अर्थशास्त्रातील वैविध्यपूर्ण संधी 

प्रा. नंदकुमार काकिर्डे 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

केवळ भारतातच नाही तर जगभरातील बहुतेक सर्व विकसित तसेच विकसनशील देशांमध्ये सातत्याने उत्तम संधी असलेले क्षेत्र म्हणजे अर्थशास्त्रातील व्यावसायिक संधी असे निश्‍चित म्हणता येईल. आपल्या दैनंदिन व्यवहारातील अन्नपदार्थ, कृषी यांसारख्या क्षेत्रांपासून व्यवसाय, व्यापार, बॅंकिंग, प्रसार माध्यमे इ. सर्व क्षेत्रांत या विषयातील पदवीधर व उच्चशिक्षितांना चांगली संधी मिळू शकते. बारावी झाल्यानंतर कला म्हणजे आर्टस्‌ क्षेत्रातील तीन वर्षांची पदवी अर्थशास्त्र या विषयात घेता येते व त्यानंतरचे दोन वर्षांचे पदव्युत्तर पदवीचे व पीएच.डी. शिक्षणही अर्थशास्त्र या विषयात पूर्ण करून विविध प्रतिष्ठित क्षेत्रांमध्ये आपला अर्थतज्ज्ञ म्हणून ठसा निश्‍चित उमटवता येतो. यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन तसेच रिझर्व्ह बॅंकेसारख्या अर्थविषयक काम करणाऱ्या संस्थांमध्येही चांगल्या प्रकारच्या संधी यात उपलब्ध आहेत.

बी.ए. किंवा एम.ए. इकॉनॉमिक्‍स केल्यानंतरही चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. मात्र त्यात काही स्पेशलायझेशन केले किंवा काही संशोधन करून पीएच.डी.चे शिक्षण/संशोधन पूर्ण केले तर संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. एक व्यावसायिक अर्थतज्ज्ञ म्हणूनही तुमची विविध क्षेत्रांत मागणी वाढू शकते. एवढेच नाही तर काही पब्लिक लिमिटेड कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या संचालक मंडळावरही काम करण्यासाठीची संधी मिळू शकते. रिझर्व्ह बॅंकेच्या तसेच सेबी किंवा अन्य काही वित्तसंस्थांच्या संचालक पदासाठीही व्यावसायिक अर्थतज्ज्ञांचा समावेश केला जातो.

यामुळेच अर्थक्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण किंवा संशोधन केले तर ते जास्त लाभदायक ठरू शकते. जागतिक पातळीवरही विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक अर्थतज्ज्ञांना सातत्याने मागणी असते हे लक्षात घेतले तर या क्षेत्रातील मोठ्या संधींची कल्पना सहज येऊ शकते. त्यामुळेच कला शाखेतील बीए किंवा एमएची अर्थशास्त्रातील पदवी घेऊन काय साध्य करता येईल असे विचारले तर पुढील क्षेत्रात त्याची निश्‍चित संधी मिळू शकते. त्यात केवळ अर्थतज्ज्ञ, वित्त क्षेत्रातील बॅंकिंग, शेअर बाजार, म्युच्युअल फंड कंपन्या यांच्याकडे माहिती विश्‍लेषक (डेटा ॲनॅलिस्ट), वित्त क्षेत्रातील नियोजक, अकाउंटंट, अर्थविषयक संशोधक, वित्त सल्लागार, गुंतवणूक सल्लागार, आयुर्विमा कंपन्यांमध्ये ॲक्‍च्युरीची कामे व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अर्थतज्ज्ञांची गरज असते. केंद्र सरकार व राज्य शासनामध्येही अर्थतज्ज्ञांची, तसेच शासनाला सल्लागार म्हणून काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. एवढेच नाही तर महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठीही अर्थज्ज्ञ आवश्‍यक असतात. गेल्या काही वर्षांमध्ये प्रसार माध्यमांमध्ये वित्तविषयक दैनिकांमध्ये सातत्याने वित्तविषयक विश्‍लेषणात्मक लेखन करण्यासाठी अर्थतज्ज्ञांची गरज असते. त्याचप्रमाणे देशातील आर्थिक परिस्थितीचे विश्‍लेषण करणे, त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून भाष्य करण्याची जबाबदारी अर्थतज्ज्ञ पार पाडू शकतो. काही मासिके, साप्ताहिके, पाक्षिकांमध्येही दर्जेदार लेखन करण्यासाठी अर्थतज्ज्ञांची गरज नेहमीच असते.

विविध खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये ग्राहक, उद्योग यांना विविध प्रकारची सल्लामसलत करण्यासाठीही गेल्या काही वर्षात अर्थतज्ज्ञांना मागणी असते. देशातील विविध आर्थिक प्रश्‍न, त्यांची सोडवणूक करण्यासाठी अर्थतज्ज्ञांचीच मदत घेतली जाते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच आर्थिक सेवा क्षेत्रांमध्ये इकॉनॉमिक्‍स पदवीधरांना प्राधान्य दिले जाते. जेव्हा समाजामध्ये काही आर्थिक किंवा अन्य पाहणी (सर्व्हे). चाचण्या घेतल्या  जातात तेव्हाही विश्‍लेषक म्हणून अर्थतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची असते. त्यासाठी अर्थतज्ज्ञांमध्ये उत्तम वक्तृत्व, मांडणीची कला, कठीण विषयाची सहज उकल करणे, लेखन कौशल्य याची जोड मात्र आवश्‍यक आहे. केवळ अर्थशास्त्राचा अभ्यास करून चालणार नाही तर त्यासाठी अन्य विश्‍लेषण, मूलगामी विचारांचे कलागुण अंगी बाणवले पाहिजेत.

अर्थशास्त्राचे पदवीधर झाल्यानंतर विविध आर्थिक प्रश्‍नांचे संशोधन, त्यासाठी पाहणी करणे, माहिती संकलन करणे, त्याचे योग्य विश्‍लेषण करणे, संख्याशास्त्राचा वापर करून तसेच संगणकाचा वापर करून माहितीचे विश्‍लेषण, त्यावर आधारित भविष्याचा वेध घेणे, विविध प्रश्‍नांवर उत्तरे शोधणे, तसेच प्रसार माध्यमे, पाक्षिकांमध्ये विश्‍लेषणात्मक लेखन करण्याचे उत्तरदायित्व अर्थतज्ज्ञांवर पडते. देशामध्ये विविध आर्थिक, सामाजिक धोरणे घेण्यासाठी सरकारला मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही अर्थतज्ज्ञांवर असते.

गेल्या काही वर्षांमध्ये बाजारपेठांचे मोठे विस्तारीकरण होत आहे. या बाजारांचे संशोधन करून त्यांचे विश्‍लेषण करण्याचे काम विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून अर्थतज्ज्ञांना दिले जाते. तसेच अर्थविषयक सल्लागार म्हणूनही कामे दिली जातात. वित्तीय विश्‍लेषकाबरोबरच गेल्या काही दशकांमध्ये सरकारी धोरणांचे विश्‍लेषण करण्यासाठी सातत्याने अर्थतज्ज्ञांची आवश्‍यकता असते. वकिलीच्या क्षेत्रात तसेच व्यवस्थापन सल्लागार म्हणूनही अर्थतज्ज्ञांची गरज असते. त्यामुळे आगामी काळामध्ये इकॉनॉमिक्‍समध्ये प्राविण्य मिळवणाऱ्यांना करियर म्हणून निश्‍चित मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे लेखापरीक्षक, शेअर दलाल, विमा सल्लागार, किरकोळ व्यापार, किंमत विश्‍लेषक, वित्त सल्लागार, विश्‍लेषक व संख्याशास्त्र विश्‍लेषक म्हणूनही अर्थतज्ज्ञांची गरज असल्याने या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या