पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधी 

विवेक वेलणकर
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील करिअर म्हणजे सामान्यतः विद्यार्थी आणि पालकांसमोर वैद्यकशास्त्र, दंतवैद्यकशास्त्र, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक यांसारखे पर्याय येतात. सामान्य माणसाच्या आवाक्‍याबाहेर जात चाललेला वैद्यकीय शिक्षणाचा खर्च पाहता एका अत्यंत उत्तम आणि अल्प खर्चिक अशा पशुवैद्यक शाखेची माहिती घेऊयात.

पशुवैद्यकशास्त्रातील पदवीधरांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. केंद्र व राज्य सरकारची खाती, डेअरी फार्म्स, पोल्ट्री, औषधनिर्माण कारखाने, कत्तलखाने इकतेच नव्हे तर बॅंका, विमा कंपन्या, संरक्षण दले यांमध्येसुद्धा नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. याशिवाय परदेशात नोकरीच्या संधी तसेच अगदी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय स्वतःचा दवाखाना किंवा सल्ला सेवा केंद्र सुरू करणेही शक्‍य आहे.

बारावीनंतर पाच वर्षांचा पदवी कोर्स आहे; त्यातील साडेचार वर्षे शिक्षणक्रम आणि सहा महिने इंटर्नशिप असते. हा पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या अनेक शासकीय आणि खासगी संस्था राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आहेत.

महाराष्ट्रातील विविध शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी बारावीनंतर NEET देणे आवश्‍यक आहे. या परीक्षेतील गुणांवरच प्रवेश मिळतो. मात्र ही प्रवेश-प्रक्रिया वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेशी निगडीत नसते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे (शिरवळ), उदगीर, परभणी आणि नागपूर अशा पाच शासकीय महाविद्यालयांतील प्रवेश-प्रक्रिया एकत्र राबविली जाते. यासाठीची सविस्तर जाहिरात NEET निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते. सुमारे पावणेतीनशे जागांसाठी या पाच महाविद्यालयांत प्रवेश दिले जातात. सत्तर टक्के प्रवेश विभागवार तर तीस टक्के प्रवेश राज्यस्तरीय खुल्या पद्धतीने होतात. उदाहरणार्थ पश्‍चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिरवळच्या महाविद्यालयातील सत्तर टक्के जागा राखीव असतात. त्या जागांसाठी NEET च्या मार्कांप्रमाणे गुणवत्ता यादी लावली जाते. उरलेल्या तीस टक्के जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी अर्ज करू शकतात. यासंबंधी अधिक माहिती www.mafsu.in या संकेतस्थळावर उपलब्ध होते. पशुवैद्यकीय पदवीनंतर अठरा विषयांत पोस्टग्रॅज्युएशन करण्याची सोय मुंबई, नागपूर, परभणी व अकोला या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईचे महाविद्यालय १८८६ मध्ये स्थापन झाले असून, आशियातील सर्वांत जुने पशुवैद्यकीय कॉलेज म्हणून ते ओळखले जाते. या कॉलेजला स्वतःचे हॉस्पिटल संलग्न आहे. मुंबईच्या या कॉलेजमध्ये पीएच.डी. करण्याचीसुद्धा सोय आहे. भारतात आजमितीला असलेले पशुधन लक्षात घेता, पशुवैद्यक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे, यात शंकाच नाही.  

पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका
महाराष्ट्रातील ९७ संस्थांमध्ये बारावीनंतर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका कोर्स उपलब्ध आहे. ज्याचे प्रवेश दहावीच्या मार्कांवर दिले जातात. यासंबंधीची अधिक माहिती www.mafsu.in या संकेतस्थळावर उपलब्ध होते.

संबंधित बातम्या