चॉकलेट किंग 

पूजा सामंत 
सोमवार, 8 जुलै 2019

शेफ्स डायरी
शेफ वरुण इनामदारला ‘चॉकलेट किंग’ म्हणूनही ओळखले जाते. त्याने केलेली चॉकलेट्‌स भारतातच नव्हे, तर परदेशांतही पॉप्युलर आहेत. या व्यवसायाला अलीकडे ग्लॅमर लाभले असले, तरी वरुणने शाळेत असतानाच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात जायचे निश्‍चित केले होते... 

वरुण, तुला ‘हॉस्पिटॅलिटी’ क्षेत्राची माहिती शाळेतच कशी होती? आणि आपल्या वडिलांना तसे सांगण्याचे धाडस तू कसे केलेस? 
वरुण इनामदार : मला खाण्याची आवड होतीच. साधारण आठ वर्षांचा असल्यापासून आईबरोबर किंवा आई नसतानाही मी किचनमध्ये लुडबूड करायला लागलो. आई कुठला पदार्थ करताना काय जिन्नस वापरते हे मला नवव्या वर्षांपासूनच समजू लागले होते. आठवीत असताना घरी माझ्या करिअरचा विषय निघाला. मी वडिलांना रोखठोक सांगितले, ‘बाबा, मला दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे..’ त्यानंतर एक मिनीट घरात शांतता पसरली. ‘हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय? कशाशी खातात? हे तुला ठाऊक आहे का?’ असे त्यांनी विचारताच आत्मविश्‍वासाने मी त्यांना सांगितले, ‘मी टीव्हीवर नियमित कुकिंग शोज बघतो. मला कुकिंगची आवड निर्माण झाली. त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करण्याची तीव्र इच्छा आहे..’ वडिलांनी मला बारावीपर्यंत उत्तम गुणांनी शिक्षण घेण्यास सांगितले. माझा बारावीचा रिझल्ट लागला आणि गुणपत्रिका घेऊन मी तडक बाबांचे ऑफिस गाठले आणि त्यांच्या प्रॉमिसची त्यांना आठवण करून दिली. तेव्हा मात्र त्यांची खात्री पटली. त्यांच्या ऑफिसजवळ रिझवी कॉलेज होते, तिथेच त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा माझा प्रवेश निश्‍चित केला. शाळेत जाणारी बहुतेक मुले अगदी खाताना-जेवताना अगदी झोपेपर्यंत कार्टून्स पाहात असतात, मी शाळेतून आल्यावर जेवताना कुकरी शोज आवडीने बघत असायचो. पदार्थ करताना त्यांची अखंड चालणारी कॉमेंट्रीदेखील माझी आवडती होती. मी कुकरी शोज इतक्‍या आवडीने बघतो, याची वडिलांना कल्पना नव्हती. पण मान्य केल्याप्रमाणे त्यांनी मला हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेऊन दिला. म्हणूनच मी शेफ होऊ शकलो. 

शिक्षणानंतर लगेच नोकरी लागली का? 
वरुण इनामदार : कॉलेजमध्ये असताना मी वेळ मिळेल, तेव्हा लायब्ररीत जाऊन झपाटल्यासारखा कुकिंगविषयक पुस्तके वाचायचो. पण कॉलेजमधील पुस्तके घरी नेऊ देत नसत. काही पुस्तके आपल्या संग्रही असावीत, असे वाटत होते. त्यावेळी ‘कमवा व शिका’ माझ्यासाठी उपयुक्त ठरले. मी बांद्र्याच्या ‘फेंदू सिझलर्स’मध्ये ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जे सांगतील ते काम करण्याची मानसिक तयारी ठेवल्याने मला मोठा फायदा झाला. अगदी भांडी घासण्यापासून, कटलरी पुसून ठेवण्यापर्यंत आणि ऑर्डर सर्व्ह करण्यापासून - किचनपर्यंत या नोकरीने मला सर्व काही शिकवले. याच हॉटेलमुळे मला जॅकी श्रॉफसारखा मित्र, ज्येष्ठ बंधू मिळाला. हे नाते आजही टिकून आहे. 

पदवी मिळण्याच्या तीन वर्षांच्या काळात तू १२ नोकऱ्या केल्यास म्हणे! 
वरुण इनामदार : येस! मला जास्तीतजास्त अनुभव हवा होता. अनुभवापेक्षा मोठा गुरू कोणता? ट्रेनी म्हणून मी आयटीसी (सहार), अँबॅसेडर, लीला, जे डब्लू मॅरियॉट अशा विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या. कोर्स पूर्ण झाल्यावर ओबेराय हॉटेल्स (आताचे ट्रायडेंट - नरिमन पॉइंट) येथे माझी मुलाखत झाली. मुलाखत घेणाऱ्याने विचारले, ‘व्हॉट डू यु नो अबाऊट चीझेस?’ मी पूर्वी कुकिंगवर, त्यांच्या प्रिझर्व्हेशन्सवर खूप काही वाचले होते, म्हणून मी त्याला म्हटले, ‘प्लीज गिव्ह मी अ पीस ऑफ पेपर अँड पेन..’ मी चीझवर एखादा थिसीस लिहावा तशी सगळी माहिती लिहून काढून त्याला पेपर दिला. त्याने पुढे विचारले, ‘तुला एम. एस. ओबेराय (हॉटेलचे मालक) यांच्याबद्दल काय ठाऊक आहे? ओबेराय हॉटेलच्या किती शाखा आहेत?’ मी बेधडक सांगितले, ‘मला या संस्थेत नोकरी द्या, कारण इथे काम केल्याशिवाय मला हे सगळे कसे समजणार? गुगलवर माहिती आहे, पण प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेली माहिती खरी असेल.’ 
अनेक उमेदवार असून मला ‘ओबेराय ट्रेनिंग सेंटर’मध्ये ट्रेनिंग देण्यात आले. हे ट्रेनिंग दोन महिन्यांचे होते. माझी नियुक्ती हल्लीच्या ट्रायडेंट म्हणजेच पूर्वीच्या ‘ओबेराय हॉटेल्स’मध्ये ‘ऑपरेशन्स’मध्ये झाली. 

या नोकरीत तुझा संबंध सेलिब्रिटीजबरोबर यायचा ना? 
वरुण इनामदार : मी इथे १० वर्षे नोकरी केली. मला नोकरी देणाऱ्या अमरजित कुंडले यांचा मी कृतज्ञ आहे. इथे बराक ओबामा ते अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर ते शाहरुख खान अशा सेलिब्रिटीजची सतत वर्दळ असे. या सगळ्या मान्यवरांचे मॅनेजर्स माझ्या थेट संपर्कात असत. जे कुठल्याही वेळी फोन करून त्यांच्या आगमनाविषयी, फूड प्रेफरन्सेस, सिक्‍युरिटी याबद्दल आग्रह धरत. या दहा वर्षांत मी अभावानेच सुटी घेतली असेल... अमिताभ बच्चन वैयक्तिक जीवनात खूप साधे, लो प्रोफाइल असल्याने त्यांना रेस्टॉरंटमध्ये कोपऱ्यातील जागा हवी असे. दाल-भात, भेंडीची भाजी, फुलके, दही इतकेच त्यांचे प्रिय अन्न! 
मला हे सगळे काम आवडत होते, पण आपल्याला आपले असे काही आयुष्य राहिलेच नाही, असे अधूनमधून वाटू लागले. त्यानंतर मी या नामांकित संस्थेला रामराम ठोकला आणि चक्क कुवेतच्या शाही घराण्याची नोकरी स्वीकारली. माझ्या राहण्याची व्यवस्थादेखील त्यांच्या महालात होती. मी या कुटुंबाचा मेनू ठरवत असे. त्यांच्या शाही महालात जगभरातील राजकीय, सामाजिक मान्यवरांचा राबता असे, त्यामुळे मी अतिशय बिझी असायचो. 
एक गंमत सांगतो, माझे एकदा व्हिएतनामला जाणे झाले. तेथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मी केक्‍स, चॉकलेट्‌स, पेस्ट्री केल्या होत्या. नेमके त्याचवेळी बराक ओबामा तिथे आले होते. पेस्ट्री खाल्ल्यावर ते म्हणाले, ‘मुंबईत माझा एक शेफ मित्र वरुण (इनामदार) आहे. तो अशीच पेस्ट्री करतो.’ ते ऐकताच हॉटेलच्या स्टाफने मला खेचून त्यांच्यासमोर नेले. बराक यांनी मला आलिंगन दिले, त्यांच्या खुर्चीवर प्रेमाने बसवले. त्या क्षणी वाटले, मी हेच धन कमावले! 

सध्या नवी इनिंग कोणती? 
वरुण इनामदार : सध्या मी केक्‍स, पेस्ट्रीज, चॉकलेट्‌सची वर्कशॉप्स आणि स्पर्धा घेतो. आपल्या भारतीय महिलांमध्ये कुकिंगचे खूप टॅलेंट आहे. घरगुती केक तयार करणाऱ्या अनेक महिलांना प्रोफेशनल ट्रेनिंग - वाव मिळावा म्हणून मी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करतो. ती हल्लीच गोव्यात मोठ्या प्रमाणात झाली. झेबा कोहलीसारखी नामांकित चॉकलेट क्वीन परीक्षक होती. देशभरांतून हजारो महिलांनी या ‘केक मॅरेथॉन’मध्ये भाग घेऊन पुरस्कार-शिष्यवृत्ती प्राप्त केली. या इव्हेंटचे संपूर्ण आयोजन मी केले होते. मला माझे स्वतःचे फूड चॅनेल सुरू करायचे आहे. फक्त एकच खंत आहे, हे सगळे बघण्यासाठी आज माझे वडील हयात नाहीत. 

विरंगुळा म्हणून काय करतोस? 
वरुण इनामदार : लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी ऐकत मी मोठा झालो. आता सुनिधी चौहान-श्रेया घोषाल यांचीही गाणी ऐकतो. पत्नीबरोबर फिरायला जातो. फूड माझे पॅशन आहेच! 

अभिनेता जॅकी श्रॉफ तुझा जवळचा मित्र आहे... 
वरुण इनामदार : जॅकी श्रॉफ हा उत्तम अभिनेता, स्टायलिश स्टार आणि बॉलिवूडच्या मायाबाजारात माणुसकी असलेला माणूस आहे. आमची निखळ मैत्री आहे.. मी शिकत असताना ज्या हॉटेलमध्ये काम करायचो, तिथे जॅकी वरचेवर यायचा. त्याच भागात राहायचा. तिथे आमची ओळख झाली. जॅकी प्रेमळ, निगर्वी आणि स्वभावाने मोकळा-ढाकळा आहे. आमची मैत्री वाढत गेली. पुढे मी ज्या ज्या हॉटेलमध्ये काम केले त्या त्या ठिकाणी तो जरूर येत असे. काही वर्षांपूर्वी माझे लग्न ठरले. जवळचा स्नेही म्हणून जॅकीला आमंत्रण दिले. तो शूटिंगमध्ये व्यग्र असेल, येण्याची शक्‍यता नाही असे मी गृहीत धरले. पण जॅकी लग्नाला आला. कोहिनूर हॉलमध्ये माझे लग्न होते. पण दादर - माहीम विभागात ५ कोहिनूर हॉटेले - हॉल्स आहेत. जॅकी या पाचही हॉलमध्ये फिरून आला. शेवटी त्याला शिवाजी पार्कचे कोहिनूर सापडले. मला शुभेच्छा देऊन या पठ्ठ्याने हॉलमधला माईक ताब्यात घेतला. आम्ही जलतरंग कार्यक्रम ठेवला होता, त्या वाद्यवृंदाचा त्याने ताबा घेतला. तो देव आनंदचा चाहता असल्याने देव आनंदची गाणी तिथे गाऊ लागला. सगळे पाहुणे जॅकीला त्या रूपात पाहून थक्क झाले.  

संबंधित बातम्या