‘माझे चित्रपट...व्हिज्युअल ट्रिट’

पूजा सामंत 
सोमवार, 11 एप्रिल 2022

गप्पा    

विधू विनोद चोप्रांकडे दिग्दर्शनाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी ‘खामोशी - द म्युझिकल’ हा चित्रपट दिग्दर्शित करून अल्पावधीतच स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पुढे ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘गुजारिश’, ‘सावरिया’, ‘गोलियों की रास लीला रामलीला’, ‘बाजीराव-मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘मलाल’ आणि आता ‘गंगूबाई काठियावाडी’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी नायिकप्रधान चित्रपटांची एक परंपरा निर्माण केली. 

गंगूबाई काठियावाडीच्या जीवनावर चित्रपट करावा असे तुम्हाला का वाटले?
संजय लीला भन्साळी ः गंगूबाई काठियावाडी ही गुजरातची एक चुणचुणीत मुलगी. तिच्या प्रियकराने तिला फसवून मुंबईत आणले. तिची फसवणूक झाली, पुढे मग आयुष्यभर तिची परवडच झाली. मनावर झालेले असंख्य घाव झेलत अशा अनेक तरुणी आयुष्यभर इथे जगतात, मुलांनाही जन्म देतात. कधी कधी त्यांची पुढची पिढी दुर्दैवाने इथेच पिचते. पण गंगूबाईसारख्या साध्या, निरलस युवतीने राखेत वाढून फिनिक्स पक्ष्यासारखी कशी भरारी घेतली, याचा प्रवास मला खूप प्रेरणादायी वाटला. तिच्यासारख्या दुर्दैव वाटेला आलेल्या अनेकींची ती आवाज बनली. असे चित्र क्वचितच पाहण्यात येते. शरीर विक्री करणाऱ्या स्त्रियांना समाजात प्रतिष्ठा नसते, पण गंगूबाई थेट तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना भेटली होती. वंचित महिलांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत जावेत हा तिचा प्रयत्न धाडसी आणि आदर्श होता. कठीण आयुष्यही सोपे करत जगण्याची तिची हातोटी लोकांसमोर यावी हा उद्देश. तिच्या आयुष्याचा प्रवास भयंकर असूनही तो उत्सव असू शकतो, हे गंगूबाईने दाखवून दिले. गंगूबाई १९६०च्या दशकातली, पण तिचे विचार, तिच्या कृती मला खूप आजच्या काळातही सामायिक वाटतात. विस्मरणात गेलेली गंगूबाई तिच्यावर काढलेल्या सिनेमामुळे जगासमोर येईल असे वाटले आणि म्हणून मी गंगूबाईवर चित्रपट करावा असे ठरवले.

गंगूबाईच्या व्यक्तिरेखेसाठी आलिया भटची निवड करण्यामागे काही खास कारण? तिने आधी नकार दिला होता हे खरे का?
संजय लीला भन्साळी ः  हर फिल्म अपनी डेस्टिनी लेकर आती है। बनती तब है, जब बननी होती है, वरना हम इन्सान लाख कोशिशें कर लें, फ़िल्म नहीं बनती! मी तसा स्वप्नाळू दिग्दर्शक आहे. माझ्या प्रत्येक चित्रपटामधल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा माझ्या मनात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यांचे अस्तित्व माझ्या हृदयात खोलवर झिरपलेले असल्याने त्या व्यक्तिरेखांचा प्रवास मी चित्रपटाच्या माध्यमातून साकारत नाही, तोपर्यंत मी बेचैन असतो. माझ्या मनातली ही पात्रे सिनेमाच्या पडद्यावर त्यांच्या नियतीनुसार कधी वेळेवर जन्माला येतात, तर कधी उशिरा.. ‘रामलीला’ आणि ‘देवदास’ हे माझे चित्रपट माझ्या मनात खूप वर्षे होते. हे चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’च्या आधीच होणार होते, पण अनेक प्रयत्नांनंतरही तो योग जुळून आला नाही. २००२मध्ये ‘बाजीराव -मस्तानी’ काढायचाच हे ठरले होते, पण तो झाला २०१५मध्ये. जोपर्यंत मनातल्या सशक्त व्यक्तिरेखा ऑन स्क्रीन येत नाहीत, तोपर्यंत त्या माझ्या मनात डोके वर काढत राहतात. 

हुसेन झैदी यांचे ‘माफिया क्वीन्स..’ हे पुस्तक माझ्या वाचनात आल्यावर त्यातील गंगूबाई ही व्यक्तिरेखा माझ्या मनात पुरून दशांगुळे उरली. सिनेमा करावा असे ठरवले. ‘पद्मावत’नंतर २०१९मध्ये सलमान-आलिया भटच्या डेट मला सलग मिळाल्या. ‘इन्शाह अल्ला’ सिनेमा करण्यासाठी. मेहबूब स्टुडिओत भव्य सेट उभारला. आलियाचे कॉस्च्युम तयार झाले, तिच्या डान्स रीहर्सल सुरू झाल्या.. पण अशा अनेक अडचणी उद्‍भवल्या ज्यामुळे इतका प्रचंड खर्च करून उभारलेला हा लॅव्हिश सेट दुर्दैवाने तोडावा लागला. सलमान -आलियाच्या तारखा व्यर्थ गेल्या. तारखा मिळवणे सोपे नाही. आलियाचे माझ्यावर ऋण आहेत ही भावना होती. मी खूप नैराश्यात गेलो. या नैराश्य, संताप, क्रोधातून बाहेर यायला मला १५-२० दिवस लागले आणि एक दिवस माझ्या ऑफिसच्या रूममधून बाहेर येत माझ्या सहकाऱ्यांना मी म्हटले, ‘मनावरची मरगळ झटका. आपण आता आलियाला घेऊन ‘गंगूबाई’ करतोय! सगळेच चक्रावले. पण अवघ्या महिन्याभरात आम्ही आलियाला घेऊन ‘गंगूबाई’ सुरू केला. हो, गंगूबाई सिनेमातदेखील  अनंत अडचणी आल्या, सेट तोडावा लागला, काही न काही घडतच होतं. आलियाला कोरोना झाला, पुढे मला झाला. दोनदा लॉकडाउन झाले. शूटिंग थांबले, पुन्हा सुरू झाले. अनंत अडचणींना तोंड देत ‘गंगूबाई’ पूर्ण झाला. प्रेक्षकांना चित्रपट आवडलाय, याचेच समाधान आहे.

येस, आलियाला गंगूबाईचे कथानक ऐकवले, तेव्हा एका सेक्स वर्करची भूमिका ऐकून तिने नकार दिला होता. ‘मैं कन्व्हिन्सिंगली सेक्स वर्कर नहीं नजर आऊंगी, संजय सर!’ असे म्हणत ती निघूनही गेली. पण दोन-तीन दिवसांत आमची पुन्हा भेट झाली आणि गंगूबाईचे काम कसे उदात्त पातळीवर होते हे तिला स्पष्ट केल्यावर ती सहर्ष तयार झाली.

हुसेन झैदी यांचे मूळ कथानक आणि गंगूबाई सिनेमा यात सिनेमॅटिक लिबर्टी घेत काय बदल केलेत?
संजय लीला भन्साळी ः  मी या कथेवर चित्रपट करतोय हे ऐकून हुसेन झैदींना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, गंगूबाईइतकी ‘लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तिरेखा प्रेरणादायी तुम्हाला वाटली याचा आनंदच आहे. कथेत काही विशेष बदल केले नाहीत. गंगूबाईचा पती रमणिक याला मी सिनेमा करताना महत्त्व दिले नाही. गंगूबाईचे त्याच्याशी जणू नावापुरते लग्न झाले होते. गंगूबाईवर झालेले शारीरिक अत्याचार मी दाखवले नाहीत. गंगूबाईच्या कथेच्या अनुषंगाने ते समोर येतात. गंगूबाईची झालेली विटंबना दाखवत तिच्या आत्म्याला पुन्हा घायाळ करण्यात मला काहीच स्वारस्य नव्हते. 

तुमच्या अनेक चित्रपटांमधून अनेक ‘स्टार’ अभिनेत्री नजरेस पडल्या. तसेच तुमच्या चित्रपटांमधील स्त्री व्यक्तिरेखा नेहमी सशक्त असते. या दोन्हीमागे काय कारण?
संजय लीला भन्साळी ः माझ्या प्रत्येक कलाकृतीत त्यातील अभिनेत्री अगदी चपखल बसलेली तुम्हाला दिसेल. कुणीच मिस कास्ट वाटले नाही. मूळ बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये सलमान होता. पण त्याच्याऐवजी हीच भूमिका रणवीर सिंगने केली आणि या भूमिकेसाठी तो नावाजला गेला. मी कलाकार योग्य निवडतो, पण काही कारणांनी त्यांच्यासोबत चित्रपट करता आला नाही; तर त्यालाच नियती म्हणतात! रणवीर सिंगला मी ‘बाजीराव मस्तानी’साठी ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटादरम्यान साइन केले होते. ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ फ्लॉप झाला. पण ‘बाजीराव मस्तानी’ने रणवीरला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले! माझ्या सगळ्याच सिनेमांमध्ये स्त्री-व्यक्तिरेखा सशक्त असतात. याचे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे माझ्यावर माझी आईचा (लीलाबेन भन्साळी), तिच्या संस्कारांचा, मूल्यांचा मोठा प्रभाव आहे. माझी वडील बहीण बेला हिनेही मला घडवले. माझ्या मते मुलांना घडवण्यात जितके श्रेय आईचे असते तितके वडिलांचे नसते. समाजातील वाईट विचार, अपप्रवृत्ती अशा सगळ्यांपासून आईच आपल्या मुलाला वाचवते. त्याला घडवते. माझ्या बाबतीत हेच घडले. म्हणूनच मी आईला फार मानतो.

दुसरे असे पाहा, आपल्या देशात मेहबूब खान, के आसिफ, गुरू दत्त, बिमल रॉय, राज कपूर, सत्यजित रे, ऋत्विक घटक, विजय आनंद असे कोणतेही आघाडीचे दिग्दर्शक पाहा. त्यांच्या कलाकृती पाहा. त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा किती प्रेरणादायी होत्या. माझ्यावर अशा अनेक थोर मेकरचा पगडा पडला नसता तर नवल होते.

हल्ली रियल लोकेशनवर शूटिंग करण्याचा ट्रेंड आहे. तुम्ही मात्र भव्यदिव्य सेट उभारता. कामाठीपुऱ्यामध्ये प्रत्यक्ष न जाता, त्याचाही सेट उभा केलात. यामागे काय कारण? 
संजय लीला भन्साळी ः ‘गंगूबाई..’ ही पिरियड फिल्म आहे. कथेमध्ये १९६०च्या काळातील मुंबई आणि कामाठीपुरा आहे. १९६०मधली मुंबई आणि आता २०२२मधली मुंबई यात जमीन अस्मानाचा फरक झालाय हे तुम्ही जाणताच. रियल लोकेशनवर शूट करण्यासारख्या माझ्या कथा नसतात, मग तो ‘पद्मावत’ असो ‘बाजीराव मस्तानी’ असो किंवा आत्ताचा ‘गंगूबाई..’ असो. मी माझ्या प्रेक्षकांना एका मनोरंजन विश्वाची सफर घडवून आणतो. माझे चित्रपट व्हिज्युअल ट्रिट असतात. आय डोण्ट मेक डॉक्युमेंटरी फिल्म्स ऑर रियलिस्टिक सिनेमा. त्यामुळे रियल लोकेशनवर शूटिंग काय करणार? गंगूबाई किंवा त्याआधीच्या चित्रपटांतल्या काशीबाई, महाराणी पद्मावती या अस्तित्वात होत्याच, पण तो काळ आता राहिला नाही. तरीही राजस्थानमध्ये काही ठिकाणी आम्ही चित्रण केले होते. पैसे खर्चून चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकाला नेत्रसुख मिळावे असे सेट मी स्वतः करून घेतो.

कामाठीपुऱ्यापासून माझे घर अगदी जवळ होते. शाळेत येता-जाताना मी हा भाग रोजच जवळून पाहिलाय. त्यामुळे १९५५-६०चा कामाठीपुरा माझ्या मनःपटलावर आजही जसाच्या तसा आहे. त्या खिडक्यांमध्ये, गॅलऱ्यांमध्ये कुठल्या कुठल्या रंगाचे कपडे वाळत घातलेले असत हेदेखील आठवते. गंगूबाईमधील कामाठीपुरा हा सेट माझ्या बालपणीच्या आठवणींमधील नॉस्टेल्जिया आहे!

संबंधित बातम्या