अभियांत्रिकीचा चढता आलेख 

प्रा. विजय नवले, करिअर मार्गदर्शक, पुणे
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
दहावी आणि बारावीनंतरच्या शैक्षणिक प्रवासाचा विचार करताना, तसेच करिअरची अचूक निवड करताना विविध कार्यक्षेत्रांचा आढावा घेता येतो. त्यातील बहुतांशी अनेक करिअर्स त्या-त्या ठिकाणी उत्तमच आहेत. खरं दर स्कोप हा एखाद्या कार्यक्षेत्रावर मुळी अवलंबून नसतो, तर एखाद्या कार्यक्षेत्रातील आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. त्या अर्थांनी सर्वच करिअर मार्ग उत्तमच असतात. त्यापैकी एक आहे अभियांत्रिकी क्षेत्र. विज्ञान तंत्रज्ञानाचा आत्मा असलेले हे क्षेत्र जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारे आणि दिवसेंदिवस प्रगतीच्या चढत्या टप्प्यांवर दिसत आहे.

शिक्षणव्यवस्थेची उपलब्धी 
बऱ्याच करिअर्समध्ये एक समस्या असते, ती म्हणजे प्रशिक्षणाची आणि शैक्षणिक सुविधांची. मात्र, अभियांत्रिकी करिअरसाठीच्या शिक्षणव्यवस्थेची. उपलब्धी सध्या इतकी प्रचंड आहे, की भौगोलिकदृष्ट्या भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वच दूरपर्यंतच्या ठिकाणी शासकीय, तसेच शासकीय मान्यतांद्वारे चालणाऱ्या विद्यापीठ संरचनेतून प्रमाणित केलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. गुणवत्तेच्या वरिष्ठ निकषांवर तावून-सुलाखून निघालेल्या विद्यार्थ्यांसाठी आय.आय.टी., एन.आय.टी., शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये विविध भागांमध्ये उपलब्ध आहेत. शासनमान्य हजारो अभियांत्रिकी महाविद्यालये जिल्हा, तालुका आणि आता तर त्याही अंतर्गत भागांमध्ये उपलब्ध आहेत.

तंत्रज्ञानातील जगाची आणि भारताची प्रगती 
कोणत्याही करिअरचा निर्णय घेताना हेदेखील पाहिले जाते, की त्या क्षेत्रात वाढीचा दर काय आहे. तंत्रज्ञानाचे आजचे प्रगतीचे गुणांकन सर्वसामान्य माणसालाही जाणवण्याइतके वेगवान आहे. मोबाईल, संगणक, दूरसंचार, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, वाहतूक, वैद्यकीय उपचारांमधील तंत्रप्रणाली, इंटरनेट इ. अनेक तंत्रज्ञानांचा वायूवेगाने झालेला विकास जनमाणसांपर्यंत अनुभवता आला आहे. कालचे तंत्रज्ञान उद्या बदललेल्या स्वरूपात पुढे येणार आहे, हे सहजपणे लक्षात येत आहे. जगामध्ये घडणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीला भारतातही तसाच प्रतिसाद मिळत आहे. मानवी जीवन सहज, आनंददायी, कष्टविरहित करण्याचा तंत्रज्ञानाचा हेतू आगामी काळात अभियांत्रिकी क्षेत्राला सुगीचेच दिवस दाखवितो आहे. ही निश्‍चितच करिअर निवडीचेप्रक्रियेतील अभियांत्रिकी विषयीची विश्‍वासाची बाब आहे.

नोकरीच्या संधी 
उत्तमपणे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यास प्रचंड संधी देशात आणि जगभरात उपलब्ध आहेत. यापूर्वी कधीही अशा विस्तारणाऱ्या संधी कोणत्याही कार्यक्षेत्राला नव्हत्या. संगणक, आयटीमध्ये तर जागतिक बाजारपेठेत सहजपणे समाविष्ट होण्याच्या संधी अगदी कॅम्पस प्लेसमेंटमधूनच मिळू शकतात. अर्थात, तशी स्पर्धात्मकता आणि उत्तमता अभ्यासक्रमातून तयार व्हायला हवी. खूप मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी सर्वांना मिळतीलच असे नाही. परंतु अन्य कोणत्याही क्षेत्रात नसतील एवढ्या संधी तंत्रज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात आहेत. अर्थात काही काळ, सुरवातीचा विशेषत्त्वाने, संघर्षाचा असू शकेल. पुढे उत्तम काम केल्यास पगाराचे आकडे आणि कामाची संधी हे चांगलेच असते.
वाढत जाणाऱ्या आस्थापना, अंतर्गत भागांपर्यंत पोहोचलेले तंत्रज्ञान, विविध विकासाचे उपक्रम, आऊटसोर्सिंगचे परिणाम, जागतिक बाजारपेठेशी थेटपणे जोडलेली भारताची उद्योगव्यवस्था यामुळेही नोकरीबद्दलची शाश्‍वती अधोरेखित होते. अर्थात रोबोटिक्‍स, ऑटोमेशन, आधुनिक तंत्रज्ञानांमुळे नोकऱ्यांचे प्रकार बदलत चालले आहेत. सर्वांनाच साहेब होता येणार नाही आणि यशाच्या शिखरावर पोहोचता येणार नाह,ह्हिा नियम इथेही लागू आहे. तंत्रज्ञानाशी अनभिज्ञ असलेल्या, निरुत्साही, कौशल्ये नसलेला, मेहनतीची तयारी नसलेला अभियंता यशाची कमान चढेल असे वाटत नाही.

संशोधन क्षेत्राचा आवाका 
अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये संशोधनाचे काम अत्यंत शीघ्र गतीने वेगवान चालू आहे. जागतिक स्तरावर, तसेच भारतातही हा स्कोप चांगलाच वाढलेला दिसतो. शासकीय, विभागांतर्गत कामात, कंपनीच्या आर अँड डी विभागाद्वारे, वैयक्तिक स्तरावर संशोधनाचे काम करता येते. पेटंट, कॉपी राईट इ. द्वारे उत्पन्नाची हमी आणि कर्तृत्वाची सुरक्षितता असल्याने कुशाग्र बुद्धिमत्तेच्या अभियंत्यांना संशोधनासाठी जगभर मागणी कायमस्वरूपी असणार आहे.

उद्योजकता 
अभियांत्रिकी शिक्षणानंतर काही वर्षांच्या अनुभवाने तयार झालेला अभियंता नोकरी सोडून स्वतःचा तांत्रिकी क्षेत्रातील व्यवसाय सुरू करू शकतो, हे तर आता सिद्ध झाले आहे. अगदी मध्यमवर्गीय किंवा त्याहून सर्वसामान्य कुटुंबातील नव्या पिढीला कर्तृत्व दाखविण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग अभियांत्रिकी शिक्षणानंतर उपलब्ध असतो, हे आता समाजातही पोहोचायला लागले आहे, त्यादृष्टीने पोषक वातावरण सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत निर्माण झाले आहे. कामाचे विकेंद्रीकरण, आऊटसोर्सिंग, स्पेशलायझेशन यांमुळे मोठ्या आस्थापनांकडून बरीच कामे छोट्या व्यावसायिकांना देण्यात येतात. इथेच उद्योजकतेची संधी विस्तारताना दिसत आहे. त्यातच संगणकप्रणाली, सेवाक्षेत्र यांमधील कामांच्या आणि सेवांच्या निर्मितीसाठी अभियांत्रिकीच्या ज्ञानाचा वापर करता येतो. इथेही काम दिवसेंदिवस वाढत आहे.

भविष्यातील प्रवाह
संगणक, इंटरनेट यांच्याच माध्यमातून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. इथूनपुढचा काळ आर्टिफिशियल, इंटिलिजन्स, मशिनलर्निंग, रोबोटिक्‍स, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज इ. नव्या प्रणालींचा असेल. तसे बदल सध्या जाणवू लागले आहेत. प्रत्येकच ठिकाणी अजून नावीन्य, अजून सुविधा, अजून अचूकपणा, अजून सुरक्षितता, असे प्रवाही मुद्दे येत आहेत. मनुष्याचा हस्तक्षेप करणारे तंत्र विकसित होत आहे. यातून कदाचित हातांनी काम करणाऱ्यांच्या नोकऱ्यांची संख्या घटेल, पण तंत्रज्ञान विकसित करणारे मात्र प्रचंड मोठ्या संख्येने अपेक्षित राहतील.

शासकीय संधी
अभियांत्रिकीनंतर शासकीय संधी या अन्य संधींपेक्षा कमी आहेत. परंतु ज्या आहेत, त्या उत्तम आहेत. अर्थात, इथे मोठी स्पर्धा आहे. आय. ई. एस. सारखी अभियांत्रिकी सेवा, रेल्वे, टेलिकॉम, दळणवळण, संशोधन, संरक्षण दल इ. मध्ये कमी संख्येत, परंतु सन्मानाच्या संधी निश्‍चित आहेत.
थोडक्‍यात, अभियांत्रिकी क्षेत्रामधून नोकरी, उच्चशिक्षणाच्या संधी, व्यवसाय, संशोधन आदींच्या संधी देशात आणि देशाबाहेर उपलब्ध आहेत. शैक्षणिक सुविधा मुबलक आहेत. व्यवस्थापन आणि यंत्रणा सज्ज आहेत. अभ्यासक्रम फार क्‍लिष्ट नाही (मेहनत घेतल्यास) आणि भविष्यकाळातील संधींची शाश्‍वतीदेखील आहे. गेल्या काही वर्षांपासून खूप संख्येनी असलेली महाविद्यालये, प्रॅक्‍टिकल शिक्षणाचा दर्जा, नोकऱ्यांची अनुपलब्धता, सहज मिळणारा प्रवेश, रिकाम्या जागा यांमुळे अभियांत्रिकी शिक्षणाची व्यवस्था काहीअंशी चेष्टेचा किंवा नकारात्मकतेचा विषय ठरली असली, तरी अन्य करिअर मार्गांचा विचार करता, अनेक यशस्वी करिअर्सपैकी अभियांत्रिकी हे एक करिअर आहे, यात वादच नाही.  

संबंधित बातम्या