कार्टून्स, कॉमिक्‍सची डॉटेड चित्रं 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 24 मे 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

चित्रात दिसणारा विस्फोट खरा वाटतो? की तुमच्या आवडत्या कॉमिक पुस्तकांतला? 

हे चित्र आहे रॉय लिश्‍टनस्टाईन (Roy Lichtenstein) या अमेरिकन आर्टिस्टचं. ‘लिश्‍टनस्टाईन’ काय अवघड नाव आहे ना! पण त्याची चित्रं गमतीशीर आहेत बरं का! 

काही चित्रकार १९६० च्या सुमारास ‘पॉप्युलर’ म्हणजे लोकप्रिय गोष्टींची चित्रं काढत असत. त्या काळी अमेरिकन संस्कृतीत टीव्ही, सेलिब्रिटिज, फास्ट फूड, पॉप म्युझिक आणि कार्टून्स अत्यंत लोकप्रिय होऊ घातले होते. या चित्रकारांना ‘पॉप आर्टिस्ट’ असंच म्हणायचे. या चित्रकारांपैकी ‘रॉय लिश्‍टनस्टाईन’ हा एक प्रसिद्ध चित्रकार होय. 

रॉयनं शिल्प, म्युरल्स, सिरॅमिक्‍स अशा बऱ्याच माध्यमांत काम केलं; पण जगभरात त्याची चित्रकार अशीच ओळख आहे. 

त्या काळच्या प्रिंटर्समध्ये मोजकेच रंग असत, त्याचप्रमाणं रॉयसुद्धा त्याच्या चित्रांमध्ये प्रिंटिंगच्या शाईतल्या रंगांचं अनुकरण करणारे रंग वापरत असे. आज आपण अगदी घरातसुद्धा रंगीत प्रिंट छापू शकतो. पण तेव्हा काही असे कॉम्पॅक्‍ट प्रिंटर्स नव्हते! तेव्हा वर्तमान पत्रातील कागदावर रंगीत मजकूर किंवा चित्र छापण्यासाठी  ‘बेन डे डॉट्‌स’ ही एक प्रिंटिंग पद्धत होती. 

हे चित्र जरा लांबून पाहिलं तर सगळे रंग एकत्र, सलग पसरल्यासारखे दिसतील. पण जवळून पाहाल तर असंख्य रंगीत बिंदूंनी भरलेलं दिसेल. अमेरिकन कॉमिक पुस्तकांच्या चित्रणातील रंग वापरून केलेल्या चित्रांसाठी लिश्‍टनस्टाईन प्रसिद्ध होता. प्रेम आणि युद्धाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कथा चितारणाऱ्या कॉमिक आर्टिस्टची चित्रं त्याला फार आवडायची. 

काही कलासमीक्षकांना त्याची चित्रं कॉमिक आर्टच्या थेट कॉपी वाटायच्या. लिश्‍टनस्टाईनचं म्हणणं असं, की तो त्याच्या चित्रात खूप बदल करी, अगदी एकेका बिंदूत! 

लिश्‍टनस्टाईनच्या चित्रांबद्दल तुम्हाला काय वाटतं?

फोटो फीचर

संबंधित बातम्या