शिक्षक ते शेफ

पूजा सामंत
मंगळवार, 29 जानेवारी 2019

शेफ्स डायरी
 

प्रोफेशनल कुकिंग अर्थात व्यावसायिक स्वयंपाक करणाऱ्यांना आपण शेफ संबोधतो. या क्षेत्रात महिला शेफ्सची संख्या तशी खूपच कमी आहे. या पुरुषप्रधान क्षेत्रांत आपली स्वतंत्र वाट चोखाळण्याचे काम या महिला शेफ्स करताना दिसतात. पंकज भदोरिया हे त्यापैकी एक नाव होय. या मूळ लखनौच्या. पहिल्या ‘मास्टर शेफ’ शोमध्ये त्या प्रथम आल्या. या प्रवासाबद्दल त्या म्हणतात, ‘मास्टर शेफ बनने के बाद मेरा सफर टीचर से शेफ हुआ।’ 

पंकज, आपल्यातील पाककला कौशल्याची प्रथम जाणीव केव्हा झाली? 
पंकज भदोरिया : आपण एखादा अगदी साधासा पदार्थ केला, तरी त्याची तारीफ होते. त्यामुळे आपला आत्मविश्‍वास वाढतो आणि हा आत्मविश्वास पाककलेतील पुढचा प्रवास निश्‍चित करतो, असेच काहीसे माझे झाले. एका शाळकरी मुलीला पाककलेत कितीशी आवड असणार? त्यात किती गती असणार? पण आयुष्यात एक वेगळे वळण आले आणि जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर पाकशास्त्र ही कौटुंबिक गरज बनली. 

म्हणजे काय घडले? 
पंकज भदोरिया : आईवडील, माझा धाकटा भाऊ आणि मी अशा चौकोनी कुटुंबात सगळे आलबेल होते. वडील पंजाबी आणि आई बंगाली असल्याने दोन्ही पद्धतींचे कुकिंग घरी होत असे. नेहमीच्या चाकोरीतले आमचे जीवन होते. पण मी तेरा वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. वडिलांमुळे आमचे चौघांचे आयुष्य संरक्षित आणि सधन आहे हे तोपर्यंत समजले नाही. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. आपोआप मला प्रौढत्व आले आणि जबाबदारीची जाणीवदेखील आली. आईला नोकरी करणे भाग होते. तिच्याकडे पदवी नव्हती, ती नातेवाइकांकडे काम करू लागली. संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक करण्याचे तिला त्राण नसे. मी दुपारी दोनपर्यंत शाळेतून घरी येत असे. मग आमच्या तिघांचा स्वयंपाक मी करू लागले. काही दिवस जमत नव्हते, पण तीन महिन्यांत पंजाबी स्वयंपाक मला येऊ लागला. माझी ही गरज पुढे माझा व्यवसाय ठरेल, असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. 

या व्यवसायात कशी आलीस? 
पंकज भदोरिया : आईच्या नोकरीमुळे माझे आणि भावाचे शिक्षण शक्‍य झाले. नंतर मला सेंट्रल स्कूलमध्ये टीचरची नोकरी लागली. दरम्यान मी २१ वर्षांची असताना आईचे निधन झाले. हा मानसिक धक्का मला सहन झाला नाही, मी नैराश्‍यात गेले. माझ्या जीवनातला हा अतिशय कठीण काळ होता. धाकट्या भावासाठी धीराने उभे राहणे आवश्‍यक होते. पुढे माझे लग्न उद्योजक चारू समर्थ यांच्याबरोबर झाले. भाऊदेखील स्थिर झाला. एक मुलगी, एक मुलगा असा संसार.. माझी नोकरी या रहाटगाडग्यात मी स्वतःला झोकून दिले. त्या काळात ‘मास्टर शेफ’विषयी ऐकले आणि पतीच्या प्रोत्साहनाने त्यात भाग घेतला. ही या व्यवसायात येण्याची सुरुवात होती... 

तू काही मूळची शेफ नाहीस. तू प्रशिक्षणही घेतले नव्हतेस. ट्रेनिंगअभावी काही चुका घडल्या का? 
पंकज भदोरिया : ‘मास्टर शेफ’मुळेच मी सर्वार्थाने घडले असे मी म्हणेन. गृहिणी असल्याने कमी प्रमाणात अन्न शिजवणे, तसे प्रमाण घेणे याची सवय होती. कमीत कमी वेळात अधिकाधिक टेस्टी स्वयंपाक बिनचूक करणे हे मोठे आव्हान असते. मास्टर शेफच्या प्रवासात मी फारशा चुका न करता शिकत गेले. घडलेल्या चुका पुन्हा घडू दिल्या नाहीत. पण पूर्वी मात्र एकदा आईच्या हातचे मटण स्वादिष्ट असते म्हणून ते करण्याचे आव्हान मी स्वीकारले. आई तिच्या नेहमीच्या सरावाने मसाले सहज घालायची, हे लक्षात आले नाही. चमच्यांचे मोजमाप तिने कधी वापरल्याचे मला आठवेना. त्यामुळे मी मटण करण्यासाठी गेले तेव्हा धणे पावडर वाटीने घातली. फार भयंकर चूक घडली नाही तरी मटणाचा स्वाद बिघडला. मग मी शहाजोगपणे घरी म्हटले, ‘मैने धनिया मटण बनाया है, इसीलिये मैने बनाए मटण का स्वाद माँ से अलग तो होगा ही न।’ पण त्या चुकीनंतर मी शिकले. स्वयंपाकात अंदाज महत्त्वाचा, त्यात चुका होता काम नयेत. त्यामुळे स्पर्धेत फारसा त्रास झाला नाही. 

मास्टर शेफनंतर पुढे नोकरी सोडलीत! 
पंकज भदोरिया : माझ्यातील पाककलेचे कौशल्य लक्षात आल्यावर मी नोकरी सोडली. मी लखनौला स्थायिक असल्याने तिथे ‘कॅफे बाय डिफॉल्ट’ आणि ‘फंकी कॅफे’ अशी दोन रेस्टॉरंट्‌स सुरू केली. अर्थात या हॉटेल्सची किचन्स माझ्याकडे आणि व्यवस्थापन पतीकडे आहे. ‘पंकज भदोरिया कलिनरी ॲकॅडमी’ सुरू केली. हे सारे आज मला स्वप्नवत भासते. 

जीवनात, व्यवसायात काय धडे मिळाले? 
पंकज भदोरिया : माझ्या कोवळ्या वयात नियतीने क्रूर वार केले. त्यात मी कोसळले, पण हातपाय गाळून बसले नाही. अजाण वयात आईवडिलांचा आधार नसणे म्हणजे काय असते हे शब्दांत मांडू शकत नाही, पण मी धडा घेतला. माझ्या आयुष्याची दोरी मी स्वतःकडे घेतली. परिस्थितीला कधीही ढाल बनवू नये, कठीण काळच आयुष्य कसे जगावे याची शिकवण देतो, हे मी शिकले आणि कोणावरही अवलंबून राहिले नाही. स्वतःच्या कमजोरींवर मीच मात केली. आपल्यातल्या दुर्गुणांवर आपणच मात केली पाहिजे तर जग तुमच्या दुबळेपणाचा फायदा घेत नाही. शरीरापेक्षा मन सशक्त असणे अतिशय गरजेचे आहे. शरीर का क्‍या है? हेल्दी खाने से, जिम जाने से शरीर चंगा, तगडा हो सकता है पर मन का क्‍या? अपने दुबले मन को हम खुद चंगा - बलवान करेंगे तो विजय हमारा है।’ 

महिला - मुलींसाठी शेफ होण्याचे प्रमाण आजही कमी आहे का? 
पंकज भदोरिया : आज काळ नक्की बदलला आहे. देशविदेशात मी कामासाठी गेले आहे. तिथे तरुण युवती, महिला शेफ दिसून येतात. हा बदल सुखावह आहे. पूर्वी तर इंजिनिअरिंग क्षेत्रातही महिलांचे प्रमाण तुरळक होते. आज ते तिपटीने वाढले आहे. प्रोफेशनल शेफ म्हटले, की हॉटेलचे किचन रात्री दोनला बंद होते. पुन्हा पहाटे ४-५ वाजता सुरू होते. शिवाय सतत उभे राहून ड्यूटी करणे ही हॉटेल व्यवसायातील गरज आहे. पण महिलांना आता आव्हाने स्वीकारणे आणि यशस्वीपणे निभावणे कठीण उरलेले नाही हे ग्लोबल चित्र आहे.   

पहिली प्रशस्ती वडिलांची 
पंजाबी पिता आणि बंगाली आई अशा भिन्न संस्कृतीत वाढलेल्या पंकजला आईवडिलांचे नेहमीच खूप प्रेम लाभले. पंकज आणि तिचा धाकटा भाऊ असे चौकोनी कुटुंब असलेल्या पंकजने आईकडून बंगाली आणि पंजाबी अशा दोन्ही खाद्यसंस्कृतीचे बाळकडू आपोआप घेतले होते. पंकजचे कुटुंब दिल्लीत स्थायिक होते. वडील लार्सन अँड टुब्रो या कंपनीत नोकरीस होते. पंकज आपल्या वडिलांना रविवारी स्वतः चहा करून देत असे. एका रविवारी मॉर्निंग वॉक करून घरी आलेल्या वडिलांना तिने चहाबरोबर टोस्ट करून दिले. या टोस्टमध्ये तिने आपली क्रिएटिव्हिटी दाखवली. वाफाळत्या चहासह गरम टोस्ट, ट्रे, आकर्षक कोस्टर्स, त्याच्या बाजूला लाल टपोरे गुलाबाचे फूल (गुड मॉर्निंगसाठी), सकाळची दैनिके असा सगळा जामानिमा लहानग्या पंकजने केला होता. त्यावेळी ती नऊ वर्षांची होती. मुलीच्या कौशल्याचे वडिलांनी कौतुक केले आणि तोंडभरून आशीर्वादही दिला. ‘तुझ्यातील कला तुला पुढे नेईल,’ हा त्यांचा आशीर्वाद पुढे अशा रीतीने खरा होईल असे कधी वाटले नाही. त्या क्षणी आपण वडिलांना आनंद दिला ही भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती,’ असे पंकज सांगतात.

संबंधित बातम्या