वेगळ्या वाटेवर

वरुण नार्वेकर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
चित्रपट क्षेत्रातल्या या विविध अंगांचं शिक्षण देणाऱ्या सरकारी, तसेच खासगी संस्था आहेत. इथे दोन ते तीन वर्षांचे कोर्सेस असतात. पूर्वी अशा वेगळ्या क्षेत्रांत मुलाला घालायचं म्हणजे पालकांना त्याच्या करिअरची शाश्वती वाटत नसे. म्हणूनच अशोक सराफ किंवा प्रशांत दामलेंसारख्या श्रेष्ठ अभिनेत्यांनीदेखील त्यांच्या अभिनय क्षेत्रातल्या सुरवातीच्या काळात बॅंकेत नोकरी करीत नाटकाचे प्रयोग केल्याचा इतिहास आहे.

दहावीनंतर आपल्याकडे तशा तीनच वाट्या खुल्या होतात. एखाद्याने वेगळी वाट निवडायची म्हटलंच, तर त्यासाठी ग्रॅज्युएशन किंवा कधी कधी तर अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनचा टप्पा त्याला-तिला पार करावा लागतो. शाळेत आपल्याला थोडे वेगळे विषय नसतात का? तर असं नाहीये. कार्यानुभव, हस्तकला, चित्रकला, बागकाम, शिवणकाम असे काही विषय असतात, पण त्यांना कायमच मनोरंजनात्मक असा दर्जा दिला जातो. अशा विषयात करिअर करावं, अशी ते शिकवणाऱ्यांची पण अपेक्षा नसते आणि ते शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांनाही तसं वाटत नसतं. पण, तसं असलं तरी अशी वेगळी वाट निवडून असंख्य लोकं अशा भिन्न विषयात करिअर घडवतात, ते केवळ त्यांच्या मनातल्या तीव्र इच्छेमुळे. 

मी सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. एखादा चित्रपट संपल्यावर जी भरपूर नावं असणारी लांबलचक यादी आपल्याला दिसते; ती खरंतर या क्षेत्रात किती वेगवेगळ्या प्रकारची करिअर होऊ शकतात, याचंच उदाहरण आहे. त्यामध्ये ज्याला तांत्रिक म्हणून संबोधल जातं, अशी छायांकान, संकलन, ध्वनी, कलर करेक्‍शन, स्पेशल इफेक्‍ट्‌स अशी उपक्षेत्र आहेत. आज या प्रत्येक उपक्षेत्रात शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत आणि या क्षेत्राचं एक वेगळेपण असंही आहे, की इथं आपण काम करता करता शिकू शकता. मी स्वत: तसंच केलेलं आहे. मी जवळपास सात वर्षं सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. ते काम हे माझं या क्षेत्रातलं शिक्षणच म्हणता येईल.

चित्रपट क्षेत्रातल्या या विविध अंगांचं शिक्षण देणाऱ्या सरकारी, तसेच खासगी संस्था आहेत. इथे दोन ते तीन वर्षांचे कोर्सेस असतात. पूर्वी अशा वेगळ्या क्षेत्रांत मुलाला घालायचं म्हणजे पालकांना त्याच्या करिअरची शाश्वती वाटत नसे. म्हणूनच अशोक सराफ किंवा प्रशांत दामलेंसारख्या श्रेष्ठ अभिनेत्यांनीदेखील त्यांच्या अभिनय क्षेत्रातल्या सुरवातीच्या काळात बॅंकेत नोकरी करीत नाटकाचे प्रयोग केल्याचा इतिहास आहे. पण, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. त्याकाळी केवळ दूरदर्शन हा एकच टीव्ही चॅनल होता, पण आता भारतात जास्त प्रमाणात अधिकृत टीव्ही चॅनल्स आहेत. दर शुक्रवारी प्रदर्शित होणा-या हिंदी आणि मराठी चित्रपटांची संख्याही वाढतेच आहे. तेव्हा पूर्वीसारखं या क्षेत्राला आता बेभरवश्‍याचं म्हणता येणार नाही. इथे चित्रपट किंवा टीव्ही सिरीयल्सची निर्मिती करणाऱ्या प्रॉडक्‍शन हाउसेसमध्ये रीतसर नोकरीदेखील करता येते.  

हे Audio-Visual माध्यम केवळ चित्रपटापुरतेच मर्यादित आहे, असे नाही. या क्षेत्रासोबत टेलिव्हिजन क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, कॉरपोरेट फिल्मसचं क्षेत्र, तसेच आता नव्याने उदयास येत असणारं डिजिटल क्षेत्र या प्रत्येकात करिअर होऊ शकतं. यातल्या कॉर्पोरेट फिल्मस आणि डिजिटल या दोन क्षेत्रांविषयी थोडी माहिती घेऊया. कॉर्पोरेट फिल्मस या क्षेत्रात अगदी मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते मध्यम किंवा अल्प उत्पन्न असणाऱ्या कंपन्या या प्रसिद्धीसाठी त्यांच्या कंपनीची संपूर्ण माहिती देणारा माहितीपट तयार करून घेतात. जो माहितीपट ते विविध प्रदर्शनात दाखवतात तसंच त्यांच्या वेबसाईटवरदेखील तो उपलब्ध असतो. याच क्षेत्राशी जुळलेलं एक करिअर म्हणजे कंटेण्ड रायटिंग. कंपन्यांच्या वेबसाइट, त्यांची ब्रोशर्स किंवा त्यांचं माहिती देणारं जे काही माध्यम असेल त्यातलं लिखाण. 

डिजिटल माध्यमाचा अवाका अजून कुणाच्याच लक्षात आलेला नाही. दिवसेंदिवस तो वाढतच चाललाय. या क्षेत्रात सध्या ब्रॅण्ड फिल्म ही एक जाहिरातींची नवी वाट खुली झालीये. या ब्रॅण्ड फिल्मसमध्ये जुन्या परंपरागत विक्रीविषयीच्या जाहिराती नसून एखादी चांगली कथा सांगून ती योग्यरीतीने त्या ब्रॅण्डशी जोडलेली असते. सध्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डपासून अगदी लोकल ब्रॅण्डसपर्यंत सर्व जण या अशा फिल्सचा उपयोग करतात. 

डिजिटल क्षेत्रातलं आणखी एक करिअर म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. आज आपल्या प्रत्येकाचंच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साइटवर अकाउंट असतं. आपल्याप्रमाणे कित्येक कंपन्या आणि व्यावसायिक या सोशल मीडिया साइटचा वापर जनसंपर्क आणि प्रसिद्धीसाठी करतात. या कंपन्यांचं तसंच प्रसिद्ध कलाकारांचं सोशल मीडिया अकाउंट हाताळणं हेसुद्धा एक करिअर आहे. हे क्षेत्र आव्हानात्मक आहे, कारण इथे दररोज नव्या युक्‍त्या लढवून आपल्या क्‍लायंटला त्याच्या ग्राहकांच्या नजरेत ठेवावं लागतं. या क्षेत्रातही लेखक, डिझायनर्स, कन्सेपच्युलायझर्स अशा विविध जबाबदाऱ्या असतात. मी स्वत: वरती उल्लेख केलेल्या बऱ्याचश्‍या क्षेत्रात काम केलंय. मी अग्निहोत्रसारख्या टीव्ही सिरीयलचे संवाद लिहिले आहेत. तसेच सुझलॉन या पवनचक्‍क्‍या बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सीएसआर डिपार्टमेंटमध्ये तीन वर्षं काम करून त्यांच्या भारतातल्या विविध राज्यात चालणाऱ्या सामाजिक कामाबद्दल दोनशेच्यावर माहितीपट बनवले आहेत. मी सेतू या जाहिरात एजन्सीमध्ये मराठी कॉपी रायटर म्हणून काम केलं आहे. सध्या मी काही सोशल मीडिया मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी कन्सल्टंट म्हणून काम करतो. तेव्हा सांगण्याचा मुद्दा हा की Audio-Visual ध्यमात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आसमंत खुला आहे आणि एखाद्या अवकाशाप्रमाणे इथं नवनवीन संधी निर्माण होत आहेत. 

जर आपल्याला किंवा आपल्या जवळच्या कुणालाही या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर आपण या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊ शकता, तसेच रीतसर शिक्षण घेऊन या क्षेत्रात उतरू शकता. एक गोष्ट नक्की आजचा काळ असा आहे की ही वेगळी वाट निवडायला घाबरू नका. या वाटेवर असंख्य सोबती तुम्हाला मिळतील आणि आपण उत्तम करिअर घडवू शकाल.         

संबंधित बातम्या