कडक कॉफीची कटू कहाणी

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
 

आपल्या देशात चहा आणि कॉफी ही दोन्ही पेये वेगवेगळ्या कारणांसाठी घेतली जातात. मुख्य करून सकाळी उठल्यावर राहिलेली रात्रीची सुस्ती घालवण्यासाठी कॉफीचे दोन घोटसुद्धा पुरेसे असतात. कुणी विशेष पाहुणे आल्यास त्यांची सरबराई करताना चहाऐवजी कॉफीला प्राधान्य दिले जाते. आजच्या जगात विशेष म्हणजे गप्पा मारायला, निवांत कट्टा जमवायला, अतिविशेष मित्रमैत्रिणींशी अतिविशेष विषयावर सविस्तर बोलण्यासाठी कॉफीचीच साथ लागते. 

दहा पंधरा वर्षांपूर्वी कॉफी प्यायला ठराविक दाक्षिणात्य हॉटेल्स गाठायला लागायची. बहुतेक शहरात आणि छोट्या मोठ्या गावात 'मद्रास कॅफे' किंवा 'मेंगलोर कॉफी हाऊस', 'पूना कॉफी हाऊस', 'बॉम्बे कॅफे' अशा नावांची हॉटेल्स तिथल्या खाण्याच्या पदार्थांपेक्षा या कॉफीसाठी प्रसिद्ध होती. तिथे गेल्यावर येणारा 'ताज्या दळलेल्या कॉफी पावडर'चा गंध आणि त्या कॉफीची चव आजही कित्येकांच्या स्मृतिगंधात रेंगाळत असेल. 

कॉफी पिण्याचे फायदे
मर्यादित स्वरूपात कॉफी प्यायल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, स्फूर्ती येते, सुस्ती तसेच आळस कमी होतो, मेंदूला चालना मिळते, शिवाय मज्जासंस्थेलाही उत्तेजना मिळण्यास मदत होते. 

शास्त्रीय संशोधनानुसार वयस्कर लोकांमध्ये हृदयाचे कार्य सुरळीत करण्यास कॉफी उपयुक्त ठरते असे जर्मनीमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. हृदयाच्या स्नायूंच्या पेशी (कार्डिओव्हॅस्क्युलर सेल्स) चांगल्या राहायला कॉफीचा उपयोग होतो असे सांगून जर्मनीमध्ये 'कॉफी प्या' असा प्रचार करणारी मोठी चळवळही सुरू करण्यात आली होती.

कॉफी प्यायल्याने यकृताचा सिरोसिस होण्याची शक्यता कमी असते. रोज एक कप कॉफी प्यायल्यास ही शक्यता २२ टक्क्यांनी कमी होते, तर दोन कप कॉफी प्यायल्यास ४३ टक्के कमी होते.

कॉफीच्या प्रमाणबद्ध सेवनाने मधुमेह टाइप-२ होण्याची शक्यता कमी होते, असे  डेन्मार्क येथे करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये सिद्ध करण्यात आले होते. कॉफीमध्ये कॅफीनशिवाय असणारे काही घटक याकरता उपयुक्त ठरतात असे त्यात दिसून आले होते.

कडक कॉफी
दोन पिढ्यांपूर्वीच्या हॉटेल कट्ट्यांची जागा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी काबीज केल्या. घसा आणि जिभेप्रमाणे डोळ्यांनाही सुखावणारे कॉफीचे असंख्य थंड आणि गरम प्रकार पाश्चात्त्य संस्कृतीतून आपल्या रस्त्यांवर आले. त्या कॉफीची चव चाखणे हा एक आजच्या नव्या जीवनशैलीचा अविभाज्य भागच होऊन गेला. केवळ तरुणच नव्हे तर सर्वच वयाच्या लहानथोरांना, उच्चवर्गीयांना आणि मध्यमवर्गीयांचे पाय या पाश्चिमात्य कॉफीशॉपकडे वळू लागले. आपण अमुक तमुक कॉफीशॉपला भेटू हे सांगणे पाहता पाहता एक प्रतिष्ठेचे लक्षणच झाले. या कॉफी पिण्याच्या सवयीला जनमान्यता मिळण्यासाठी दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक कॉफी डे म्हणून जगभरात साजरा केला जातो.

तसे पाहू गेल्यास, भारताच्या दक्षिणेकडील राज्यात कॉफी आणि उत्तरेत चहा, ही रोजची आवडती पेये आहेत. पण चेन्सच्या स्वरूपात सर्वत्र पसरलेल्या या नव्या कॉफीशॉपचा फंडा जरा वेगळाच असतो. ज्यांना कॉफीची सवयच नाही अशांना कॉफी प्यायला लावायची आणि तीसुद्धा खूप जास्त प्रमाणात कॅफीन असलेली अशी अतिशय कडक अशा स्वरूपातली. तरुणांना आकर्षित करणारी नावीन्यपूर्ण इटालियन, फ्रेंच किंवा इंग्लिश नावे, त्यात क्रीम्स, चॉकलेट, दूध, साखर आणि कॉफी यांची हरतऱ्हेची कॉम्बिनेशन्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी दिलखेचक जाहिरातींचा कौशल्यपूर्ण मारा. मास मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे वापरून जास्तीत जास्त लोकांच्या घशाखाली ही कॉफी उतरवायची. या पद्धतीने एकविसाव्या शतकात असंख्य देशी आणि विदेशी कॉफीशॉप्स भारतातल्या मोठ्या आणि अगदी छोट्या शहरातसुद्धा स्थापन झाली आणि बघता बघता आमच्या तरुणांच्या रोजच्या कट्ट्याचा हिस्सा झाली.

या कडक कॉफीवाल्यांचे एक सोपे गणित आहे. भारतातले कॉफीसेवन माणशी फक्त ९० ग्रॅम असूनही भारतातली या कॉफीशॉप्सची बाजारपेठ २५० कोटी रुपयांची आहे आणि दरवर्षी ती ३० टक्क्यांनी वाढत जातेय. ब्राझीलसारख्या देशात हे प्रमाण माणशी ४.८ किलो आहे; मग हा फरक जर भरून काढला तर केवढा फायदा होईल, यासाठी हा सारा खटाटोप.

याशिवाय कुठल्याही मॉलमध्ये गेलात, तर एनर्जी ड्रिंक्स या नावाखाली अनेक कॅफीनयुक्त परदेशी पेये आणि ती नियमितपणे घेणारे असंख्य तरुण आढळतात. कारण कॉफीप्रमाणेच, पराकोटीचा उत्साह निर्माण करणारी ही पेये घेणे या नव्या जीवनशैलीच्या प्राथमिक पायऱ्या आहेत.

हे सगळे संस्कार ज्या अमेरिकेतून आले, त्यांच्या न्यूयॉर्क राज्यामध्ये या अति-कॉफी सेवनाबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत खूप गवगवा झाला. वर्षाला पाच हजार तरुण कॉफी सेवनाने अत्यवस्थ स्वरूपात रुग्णालयात दाखल होऊ लागले. त्यामुळे त्यांनी २००९ मध्ये एक कायदा केला, की प्रत्येक कॉफीशॉपने त्यांच्या प्रत्येक कॉफीमध्ये किती कॅफीन आणि किती कॅलरीज आहेत, हे जाहीर करावे आणि त्याचा तक्ता प्रत्येक कॉफीशॉपमध्ये लावावा. 

यामधून असे लक्षात आले की वेगवेगळ्या कंपन्यांच्या कॉफीच्या प्रत्येक कपातून २०० ते ५०० कॅलरीज अतिरिक्त ऊर्जा मिळत होती. आपल्या साध्या घरगुती कपभर कॉफीमध्ये फार तर ०.५ ते १ मि.ग्रॅ. कॅफीन असते; तर या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कॉफीत कॅफीनचे प्रमाण कपामागे ९ ते ५४ मि.ग्रॅ. म्हणजे सुमारे २० ते ५० पट एवढे जास्त सापडले.  

न्यूयॉर्कमधील उदाहरणावरून जगभरातील कॉफीशॉप्सच्या व्यावसायिक उत्पादनांची सखोल पाहणी झाली. १४ ऑक्टोबर २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक पत्रक काढून कडक कॉफी, एनर्जी ड्रिंक्स आणि तत्सम उत्साहवर्धक पेयांमुळे जगातील तरुणांवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जाहीरपणे चिंता व्यक्त केली. या पेयांमध्ये कॅफीन, अनावश्यक प्रमाणात नायसिन, पायरीडॉक्सीन अशी जीवनसत्वे, टॉरिन, जिन्सेंग, ग्वाराना अशा शरीराला धोकादायक आणि घातक घटकांचा समावेश असतो. 

या पाहणीनुसार जगातील तब्बल ६८ टक्के तरुण, ३० टक्के मध्यमवयीन आणि १० वर्षांखालील १८ टक्के छोटी मुले या उत्साहवर्धक पेयांच्या अधीन आहेत. 

अति कॉफी पिण्याचे तोटे
 कमी प्रमाणात नेहमीची कॉफी प्यायल्याने आरोग्याला विशेष धोका नसतो. कॅफीनमुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढून सुरुवातीला उत्साह वाढतोही; पण अशा व्यापारी पेयातून मोठ्या प्रमाणात आणि नियमितपणे शरीरात अतिप्रमाणात कॅफीन गेल्यावर, छातीत धडधडणे, रक्तदाब वाढणे, निद्रानाश, डोके दुखणे, गरगरणे, उलट्या, मळमळ होणे असे त्रास होतात. तसेच सतत खूपवेळा कॉफी घेतल्याने वजनवाढ, मधुमेह अशा विकारांचा संभव वाढतो.

 एका पाहणीनुसार कॅफीनचे व्यसन असलेल्या मुलांमध्ये वाहन खूप वेगाने चालवणे, भांडणे, मारामाऱ्या करणे वगैरे धोकादायक वर्तनांचा प्रादुर्भाव आढळतो.   

 जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होते. त्यासाठी एक कप कॉफी प्यायल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासानंतर दोन कप पाणी प्यायला हवे. दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्रत्येक व्यक्‍तीने प्यायला हवे असते. त्यात कॉफी पिणाऱ्यांना आणखी एक-दोन ग्लास पाण्याची गरज असते. 

 कॉफीमुळे तरतरीत वाटते, पण व्यक्‍ती सजग होते. पण अन्नातून जशी शरीराला लागणारी आवश्यक ऊर्जा उष्मांकाच्या (कॅलरीज) स्वरूपात लाभते तशी ऊर्जा कॉफीतून मिळत नाही. साहजिकच जेवण टाळून कॉफी पिणे हा अशी ऊर्जा मिळवणे हा कायमस्वरूपी मार्ग नक्कीच नसतो. अशी ऊर्जा किंवा उत्साह मिळवण्यापेक्षा रक्‍तातील साखरेची पातळी योग्य राखण्यासाठी दर दोन तासांनी आरोग्यकारी पदार्थांचा समावेश असलेला आहार घ्यावा. दिवसभरात एक कप कॉफीदेखील पुरेशी ठरू शकते. 

जेवणाच्या वेळेस कॉफी प्यायल्याने भूक मरते. त्यामुळे अशी अवेळी कॉफी पिऊ नये. पाश्चात्त्य संस्कृतीत भोजनोत्तर कॉफी पिण्याचा परिपाठ असतो. मात्र यामुळे पचनावर विपरीत परिणाम होतो. पोटातील आम्लता वाढते आणि अपचन, करपट ढेकरा येणे असे त्रास होऊ शकतात. 

नव्या युगातल्या या डागाळलेल्या आरोग्यशैलीमध्ये बदल करावा अशा हेतूने जागतिक आरोग्य संघटनेने कॉफीबाबत काही मननीय सूचना केल्या आहेत -

  • कॉफीसह प्रत्येक एनर्जी पेयांवर त्यातील घटकांचा आणि त्यांच्या प्रमाणांचा उल्लेख पाहिजे. 
  • जगातील सर्व देशांनी या पेयातील घटकांचे आरोग्याला बाधक ठरणार नाही एवढेच कमाल प्रमाण ठेवावे आणि याबाबतीत कडक धोरण अवलंबावे. 
  • या पेयांबाबत मोठ्या स्वरूपात जनजागृती आणि लोकशिक्षण करावे. 
  • कॉफी तसेच अशी इतर पेये करणाऱ्या कंपन्यांनी तरुणांच्या जिवाला घटक ठरतील असे घटक अतिरिक्त प्रमाणात वापरू नये.
  • सर्वसामान्य नागरिकांनी कॉफी आणि तत्सम उत्साहवर्धक पेयांचे धोके जाणून घ्यावेत आणि त्याचे अतिरिक्त सेवन टाळावे.

मेंदूचा तल्लखपणा वाढावा, म्हणून माणसाच्या तल्लख मेंदूने अशी असंख्य उत्तेजक पेये निर्माण केली आहेत; पण त्यांच्या वापरावर त्याच मेंदूतल्या बुद्धीचा वापर करून आवर घालणे हे बदलत्या आरोग्यशैलीत सर्वांनाच साधायला हवे.

संबंधित बातम्या