शब्द की चित्र? 

मधुरा पेंडसे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

काही चित्रकारांना निसर्गाऐवजी शब्द आणि अक्षरांची चित्रे काढायला आवडतात! 

कलेचे जग भले मोठे आहे. इतके कलाप्रकार असू शकतात की गोंधळात पडायला होते. तुम्हाला कधी ‘शब्दा’त चित्र दिसले आहे? भाषेच्या गृहपाठात? जो टिल्सन यावर (Joe Tilson) `येस’ म्हणेल. त्याने काय दाखवलेय या चित्रात? काही कलाकार शब्दांची चित्रे का आणि कशी करतात ते बघूया. 

कधी कधी कलाकार कशाचा विरोध दाखवण्यासाठी शब्दांचा उपयोग करतात. ‘आर्ट नॉट वॉर’ हे चौकोनी चित्र बॉब आणि रॉबेर्टा स्मिथ (Bob and Roberta Smith) याने काढले आहे. (हे एकाच माणसाचे नाव आहे) हे त्याने टाकून दिलेल्या दोन लाकडी फळ्यांवर रंगवले आहे. बॉबचे वडील दुसऱ्या महायुद्धात शिपाई होते. ते त्याला म्हणत, ‘मेक आर्ट नॉट वॉर, डोंट हेट, ड्रॉ!’ त्याने हे चित्र या ओळी लक्षात राहण्यासाठी काढले असेल? 

तुम्ही ‘गोरिला गर्ल्स’ (Guerrilla Girls) हे नाव ऐकले आहे? हा एक महिला कलाकारांचा ग्रुप आहे, पण या नेमक्‍या कोण स्त्रिया आहेत हे कोणालाच ठाऊक नाही. कारण त्या गोरिला माकडाचा मुखवटा त्या घालतात. कलानिर्मिती ही सर्वांसाठी आहे. म्हणजे स्त्रिया आणि सगळ्या वंशाच्या लोकांसह सर्वांची आहे, असे त्या मानतात. 

ट्रूइसम्‌स  (Truisms) या सिरीजमधली ही एक कलाकृती आहे. जेनी हॉलझरने (Jenny Holzer) १९७० मध्ये काही वाक्‍ये पोस्टरवर मांडून न्यूयॉर्क शहरभर लावली. दैनंदिन नित्यक्रमात मधेच असे काही वाचून विचार करायला लावणारी चित्रे याचे या कलाकृती हे एक उदाहरण असू शकते. असे शब्द, कामावर जाताना, बसमधून पाहिले तर लोक कदाचित एखादा क्षण थांबतील, त्यावर विचार करतील असे तिला वाटे. 

या प्रकाशमान शब्दांची निर्मिती मार्टिन क्रीड (Martin Creed) या कलाकाराने केली आहे. निऑन ट्यूब, अक्षरांच्या वळणात वाकवून ही कलाकृती बनली आहे. ‘चांगले वाटावे म्हणून मी काम करतो. आयुष्य सोपे करण्यासाठी कलाकृती बनवायला मला आवडतात’ असे मार्टिन सांगतो. या इमेजकडे पाहून शांतपणे आयुष्याची मजा घ्यावी असे वाटू शकते. काही जणांना या ओळींमध्ये लपलेला संदेश दिसू शकतो. कलाकृतीचे अनेक अर्थ असू शकतात; आपल्याला काय वाटते हे आपणच ठरवायचे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या