पिएटची ॲबस्ट्रॅक्‍ट आर्ट 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 21 जून 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

मित्रांनो, तुम्हाला मागच्या लेखातील पिकासोचे संगीतकार आठवतात? आणि त्याची आतून बाहेरून दिसणारी गिटार? समोर जे आहे ते तसेच्या तसे न काढता स्वतःला ते कसे दिसतेय ते काढायचा प्रयत्न पिकासो करत असे. या कला प्रकाराला ॲबस्ट्रॅक्‍ट आर्ट म्हणजे अमूर्त कला असे म्हणतात. या कलाप्रकारात माणसे, निसर्ग किंवा एखादी वस्तू अशा गोष्टींचे रेखाटन चित्रकार स्वतःला दिसणाऱ्या रंग, आकार आणि टेक्‍श्चरच्या आधारावर करतो असे म्हणता येईल. 

पिएट मॉनड्रिअन (Piet Mondrian) हादेखील एक ॲब्स्ट्रॅक्‍शनिस्ट चित्रकार होता. त्याला नृत्यकलेचीही आवड होती.. गमतीचा भाग म्हणजे, त्याला फ्री स्टाइल, फास्ट डान्स आवडे. त्याच्या एका कलाकृतीचे नाव ‘ब्रॉडवे बुगी वूगी’ आहे. हा त्याकाळचा एक लोकप्रिय नृत्यप्रकार होता. 

चित्र काढताना मॉनड्रिअन ट्यूबमध्ये मिळतात ते रंग तसेच्या तसे न वापरता ते मिक्‍स करून मग कॅनव्हासवर लावीत असे. तो बऱ्याचदा लाल, पिवळा आणि निळा या प्राथमिक रंगांची चित्रे काढी. 

या चित्राकडे पाहून वाटेल की त्याने पट्टीच्या आधारे या रेघांचे अंतर ठरवले. तो विचार करून चित्राची रचना करीत असे. या चित्रात कॅनव्हासच्या बाजूने लाल, निळा, पिवळा रंग तर मध्यभागी केवळ पांढरा रंग दिलाय. पिएटच्या बऱ्याच रचना (compositions) या प्रकारच्या आहेत. (साधारणपणे चित्रातील रेषा, रंग कॅनव्हासवर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर ज्या प्रकारे मांडतात त्याला कॉम्पोझिशन/रचना म्हणता येईल.) 

पिएट मॉनड्रिअन त्याच्या चौकोनी, त्रिकोणी चित्रांसाठी ओळखला जातो. पण सुरवातीला तो रिॲलिस्टिक म्हणजे जसे दिसतेय तसे चित्र काढत असे. त्याला निसर्ग चित्र आणि मुख्यतः झाडे काढायला आवडत असे. 

या चित्रात झाडासारखा आकार दिसतोय तुम्हाला? या झाडाचे खोड आणि फांद्या उभ्या आडव्या रेषांच्या जाळ्यांनी बनल्या आहेत आणि त्यामुळे या चित्रातदेखील चौकोन, त्रिकोणासारखे भौमितिक आकार दिसतात. 

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पॅरिस ही जागा कलाकारांसाठी महत्त्वाची होती. मॉनड्रिअनदेखील कला प्रयोग करण्यासाठी पॅरिसमध्ये गेला. मॉनड्रिअनच्या चित्रांचा प्रभाव अनेक चित्रकारांबरोबर फॅशन डिझाईनिंग ते फर्निचर डिझाईनिंगपर्यंत पडलेला दिसतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या