दहावीनंतरचा प्राधान्यक्रम 

विवेक वेलणकर
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

दहावीची परीक्षा झाली आणि रिझल्ट जवळ येऊ लागला, की पालक व विद्यार्थी दोघांपुढेही आता पुढे काय, असा प्रश्‍न उभा राहतो. अनेकदा हे निर्णय दहावीला किती गुण मिळतात, यावर घेतले जातात. आजही पंचाहत्तर टक्‍क्‍यांच्या वर गुण मिळाले, की सायन्स शाखा, साठ-पंचाहत्तर टक्‍क्‍यांदरम्यान गुण मिळाले की कॉमर्स शाखा, त्यापेक्षा कमी गुण मिळाले, की कला शाखा, होम सायन्स, आयटीआय अशा प्रकारे शाखा निवड केली जाते. ही अशी मार्कांच्या आधारे केलेली शाखानिवड चुकीची ठरू शकते. 
दहावीला मिळणारे गुण अनेकदा फसवे असू शकतात. बऱ्याचदा विषय न समजताही केलेली घोकंपट्टी, प्रश्‍नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्याची अभ्यासपद्धती यामुळे चांगले गुण मिळू शकतात. आणि मग वर उल्लेख केल्याप्रमाणे ठोकताळ्यावर आधारित शाखानिवड केली असता, ती चुकीची ठरू शकते. केवळ ऐंशी टक्के मार्क मिळाले आहेत म्हणून शास्त्र शाखेकडे प्रवेश घेणे योग्य नाही; पण अनेकदा इतके चांगले मार्क मिळालेत मग शास्त्र शाखेला का जात नाही, असे दडपण पालक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी-पाजारी यांच्याकडून आणले जाते आणि भावनेच्या भरात निर्णय घेतला जातो. मात्र, अनेकदा दहावीपर्यंतच पाया पक्का नसल्याने, विषयाचे परिपूर्ण आकलन न झाल्याने केवळ चांगले मार्क मिळाले म्हणून विषय व शाखा निवडली तर पुढे अकरावी/ बारावी जड जाऊ शकते. गेल्या वर्षीपासून अकरावी/ बारावीचे सिलॅबस खूप वाढले आहेत, त्यामुळे विषयांचा पाया दहावीतच पक्का असणे अत्यावश्‍यक झाले आहे. 
शास्त्र शाखेकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्‍स व केमिस्ट्री या विषयांच्या संकल्पनांचे आकलन दहावीपर्यंत झालेले नसेल आणि घोकंपट्टीच्या जोरावर मार्क मिळवले असतील, तर अकरावीला हे विषय जड गेल्याने शेवटी बारावीला शाखाबदल करण्याचा प्रसंग आलेल्या अनेक केसेस दरवर्षी माझ्याकडे येतात. मिळालेले मार्क, विषयांचे परिपूर्ण आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःला मनातून नक्की माहिती असते, की दहावीपर्यंत आपल्याला कुठले विषय आवडले/ समजले/ झेपले आणि कुठले विषय आवडले नाही/ समजले नाहीत/ झेपले नाहीत. कोणत्या विषयात न समजता वा न आवडता रेटून पाठांतराच्या जोरावर मार्क मिळवले आहेत. फक्त ही गोष्ट उघड बोलून दाखवण्याचे धाडस ते करू शकत नाहीत आणि त्या विषयांत उत्तम मार्क मिळाल्यावर तर नाहीच नाही. त्यामुळे शाखा निवड करण्यातले पहिले सूत्र म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रामाणिक आत्मपरीक्षण करून आपल्याला कोणते विषय आवडतात/ झेपतात/ समजतात याचे व त्याचबरोबरीने कोणते विषय आवडत नाहीत/ झेपत नाहीत/ समजत नाहीत याचा अभ्यास करणे व पालकांबरोबर त्याची खुली चर्चा करणे आवश्‍यक आहे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना यासाठी प्रोत्साहन देणे व मुलांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या निर्णयप्रक्रियेत त्यांना मदत करणे व त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे. सायन्स शाखेमधूनच फक्त करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होतात, या समाजापोटी सायन्स शाखा निवडीकडे कल असतो; परंतु करिअरचे असे असंख्य पर्याय आहेत, की ज्यामध्ये सायन्स/ कॉमर्स/ आर्टस्‌/ होमसायन्स/ एम.सी.व्ही.सी. अशा कोणत्याही शाखेची निवड केली तरी चालू शकते. फाइन आर्टस्‌, फॅशन/ इंटेरीअर डिझाइन, लॉ, हॉटेल मॅनेटमेंट, बीबीए, बीसीएस, बी.बी.एम., एमबीए, डिफेन्स, जर्नालिझम, स्पर्धा परीक्षा, बॅंकिंग-विमा, ट्रॅव्हल/ टुरिझम, सेल्स/ मार्केटिंग, हार्डवेअर/ नेटवर्किंग, ॲनिमेशन, कॉल सेंटर/ बीपीओ/ केपीओ अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी दहावीनंतर कोणतीही शाखा निवडली तरी चालते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

ॲप्टिट्यूड टेस्ट 
करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतील असे काही मानसशास्त्रीय आणि व्यक्तिमत्त्व जडणघडणविषयक आलेख काढून देणाऱ्या चाचण्या आज उपलब्ध झाल्या आहेत.
काही नावाजलेल्या संस्थांनी या चाचण्या संशोधनाअंती तयार केल्या आहेत. या चाचण्यांमधून स्वाभाविक वैचारिक कल आणि क्षमता यांचे मोजमाप केले जाते. त्यातून कोणत्या क्षमता उत्तम विकसित आहेत, कोणत्या विकसित करणे शक्‍य आहे आणि कोणत्या अविकसित आहेत त्याचप्रमाणे मुलांच्या स्वाभाविक कलाविषयी ज्ञान मिळते.
यातून कोणते करिअर निवडले असता, क्षमतांचा सुयोग्य वापर होऊन जीवनात यशस्वी होण्याची शक्‍यता वाढेल, याचे मार्गदर्शन मिळते. आजकाल जवळ जवळ सर्वांनाच कॉम्प्युटरमध्ये करिअर करावयाचे असते; पण ज्यांची लॉजिकल रिझनिंग ॲबिलिटी आणि आकलनशक्ती या क्षमता उच्चदर्जाच्या आहेत, त्यांनाच या करिअरमध्ये जास्त वाव आहे. ज्यांच्याकडे उत्तम त्रिमिती ज्ञान आहे, त्यांना डिझायनिंगमध्ये करिअर करणे जास्त सुकर ठरेल, अशा प्रकारच्या मार्गदर्शक टिप्स या चाचण्यांमधून नक्कीच मिळू शकतात.  
 

संबंधित बातम्या