आनंदाचा प्रवास 

पूजा सामंत 
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

शेफ्स डायरी
अनेक शहरांत कुकिंग - करी क्लासेस घेतलेल्या मास्टरशेफ शाझिया खान हिने वयाच्या नवव्या वर्षी सर्वप्रथम फ्रूट्स कस्टर्ड केले. या तिच्या पहिल्या प्रयत्नाला कुटुंबाने छान दाद दिली आणि या चिमुरडीची पाकशास्त्रातील आवड पुढे वाढतच गेली... शाझियाची आजी आणि आई दोघीही तशा सुगरण. खास पारंपरिक खाद्यपदार्थ आपल्या पुढील पिढीलादेखील ठाऊक असावेत, अशी त्यांची इच्छा. त्यांचं कौशल्य शाझियाने अलगद टिपलं आणि मोठेपणी ती शेफ झाली!

शाझिया, तुला स्वयंपाकाची आवड कशी निर्माण झाली? 
शाझिया खान : शादी से पहले हमारा बहुत बडा परिवार था और घरकी महिलाएं नाश्ते, लंच, डिनरके मेनू पहले से सोचकर रखती थी। फिर भी महिने के हर दिन खाने में विविधता होती थी। आई, आजीला स्वयंपाकघरात मदत करणे किंवा प्रत्यक्ष मदत न करणे पण तिथे लुडबूड करणे याची मलाही सवय लागली. आई, आजी स्वयंपाकघरात किती रमतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले - अनुभवले. याच कालावधीत मी एक सॅलड आणि नंतर फ्रूट्स कस्टर्ड केले. ते चवीला कसे झाले होते कोण जाणे; पण सगळ्यांनी भरभरून त्याची तारीफ केली. माझा हुरूप वाढला. मीदेखील आई-आजीसारखी उत्तम रांधू  शकते ही माझ्या आत्मविश्वासाची पहिली पायरी होती. 

मग स्वयंपाकाची सूत्रे हातात कधी आली? आणि व्यावसायिक शेफ हा प्रवास कसा सुरू झाला? 
शाझिया खान : आमचे पूर्ण कुटुंब खवय्ये. पण रसना तृप्त करणारे हात, स्वयंपाकाची आवड माझ्यात वंशपरंपरेने आली असली तरी त्या आवडीचा उपयोग शेफ होण्यासाठी करता येईल हे माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या ध्यानात आले नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण केले, मास्टर्स केले आणि पुढे लग्नाच्या बोहल्यावर उभी राहिले. वैवाहिक जीवनात कधी सुनेकडून अपेक्षा म्हणून, त्या पुढच्या टप्प्यावर मुलांना पौष्टिक, चविष्ट खायला द्यावे म्हणून मी माझ्या रोजच्या कुकिंगकडे अधिक लक्ष देत गेले. मी माझ्या रोजच्या आहारात काही स्किल्स शिकले, जाणून घेतले. हा माझ्यासाठी एक नवा प्रवास, एक नवी दिशा होती. मी ठरवून शेफ झाले नाही. अकिब (वय २४) आणि अर्ज़ान (वय २०) या दोन्ही मुलांसाठी, कुटुंबासाठी माझे पॅशन वाढतच गेले. मी जे काही करत होते, ते मुले - त्यांचे मित्र, पती मकसूद अली - त्यांचे सहकारी, पै-पाहुणे अतिशय आवडीने खात, मला दाद देत, रेसिपी मागून घेत. हे सगळे माझ्यासाठी टॉनिकसारखे होते. नंतर माझे पती आणि कुटुंबीयांनी मला ‘मास्टरशेफ’ (सीझन २) मध्ये भाग घेण्याचा आग्रह केला. सुमारे एक हजार स्पर्धकांमधून मी १२ स्पर्धकांमध्ये आले. शेवटी ५ स्पर्धकांमध्ये मी रनर अप ठरले. माझ्यात व्यावसायिक शेफ होण्याचे गुण आहेत हा शोध मला या स्पर्धेत लागला. इथेच माझी मला ओळख झाली. 

पुढच्या टप्प्यावर काय घडले? 
शाझिया खान : मला एखादा पदार्थ सुचला, की झोपेतून उठून मी तो डायरीत टिपून ठेवते. यामुळे माझी स्वतःची अशी खाद्यपदार्थांची डायरी तयार झाली आहे. ‘मदर्स मेनू’ या एल एफ वाहिनीसाठी कुकिंग शो करणे यामुळे मला वाव मिळत गेला. प्रेग्नन्सीदरम्यान होणाऱ्या मातांनी काय खावे, अपत्य झाल्यानंतर त्यांचा आहार, शिशूचा आहार कसा असावा यावर संशोधन करून त्या रेसिपीज, शोमध्ये सादर करणे हे मोठे आव्हान होते. सगळ्या पाककृती वसुधा सैनिक या आहारतज्ज्ञाकडून मी पारखून, अभ्यासून घेतल्या होत्या. माझ्या गर्भारपणाच्या काळातील काही खास रेसिपीजदेखील मी या शोमध्ये सादर केल्या. गर्भवती स्त्रीचा आहार म्हणजे मोठी जबाबदारी असते. तिने अन्न आवडीने खाल्ले पाहिजे; शिवाय तिचे आणि गर्भातील शिशूचे पोषण होणे ही फार मोठी गरज असते. या काळात तिने काय खावे - काय खाऊ नये याबद्दल अनेक जण सल्ले देतात, ते सगळे खरे असतातच असे नाही. त्याबाबतदेखील या शोमध्ये मी मार्गदर्शन करते. जगभर कुकिंग वर्कशॉप्स घेते. न्यूयॉर्कपाठोपाठ चेन्नई इथे खूपच प्रतिसाद मिळाला. याशिवाय दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये नोकरी करते. त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये मी काम करते. मुलांना शिकवतेही, मी एमबीए केले आहे. 

एखादा पदार्थ करताना कधी काही चुका घडल्यात का? 
शाझिया खान : सुदैवाने चुका झाल्या नाहीत; एकच चूक घडली.. त्यातही मला वाटते थोडा गलथानपणा माझ्याकडूनच घडला. शो दरम्यान मला एग हलवा करायचा होता, म्हणून त्या हलव्यात मी साखर घालायला हवी होती. ओट्यावर मिठाची बरणी होती. कॅस्टर शुगर समजून मी ते मीठ घातले. ज्या व्यक्तीने हा हलवा टेस्ट केला, त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. या चुकीनंतर मी सावध झाले; पण नंतर माझ्याकडून कधी चुका झाल्या नाहीत. 

ग्लोबल फूड ट्रेंड्स कोणते? भारत जागतिक नकाशावर याबाबत कुठे आहे? 
शाझिया खान : हल्ली एका नव्या ट्रेंडबद्दल लोक खूप प्रभावित झालेले दिसतात. हा ट्रेंड म्हणजे ‘फार्म टू होम’! आपल्या आहाराबाबत चिकित्सक, चोखंदळ असलेली नवी पिढी शेतातील अन्न, धान्य, भाजीपाला थेट शेतकऱ्याकडून मागवू पाहते आहे. प्रीझर्व्हेटिव्ह्ज टाळण्यासाठी ‘फार्म टू होम’ ही संकल्पना निर्माण झाली. तोच आजचा ट्रेंड झाला आहे; अगदी ग्लोबलीदेखील! ऑरगॅनिक पदार्थांबद्दल लोकांना खास उत्सुकता निर्माण झाली आहे. या वस्तूंसाठी अतिरिक्त किंमत देण्याचीदेखील त्यांची तयारी असते. मध्य पूर्वेतील खाद्यसंस्कृतीचा ट्रेंड वाढता आहे. प्लास्टिकमध्ये असलेले अन्नपदार्थ खाण्यास नापसंती दिसून येते. एकूण काय, तर आपण काय खातोय याबद्दल हल्ली जागरूकता वाढली आहे. रोजच्या आहारात सॅलड्स-सूपचे प्रमाण वाढलेले दिसून येते. तळलेले पदार्थ, शिळे अन्न टाळण्याकडे कटाक्ष दिसून येतो. फ्रायपेक्षा बेक्ड पदार्थ उत्तम, हे समजून चुकले आहे. त्यामुळे ‘योग्य आहार, उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ हे नवीन पिढीला समजून चुकले आहे. तोच सामाजिक ट्रेंड ठरतो. 

शेफ शाझियाची सिग्नेचर डिश कोणती? 
शाझिया खान : ‘शामे कबाब’ आणि ‘शाही जाफ्रान पुलाव’ मी अधिक पारंपरिक पद्धतीने करते. घरातील प्रत्येक कार्यक्रमात मला हा पदार्थ आवर्जून करण्यास सांगितले जाते. गर्भवती महिला आणि बाळंतिणी यांच्या मेनूतही मी हे पदार्थ समाविष्ट केले आहेत. अनेक पौष्टिक सूप्स, सॅलड्स, कडधान्ये, नाचणी आणि अन्य धान्यांच्या भाकरी अशा सत्व असलेल्या पदार्थांचा मी सातत्याने वापर करत असते. 

काही पुरस्कार? पाकशास्त्रावर पुस्तकेही लिहिली आहेस ना? 
शाझिया खान : रोशनी यंग इंडिया अचिव्हर्स अवॉर्ड २०१६ मध्ये फूड अँड बेव्हेरेजेस या श्रेणीत मला पुरस्कार मिळाला होता. व्हॉट्‌स ऑन द मेनू - बाय शाझिया खान या पहिल्याच पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हल्लीच फूड फूड वाहिनीतर्फे मला सेलिब्रिटी शेफ हा पुरस्कारही मिळाला. २०१९ मध्ये टाइम्सतर्फे यंग महिला उद्योजक हा पुरस्कार ‘फूड कॅटॅगरी’मध्ये मिळाला. 

यशस्वी शेफ होण्यासाठी कुठल्या गुणांची आवश्यकता असते? 
शाझिया खान : अगदी स्वतःचे यू ट्यूब चॅनेल सुरू करूनही तुम्ही शेफ म्हणून लौकिक मिळवू शकता, हे आता ध्यानात घ्यायला हवे. त्यासाठी फार मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज नाही. फक्त कुकिंगची आवड मात्र असावी. त्यात झोकून देऊन काम करणे आलेच. 

आगामी योजना काय? 
शाझिया खान : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी एक कलिनरी स्कूल सुरू करावे अशी खूप इच्छा आहे. स्वयंपाक करणे ही माझ्यासाठी ‘जॉयफूल राइड - आनंददायी प्रवास’ आहे. इतरांनाही या प्रवासाचे साक्षीदार करता यावे, अशी प्रामाणिक इच्छा आहे...

संबंधित बातम्या