तयार वस्तूच कला!
चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?
रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूंकडे ‘कलाकृती’ म्हणून बघता येईल? उदा. भांडी, बेसिन, अगदी टॉयलेटचे भांडेपण!
मार्सेल दृशॉ, कारंजे
Marcel Duchamp
Fountain १९१७
पहिल्या महायुद्धाच्या सुमारास ‘डाडाइझम’ ही कलाचळवळ स्वित्झर्लंडमध्ये सुरू झाली. डाडा (Dada) हे काय नाव आहे? या चळवळीचे मूळ असच गमतीशीर आहे. लोकांना गोंधळात टाकण्यासाठी केलेली ही एक कलाविरोधी चळवळ होती. मार्सेल दृशॉ पहिल्या ‘डाडाईस्टां’पैकी एक होय. मार्सेल दृशॉचा जन्म फ्रान्समध्ये झाला. बुद्धिबळ त्याचा अत्यंत आवडीचा खेळ. लहानपणी तो कार्टून काढीत असे. पॅरिसमध्ये तो खास चित्रकला शिकण्यासाठी गेला होता.
‘नग्नाकृती - जिना उतरताना’ ही कलाकृती १९११ मध्ये प्रसिद्ध झाली. या चित्रात एक स्त्री स्लो-मोशन मध्ये जिना उतरते आहे, असे चित्र काढले आहे. त्यापुढे त्यानी एकापेक्षा एक गमतीशीर कलाकृती सादर केल्या.
तयार वस्तूच ‘कला’ म्हणून दृशॉ प्रदर्शनात लावत असे. ‘रेडिमेड आर्ट’ म्हणजे तयार वस्तूंच्या या प्रदर्शनात, सायकलचे उलटे चाक, बर्फ काढायचे फावडे, बाटल्या ठेवण्याचा खण (बॉटल रॅक) अशा वस्तू असत. त्याचा निर्मितीला विरोध होता. या वस्तू तो स्वतः करीत नसे, तयार केल्या वस्तूच थेट दालनात आणून ठेवी. मार्सेल दृशॉच्या या कलाकृतींमुळे अनेकांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
हे चित्र एका दरवाजाचे आहे. कलादालनात हे कलाकृती म्हणून पहिले जाते. पण मुळात हा दरवाजाच आहे. मजेशीर आहे ना?
तयार वस्तू वापरून आणि त्या वेगळ्या पद्धतीने दालनात मांडून कलाजगतात त्याचा प्रभाव पडला. ‘निर्मिती’ या गोष्टीला विरोध असल्यामुळे शेवटची काही वर्षे तो फक्त बुद्धिबळ खेळत असे. ‘सध्या काय करता आहात?’ असे विचारले तर, ‘श्वासोच्छवास!’ असे उत्तर देई.
मार्सेल दृशॉ हा इसम खरोखर कोड्यात टाकणारा आहे!