पॉल गोगॅंची वेगळी चित्रं 

मधुरा पेंडसे 
शुक्रवार, 11 मे 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते? 

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पॉल गोगॅं हा चित्रकार वयाच्या चाळिशीपर्यंत बॅंकेत काम करत असे! 

लोककला आणि आदिमकलेमध्ये त्याला रुची होती. बॅंकेच्या कामातून मोकळा झाला, की तो चित्र काढीत असे. त्याच्या घराजवळच्या एका कॅफेमध्ये तो अनेक चित्रकारांच्या भेटी घेई. त्यांच्याबरोबर चित्रकलेबद्दल गप्पा मारत असे. या गप्पा आणि त्यांच्याबरोबर चित्र काढणे हे पॉलसाठी चित्रकलेचे धडेच होते. 

पुढं त्यानं पूर्ण वेळ चित्रकलेसाठी देण्याचं ठरवलं. शहरी गजबजाटापासून लांब, शांत ठिकाणी जाऊन चित्र काढण्यासाठी त्यानं ताहिती या बेटांवर राहायला सुरवात केली. वर दाखवलेलं ‘व्हेअर डू वुई कम फ्रॉम? व्हॉट आर वुई? व्हेअर आर वुई गोईंग?’ हे चित्र पॉल गोगॅंनं या बेटावरच काढलं होतं. हे चित्र उजवीकडून डावीकडं बारकाव्यानं पाहा. काय काय दिसतंय? 

उजवीकडं खालच्या बाजूला एक लहान बाळ आहे, मध्यभागी असलेली मनुष्याकृती झाडावरून फळ काढतेय आणि डावीकडं एक वृद्ध स्त्री बसलेली आहे. या चित्रात अजून बऱ्याच गोष्टी आहेत, काय शोधायचा प्रयत्न करत असेल हा चित्रकार? 

पॉल गोगॅं निसर्गाचा आधार घेई पण जसं दिसतं त्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीनंही तो चित्र काढून बघत असे. बऱ्याचदा तो वास्तवापेक्षा निराळेच रंग वापरून पाहत असे. ‘रायडर्स ऑन द बीच’ या चित्रात समुद्रकिनारा चक्क गुलाबी आणि निळ्या रंगाच्या छटा वापरून दाखवला आहे. चित्रातील बाकी गोष्टी म्हणजे घोडे, समुद्र आणि माणसं जशी दिसतात तशी काढली आहेत. वास्तविक आणि अवास्तविक गोष्टी एकाच चित्रामध्ये आल्यानं हे दृश्‍य काहीसं अद्‌भुत किंवा रहस्यमय नाही वाटत? 

त्याकाळी पॅरिसच्या जवळच्या खेड्यापाड्यातसुद्धा शहरीकरण व्हायला सुरवात झालेली होती. याविरुद्ध ताहितीमध्ये दिसलेलं शांत जनजीवन या चित्रांमध्ये दिसतं. 

तुम्हाला काय वाटतं पॉल गोगॅं याच्या चित्रांबद्दल? शहरांपासून लांब, जिथं मोठे रस्ते, गाड्या, उंच इमारती आणि प्रकाशाचा झगमगाट नाही अशा ठिकाणी गेलाय तुम्ही कधी? तिथं दिसलेल्या रंगांमध्ये, आकारांमध्ये आणि शहरात दिसणाऱ्या रंगात आणि आकारांमध्ये काय वेगळेपणा वाटला?

फोटो फीचर

संबंधित बातम्या