बिंदूभोवती...
चित्र-गमती
चित्रातले जग कसे असते?
एका बिंदूतून रेष निघते
रेष कुठे कुठे घेऊन जाते?
रेषेच्या पाठीवर होऊन स्वार
चला जाऊया दूर फार..
मन एकाग्र करण्यासाठी प्रसिद्ध चित्रकार एस. एच. रझा यांना त्यांच्या शाळेतल्या शिक्षिका, एका बिंदूकडे एकटक पाहायला सांगायच्या.
त्यांनी ‘अंतर्मनातील रूपकात्मक बिंदू’ या विषयावर त्यांच्या चित्रांमध्ये अनेक प्रयोग केले. साधारण सत्तरच्या दशकापासून त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यासारख्या भौमितिक आकारांच्या कलात्मक रचना रझांच्या चित्रात दिसतात.
रेषा उभ्या, आडव्या, तिरक्या, वक्र कशाही असू शकतात. चित्र क्रमांक १ मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या रेषा दिसताहेत? एकमेकांना छेदणाऱ्या रेषा आणि समांतर रेषा कोणत्या सांगू शकाल?
जेव्हा रेषा, आकार, रचना पुन्हा पुन्हा काढल्या जातात तेव्हा त्याचा एक पॅटर्न तयार होतो. चित्र क्रमांक १ मधील चित्रात कोणते पॅटर्न सापडताहेत?
ही शैली विकसित होईपर्यंत रझांनी अनेक वेगवेगळी चित्रे काढली. त्यांच्या फ्रान्समधील खेड्यांच्या चित्रात कोणतीही ठराविक वेळ आणि जागा दिसत नाही. या चित्रांमध्ये मनुष्याकृतीचाही अभाव दिसतो. चित्र क्रमांक २ मध्ये चित्रात भौमितिक आकार दिसताहेत का?
दृश्यकलेत आणि भूमितीत काय एकसारखे असेल?
आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टींमध्ये भूमिती दिसते, पाण्याचा ग्लास, वही, टेबल, पंखा, खिडकी अगदी सगळीकडे.
तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या मोजक्या वस्तूंची यादी करा त्या वस्तूंमध्ये भौमितिक आकार शोधा आणि जसे दिसतेय तसे त्याचे चित्र न काढता, रूपकात्मक चित्र काढून पाहा!