प्रशासकीय सेवा क्षेत्राचे आव्हान

तुकाराम जाधव, संचालक, द युिनक ॲकॅडमी
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

महाराष्ट्राचा गेल्या दशकभराचा विचार केल्यास प्रशासकीय (नागरी) सेवा क्षेत्र हे करिअरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून पुढे आले आहे, ही बाब लक्षात येते. भारताने उदारीकरणाच्या विकास प्रारूपाचा स्वीकार केल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, अध्यापन यासारख्या प्रचलित करिअर संधींबरोबरच उद्योग-व्यवसाय व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान यासारख्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या. विशेषतः खासगी क्षेत्राचा विस्तार झाला असून त्यात नोकरी, व्यवसायाचे विविध आकर्षक मार्ग पुढे आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय सेवा क्षेत्रास राज्यातील अनेक विद्यार्थ्यांकडून दिली जाणारी पसंती ही लक्षणीय बाब मानली पाहिजे.
नागरी सेवा परीक्षा आणि त्यातील यशासंदर्भातील महाराष्ट्राचा विचार करता ही बाब ठळकपणे लक्षात येते, की गेल्या १०-१५ वर्षांत मराठी मुलांचा या क्षेत्राकडील कल लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. आज जवळपास प्रत्येक विद्यापीठामध्ये नागरी सेवा प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, संदर्भपुस्तकांची विपुल प्रमाणात झालेली निर्मिती आणि उपलब्धता, इंग्रजीबरोबरच मर्यादित असले तरी मराठी भाषेतून निर्माण होणारे अभ्यास साहित्य, इंटरनेटचा विस्तार या घटकांमुळे नागरी सेवा परीक्षांच्या संदर्भात जाणीव-जागृती घडून आलेली दिसते. नागरी सेवा परीक्षांविषयी वाढलेल्या जाणिवेमुळे अनेक विद्यार्थी पदवीकाळापासूनच या परीक्षेच्या तयारीस सुरुवात करतात. चांगली पर्यायी नोकरी असतानाही बरेच विद्यार्थी या क्षेत्राची जाणीवपूर्वक निवड करत आहेत. २००७-०८ पासून सुरू झालेल्या जागतिक वित्तीय संकटामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फटका बसल्याने अनेक आयटी पदवीधारक या सेवांकडे वळले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रासही वित्तीय संकटाचा सामना करावा लागल्याने नोकरी-रोजगाराची समस्या तीव्र बनली. त्यामुळे या क्षेत्राकडे अभियांत्रिकीचे पदवीधारक मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर आर्थिक सुरक्षितता, आव्हानात्मक करिअर संधी, समाजात सकारात्मक बदल करण्याची क्षमता अशा बाबींमुळे नागरी सेवांकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते. त्यामुळे यूपीएससी परीक्षेत गेल्या काही वर्षांत एकूण पदसंख्येच्या सुमारे ८-१० टक्के या प्रमाणात सेवापदे प्राप्त करत महाराष्ट्रीय मुले यशस्वी झाल्याचे दिसते. यावर्षीच्या निकालातही एकूण ७५९ पैकी सुमारे ७० महाराष्ट्रीय विद्यार्थी यशस्वी झाल्याचे दिसून येते.

नागरी सेवा परीक्षेचे स्पर्धात्मक वेगळेपण
यूपीएससीद्वारे आयोजित केली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी करण्यापूर्वी या परीक्षेचे स्वरूप, त्यातील पूर्व, मुख्य, मुलाखत हे टप्पे, त्यांचा अभ्यासक्रम, त्यासाठी आवश्‍यक संदर्भ-साहित्य आणि महत्त्वाचे म्हणजे परीक्षेची अभ्यासपद्धती या विषयी वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे गरजेचे ठरते. एकतर या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी इतर परीक्षांप्रमाणे पात्रतेची कोणतीही पूर्व निर्धारित अट (३५ % अथवा ४०%) ठरविलेली नसते. त्या-त्या वर्षी आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांच्या विशिष्ट प्रमाणातच परीक्षेच्या त्या-त्या टप्प्यात विद्यार्थी पात्र ठरविले जातात. स्वाभाविकच परीक्षेत पात्र होण्यासाठी इतरांना मागे सारून पुढे जाण्याची विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि अखेरीस जाहिरातीत नमूद केलेल्या संख्येएवढेच विद्यार्थी यशस्वी ठरतात. दुसरे म्हणजे ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्व परीक्षा, लेखी स्वरूपाची मुख्य परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची तपासणी करणारी मुलाखत अशा तीन निरनिराळ्या टप्प्यांमध्ये घेतली जाते. यासंदर्भात हे लक्षात घेतले पाहिजे, की सर्वसाधारणतः रूढ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलाखतीसारख्या चाचणीला सामोरे जावे लागत नाही. याउलट, मुलाखत हा स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाचा घटक आहे. तिसरे वेगळेपण म्हणजे, या परीक्षेचा व्यापक अभ्यासक्रम. यात एक वैकल्पिक विषय, सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स आणि निबंधाच्या स्वतंत्र पेपरचा समावेश होतो. 
या परीक्षेचे आणखी एक वेगळेपण म्हणजे, सामान्य अध्ययन तसेच वैकल्पिक विषयांतील महत्त्वपूर्ण प्रकरणांशी संबंधित चालू घडामोडींचा करावा लागणारा अभ्यास होय. वर्तमानपत्रे, मासिके, नवीन संदर्भ ग्रंथ याद्वारे विद्यार्थ्याला आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. शेवटी, अत्यंत ‘गतिशील’ स्वरूप हे या परीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एकंदरच शब्द व वेळेची मर्यादा, इतरांशी असणारी स्पर्धा यामुळे या परीक्षेचा प्रत्येक टप्पा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा ठरतो. यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा आरंभ करताना हे वेगळेपण लक्षात घेऊनच विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी आवश्‍यक साधनांची जमवाजमव करावी लागते.

नागरी सेवा परीक्षेची रचना
उपरोक्त परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे नागरी सेवा परीक्षेतील तीन टप्पे आहेत. पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन (२०० गुण) आणि नागरी सेवा कलचाचणी (२०० गुण) या दोन विषयांचा समावेश होतो. 
यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी १७५० गुण निर्धारित करण्यात आले आहेत. मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन (१००० गुण), वैकल्पिक विषय (५०० गुण), निबंध (२५० गुण) पेपर्सखेरीज भारतीय भाषा (३०० गुण) आणि अनिर्वाय इंग्रजी (३०० गुण) हे भाषेचे दोन पात्रता विषयही समाविष्ट आहेत. 
मुख्य परीक्षेतील पहिला पेपर निबंधाचा पेपर होय. आयोगाने यास २५० गुण निर्धारित केले आहेत. आयोगाने दिलेल्या दोन विभागांतील प्रत्येकी एक विषयावर अशा एकूण दोन विषयांवर निबंध लिहिणे अपेक्षित आहे. सुरुवातीपासूनच निश्‍चित वेळ देऊन निबंधाची सातत्यपूर्ण तयारी करणे गरजेचे आहे. त्यासाठी मागील ५-६ वर्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचे अवलोकन करून आयोगाने आतापर्यंत विचारलेले निबंधांचे विविध विषय लक्षात घ्यावेत. अभ्यासाच्या सोयीसाठी प्रस्तुत विषयांचे ४-५ प्रमुख शीर्षकाखाली व्यापक वर्गीकरण करावे. उदा. लोकशाही, जागतिकीकरण, स्त्रियांचे समाजातील स्थान, आंतरराष्ट्रीय राजकारण, पर्यावरण इ. अशा रीतीने व्यापक वर्गीकरण केल्यानंतर संबंधित मुद्द्यांविषयी मतमतांतरे, वैचारिक भूमिका, उपाययोजना आणि भवितव्य या धर्तीवर विविधांगी माहितीचे संकलन करावे. त्यानंतर स्वतःच विषय तयार करून निबंध लिहून तपासून घ्यावा. 
मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाचे महत्त्व वाढल्यामुळे त्यास योग्य वेळ देणे महत्त्वाचे ठरते. सामान्य अध्ययनातील चारही पेपर्समध्ये विविध विषय समाविष्ट करण्यात आले आहेत, हे लक्षात घेऊन प्रत्येक विषयाचे स्वतंत्र नियोजन करणे अत्यावश्‍यक आहे. त्या-त्या विषयांतील मूलभूत संकल्पना, माहिती प्रधान-तथ्यात्मक भाग आणि चालू घडामोडी अशा तिन्ही घटकांची पद्धतशीर तयारी करावी. सामान्य अध्ययनासाठी विविध संदर्भ पुस्तके वाचावयाची असल्याने ‘मायक्रो नोट्‌स’चा आधार घेऊन संबंधित साहित्य साररूपाने लिहून काढावे. प्रत्येक विषयाची उजळणी आणि नेमकेपणाने उत्तरे लिहिण्यासाठी ‘मायक्रो नोट्‌स’ परीक्षेच्या तोंडावर उजळणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. सामान्य अध्ययनातील प्रश्‍नांची उत्तरे अधिक प्रभावी करण्यासाठी समर्पक उदाहरणे, प्रयोग, आकडेवारी, सांख्यिकी यांचा आधार घ्यावा आणि उत्तरांची मांडणी करताना फ्लो चार्ट, पाय चार्ट, नकाशे इ. तंत्रांचा वापर करावा. शेवटी भरपूर सराव चाचण्यांची उकल, हा अभ्यासपद्धतीचा मध्यवर्ती भाग असेल याची दक्षता घ्यावी. वैकल्पिक विषयाच्या संदर्भातही विषयाची निवड, अभ्यासक्रम, प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण, संदर्भसाहित्याची निवड, मायक्रो नोट्‌सची निर्मिती आणि सराव चाचण्यांचा अवलंब करावा.
मुलाखत अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणी हा या परीक्षेचा अंतिम आणि अनेकार्थाने महत्त्वाचा टप्पा. त्यासाठी यूपीएससीने २७५ गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षा व मुलाखत या दोन्ही परीक्षांमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करूनच विद्यार्थी पात्र वा अपात्र ठरवला जातो. आयोगाने मुलाखती ऐवजी ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक उपयोजिला आहे. यासाठी विद्यार्थ्याची व्यक्तिगत माहिती (नाव, आई-वडिलांचे नाव, आडनाव), गाव, तालुका, जिल्हा, विभाग व राज्याची माहिती, शिक्षण (शालेय, महाविद्यालयीन व पदवी), वैकल्पिक विषय, चालू घडामोडी व विद्यार्थ्यांच्या अभ्यासबाह्य छंद-आवडी, क्रीडा, सामाजिक सेवेतील रस या घटकांची तयारी करणे क्रमप्राप्त ठरते. वास्तविक पाहता मुलाखतीत विद्यार्थ्याच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे या विषयी दृष्टिकोन व त्या विषयी भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्याला समकालीन बाबींची जाण तर असलीच पाहिजे, परंतु संबंधित मुद्यांविषयी त्याची स्वतःची स्पष्ट भूमिकादेखील असावी लागते. विद्यार्थी समन्यायी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही हे पाहिले जाते. अर्थात विद्यार्थ्याची देहबोली, भाषा, संवाद कौशल्य, विचारांतील स्पष्टता, आत्मविश्‍वास या बाबीही मुलाखतीत महत्त्वाच्या ठरतात यात शंका नाही. स्वाभाविकच भरपूर वाचन, विविध मुद्यांचे सर्वांगीण आकलन, त्याविषयी स्वतःचे ठाम मत विकसित करणे महत्त्वपूर्ण ठरते. बोलण्याचा भरपूर सराव, गटचर्चा व अधिकाधिक मॉकइंटरव्ह्यूजद्वारे मुलाखतीची तयारी करता येते. 

अभ्यास पद्धती
पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांच्या व व्यापक अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे लक्षात घेतल्यानंतरच या परीक्षेच्या तयारीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या तयारीच्या प्रारंभीच काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे अत्यावश्‍यक ठरते. मुख्य परीक्षेत घ्यावयाच्या वैकल्पिक विषयाची निवड महत्त्वपूर्ण ठरते. संबंधित वैकल्पिक विषयातील आपला रस, स्वतःची पदवी शिक्षणाची पार्श्‍वभूमी, त्या विषयाच्या मार्गदर्शनाची उपलब्धता, त्यावर उपलब्ध दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य या बाबींचा विचार वैकल्पिक विषयांची निवड करताना अगत्याचा ठरतो. यूपीएससीत साधारणतः राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, मानववंशशास्त्र, भूगोल, इतिहास हे विषय अग्रक्रमाने निवडले जातात असे दिसते. 
वैकल्पिक विषयाची निवड ठरल्यानंतर सर्व विषयांचा अभ्यासक्रम बारकाईने पाहावा. अभ्यासक्रम बारकाईने पाहिल्यानंतर विविध विषयांवरील दर्जेदार व अद्ययावत संदर्भसाहित्य मिळवावे. काही मूलभूत, संकल्पनात्मक व महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ इंग्रजीतूनच वाचावेत. त्याचे मराठीत सुयोग्य भाषांतर झालेले असल्यास ते उपयोगात आणावे. यानंतर यूपीएससी परीक्षांच्या मागील किमान १० प्रश्‍नपत्रिकांचे सूक्ष्मपणे विश्‍लेषण करावे. या परीक्षांच्या अभ्यासात प्रश्‍नपत्रिकांच्या विश्‍लेषणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, त्या माध्यमातूनच अभ्यासाची दिशा निर्धारित करून त्यात नेमकेपणा आणता येतो. प्रश्‍नांच्या विश्‍लेषणाद्वारे प्रश्‍नांचे स्वरूप, त्यात होणारे बदल, त्या-त्या विषयातील महत्त्वाची प्रकरणे, संदर्भ साहित्याची पर्याप्तता या बाबी लक्षात घ्याव्यात.
माध्यमाची निवड हादेखील अनेकांसाठी त्रासदायक व गुंतागुंतीचा विषय ठरतो. प्रथमतः हे लक्षात घेतले पाहिजे, की मराठी माध्यमातूनही (इतर भारतीय भाषांप्रमाणेच) ही परीक्षा देता येते. इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिल्यानंतर चांगले गुण मिळतात, असा एक व्यापक स्तरावर गैरसमज आढळतो. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा देऊन यश मिळवले हे वेगळे सांगणे नको. वास्तविक पाहता प्रश्‍नाला अनुसरून योग्य परिभाषेचा अवलंब करून, उत्तरात सर्व मुद्दे समाविष्ट केल्यास कोणत्याही भाषा माध्यमातून चांगले गुण प्राप्त करता येतात, हे उघड आहे. मराठी माध्यमातून अनेक विषयांवर दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य उपलब्ध नाही, हे वास्तव आता मागे पडत आहे. त्यामुळे आपल्याला ज्या भाषेतून उत्तम पद्धतीने अभिव्यक्त करता येते, ती भाषा माध्यम म्हणून निवडावी.

अभ्यास व वेळेचे नियोजन
यूपीएससीसाठी लागणारी ही प्राथमिक जमवाजमव केल्यानंतर अभ्यास व वेळेचे नियोजन मध्यवर्ती ठरते. पूर्व व मुख्य परीक्षेत अनेक विषयांचा अभ्यासक्रम विविध गुणांसाठी दिलेला असल्याने त्यांचे परीक्षेतील महत्त्व व त्यासाठी वाचावी लागणारी पुस्तके, अभ्यास विषयातील स्वतःची गती व रस या बाबी लक्षात घेऊन घटकवार अभ्यास व वेळेचे नियोजन करावे. नियोजनाबाबत प्रत्येक विद्यार्थ्याने हे लक्षात घ्यावे, की या परीक्षेच्या योग्य तयारीसाठी किमान एक वर्षाचा (दररोज किमान १०-१२ तास) नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास आवश्‍यक ठरतो. या वर्षभराच्या काळाचे ६, ३, १ महिना; ३०, १५, ७ व १ दिवसाचे सूक्ष्म नियोजन ठरवणे महत्त्वाचे आहे. या नियोजनाची विभागणी करताना मुख्य परीक्षेसाठी साधारणतः ८ महिने, पूर्व परीक्षेसाठी ४ महिने द्यावेत. वेळेच्या नियोजनात त्या-त्या विषयांच्या किमान दोन/तीन उजळण्या झाल्या पाहिजेत हे लक्षात घ्यावे. नियोजनाच्या संदर्भात नियोजन केवळ कागदावरच राहणार नाही, तर त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली पाहिजे. 
यूपीएससीच्या एकंदर तयारीत पूर्व व मुख्य परीक्षांसाठी भरपूर सराव चाचण्या देणे निर्णायक ठरते. कारण या सरावाद्वारेच आपल्या तयारीची पातळी, त्यातील उणिवा, कच्चे दुवे, वेळेचे नियोजन या बाबी लक्षात घेऊन त्यात वेळीच दुरुस्त्या करता येतात. सराव चाचण्यांद्वारेच उत्तरात अचूकता व नेमकेपणाची हमी देणे शक्‍य होईल. म्हणून सराव चाचण्या विद्यार्थ्यांच्या यशात निर्णायक घटक मानावा लागतो. चालू घडामोडी हा भाग पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यांत मध्यवर्ती आहे. विशेषतः सामान्य अध्ययनातील बहुतांशी प्रश्‍न चालू घडामोडींवर आधारित असतात. राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान यातील ताज्या घडामोडींविषयी अनेक प्रश्‍न विचारले जातात. त्यामुळे द हिंदू, इंडियन एक्‍स्प्रेस ही वर्तमानपत्रे, फ्रंटलाईन हे पाक्षिक, योजना व ‘युनिक बुलेटिन’ हे मासिक नियमितपणे वाचावे. इंडिया इयरबुक व अद्ययावत संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन हा विषय पक्का करावा. दररोज किमान २ तासांचा कालावधी चालू घडामोडींसाठी राखीव ठेवावा. मुलाखतीत तर बरेच प्रश्‍न चालू घडामोंडीवर आधारित असतात. म्हणून या विषयाची तयारी सुरुवातीपासूनच करावी लागते. 
थोडक्‍यात, यूपीएससी परीक्षेच्या एकंदर तयारीत विद्यार्थ्याने हे नेहमी लक्षात ठेवावे, की पूर्व, मुख्य व मुलाखत हे टप्पे भिन्न असले, तरी त्याचा अभ्यास समग्र दृष्टिकोनातूनच केला पाहिजे. कारण, या तिन्ही टप्प्यांत अनेक अभ्यासघटकांच्या बाबतीत साम्य आहे आणि यातील प्रत्येक टप्प्याचा अभ्यास इतर टप्प्यांना सहाय्यभूत ठरणाराच आहे. म्हणून पूर्व, मुख्य, मुलाखत असा सुटा-सुटा, विखंडित अभ्यास न करता त्यातील साम्य लक्षात घेऊन समग्रपणे अभ्यास करावा. शेवटी, परीक्षेचे योग्य आकलन, दर्जेदार व अद्ययावत संदर्भ ग्रंथांचा अवलंब, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास व वेळेचे नियोजन याद्वारे सर्वसामान्य विद्यार्थीदेखील या परीक्षेत देदीप्यमान यश मिळवू शकतो.

संबंधित बातम्या