मर्चंट नेव्हीमधील संधी  

विवेक वेलणकर
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
आज या मर्चंट नेव्ही क्षेत्रात जगभरात पंधरा लाखांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे आणि या क्षेत्रात सुमारे सत्तर हजार भारतीय काम करतायत; पण आज फिलिपाइन्ससारख्या छोट्या देशाने या क्षेत्रातील मनुष्यबळाबाबत भारताला मागे टाकले आहे. मर्चंट नेव्हीसारख्या धाडसी करिअरबद्दल तरुणांना पुरेशी माहिती नसल्याने या क्षेत्राबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि त्यापोटी या क्षेत्रामध्ये संधीची मुबलकता असूनही युवा पिढी यापासून दूरच राहते.

जागतिक स्तरावर नव्वद टक्के व्यापार व वाहतूक सागरातून होते. कोळसा/खनिज तेलापासून अन्नधान्यापर्यंत आणि यंत्रसामग्रीपासून खनिजांपर्यंत सर्वच वस्तूंची आयात/निर्यात सागरी मार्गानेच होते. जागतिक अर्थव्यवस्थेला अबाधितपणे कार्यरत ठेवण्यासाठी जहाज वाहतूक वंगणाची भूमिका निभावत आहे. जहाजातून वाहतूक ही इतर कोणत्याही पर्यायांपेक्षा अत्यंत किफायतशीर व अत्यंत कमी प्रदूषण करणारी असल्याने या क्षेत्रात जगभरातच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.

आज या मर्चंट नेव्ही क्षेत्रात जगभरात पंधरा लाखांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. आणि या क्षेत्रात सुमारे सत्तर हजार भारतीय काम करतायत; पण आज फिलिपाइन्ससारख्या छोट्या देशाने या क्षेत्रातील मनुष्यबळाबाबत भारताला मागे टाकले आहे. मर्चंट नेव्हीसारख्या धाडसी करिअरबद्दल तरुणांना पुरेशी माहिती नसल्याने या क्षेत्राबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि त्यापोटी या क्षेत्रामध्ये संधीची मुबलकता असूनही युवा पिढी यापासून दूरच राहते.
मर्चंट नेव्हीमध्ये जहाज नियंत्रण, कार्गो हॅंडलिंग, अभियांत्रिकी, देखभाल अशा 
विविध खात्यांमध्ये जहाजांवर अधिकारी व खलाशी अशा दोन प्रकारांमध्ये करिअर 
करता येते. या दोन्ही करिअरविषयी माहिती घेऊयात. अधिकारी म्हणून मर्चंट नेव्हीमध्ये जाण्यासाठी उपलब्ध असणारे मार्ग प्रथम बघूयात. यामध्ये शासकीय व खासगी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेता येते.

शासकीय संस्थांमधील प्रशिक्षण
टी. एस. चाणक्‍य, नवी मुंबई 
या ठिकाणी बारावी (शास्त्र) नंतर तीन वर्षांचा नौशास्त्र विषयाचा पदवी कोर्स चालवला जातो. या पदवीनंतर एक वर्षाचे समुद्री प्रशिक्षण घ्यावे लागते. या शासकीय संस्थेत प्रवेशासाठी आयआयटी जेईईची परीक्षा देणे अनिवार्य आहे. या संस्थेमध्ये निवासी कोर्स असून, सर्व मिळून वर्षाला ऐंशी हजारांच्या आसपास खर्च येतो.

मेरी (कोलकता) 
या शासकीय संस्थेमध्ये चार वर्षांचा नेव्हल इंजिनिअरिंगचा निवासी कोर्स चालवला जातो. याचाही खर्च वर्षाला साधारण ऐंशी हजार रुपयांच्या आसपास आहे. या संस्थेतील प्रवेशही आयआयटीजेईई या प्रवेश परीक्षेतूनच होतो. अधिक माहितीसाठी www.merical.ac.in/ admissiob.html या संकेतस्थळाला भेट द्या.

मेरी (मुंबई) 
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळविलेल्या अभियंत्यांना मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेशासाठी या संस्थेत एक वर्षाचा कोर्स करता येतो. या कोर्सच्या प्रवेशाची जाहिरात नोव्हेंबर महिन्यात एम्प्लॉयमेंट न्यूज या साप्ताहिकात प्रसिद्ध होते व प्रवेश पूर्णपणे गुणवत्तेवर मिळतो. या कोर्ससाठी साधारण एख लाख रुपये खर्च येतो.

खासगी संस्थांमधील प्रशिक्षण
बारावी शास्त्र किमान ६०% गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नेव्हल इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण देणारी डायरेक्‍ट जनरल ऑफ शिपिंगची मान्यताप्राप्त काही खासगी महाविद्यालये आहेत. यामध्ये चार वर्षांचा इंजिनिअरिंग कोर्स चालवला जातो व या महाविद्यालयांच्या प्रवेशाच्या जाहिराती वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होतात. १२ वी नंतर खासगी महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना Indian Maritime University (I.M.U.) ची CET उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी www.imu.edu.in या संकेतस्थळावर भेट द्या.
यातील प्रमुख खासगी महाविद्यालयांची नावे व संकेतस्थळे पुढीलप्रमाणे ः
    तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट, तळेगाव.www.tolani.edu
    मॅनेट, एमआयटी, पुणे.
www.manetpune.com
या संस्थांमधील चार वर्षांचा खर्च आठ ते दहा लाखांच्या आसपास आहे.

खलाशी म्हणून मर्चंट नेव्हीतील संधी
दहावी पास विद्यार्थ्यांना खलाशी म्हणून मर्चंट नेव्हीमध्ये संधी मिळू शकते. यासाठी शासनमान्य सुमारे चाळीस प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये सहा महिन्यांचा कोर्स चालवला जातो. ज्यात विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक तसेच जहाजावरील नेव्हिगेशन, कार्गो हॅंडलिंग, मेंन्टेनन्स व दळणवळण याविषयी मूलभूत माहिती दिली जाते. त्यानंतर सहा ते नऊ महिन्यांचा जहाजावरील अनुभव घेऊन परीक्षा देऊन या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्हीत खलाशी म्हणून नोकरी मिळू शकते. खलाशांना करिअरमध्ये ऑफिसर लेव्हलपर्यंत जाता येऊ शकते. मात्र, त्यासाठी किमान तीन वर्षांचा अनुभव व परीक्षा देणे गरजेचे आहे. मात्र खलाशी या जॉब कॅटेगरीमध्ये फिलिपाइन्सने मोठे वर्चस्व मिळविले आहे.
मर्चंट नेव्हीमधील करिअर इतर करिअर्सपेक्षा खूपच वेगळे आहे. इथे भरपूर पैसा (अनेकदा टॅक्‍स फ्रीसुद्धा) व संपूर्ण जग बघण्याची संधी जशी मिळते तशीच घरापासून, कुटुंबीयांपासून महिनोन्‌ महिने दूर राहण्याची तयारी ठेवावी लागते.   

संबंधित बातम्या