पोलका डॉट प्रिन्सेस 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 19 जुलै 2018

चित्रातले जग कसे असते?
 

`पोलका डॉट प्रिन्सेस’ या नावानी गाजलेल्या या आर्टिस्टचे खरे नाव आहे यायोयी कुसामा. यायोयी चित्र काढते, शिल्पे बनवते, प्रायोगिक कला म्हणजे नाट्यपूर्ण सादरीकरणसुद्धा करते. या सगळ्या कलाकृतींमध्ये एक गोष्ट मात्र नियमित असते ती म्हणजे ठिपके! 

यायोयी या ठिपक्‍यांची एक गोष्ट सांगते, ती लहान असताना तिला एकदा असे भासले की ती असंख्य फुलांनी घेरली गेली आहे आणि ती फुले तिच्याकडे पाहात आहेत. तसेच दूरवर पसरलेल्या या फुलांची डोकी ठिपक्‍यांची आहेत. या प्रसंगाची आठवण तिच्या सगळ्या कलाकृतींमध्ये दिसते. 

दहा वर्षांची असताना यायोयीने तिच्या आईचे हे चित्र काढले होते. तिच्या आईवडिलांना ती चित्रकार व्हावी असे वाटत नसे. तिने काढलेली चित्रे आईने फाडली तर यायोयी पुन्हा चित्रे काढायची. कधी कधी तर तिच्याकडे पेन्सिल किंवा रंग नसले तर ती चक्क चिखल माती वापरून गोणपाटावर चित्र काढे. पुढे तिने हट्टाने कला विद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेतले. 
मोठी झाल्यावर ती न्यूयॉर्कला कलेच्या ओढीने गेली. जपानहून इतक्‍या दूर नवीन देशात आल्यावर तिला भीती वाटली असेल कदाचित. पण तिला न्यूयॉर्कमध्ये कलाक्षेत्रात काहीतरी नवीन करायचे होते. 

ठिपके वापरून ती इन्स्टॉलेशन आर्ट म्हणजे कलात्मक रचना करते. आरसे असलेल्या खोल्यांमध्ये शेकडो LED लाइट वापरून ही रचना तिने केली आहे. ही रचना पाहिलेले लोक सांगतात, की या असंख्य छोट्या छोट्या रंगीत ठिपक्‍यांच्या खोलीत तुम्हीसुद्धा या जागेत एखाद्या बिंदूप्रमाणे हरवून जाऊ शकता. 

यायोयी कुसामा कविता करते, तिने पुस्तके लिहिली आहेत, तिने प्रायोगिक चित्रपट केले आणि फॅशन डिझाईनिंगदेखील केले आहे. आता यायोयी ८९ वर्षांची आहे. ती अजूनही कलाकृती करते.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या