दालीची स्वप्नचित्र 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

सालवेडोर दालीने त्याला दिसलेल्या स्वप्नातील दृश्‍य चित्रात काढली, शिल्प बनवली आणि चित्रपटसुद्धा केले. 

वितळणारी घड्याळं, तरंगणारे डोळे, मानवी चेहेऱ्यासारखे दिसणारे ढग आणि शरीरासारखे दिसणारे दगड असं सगळं तो चित्रात दाखवत असे. 

हे विषय जरा विचित्रच वाटाताएत ना! विचार करा, तुम्हाला पडलेली स्वप्नं रंगवायची झाली तर? मला खात्री आहे, की तीसुद्धा अगदी गमतीशीर दिसतील! 

मागील भागात आपण रिने मॅग्रिट या चित्रकाराची काही पेंटिंग्ज पाहिली. या चित्रकाराप्रमाणं दालीसुद्धा अतिवास्तववादी म्हणजे सररिॲलिझम या ग्रुपचा एक चित्रकार होता. 

या चित्रकारांना ‘सिग्मंड फ्रॉईड’ नावाच्या मनोविश्‍लेषकाचे विचार आवडायचे. 

फ्रॉइडचा विश्‍वास होता, की आपल्या मनाचे दोन भाग आहेत. एक भाग रोजचे निर्णय घेते, म्हणजे आज शाळेत सायकलनं जायचं की चालत? या प्रकारचे.. आणि मनाच्या दुसऱ्या भागात खोलवर आपल्या आठवणी जमा होतात. या नव्या-जुन्या आठवणींची सरमिसळ झोपेत स्वप्नांच्या स्वरूपात दिसायला लागते! सालवेडोर दाली अशीच स्वप्नं त्याच्या चित्रात दाखवायचा प्रयत्न करीत असे. 

वरील चित्रात हातात धरलेलं अंड आणि पाण्यापाशी बसलेला माणूस एकसारखा दिसतोय? 

या चित्रातील बॅकग्राऊंडमध्ये लहान लहान तपशिलात अनेक अजब गोष्टी आहेत.. काय काय दिसतंय तुम्हाला? 

या सररिॲलिस्ट चित्रकारांना अनेक गमतीशीर खेळ तयार करायला आणि वेगवेगळ्या वस्तू एकमेकांशी जोडायला आवडत असे. या चित्रविचित्र वस्तू कधी मजेशीर आणि कधी धक्कादायक पण दिसत! दालीचं हे शिल्प पाहा. या शिल्पाचं नाव आहे ‘लॉबस्टर टेलिफोन.’ तुम्हाला आवडेल या फोनवर गप्पा मारायला? 
तुम्ही कोणत्या दोन वस्तू एकमेकांना जोडून सररिॲलिस्ट शिल्प बनवाल? 

दालीनं अनेक माध्यमं वापरून कलानिर्मिती केली. त्यानं फर्निचर बनवलं, आभूषणं बनवली आणि नाटकांसाठी बॅकड्रॉप्ससुद्धा केले. तुम्ही त्याच्या कलाकृती नेटवर नक्की पाहा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या