चॉकलेट्‌सची राणी

पूजा सामंत 
सोमवार, 6 मे 2019

शेफ्स डायरी
रूढ अर्थाने झेबा कोहली शेफ नाही, पण झेबा ही ‘चॉकलेट शेफ’ म्हणून प्रख्यात आहे. चॉकलेटियर झेबा कोहली ही बेल्जियम चॉकलेट्‌सची भारतातील सदिच्छा दूत - अर्थात ब्रॅंड अम्बॅसॅडर आहे. चॉकलेट्‌सवर नितांत प्रेम करणारी झेबा आज दोन युवा लेकींची आई आहे. चॉकलेट्‌समध्ये करिअर करणारी संसारी स्त्री आहे. तिला झेबा मीठा कोहली या टोपणनावानेही ओळखले जाते. जगभरातील अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. 

झेबा, आपला देश हा काही चॉकलेट्‌ससाठी प्रसिद्ध नाही. तरीही तुझ्या ‘फॅंटसी चॉकलेट्‌स’साठी तू जिद्दीने उभी राहिलीस. हे तुझे चॉकलेट पुराण कसे सुरू झाले? 
झेबा कोहली : मेरे फॅंटसी चॉकलेट के पीछे भी एक कहानी है - आमचे कुटुंब तसे खवय्याचे आहे.. आजी, आई आणि आईच्या  बहिणी म्हणजे माझ्या मावश्‍या सगळ्याच सुगरण आहेत. इराणी मोगलाई, गुजराथी सगळ्या स्वादाचा स्वयंपाक आमच्याकडे आजी करत असे. तिच्या चवीचा वसा जणू सगळ्यांनी घेतला आणि घरातील सगळ्या स्त्रिया सुगरण झाल्या. माझे आजोबा फजलबॉय हे खूप दानशूर होते. चॉकलेट्‌सचे स्वतःचे दुकान; आजच्या भाषेत सांगायचे तर बुटीक असावे असे आजोबांचे स्वप्न होते. आपल्या मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी आजोबांनी चॉकलेट्‌सवर प्रचंड संशोधन केले आणि हा फॅंटसी चॉकलेट्‌सचा डोलारा उभारायला सुरुवात झाली. आजोबांच्या या स्वप्नाची - कामाची धुरा मी पुढे नेली इतकेच! 

चॉकलेट्‌स आणि झेबा हे समीकरणच आहे. पुढचा प्रवास कसा होता? 
झेबा कोहली : ‘फॅंटसी’ ह्या ब्रॅण्डला ७० वर्षे होऊन गेली. आजोबा स्टील आणि एअर कंडिशनिंग व्यवसायात होते. आम्हा सगळ्या मुलांवर प्रामुख्याने त्यांचेच संस्कार आहेत. चतुरस्र, बहुश्रुत, दयाळू स्वभावाच्या आजोबांचे नाव त्यांच्या व्यवसायात अतिशय आदराने घेतले जाई. मी शाळांच्या उन्हाळी सुटीत त्यांच्या ऑफिसमध्ये येत असे. स्वतःचे काम करता करता ते मला त्यांच्या कामाची माहिती देत असत. मुंबईत लिबर्टी सिनेमाजवळ त्यांचे ऑफिस होते. आजोबांच्या तालमीत मी हळूहळू तयार होत होते. पुढे कॉलेजमध्ये जाऊ लागले आणि कॉलेज लेक्‍चर्सनंतरही माझे विश्‍व आजोबांचे ऑफिस हेच होते. तिथे जाणे हे त्यांनी माझ्यावर लादलेले नव्हते, पण सुटीत मी काही शिकावे असे त्यांना वाटे. पण त्यांच्या बिझनेस स्किल्सचे मला पॅशन वाटू लागले. याच काळात म्हणजे मी १५ वर्षांची असताना माझ्या आईचे निधन झाले. आजोबांच्या चार मुलांपैकी एका मुलाचे स्वप्न चॉकलेट्‌सच्या स्व-निर्मितीचे होते. आजोबांनी त्याच्या अकाली जाण्यानंतर खचून न जाता हे स्वप्न पुरे करायचे ठरवले. तेव्हा इंटरनेट वगैरे काही नव्हते. त्यांनी स्वित्झर्लंड, बेल्जियम, न्यूझीलंड अशा अनेक देशांना भेटी दिल्या. त्या त्या देशातील चॉकलेट्‌स निर्माण प्रक्रिया, त्यातील घटक, पोषण मूल्य, लागणारा वेळ, मनुष्यबळ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याची चव या सगळ्याचे आजोबांनी प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण केले. त्यानंतर दक्षिण मुंबईत ‘फॅंटसी’ या नावाने चॉकलेट्‌सचे विविध फ्लेवर्स असलेले दुकान सुरू केले. त्यांच्या या सगळ्या पाहणीची, संशोधनाची, परिश्रमांची मी साक्षीदार होते. 
त्या काळात काही पंचतारांकित हॉटेल्स सोडली, तर सहजासहजी चॉकलेट्‌सची वेगळी अशी बुटिक्‍स नसत. त्यामुळे मी नक्कीच म्हणेन की आयुष्यभराची पुंजी मला या प्रवासात सापडली. कारण पुढे आजोबांना देवाज्ञा झाली, पण तत्पूर्वी ते मला घेऊन परदेशातल्या त्या तमाम बिझनेस असोसिएट्‌सकडे गेले. त्यांना त्यांनी सांगितले, ‘यापुढे आमचा चॉकलेट्‌स बिझनेस आमची नात झेबा सांभाळेल. मी थकलोय आता..’ आजोबांचा चॉकलेट व्यवसाय अशा तऱ्हेने माझ्याकडे आला आणि मी ‘चॉकलेटियर झेबा’ झाले... 

या दरम्यान काही अडचणी आल्या का? 
झेबा कोहली : अडचणी हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही. अडचणी येत राहतात, पण त्यांना पार करण्यात मी खरे आव्हान मानते. आजोबांनी १९४६ मध्ये चॉकलेट्‌स निर्मिती, विक्री, वितरण सुरू केले. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले, हे त्यांचे आशीर्वाद! अडचणी सगळ्यांना येतात, मलाही आल्या पण त्यांचा पाढा वाचणे माझ्या मनाला पटत नाही. 

पहिले चॉकलेट कधी बनवलेस? 
झेबा कोहली : मला चोक्‍लेट्‌सने झपाटून टाकले होते. परंतु, करेन आनंद या व्यावसायिक महिलेने मला प्रथम उद्युक्त केले. ती म्हणाली, ‘झेबा माझ्या वाढदिवशी मला शॅम्पेन फ्लेवरचे चॉकलेट करून दे. मी तसे तिला करून दिले आणि पहिले चॉकलेट ते आज अशी किमान २५ वर्षे सरली. 
या प्रवासात मला उमजत गेले, चॉकलेट्‌सच्या रेसिपीज माझ्यासाठी हातखंडा खेळ आहे. हजारोंनी महिलांना मी चॉकलेट निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. या अखंड प्रवासात चॉकलेटविषयी माझे प्रेम वाढतच गेले. कथा, कविता, साहित्यनिर्मितीदेखील केली. अनेक पुरस्कार मला मिळाले. मी कृतकृत्य आहे. 

चॉकलेट्‌स म्हणजे कॅडबरी किंवा नेस्ले असे समीकरण असताना तू ‘फॅंटसी’चा दर्जा आणि त्यातील वेगळेपण कसे राखलेस? 
झेबा कोहली : चॉकलेट्‌स हा व्यवसाय म्हणून वाढवत असताना मी ‘गुड हाऊसकिपींग’ ही कंपनीदेखील सुरू केली. कारण कुठेतरी हेदेखील मनात होते, की अन्य व्यवसायातील नफा शक्‍य झाल्यास ‘फॅंटसी चॉकलेट्‌स’ विस्तारित करण्यासाठी वापरता येईल. काळ पुढे जातो आणि बदलत्या काळाची पावले ओळखून मी स्वित्झर्लंड गाठले आणि नवे फ्लेवर्स शिकून घेतले. ते आमच्या अनेक फॅंटसी चॉकलेट्‌समध्ये वापरले. त्यापैकी फळांचे स्वाद लोकप्रिय झालेत. मिल्क-फ्री चॉकलेट्‌स, झिरो ॲनिमल प्रॉडक्‍ट चॉकलेट्‌स, एडिबल फ्लॉवर्स फ्लेवर, खजुराची चॉकलेट्‌स आमची अतिशय प्रिय आहेत. असे माझे सतत इनोव्हेशन सुरू असते. कुणीही काहीही म्हणा, परदेशी चॉकलेट्‌सच्या तुलनेत आपली भारतीय चॉकलेट्‌स कुठेही कमी नाहीत, हे माझे ठाम मत आहे. फक्त भारतीय अधिक गोड चॉकलेट्‌स खातात. पण नव्या पिढीला ‘डार्क’ म्हणजे कडवटपणा जिभेवर रेंगाळेल अशा स्वादाची चॉकलेट्‌स प्रिय आहेत. मी जे चॉकलेट्‌स तयार करते त्यांची रेसिपी माझी स्वतःची आहे. 
माझे यु ट्यूब चॅनेल आहे. खास चॉकलेट्‌स शिकवण्यासाठी मी त्याचा वापर करते आणि हे ट्रेनिंग विनामूल्य असते. अनेक गृहिणींना चॉकलेट्‌सचे ट्रेनिंग मी देते जेणेकरून त्यांनी आपल्या पायांवर उभे राहावे. मी स्वतः चॉकलेट्‌सबाबत अपडेट राहण्यासाठी अनेक ऑनलाइन कोर्स करत असते. 

तुझे पती राजेश कोहली यांच्या बिझनेसचा पसारा, दोन युवा लेकींच्या आवडीनिवडी जोपासणे, तुझे चॉकलेटचे व्याप; शिवाय एक स्वतंत्र व्यावसायिक म्हणून तुझी ओळख अशा अनेक ओळखीत स्वतःची जीवनशैली जपणे अथवा फिटनेस राखणे तुला कसे जमते? तुझे रुटीन कसे आहे? 
झेबा कोहली : रात्री साडे दहापर्यंत मी झोपते आणि सकाळी सहाला उठते. मुली आणि पती उठेपर्यंत दिवसभराच्या कामाची यादी तयार होते. प्राणायाम करून न्याहारी आणि टिफीनचा मेनू महाराजला (आचारी) दिला, की सगळे एकत्र न्याहारीला बसतो. मुली आणि राजेश ऑफिसला गेले, की मी दहाच्या सुमारास माझे ऑफिस गाठते. चॉकलेट्‌स कामात माझ्याकडे पन्नास सहाय्यक स्टाफ आहे. पोहणे आणि अय्यंगार योगा हे माझ्या फिटनेसचे रहस्य आहे. संतुलित आणि कमी तेलाचा घरगुती आहार हेदेखील माझ्या कुटुंबाच्या जीवनशैलीचा भाग आहे. 
पॉवर, प्रेयर, प्रॉडक्‍टिव्हिटी, पेशन्स, पॉझिटिव्हिटी या पंचसूत्रीवर माझा विश्‍वास आहे.   

संबंधित बातम्या