वाचनप्रिय ‘पेस्ट्री शेफ’ 

पूजा सामंत 
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

शेफ्स डायरी
चाकण (जि. पुणे) येथे जन्मलेल्या, वाढलेल्या संदीप कड यांनी चाकण ते दुबई - ओमान व्हाया कॅलिफोर्निया आणि लंडन असा प्रवास केला आहे. या प्रवासात त्यांनी ‘पेस्ट्री शेफ’ असा लौकिक जगभर मिळवला आहे. त्यांचे सामाजिक भान जबरदस्त आहे. ‘लेटो कॅफे’, ‘लाऊंज कॅफे’, ‘मंगोलिया बेकरी’ (बुर्ज खलिफा - दुबई), टोनीज पिझ्झा, लँडमार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स अशा प्रतिष्ठित हॉटेल चेन्स आणि कॅफेजमधून काम करणाऱ्या संदीप कड यांचा प्रवास नक्कीच खास आणि प्रेरणादायी आहे. 

संदीप, तुझ्या लहानपणी चाकण खूप मागासलेले असेल ना! तिथे राहून तू विकास कसा साधलास? या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? 
संदीप कड : माझा जन्म, बालपण, शालेय शिक्षण सगळे चाकणमधले. आज चाकण जागतिक नकाशावर आहे कारण अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या ब्रॅंड्समुळे चाकणला ओळख लाभली आहे. माझ्या बालपणीचे चाकण म्हणजे आजूबाजूच्या १० घरांपैकी एका घरातील एक व्यक्तीदेखील पुण्याला कामासाठी निघाली, की ‘काही वस्तू आणायची का?’ असे हमखास विचारले जाई. कारण चाकणमध्ये त्यावेळी बऱ्याच वस्तू मिळत नव्हत्या. खेळायचे, अभ्यास करायचा असे मजेत आयुष्य सुरू होते. पण या वयात माझ्याही नकळत माझ्यावर किचन, स्वयंपाक, प्रत्यक्ष कुकिंग याचे संस्कार कधी होत होते हे मलाही कळले नाही.. माझे वडील त्या काळात काँग्रेसचे कार्यकर्ते होते. घरात मोठा राबता असायचा. ‘अतिथी देवो भव’ मानून आईला अनेकांसाठी अगदी हसतमुखाने स्वयंपाक करताना पाहत आलो. शिवाय आमची स्वतःची दोन हॉटेले होती. एक पुणे-नाशिक रोडवर गावरान जेवणाचा ढाबा, तर दुसरे हॉटेल म्हणजे कँटीन होते. चाकण मार्केटमध्ये असलेले कँटीनदेखील खूप चालायचे. त्या हॉटेलवर माझे येणे-जाणे असे. तिथे कर्मचारी कसे काम करतात, कांदा कसा चिरला जातो, चुलीचा जाळ कसा भडकतो हे मी पाहत होतो. त्यातील बहुतेक गोष्टी मनात ठसत होत्या. पण मला पुढे हेच करायचे आहे, हे तेव्हा लक्षातच आले नाही. दहावीत आणि बारावीत बरे गुण मिळाले आणि मी घरी वडिलांना हॉटेल मॅनेजमेंट करणार असे सांगितले. पुण्यातून हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केले, पण तरीही मला वाटत होते मला स्पेशलायझेशन करायला हवे. इंडियन क्विझिन सगळेच करतात. १०० पैकी ८० व्यक्तींना आपले भारतीय पदार्थ कसे केले जातात हे ज्ञात आहे, मग वेगळे काय करणार? म्हणून मी पेस्ट्री - बेकरी यात विशेष प्रावीण्य मिळवायचे ठरवले... 
मुंबईत विठ्ठल कामत यांच्या ऑर्किड हॉटेलमध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग हा पाठ्यक्रम पूर्ण केला. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करताना इंडियन, थाई, कॉन्टिनेन्टल, चायनीज, आफ्रिकन अशा सगळ्या फूड कल्चरची ओळख आणि ते कसे केले जातात याची माहिती झालेलीच होती. मग मी माझे लक्ष पेस्ट्री - बेकरीमध्ये घातले. बेकरी - पेस्ट्रीमध्ये जगातील असा एकही पदार्थ नाही, जो मला करता येत नाही इतका आत्मविश्वास माझ्यात आला. 
ऑर्किडनंतर मी सिंगापूरी बेकरी चेनसाठी खूप झोकून काम केले. या उत्तम अनुभवानंतर मला जागतिक कीर्तीचे हॉटेल ‘द ताजमहाल’ इथे संधी अर्थात बेकरी-पेस्ट्री शेफ म्हणून मिळाली. ताज हॉटेलमध्ये जगभरातील पर्यटक येत असल्याने पेस्ट्री करण्यासाठी इथे चांगला असा वाव मिळाला. एक्झिक्युटिव्ह शेफ हेमंत ओबेराय आणि पेस्ट्री शेफ इराणपूरकर या दोघांनी मला मोलाचे सहकार्य केले. इटालियन पेस्ट्री कशी करावी हे मी इथे शिकलो आणि त्यात तरबेज झालो. 
ताज हॉटेलमध्ये मी रुळलो. इथल्या माझ्या कारकिर्दीतच ताज हॉटेलवर २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला झाला. माझे जवळचे अनेक सहकारी त्यात जखमी झाले, काही मृत्युमुखी पडले. या घटनेचा कायमचा ओरखडा माझ्या मनावर उमटला आहे. 

‘ताज’च्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील अनुभव कसा होता? 
संदीप कड : कॅलिफोर्नियामध्ये एका रेस्टॉरंट चेनसाठी पेस्ट्री शेफची गरज होती आणि मी ते आव्हान स्वीकारले. पेस्ट्री करण्यात मी तरबेज होतोच, पण अमेरिकेत मी टाइम मॅनेजमेंट - वेळेचे नियोजन शिकलो. अमेरिकेत वेळेला खूप महत्त्व आहे. ऑर्डर दिल्यानंतर ती निर्धारित वेळेतच कस्टमरकडे त्याच्या टेबलावर पोचायला हवी, हा प्रोफेशनल ॲप्रोच मी अमेरिकेत चांगलाच शिकलो. अमेरिकेच्या संस्कृतीप्रमाणे दररोज होणारी अनेक लग्ने आणि त्या प्रत्येक लग्नात वेडिंग केक असणे हे त्यांच्या शिष्टाचारात समाविष्ट आहे. त्यामुळे दिवसरात्र मी वेडिंग केक करत असे. फाईन डायनिंग काय असते तेदेखील इथे शिकलो. 

अमेरिकेनंतर तू पुढे काय केलेस? 
संदीप कड : नोकरीबरोबरच मी तिथले मराठी जन काय करतात याचा कानोसा घेतो. मी जाईन तिकडे मराठी, समविचारी मित्र जमवले आहेत. परदेशात राहून अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्याचा-मदत करण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करतो. अमेरिकेनंतर माझा पुढचा टप्पा दुबई होता. इथे ४ स्टार हॉटेलमध्ये काम करताना असे जाणवले, की इथल्या पराधीन जीवनालाच लोक सुखासीन आयुष्य समजताहेत. सकाळी उठून येथील चकचकीत विश्वात प्रवेश करावा. कामातल्या ब्रेकमध्ये गप्पा आणि चहा हाणावा आणि मग ड्युटी संपवून रात्री घरी जावे, असा हा दिनक्रम. दुबईत राहून अनेक मराठी शेफना स्थानिक पर्यटन स्थळे ठाऊक नसत. त्यांच्यासाठी त्यांचे हॉटेल हेच त्यांचे विश्व होते. ४ स्टार, ५ स्टार हॉटेलपेक्षा त्यांनी रेस्टॉरंट चेन्समध्ये काम करून दुप्पट पगार घ्यावा आणि इतरही जग बघावे, फॅमिली लाइफ एंजॉय करावे असे माझे मत होते. ५ स्टार हॉटेल्स म्हणजे सोन्याचा पिंजरा असे मला वाटते. तिथे काम करून आपला काही विकास होत नाही, हे माझे अनेक शेफना पटले आणि आता ते अधिक संपन्न आयुष्य जगू लागले आहेत. माझ्या दुबईच्या वास्तव्यात मी दोन कपाटे भरून पुस्तके जमवलीत. मी ती वाचलीदेखील आहेत आणि मित्रांनादेखील वाचन संस्कृतीची सवय जडवली आहे. 
‘सिम्बॉयसिस’मधून मी ‘एमबीए’देखील केले आहे. कारण मला दुबईत माझे स्वतःचे हॉटेल सुरू करायचे आहे. 

ओमानमध्ये तू महाराष्ट्र मंडळाचा ॲक्टिव्ह मेंबर आहेस म्हणे! 
संदीप कड : कसलाही आव न आणता, गाजावाजा न करता किंवा कसलेही अवडंबर न माजवता अतिशय साधेपणाने २०१४ मध्ये मी येथे शिवजयंती साजरी केली. इथे आखातातदेखील मराठी संस्कृती रुळावी हा उद्देश होता. सण साजरे करण्यासाठी घोषणा देण्याची गरज नाही. साधेपणाने, इतरांना त्रास न देता जर आपण आपले सण साजरे केले, तर अन्य धर्मियांनाही त्याबद्दल औत्सुक्य वाटते. मी सामाजिक भान ठेवत इथे सगळ्यांना मदत करतो. हा मोठेपणा नाही, पण मदत करणे हा माझा स्वभाव आहे. माझी पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा दुबईत असतात. ओमानमधले काम संपले, की मी दुबईत परत जाईन. कुटुंबात रमणे मला जसे प्रिय; तसे समाजात रमणेदेखील आवडते.    

संबंधित बातम्या