प्रीमियर

संतोष भिंगार्डे
सोमवार, 18 जानेवारी 2021

प्रीमियर

ताहिर भसिन नव्या भूमिकांमध्ये
बॉलिवूड अभिनेता ताहिर राज भसिनचे यावर्षी दोन चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होत आहेत. त्यापैकी एक आहे ‘८३’ आणि दुसरा ‘लूप लपेटा’. त्याचे हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहेत. तो ओटीटीवरील एका मोठ्या सिनेमातही दिसणार आहे. मात्र त्याबद्दलची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. 
ताहिर म्हणतो, ‘दणक्यात चित्रीकरण करून या वर्षाची सुरुवात झाली आहे. एक कलाकार म्हणून मी करत असलेल्या वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्सविषयी मी उत्सुक आहे. वर्ष पुढे पुढे जात असताना मी प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या रूपात येणार आहे.’
‘लूप लपेटा’ ही तापसी पन्नूबरोबरची प्रेमकथा आहे. या चित्रपटात काहीशा विचित्र पद्धतीने एक दरोडा घडतो. तर कबीर खान यांचा ‘८३’ हा ख्यातनाम स्पोर्ट्स ड्रामा आहे. डिजिटल व्यासपीठावरील शो रोमँटिक ड्रामा आहे. तो म्हणाला, ‘मी नव्या प्रोजेक्टचे काम सुरू केले आहे. आजवर मी जे काम केले आहे, त्यापेक्षा हे फार वेगळे आहे. आत्तापर्यंत या चित्रीकरणात मला फारच मजा आली आहे.’

‘आँखे २’ जून-जुलैमध्ये सेटवर

‘आँखे २’ या चित्रपटाची तयारी गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अर्जुन रामपाल, अर्शद वारसी, इलियाना डीक्रूझ आदी कलाकारांना घेऊन हा चित्रपट तयार होणार होता. या चित्रपटाच्या राइट्सवरून काही समस्या उद्‍भवल्या आणि हा प्रॉजेक्ट काहीसा थंड पडला. त्यानंतर दिग्दर्शक अनीस बझ्मी हे दिग्दर्शन करतील, असेही सांगण्यात आले आणि तशा प्रकारची दोनेक वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली. तेव्हा अमिताभ बच्चन यांचे नाव कायम होते मात्र सैफ अली खान, सनी देओल, कार्तिक आर्यन, जॅकलिन फर्नांडिस आदी कलाकारांना घेऊन हा चित्रपट होणार असे सांगण्यात आले. परंतु त्यानंतरही हा प्रॉजेक्ट काही पुढे सरकला नाही. 
पण आता नवीन कलाकार व नव्या कथेसह हा चित्रपट होणार आहे अशी अंदर की बात आहे. या नवीन प्रॉजेक्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय खन्ना अशा काही कलाकारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बाब म्हणजे, आता अनीस बझ्मी याच्याऐवजी अभिनय देव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याने आपली तयारी सुरू केल्याचे समजते. सध्या काही पेपरवर्क राहिले आहे. ते पूर्ण व्हायला तीन ते चार महिने लागतील आणि साधारण जून किंवा जुलै महिन्यात हा चित्रपट प्रत्यक्ष सेटवर जाईल. थोडक्यात सांगायचे तर शेवटी आँखेचा सिक्वल आता येणार आहे.

संबंधित बातम्या