्‍निशियन म्हणून पुरेसा असतो. 

अशा जगात मुलांनी करिअरसाठी काय शिकावं? या बेरोजगारीवर काही उपाय आहेत का असे प्रश्‍न मानवजातीसमोर आहेत. यासाठी पहिला उपाय म्हणजे मुलांनी वैविध्यपूर्ण आणि आपल्या आवडीच्या विषयांमध्ये शिक्षण घेणं. आयुष्यात ‘स्टेम-एस-सायन्स, टी-टेक्‍नॉलॉजी, इ-इंजिनिअरिंग आणि एम-मॅथेमॅटिक्‍स-विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ याच विषयांमधलं शिक्षण यश आणि संपत्ती मिळवून देतं, असा गैरसमज आज सर्रास दिसतो. त्यामुळंच फक्त इंटेलिजन्स कोशंट (आयक्‍यू) हीच एक बुद्धिमत्ता महत्त्वाची मानली जाते. ही बुद्धिमत्ता वापरून शाळेत पहिल्या येणाऱ्या मुलांचा उदोउदो केला जातो. अशावेळी ‘तंत्रज्ञान इतक्‍या झपाट्यानं बदलत असताना आपण सगळ्यांनीच मुलांना ‘इमोशनल इंटेलिजन्स’ आणि ‘संवेदनशीलता’ या दोन गोष्टी शिकवण्यावर भर द्यायला हवा आणि त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात माहिती येऊन कोसळत असल्यामुळं त्यांना माहिती (नॉलेज) हा विषय सर्वांत शेवटी शिकवायला हवा. मुलांना भौतिकशास्त्र आणि इतिहास शिकवणं एक वेळ सोपं आहे, पण या दोन गोष्टी शिकवणं खूप अवघड आहे. त्याचा विचार करा,’ असं युवाल नोहा हरारी या आत्ताच्या जगातल्या प्रसिद्ध विचारवंताचं म्हणणं आठवतं. 

यासाठी होवार्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञानं आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता मांडल्या आहेत, त्याबद्दल विचार व्हायला हवा. भाषाविषयक - लिहिण्याचं आणि बोलण्याचं भाषाकौशल्य; लॉजिकल-मॅथेमॅटिकल - संख्याविषयक; संगीतविषयक - गायन किंवा संयोजन; स्पटायल - विश्‍लेषण कौशल्य; बॉडी-कायनेस्थेटिक - नृत्य किंवा ॲथलेटिक क्षमता; इंटरपर्सनल - इतरांना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी साहचर्य साधण्याची क्षमता, इंट्रापर्सनल - स्वतःला समजून घेण्याची क्षमता; नॅचरलिस्टिक - भोवतालचा निसर्ग समजून घेण्याची क्षमता या त्या आठ बुद्धिमत्ता आहेत. या बुद्धिमत्तांवर आधारित असणारी वेगवेगळी करिअर्स याबाबत विचारांची आणि माहितीची देवाणघेवाण समाजात फारशी होताना दिसत नाही. त्याचवेळी या विषयांमध्ये शिक्षण देणाऱ्या शिक्षणपद्धतीचा आणि शिक्षणसंस्थांचाही अभाव आहे. 

अर्थात तंत्रज्ञान पुढं जातच राहणार. मग नवीन प्रकारची कोणकोणती करिअर्स मुलं करू शकतील? नृत्यकला, अनुवादक, दुभाष्या, वेब कंटेंट तयार करणं, वेबवरच्या व्हिडिओजना आवाज देणं, ऑनलाइन गायन किंवा वादन शिकवणं, सर्वच प्रकारचं शिक्षण ऑनलाइन देणं, इतकंच काय पण दारूपासून कॉकटेल करण्यासाठी मिक्‍सॉलॉजीचा कोर्स करणं अशा करिअरच्या अनेक वेगळ्या वाटा आता मुलांना जोपासता येऊ शकतात. 

अशा वाटांनी जाऊन करिअर केलेल्यांची ही काही उदाहरणं. माझ्या एका ओळखीच्या कुटुंबातल्या मुलाला लहानपणापासून चित्रकलेचा, विशेषतः रेखाटनं करायचा छंद होता. शाळेच्या चौकटीत बसणाऱ्या इतर विषयांमध्ये तो ठीकठाक पास व्हायचा. त्याच्या पालकांनी मात्र त्याचा चित्रकलेचा छंद जोपासायला भरपूर प्रोत्साहन दिलं. बी. कॉम. केल्यानंतर त्यानं ॲनिमेशनचा कोर्स घेतला. आता त्याच्या काही शॉर्ट फिल्म्सना आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळतात. 

चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी उमेदवारी करताना अपूर्वा जोशी या मुलीला एका वेगळ्याच क्षेत्रात काम करायला मिळालं. ते क्षेत्र म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग. एखाद्या कंपनीचे बॅलन्सशीट्‌स तपासून त्यातून काही धोका-फ्रॉड होण्याची शक्‍यता या शाखेत अजमावली जाते. अपूर्वानं अक्षरशः रात्रंदिवस मेहनत घेऊन अमेरिकेतल्या एसीएफईचा सर्टिफाईड फ्रॉड एक्‍झामिनर कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण करून ती थांबली नाही, तर भारतात अशा कोर्सची गरज आहे हे तिनं हेरलं. वयाच्या चोविसाव्या वर्षी अपूर्वानं स्वतःचं फ्रॉड-रिस्क ॲसेसमेंटचा पदविका कोर्स तयार करून तो चालवायला सुरुवात केली. या पदविकेला सोलापूर विद्यापीठानं प्रमाणित केलं होतं. स्वतःची कंपनी चालवणाऱ्या अपूर्वाला आता या विषयात डॉक्‍टरेटदेखील मिळाली आहे. अशा क्षेत्रातल्या माणसांची पुढच्या काही वर्षांमध्ये खूप गरज वाढेल. वैद्यकीय विश्‍वात आजारी माणसं, लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं यांची काळजी घेणं हे फक्त माणूसच करू शकेल. तिथं यंत्रमानव उपयोगी ठरणार नाहीत. त्यामुळं वैयक्तिक पातळीवर रुग्णांना आणि वृद्धांना सेवा पुरवणाऱ्या नोकऱ्यांचं प्रमाण पुढच्या काही काळात प्रचंड वाढेल. स्वयंचलित यंत्रांमुळं निर्माण होणाऱ्या बेरोजगारीमुळं आर्थिक समस्यांबरोबरच मानसिक समस्यांचंही प्रमाण भरमसाट वाढेल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ‘आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे’ हा मानवाला उत्पत्तीपासून पडलेला प्रश्‍न भयावह रीतीनं तोंड वर काढेल. त्यामुळं शारीरिक आजारांबरोबरच मानसिक विकारांसाठी वैयक्तिक समुपदेशन पुरवणाऱ्यांचीही खूप गरज भासेल. 

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कामाचं स्वरूप झपाट्यानं बदलत राहील. एका विशिष्ट विषयात घेतलेलं शिक्षण आणि त्यातलं एकसुरी सरधोपट करिअर (उदा. इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय किंवा अध्यापन) हा प्रकार उरणार नाही. त्यामुळंच बदलत्या जगाच्या वेगाशी जुळवून घेताना सतत नवनवीन गोष्टी शिकण्याचं कौशल्य आणि तयारी असणं हा मुलांसाठी पुढच्या काळातला सर्वांत गरजेचा गुण ठरेल.
 

संबंधित बातम्या