करिअरची धाडसी वाट 

विवेक वेलणकर
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
करिअरच्या वेगवेगळ्या वाटा पडताळत असताना देशसेवा आणि करिअर, असा सुवर्णमध्य लष्करी सेवेच्या माध्यमातून शक्‍य आहे; पण त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा व त्यासाठी लागणारी पात्रता याची योग्य माहिती असणे आवश्‍यक असते. म्हणूनच याविषयी सविस्तर माहिती.

संरक्षण दलांमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पहिली संधी उपलब्ध होते. ज्यामध्ये मुलांना AFMC या वैद्यकीय महाविद्यालयात तसेच पुण्यातील CME या आर्मी इंजिनिअरिंग कॉलेजात व केरळमधील नेव्हल इंजिनिअरिंग कॉलेजात त्याचप्रमाणे NDA ध्ये जाता येते; तर मुलींना मात्र फक्त AFMC या वैद्यकीय महाविद्यालयातच संधी आहे.
NDA किंवा CME किंवा नेव्हल इंजिनिअरिंग हे पर्याय मुलींना बारावीनंतर उपलब्ध नाहीत. संरक्षण दलात करिअर करण्याचा पुढील मार्ग मुला-मुलींना पदवीनंतर उपलब्ध होतो. एअरफोर्स व नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी बारावीपर्यंत गणित व फिजिक्‍स विषय असणे गरजेचे आहे. मात्र, भूदलात कोणत्याही शाखेची पदवी चालते. संरक्षण दलात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी NCC ध्ये जाणे फायद्याचे ठरते. NCC चे ‘C’ सर्टिफिकेशन किमान ‘B’ ग्रेडमध्ये पदवी परीक्षेपर्यंत उत्तीर्ण झाल्यास अशा मुलामुलींकरता सैन्यदलांमध्ये विशेष भरती योजना असते. ज्यामध्ये लेखी परीक्षा न घेता फक्त SSB Interview घेऊन निवड होते. पदवीनंतर UPSC त घेतल्या जाणाऱ्या कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेला मुलामुलींना बसता येते. ज्यामधून निवडलेल्या विद्यार्थ्यांचा SSB Interview घेऊन अंतिम निवड केली जाते. या परीक्षेचा अभ्यासासाठी इंग्रजी, अंकगणित व सामान्यज्ञान हे तीन विषय असल्याने त्याचा अभ्यास व सराव खूप आधीपासून करावा.

एनडीएमधील करिअर
पुण्याजवळ खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आहे. येथे बारावीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी एनडीएसाठी तीनशे (आर्मी - एकशे पंच्याणव, नेव्ही - एकोणचाळीस व एअर फोर्स - सहासष्ट) तर नेव्हल ॲकेडमीच्या एक्‍झिक्‍युटिव्ह ब्रॅंचसाठी - पस्तीस विद्यार्थ्यांची संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. अर्ज करताना ज्या विद्यार्थ्यांचे वय १५ १/४ ते १८ १/४ वर्षे या दरम्यान असेल, अशाच विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. दरवर्षी मार्च व ऑक्‍टोबर महिन्यात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये यासंबंधीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होते (upsc.gov.in) या संकेतस्थळावरसुद्धा ही जाहिरात उपलब्ध असते) या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा व अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षाकेंद्रे वगैरे सर्व सविस्तर माहिती असते. देशपातळीवर लेखी परीक्षा ऑगस्ट व एप्रिल महिन्यात होते. परीक्षा ऑब्जेक्‍टिव्ह स्वरूपाची असते, ज्यामध्ये अडीच तासांचे दोन पेपर्स असतात. पहिला पेपर गणिताचा तीनशे मार्कांचा असतो, तर दुसरा पेपर जनरल ॲबिलिटी टेस्ट असतो. ज्यामध्ये सहाशे गुणांसाठी इंग्रजी, इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्‍न असतात. लेखी परीक्षा मुंबई व नागपूर या दोन ठिकाणी घेण्यात येते.
परीक्षेनंतर साधारणपणे तीन महिन्यांनी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होतो. तो upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येतो. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांत एसएसबी इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाते, यातून यशस्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर होते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (BA/ BSC) पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. एनडीएमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमही लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर त्यांच्या क्षेत्रामध्ये (आर्मी/ नेव्ही/ एअरफोर्स) त्यांना पुढील प्रशिक्षण देऊन भारतीय संरक्षण दलांच्या सेवेमध्ये अधिकारी म्हणून दाखल करून घेण्यात येते.

एनडीएसाठी काही महत्त्वाच्या टीप्स 
    एनडीएमध्ये फक्त सायन्स साइडच्या मुलांनाच प्रवेश घेता येतो असे नाही तर कॉमर्स/ आर्टस्‌चे विद्यार्थ्यीही प्रयत्न करू शकतात. मात्र, यासाठी अकरावी/ बारावीला गणित विषय घेणे फायद्याचे ठरते. मात्र, या विद्यार्थ्यांना फक्त आर्मीमध्ये करिअर करता येते. एअरफोर्स व नेव्हीमध्ये नाही.
    एनडीएमध्ये प्रवेशाच्या जास्तीत जास्त संधी घ्यायच्या असतील तर पहिल्यांदा परीक्षा अर्ज अकरावी संपतानाच (मार्च/ एप्रिल) मध्ये भरणे आवश्‍यक आहे. दुसऱ्यांदा बारावीच्या वर्षी ऑक्‍टोबर/ नोव्हेंबरमध्ये अर्ज भरणे गरजेचे आहे, तर तिसऱ्यांदा बारावी संपता संपता मार्च/ एप्रिलमध्ये अर्ज भरता येईल.

SPI (औरंगाबाद) 
एनडीएच्या लेखी परीक्षा आणि एसएसबी इंटरव्ह्यू यासाठी तयार करून घेणारी ही संस्था औरंगाबाद येथे आहे. १० वीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षेद्वारे या संस्थेमध्ये ११ वी सायन्सच्या कोर्सला प्रवेश मिळतो. अधिक माहितीसाठी www.spiaurangabad.com या वेबसाइटला भेट द्या.   

संबंधित बातम्या