जॉर्जियाचं चित्र जग

मधुरा पेंडसे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

चित्र-गमती 
चित्रातले जग कसे असते?

‘याला संयुक्त डोळे असतात, प्रत्येक डोळा हजारो छोट्या डोळ्यांचा बनलेला असतो, जवळच्या हालचाली तो चटकन टिपू शकतो!' बाई वर्गात भुंग्याच्या डोळ्याचे वैशिष्ट्य सांगत होत्या. "त्याला आपल्यासारखे दिसत नाही, अल्ट्रा व्हायलेट किरणं दिसतात..' वगैरे.. तास संपतच आला होता. 

ऋताची नजर तिच्या जीवशास्त्राच्या नव्या वहीवर पडली. वहीच्या कव्हरवर कॅमेऱ्यानी झूम केल्यावर दिसतं तसं पांढऱ्या गुलाबाचं एक चित्रं होतं. 

ऋतानी बाईंना बाहेर पडताना गाठलं आणि विचारलं, "असं दिसत असेल का भुंग्याला?' 

"कीटकांना नेमकं कसं दिसत असेल हे मला ठाऊक नाही, पण या चित्राबद्दल तू आर्ट टीचरला नक्की विचार,' बाई म्हणाल्या. 

मधल्या सुटीनंतर चित्रकलेचा तास होताच. तिने सुटीत हे चित्र जसंच्या तसं काढून पाहिलं. 

वहीच्या आतल्या पानावर चित्राची माहिती दिली होती. "ऍब्स्ट्रक्‍शन व्हाइट रोझ, 1927 बाय जॉर्जिया ओकिफ.' 

आर्ट टीचरनी ओकिफच्या चित्राबद्दल खूप माहिती दिली. 

ऋताला वाटलं भुंग्याच्या छोट्याशा डोक्‍यात, छोट्या छोट्या हजारो डोळ्यांनी त्याचा मेंदू कशा प्रकारची प्रतिमा तयार करत असेल हे तोच जाणे! म्हणजे आपल्याला जसं दिसत तसं भुंग्याला दिसत नाही! 

पण मला जसं दिसतं तसंच जॉर्जियालाही दिसत असणार.. तिच्या डोळ्यांना नेहमीचा गुलाब किती वेगळा दिसला! काय सांगितलं असेल आर्ट टीचरनी ओकिफबद्दल? 

मित्रांनो, जॉर्जिया ही एक अमेरिकन चित्रकार. अगदी सोपे आकार वापरून ती निसर्गचित्रं काढत असे. चित्रकार व्हायचं असं तिनं वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच ठरवलं होतं. ती फिरायला जात असे तेव्हा तिचं निरीक्षण चालू असे. तिच्या डोळ्यांना फुलं, डोंगर यांचे आकार जसे दिसले तसे ती तिच्या चित्रात काढत असे. तिनं काढलेली फुलं एखाद्या भिंगातून पहिल्यासारखी मोठ्ठी आणि कॅनव्हासभर पसरलेली दिसतात. तिची निसर्गचित्रं आणि फुलांची चित्र जगप्रसिद्ध आहेत. फुलांचा रंग, आकार आणि रचना ओकिफसाठी एक प्रेरणा होती. 

न्यू मेक्‍सिकोमध्ये असताना ती अनेक वेगवेगळ्या आकारांचे दगड, हाडांचे अवशेष, वाळलेल्या फांद्या असं बरंच काही गोळा करायची. हे सगळं तिच्या चित्रात दिसायचं. हाडांचे अवशेष आणि प्राण्यांच्या कवट्या तिला फार आकर्षक वाटत. 

हे तिचं निसर्गाकडं "पाहणं' वयाच्या लहान वर्षांपासून चालू होतं. आकार, रंग आणि रेघा यांच्या रचनांचे अनेक प्रयोग ती करत असे. 

हे ओकिफचं एक निसर्गचित्र! या डोंगररांगा आहेत हे नक्की समजतं. पण एखाद्या फोटोत दिसल्याप्रमाणं किंवा रिऍलिस्टिक चित्रापेक्षा हे वेगळं वाटतं. या चित्राचं वर्णन तुम्ही कसं कराल? 

तुम्ही टेकडीवर, डोंगरावर फिरायला जातच असाल.. तिथं खाली पडलेल्या छोट्या वाळक्‍या फांद्या, दगड, पिसं अशा कितीतरी गंमतशीर आकाराच्या आणि रंगांच्या गोष्टी सापडतील. त्या गोळा करा, घरी येऊन त्याचं रेखाटन करून पाहा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या