‘महिलांना गृहीत धरले जाते...’

पूजा सामंत
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

गप्पा    

अभिनयाची कसलीही पार्श्‍वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय तमीळ कुटुंबात जन्म झालेली विद्या बालन गेली १६ वर्षे अभिनयाच्या क्षितिजावर ‘शेरनी’सारखी वावरतेय. नेपोटिझम आणि बॉलिवूड यांचे विशेष सख्य आहे असे चित्र कित्येक वर्षे दिसत असतानाही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणे  खचितच सोपे नव्हते. अशा या गुणी अभिनेत्रीबरोबर मारलेल्या गप्पा... 

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘शेरनी’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. तुमची प्रतिक्रिया काय?
विद्या बालन : ‘शेरनी’ प्रदर्शित झाल्यानंतर साधारण महिनाभरानंतर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कळेल अशी माझी कल्पना होती. प्रत्यक्षात मात्र त्याच दिवशी दुपारपर्यंत सोशल मीडियावर, माझ्या मॅनेजरकडे, ॲमेझॉन प्राईमकडे चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सर्व थरातील स्त्री-पुरुषांना चित्रपट आवडला. हा एक चाकोरीबाहेरचा विषय आहे. यामध्ये व्यावसायिक मूल्ये कमी असताना हा सिनेमा बघितला जाईल का, असे वाटत होते. पण माझी समजूत चुकीची होती. मला मिळालेल्या सगळ्याच प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. शर्मिला टागोर यांनीदेखील मला फोनवर त्यांना ‘शेरनी’ खूप भावल्याचे कळवले. माझ्यासाठी एका ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिक्रिया खूप प्रेरणादायी आहे.

विद्या बालनच्या व्यक्तिगत जीवनातील ‘शेरनी’ कोण?
विद्या बालन : You may find my answer very cliche! पण हेच सत्य आहे. माझी आजी, आई आणि माझी दीदी प्रिया या सगळ्या माझ्यासाठी शेरनी आहेत. त्या खरेपणाला खूप महत्त्व देतात. त्यांच्या बाण्याचा ठसा माझ्यावर पडणारच. कॉलेजमध्ये गेल्यावर मी जाहिराती करू लागले. मग दाक्षिणात्य चित्रपटांसाठी प्रयत्न करू लागले. ‘हम पांच’ या गाजलेल्या मालिकेत राधिका माथूर ही व्यक्तिरेखा केली. हा प्रवास अम्माच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. ‘विद्या, तू फार तर टीव्ही शो कर, पण आपल्याला फिल्मी दुनिया सर्वार्थाने झेपणारी नाही. आपली कुणाशीही ओळख नाहीय. कोण उभे करेल तुला...’ तिच्या मतावर ती ठाम होती. अभिनयाचे भूत माझ्या डोक्यातून उतरायला तयार नव्हते. त्या काळात तिने माझ्याशी अबोला धरला. पण अम्माच्या लक्षात आले, विद्या जिद्दी आहे. अभिनय क्षेत्रात गेल्याशिवाय राहणार नाही. मग मात्र अम्माने मला पूर्ण सहकार्य केले. माझे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून ती देव पाण्यात बुडवून बसली होती. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला `जिंक्स’ (अपशकुनी) ठरवले गेले आणि ४-५ चित्रपटांमधून काढून टाकले. माझ्यापेक्षा जास्त अश्रू अम्मा ढाळत होती. पण तिने माझ्यात कायम उमेदीची पणती तेवत ठेवली. ती म्हणायची, ‘विद्या, आज न उद्या उषःकाल झाल्याशिवाय राहणार नाही बघ!’ माझ्या अम्माकडूनच मला जिद्द, साहस, आशावाद, प्रेरणा हे गुण मिळाले. `मेरे लिये मेरी अम्मा मेरी शेरनी है!’ निराशेच्या अनेक प्रसंगातून माझ्या खचलेल्या मनाला उमेद देणारी माझी अम्मा माझ्यासाठी नेहमीच ‘शेरनी’ राहील.

तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः कधी ‘शेरनी’ झालात का? धाडसी निर्णय घेतलेत का?
विद्या बालन : कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच आपल्या आयुष्यात कधी तरी ‘शेरनी’ होतो, धीटपणे निर्णय घेतो, असे मला वाटते. मीही घेतला आहे. तो योग्य की अयोग्य याची कल्पना मला नव्हती. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला ‘इश्किया’ चित्रपटाची ऑफर आली. कथानक खूप बोल्ड, अगदी मध्यमवर्गीय संस्कृतीला न रुचणारे, न पटणारे होते. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी मला कथानक ऐकवले तेव्हा नसिरुद्दीन शाहसारख्या जाणत्या, ज्येष्ठ अभिनेत्याबरोबर चित्रपट करायला मिळतोय हा मोह होता. व्यक्तिरेखा खूप चाकोरीबाहेरची होती. मी हा चित्रपट करावा या निर्णयाप्रत आले, पण त्याच वेळी मला अनेक अनुभवी फिल्मी सेलेब्जचे सल्ले मिळाले, ‘इतक्यातच नसिरुद्दीन शाहसारख्या प्रौढ अभिनेत्याबरोबर फिल्म करणे तुझ्यासाठी रिस्क ठरेल. ‘प्रौढ नटांची अभिनेत्री’ असा शिक्का बसेल, तशाच भूमिका ऑफर होतील!...’ अनेक उपदेश.. अनेक सल्ले.. मी गोंधळून गेले. शेवटी हा बोल्ड चित्रपट करण्याचा निर्णय घेतला! माझ्या कारकिर्दीत एक नवा प्रवाह मीच सुरू केला. माझ्यासाठी ‘इश्किया’ चित्रपट करणे ही ‘शेरनी’ मोमेंट होती.

‘शेरनी’मधील विद्या व्हिन्सेंट या फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका करण्यासाठी तुम्ही काही विशेष होमवर्क केला होता का?
विद्या बालन : दिग्दर्शक अमित मसूरकर यांचे स्क्रिप्ट तयारच होते. नव्या दमाची लेखिका आस्था टिकू हिची कथा होती. व्यक्तिरेखेचा सविस्तर अभ्यास तयारच होता. जोपर्यंत व्यक्तिरेखेत विद्या बालन दिसत असते तोपर्यंत मला समाधान मिळत नाही. माझ्या बहुतेक चित्रपटांच्यावेळी स्वतःला विसरून नव्या व्यक्तिरेखेत ‘पर-काया प्रवेश’ करण्यासाठी मी नवे परफ्यूम वापरते. माझ्या नव्या अस्तित्वाचा हा जन्म असतो. असो. ‘शेरनी’मधील विद्या व्हिन्सेंट साकारण्यासाठी मी काही फॉरेस्ट ऑफिसरना जाऊन भेटले. त्यांच्या कामाची माहिती घेतली. प्रत्यक्ष जंगलात काम करताना त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, ते किती धोका पत्करतात, अशा अनेक मुद्द्यांवर मी त्यांच्याशी चर्चा केली. मला काही जंगलातील डॉक्युमेंटरी दिल्या गेल्या, त्याही मी पाहिल्या. प्रत्यक्ष शूटिंग सुरू होण्यापूर्वी मी जंगलाचा फेरफटका मारून आले. बहुतेकवेळा आपण शहरी लोकांनी खरेखुरे घनदाट जंगल पाहिलेलेच नसते.

विद्या बालन आणि विद्या व्हिन्सेंट यांच्यात काय साम्य?
विद्या बालन : काही बाबतीत मी विद्या व्हिन्सेंटसारखी आहे. मनाला न पटणाऱ्या खूप गोष्टी, भावना मीही बोलून दाखवू शकत नाही. जेव्हा मी व्यक्त होऊ शकत नाही, त्याक्षणी माझ्याही मनात विद्या व्हिन्सेंटप्रमाणे विचारांचा कोलाहल माजलेला असतो. विद्या व्हिन्सेंट या फॉरेस्ट ऑफिसरचा नॉन रिॲक्टिव्ह ॲप्रोच आहे, हे तिच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. विद्या बालन अभिनेत्री आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी आहे. माझे आणि विद्या व्हिन्सेंटचे विश्वच वेगळे आहे.
‘शेरनी’ पाहिल्यानंतर शेकडो मुलींचे मेसेज आले, ‘विद्या आप में (विद्या व्हिन्सेंट) हमने खुद को देखा, बहुत करीब से महसूस किया।’ याचाच अर्थ असा की दहापैकी पाच महिलांना, युवतींना या अनुभवातून जावे लागते. त्या जबाबदारीच्या पदावर जरी असल्या तरी त्यांची बाजू, त्यांचे मत त्यांचे वरिष्ठ पुरुष अधिकारी ऐकून घेत नाहीत, त्यांना डावलले जाते. त्यामुळे माझी भावना अशी आहे, की विद्या व्हिन्सेंट म्हणजे अनेक नोकरदार महिलांचे प्रातिनिधिक रूप! अनेक स्त्रिया या अनुभवातून गेल्या आहेत. कदाचित त्यांचे व्यवसाय वेगळे असतील, पण अनुभव मात्र इथून तिथून सारखेच. महिलांचा आवाज वरिष्ठांकडून दाबून टाकला जातो, त्यांना कमी लेखले जाते.

तुम्हाला कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अंडरएस्टिमेट केल्याचे जाणवलेय का? 
विद्या बालन : येस! मला असा अनेकदा अनुभव आलाय. सगळे अनुभव आता लक्षात नाहीत. पण एक अनुभव शेअर करेन. सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी’ चित्रपट केला तेव्हाचा किस्सा. मला आणि सुजॉयला अनेकांनी सल्ला दिला, त्यात वितरकही होते, ‘कहानी’ फिल्म कौन देखना चाहेगा? एक प्रेग्नन्ट महिला जो अपने खोये हुए पती के तलाश के लिए निकली है, कोई उसे परदे पर देखना नहीं चाहेगा।’ चित्रपटामध्ये अन्य काही एंटरटेनमेंट एलिमेंट्स टाका, जेणेकरून ‘कहानी’ कमर्शिअल होईल.
‘डर्टी पिक्चर’ इसलिये चली क्योंकी विद्या का किरदार सेक्सी था।’ याचाच अर्थ असा की महिलांना गृहीत धरले जाते. गर्भवती स्त्रीला पडद्यावर पाहणे यात मनोरंजन नाही! नायिकाप्रधान फिल्म्स बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत. हिरॉईन फिल्मचा हिरो होऊ शकत नाही. हिरो हाच बॉक्स ऑफिसचा राजा, तोच एक्का असेल, हीच मानसिकता अलीकडेपर्यंत दिसून आली. त्यामुळे नायिकाप्रधान चित्रपट येणे आणि तो सुपर हिट होणे ही एक जमेची बाजू वाटते मला. 

विद्या बालन म्हणजे आशयघन, वास्तविक भूमिका करणारी एक परिपूर्ण अभिनेत्री. तुमच्या चित्रपटांना यशही मिळाले. तुमच्या चित्रपटांमध्ये हिरोला फारसे महत्त्व नसते. अमीर, सलमान, शाहरुख या तीन खानांनी तुमच्याबरोबर अजून काम केले नाहीये. तुमची ही इमेज तुम्हाला फायदेशीर ठरतेय की नुकसानकारक?
विद्या बालन :  थँक्स फॉर ऑल द कॉम्प्लिमेंट्स. माझ्यासाठी माझ्या व्यक्तिरेखा सशक्त असणे हे अधिक महत्त्वाचे आहे. ‘मिशन मंगल’मध्ये मी अक्षय कुमारबरोबर काम केले आहे. अक्षय कुमार खान हिरोंपेक्षा कुठेही कमी नाही. मुळातच मी कुणाची कुणाशी बरोबरी करत नाही. याआधी ‘हे बेबी’, ‘भूल भूलय्या’मध्येदेखील आम्ही एकत्र काम केले आहे. माझ्याबरोबर कुठल्या हिरोला साइन करायचे हा प्रश्न निर्माते, दिग्दर्शकांचा असतो. माझ्यासाठी फक्त स्क्रिप्ट आणि व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे. माझी व्यक्तिरेखा आऊट ऑफ द बॉक्स असावी, त्यात वेगळेपण असावे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. 

तुमच्या अनेक व्यक्तिरेखांमधून तुम्ही स्विच ऑफ-स्विच ऑन कशा होता? 
विद्या बालन : मैंने पिछले १६-१७ सालों में २०० फिल्मे नहीं की। जे काही चित्रपट केले त्यातही एक चित्रपट पूर्ण झाला की दुसरा सुरू करण्यापूर्वी मी किमान दोन-तीन महिन्यांची सुटी घेते. हा वेळ मी माझ्या भाच्यांबरोबर म्हणजेच प्रियादीदीच्या जुळ्या मुलांबरोबर घालवते. लहान मुलांच्या सहवासात मी लहान होते. चिंता, तणाव, काळजी, मानसिक दडपण सगळे बाजूला ठेवते. कधी आम्ही कुटुंबीय आउटिंगला जातो. सिद्धार्थला (पती - सिद्धार्थ रॉय कपूर) वेळ असला की आम्ही दोघेही छान भटकंती करून येतो. एक मात्र आहे, या सुट्यांमध्ये मी माझ्या पुढील व्यक्तिरेखेचाही अभ्यास करते. माझे अनुभव, त्या ट्रांझिशनमधून बाहेर पडताना होणारी माझी तगमग हे सगळे मी कधी सिद्धार्थ, आदित्य (दीर) आणि माझ्या कुटुंबाबरोबर शेअर करत असते.

तुम्हाला डिप्रेशनला कधी तोंड द्यावे लागलेय का?
विद्या बालन : हो. मला वाटते हल्लीच्या काळात डिप्रेशनमधून अनेक जण जातात. पण डिप्रेशन ही अवस्था फार ताणली जाऊ नये. त्यासाठी जवळच्या व्यक्तींच्या सहवासात राहणे गरजेचे आहे.

मी डिप्रेस्ड असते तेव्हा कुटुंबाशी बोलते. पण आमच्या लहानपणापासून आम्हाला अम्माने प्रार्थना करण्यास शिकवले आहे. प्रार्थनेत खूप शक्ती असते. मनापासून केलेले ईश्वराचे नामस्मरण थेट त्याच्यापर्यंत जाते, हे संस्कार मी विसरले नाही. त्यामुळे दररोज प्रार्थना करणे हा माझ्या दिनचर्येचा भाग आहे. प्रार्थना, नामस्मरणाने ताणतणाव निश्चितच दूर होतो. मन शांत होते. १०-१२ वर्षांपूर्वी एका पाठोपाठ एक आलेल्या वावटळीने माझे मनःस्वास्थ्य मी घालवून बसले होते. सोशल मीडियावर मला ट्रोल केले जात होते. मला बदनाम करण्याची साजीश असावी असे वातावरण होते. काही रेडिओ जॉकीज् माझ्या ड्रेसिंग सेन्सबद्दल उघड उघड टीका करत. माझ्या वजनाचा तर मोठा इश्‍यू केला गेला. मी मनाने खचून गेले होते. त्याच काळात माझ्या अम्माने मला एका हिलरकडे नेले. निधू कपूरने माझा  प्रत्येक शब्द अन शब्द ऐकून घेतला. योग, प्राणायाम, प्रार्थना यांमुळे माझा ताण कमी होत गेला. स्त्रियांचे मन अधिक संवेदनशील असते. त्यांना विपरीत परिस्थितींचा अधिक त्रास होतो. ‘कहानी’, ‘कहानी २’, ‘बेगम जान’, ‘नो वन किल्ड जेसिका’ अशा अनेक चित्रपटांच्यावेळी शूटिंगनंतर मी आजारी पडू लागले. निधू कपूरने मला मानसिक बळ, उभारी दिली. 

‘शेरनी’ झाला.. आता नव्या चित्रपटाचे चित्रीकरण कधीपासून?
विद्या बालन : ‘तुम्हारी सुलु’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्या नव्या चित्रपटाची सुरुवात करतेय. 

संबंधित बातम्या