‘महिलांच्या प्रश्नांवर काम करायचंय...’

पूजा सामंत
सोमवार, 10 जानेवारी 2022

मुलाखत

सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर तब्बल एकवीस वर्षांनी हरनाझ कौर संधू या भारतीय युवतीने ‘मिस युनिव्हर्स’ किताबावर नाव कोरले आहे. चंदिगढच्या या एकवीस वर्षीय ‘मिस युनिव्हर्स’बरोबर मारलेल्या गप्पा...

हरनाझ, इस्राईलमध्ये झालेल्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेमध्ये तू भारताचे प्रतिनिधित्व केलेस. प्रत्यक्ष स्पर्धा आणि आता जिंकून मायदेशी परतल्यावर असलेले अपेक्षांचे ओझे... या सगळ्या ताणतणावाखाली अवघ्या २१व्या वर्षी परफॉर्म करणे तुला कसे शक्य झाले?
हरनाझ कौर संधू :  उम्र तो महज एक नंबर है! इन्सान चाहे तो उम्र के किसी भी पडाव पर जो चाहे वो कर सकता है, बस उस में वो जज्बा, फायर होना चाहिये। खरेच खूप प्रेशर होते माझ्यावर. ऐंशी देशांमधील बुद्धिमान, देखण्या युवतींबरोबर माझी स्पर्धा होती. स्पर्धा अवघड होती. तयारी करण्यासाठी हातात फक्त ३० दिवस शिल्लक होते. ‘मिस युनिव्हर्स’ ही जागतिक पातळीवरील महत्त्वाची स्पर्धा असते आणि त्या तयारीसाठी ३० दिवस अतिशय कमी आहेत. स्पर्धक युवतींचे कम्युनिकेशन स्किल, कॉस्च्युम, रॅम्प वॉक, मेकअप, त्यांचा इतरांशी असलेला व्यवहार, बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर काम केले जाते. हाती असलेला वेळ कमी आणि ८० स्पर्धक देशांच्या एक से एक सुंदर युवतींपुढे माझी डाळ शिजणार नाही ह्या भीतीने आधीच आसवे गाळण्यात अर्थ नाही, हे माझ्या लक्षात आले. मी ‘मिस इंडिया’ आहे आणि ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेसाठी आता माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इस्राईलच्या भूमीवर उभी होते. ही स्पर्धा मी जिंकली तर २१ वर्षांनंतर ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट मी मायदेशी आणणार होते. लक्षावधी भारतीयांचे डोळे माझ्याकडे लागले होते. दडपण न घेता मानसिक खच्चीकरण होऊ न देण्याचा मी ठाम निर्धार केला. माझ्या देशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच संधी होती. कारण हे व्यासपीठ सगळ्यांना कुठे मिळते? सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा माझ्यासोबत होत्या. सगळे ताणतणाव मी दूर ठेवले आणि आत्मविश्वासाने या स्पर्धेला सामोरी गेले. अखेर ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट आपल्या देशाला मिळाला. ही स्पर्धा जिंकणे मुश्कील होते, पण नामुमकीन नव्हते!

तुमच्या कुटुंबात १७ भावंडामध्ये तू एकटीच मुलगी आहेस. खूप लाडाकोडात वाढली असशील... 
हरनाझ कौर संधू : मेरे परिवार मी मुझे कुल १७ भाई है। माझा सख्खा भाऊ हरनुर सिंग. खेरीज चुलत, मावस, मामेभाऊ मिळून सतराजण आहेत. या सगळ्या बंधुराजांमध्ये मी एकटी बहीण आहे, त्यामुळे मी त्यांची खूप लाडकी आहे हे सांगायला नकोच. माझी आई स्त्रीरोगतज्ज्ञ आहे.  मुलगी व्हावी म्हणून तिने अनेक नवस केले होते. मला ‘मिस इंडिया’ आणि त्यानंतर ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळावे म्हणून आईने गुरुद्वारात अनेक दुआ मागितल्या! 
माझ्या कुटुंबात मी सगळ्यांच्या ‘आँख का तारा’ जरी असले तरी जिथे मी चुकले तिथे माझे कान धरण्यात आले, माझ्या चुकांवर पांघरूण घातले गेले नाही. सगळ्या भावांच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या प्रेमामुळे मी अधिकच जबाबदार झाले. भारतीय कौटुंबिक मूल्यांचे संस्कार माझ्यावर आहेत, माझ्या घडण्यात माझ्या कुटुंबाचा, अगदी सगळ्या कौटुंबिक मित्रमंडळींचा, घरच्या स्टाफचा, सगळ्यांचा सहभाग आहे. अवतीभवती असणाऱ्या प्रत्येकाकडून मी शिकत गेले, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे! एकटी मुलगी असले तरी मला माझ्या घरात कायम समान वागणूक मिळालीये. 
आपण फक्त शाळेत किंवा विद्यापीठात, ग्रूमिंग सेंटरमधूनच शिकतो असे नाही. समाजाचा प्रत्येक घटक आपल्याला शिकवत असतो. मी पदवीधर आहे. आईबरोबर तिच्या अनेक मेडिकल कॅम्पना मी आवर्जून उपस्थित राहते. अशा अनेक सामाजिक बांधिलकीच्या कामातूनही मी शिकत गेले. 

महिला सशक्तिकरणाबद्दल तुझे काय विचार आहेत? देशातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय केले पाहिजे असे तुला वाटते?
हरनाझ कौर संधू : मी आधी म्हणाले तशी, माझी आई रविंदर कौर संधू डॉक्टर आहे. तिच्यासोबत मी चंदिगड आणि पंजाबमधील अनेक शहरांत, गावांमध्ये जाऊन जेव्हा आरोग्य शिबिरे घेतली तेव्हा माझ्या लक्षात आले, की महिला सशक्तीकरण, महिलांची राजकारणातली उपस्थिती, त्यांचा राजकारणातला सहभाग वाढावा म्हणून आपण धडपडतोय. पण आजही देशांतील अनेक महिलांचे आरोग्य समाधानकारक नाहीये. मासिक पाळीशी निगडित अनेक आरोग्य समस्या आपल्या देशातील महिलांना  भेडसावताहेत. महिलांमध्ये कर्करोगाची समस्या वाढते आहे. विवाहासाठी आता मुलीचे वय किमान एकवीस असावे या कायद्यातील सुधारणेला मंजुरी मिळाली असली, तरी अजूनही अगणित मुलींची लग्न फार कोवळ्या वयात होतात. त्या स्त्रियांशी संबंधित विविध आजारांनी ग्रस्त होतात. महिलांचे आरोग्य हे मला वूमेन एम्पॉवरमेंटपेक्षाही अधिक महत्त्वाचे वाटते. माझ्यासाठी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य आहे.

जागतिक पातळीवर स्त्रियांचे कोणते प्रश्न तुला जाणवतात?
हरनाझ कौर संधू : महिलांकडून स्वतःच्या आरोग्याची हेळसांड होत असते. बऱ्याचदा कौटुंबिक गरजांमुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पण त्याशिवाय महिलांना गृहीत धरणे, ही समस्या जगभर आहे. विकसित देशांतही महिलांना गृहीत धरून त्यांना दुर्लक्षित केले जाते. महिलांबाबत त्यांचे निर्णय आधी तिचे वडील, मग भाऊ, मग पती, मग वाढत्या वयातील तिची मुले घेतात ही वस्तुस्थिती आहे. स्त्री शिक्षित असो वा अशिक्षित; तिला मन आहे, योग्य विचार करण्याची क्षमता तिच्या कार्यक्षम मेंदूत आहे! पण स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व विसरून तिच्यावर स्वतःचे निर्णय लादण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. स्त्रीने आत्मनिर्भर कसे व्हावे? तिचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने या सगळ्या विपरीत परिस्थितीतून पुढे घडत असते, ते तिच्यातील असलेल्या नैसर्गिक ऊर्मीमुळे, तिच्या झगडण्याच्या स्वभावामुळे. स्त्रीला तिचा योग्य तो आत्मसन्मान मिळायला हवा, असे मला तीव्रतेने वाटते. स्त्री आणि पुरुष एकाच पातळीवर आहेत. मी ‘फेमिनिस्ट’ नाही, पण स्त्रीला आत्मसन्मानाने जगता आलेच पाहिजे.

कोरोना काळात महिला नर्स, डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी यांची कामगिरी लक्षणीय होती. हे आपल्या देशातले अलीकडचे चित्र.. डॉक्टर असो, पायलट असो, सामाजिक कार्यकर्ती असो, अशा सगळ्याच क्षेत्रांत स्त्रीचे कर्तृत्व पुरून उरेल असे आहे, हे सिद्ध झाले आहे.

माझ्याच राज्यात मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, पण स्वतःसाठी जीवनसाथी निवडण्याचा मुलींना अधिकार नाही! शिकलेल्या युवतींना बोलू न देता त्यांचा आवाज दाबून टाकला जातो. स्त्रीने शिक्षण घेऊनही तिला ‘घर गृहस्थी संभालो,’ हा सल्ला देणे सर्वस्वी चुकीचेच आणि अन्यायकारक आहे!  महिलाओं के इन सभी इश्यूज् पर मैं काम करना चाहूंगी। यह इश्यूज् दुनिया भर में है, चाहे वो अपना देश हो, आफ्रिका हो, या यूके! महिलांच्या सन्मानार्थ मी सतत त्यांच्या सोबत असेन.

‘मिस इंडिया’ असो, ‘मिस युनिव्हर्स’ असो वा ‘मिस वर्ल्ड’ असो; सगळ्यांचा मुक्काम नंतर बॉलिवूडकडे वळतो. तुलाही हिंदी फिल्मसाठी ऑफर आल्याच असतील!
हरनाझ कौर संधू :  मैने कोई फिल्म साइन नहीं की है। ऑफर्स आल्या, पण सध्या तरी अभिनय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. भविष्यात सिनेमात आले तरी सिनेमा फार चोखंदळपणे करेन. जल्दबाजी  हरगीज नही करना चाहती। माझा कुठलाही निर्णय माझ्यासाठी ‘मेक ऑर ब्रेक’ ठरू शकेल याची कल्पना मला आहे. क्वालिटी मॅटर्स मोअर टू मी दॅन क्वांटिटी! 
बॉलिवूडमधील कुठल्या कलाकारांबरोबर फिल्म करायला आवडेल?
हरनाझ कौर संधू : शाहरुख खान मला आवडतो. पण मला त्याच्यासोबत फिल्म करायची आहे, असे मी असे कधीही म्हटलेले नाही.

तुझा ब्यूटी-फिटनेस मंत्रा काय आहे ?
हरनाझ कौर संधू : खूप साधा आहे माझा सौंदर्य मंत्रा. मी कमीत कमी सौंदर्य प्रसाधने वापरते. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सन स्क्रीन लोशन आणि ओठांना लिप ग्लॉस. माझ्या आईची स्किन खूप नितळ आहे. त्यामुळे मला तिच्याकडून जेनेटिकली आरोग्यदायी स्किन लाभली आहे.
स्किन मॉईस्ट ठेवण्यासाठी मी दररोज अडीच ते तीन लिटर पाणी पिते. आहारात फळांचा वापर अधिक करते. दररोज किमान १५ ते २० मिनिटे योगा करते. माझी ईश्वरावर श्रद्धा आहे आणि सकारात्मक विचार मला दररोज नवी ऊर्जा देतात. माझे कुटुंब मला मानसिक शक्ती देते. माझी आई माझा श्वास, माझी लाइफलाइन आहे! 

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत तू मांजराचा आवाज काढून मिमिक्री केलीस...
हरनाझ कौर संधू :  हो, लहानपणापासून मी घरातील सदस्यांच्या नकला करतेय. हे आमचे कौटुंबिक विरंगुळ्याचे क्षण असतात. मी स्पर्धेत मांजरीचा आवाज काढल्यावर सगळ्यांचेच मनोरंजन झाले.

तुझ्यासाठी रोल मॉडेल कोण?
हरनाझ कौर संधू : बहुतेक मुलांसाठी त्यांचे आई-वडील अथवा शिक्षक रोल मॉडेल असतात. माझे आई-वडील माझे विश्व आहेतच, पण मी स्वतः माझी रोल मॉडेल आहे. यहाँ तक आने के लिये मैने कडी मेहनत की है। माझी इच्छा आहे उगवत्या पिढीने मला लक्षात ठेवले नाही तरी चालेल, पण माझी मेहनत, कष्ट, सचोटीने वागणे, प्रामाणिकपणा, माझे आदर्श नव्या पिढीने लक्षात ठेवावेत आणि नवे आदर्श घडवावेत!

संबंधित बातम्या