टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी

संजीवनी पंधे-निपसे, लोटस बिझनेस स्कूल, पुणे 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
भारताची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी पाहताच अतिथी देवो भव ही भावना प्रत्येक भारतीयामध्ये लहानपणीपासूनच रुजलेली. घरी आलेल्या पाहुण्याला आपण देवासमान मानतो आणि त्याचे आदरातिथ्य मनापासून करतो, अगदी इतके की तो खूश होऊनच जातो. याच भावनेवरती आधारीत एक संपूर्ण आगळेवेगळे असे क्षेत्र आजच्या तरुणांची वाट पाहात आहे. 

भारतीय पर्यटनाचा इतिहास प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. भारतासारख्या भव्य संस्कृतीसंपन्न अशा देशात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत ते राजस्थानच्या वाळवंटापासून आसामच्या चहाच्या बागांपर्यंत अतोनात निसर्गरम्य ठिकाणे आहेत. अशा देशाला संस्कृती, खान-पान, भाषा, सुंदर समुद्र किनारपट्टी, गगनी भिडणारे पर्वत व अखंड अविस्मरणीय असणारा इतिहास नेहमीच पर्यटकांना भूल घालाणारा आहे. 

अशा या श्रीमंत आणि संस्कृतीप्रधान देशाला पर्यटण आणि आदरातिथ्याचा खूप मोलाचा वारसा लाभला आहे. हा वारसा राजामहाराजांपासून चालत आला आहे. परंतु काळानुसार व गरजेनुसार त्यामध्ये खूप सारे बदलही घडले आहेत. 

भारतामधील मध्यमवर्गीयांचे वाढते उत्पन्न आणि खर्च करण्याची शक्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. मोकळ्या वेळात फिरायला जाणे, नवनवीन स्थळांना भेटी देणे, रेस्टॉरंटला जाणे, मॉल्स, अम्युझमेंट पार्क, मल्टिप्लेक्‍स, वॉटर पार्कस अभयारण्य, ट्रेकिंग अशा अनेक गोष्टींकडे लोक आकर्षित होत आहेत. या सगळ्या ॲक्‍टिव्हिटीज पूर्णपणे लोकांना एन्जॉय करता याव्यात म्हणून अनेक पर्यटन कंपन्या आणि हॉटेल्समधील लोक जुंपले आहेत. एखादी सहल, रेस्टॉरंटमधील अनुभव किंवा सामूहिक सोहळा अविस्मरणीय व्हावा म्हणून सतत कार्यरत आहेत. 

गेल्या काही वर्षांत पर्यटन क्षेत्र ७ टक्‍क्‍यांनी तर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री १०-१२ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. यामध्ये इंटरनॅशनल ब्रॅंडेड हॉटेल्सचा वाटा ४७ % आहे. जो २०२८ पर्यंत ५० टक्‍क्‍यांवर जाऊन पोचणार आहे. भारताचा रूम ऑक्‍युपंसीचा अभ्यास केला तर २०१८ मध्ये ६६.६% होता, तर येणाऱ्या काहीच वर्षात तो ६८-७०% होणार आहे हे निश्‍चित.

ज्या प्रकारे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात वाढ होत आहे. त्याच प्रकारे या इंडस्ट्रीने जवळजवळ ८०% हून जास्त रोजगार आजच्या पिढीला उपलब्ध करून दिले आहेत. मेडिकल टुरिझम, कृषी पर्यटन, इव्हेंट मॅनेजमेंट (कार्यक्रम व्यवस्थापन), कार रेंटल, हॉटेल पोर्टल्स अशा नवनवीन करिअर्समध्ये उच्चस्तरीय नोकऱ्या निर्माण होताना आढळून येतात. ज्या युवा युवतींकडे संभाषण कला, नवीन लोकांना भेटण्याची आवड, फिरण्याची आवड आहे त्या तरुणाईसाठी ही करिअर्स खूपच मोहक आहेत. 

अशा या ग्लॅमरस फील्डला योग्य मनुष्यबळाची कायमच आवश्‍यकता असते. भारतामध्ये अनेक नामांकित संस्था आहेत ज्या या करिअर्सला साजेसे, असे शिक्षण प्रदान करण्यात कार्यरत आहेत, त्यातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे ‘लोटस बिझनेस स्कूल, पुणे’ येथे स्थापित आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षांचा फूल टाइम एमबीए इन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी कोर्स चालविण्यात येतो. हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असून AICTE मान्यताप्राप्त आहे. B.Com, B.A., B.Sc., B.B.A. B.Sc., H.S., HMCT उत्तीर्ण असे विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. हा कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असल्या कारणाने विद्यार्थ्यांना CET किंवा ATMA ची प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. 

चला तर मग, या ग्लॅमरस क्षेत्रामध्ये पाऊल ठेवूयात, एका नवीन जिद्दीने, नवीन उमेदीने आणि अर्थातच एका नवीन दृष्टिकोनाने. ही वेळ आहे तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याची आणि स्वच्छंदी जगण्याची....  

संबंधित बातम्या