अँडीची पॉप आर्ट
चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?
दोस्तांनो, मागच्या लेखात आपण रॉय लिश्टनस्टाइन या पॉप आर्टिस्टची चित्रं पहिली. बाजारातील लोकप्रिय उत्पादनं, नट-नट्या, कॉमिक बुक्स अशा गोष्टी पॉप आर्टिस्टच्या चित्रांचा विषय होता. अनेक माध्यमं वापरून या पॉप्युलर गोष्टींच्या कलाकृती होत. बाजारातील उत्पादनांप्रमाणंच या कलाकृतींच्या असंख्य प्रतिदेखील तयार केल्या जात.
या पॉप आर्ट मूव्हमेंटमध्ये अनेक चित्रकारांचा सहभाग होता. त्यापैकी अँडी वॉरहोल हा एक प्रसिद्ध कलाकार होय. हासुद्धा अमेरिकन लोकप्रिय संस्कृती आधारे चित्र काढत असे. कोकाकोला, कॅम्बेल्स सूप (त्याकाळी हे सूप लोकांच्या अत्यंत आवडीचं होतं).. असे वेगवेगळे ब्रॅंड आणि त्यांचे प्रॉडक्ट त्याच्या चित्रात दिसतात.
टोमॅटो सूप कॅन हा काय चित्राचा विषय असू शकतो? अँडी सांगत असे, ‘मी हे सूप प्यायचो. वीस वर्षं हे माझं रोजचं दुपारचं जेवण असे.’ त्यानं कॅम्बेल्स सूपच्या अनेक प्रति बनवल्या.
वॉरहोल उजळ रंग वापरून सिनेमातल्या पॉप्युलर नट-नट्यांच्या फोटोवरून स्क्रीन प्रिंटिंग करीत असे. लाकडी फ्रेमला जाळीदार कापड ताणून लावल्यावर त्यावर एखाद्या डिझाइनचं स्टेन्सिल म्हणजे कापून मिळवलेले छापे ठेवतात. त्यातून शाई फिरवल्यावर हव्या त्या पृष्ठभागावर मूळ डिझाईन उमटतं.
अँडी वॉरहोलनं प्रिंट्सबरोबर सिनेमा, मूर्तिकाम, चित्रकला अशा अनेक माध्यमांत काम केलं.
वॉरहोलच्या स्टुडिओला त्यानं मजेशीर नाव दिलं होतं - ‘द फॅक्टरी’; म्हणजे कलाकृती बनवणारा कारखाना!
त्याला कपडे, अन्नपदार्थ या सारखेच कला हेसुद्धा एक उत्पादन वाटे. ज्या सातत्यानं बदलत असतात अशा आधुनिक, नवनवीन गोष्टींची अँडीला आवड होती.
अँडी आज असता तर त्यानं कुठल्या कुठल्या पॉप्युलर गोष्टींची चित्र बनवली असती?